Home महामुंबई पथकर आकारा मुंबई खड्डेमुक्त झाल्यावरच

पथकर आकारा मुंबई खड्डेमुक्त झाल्यावरच

0

मुंबईतील उड्डाणपूल व रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल टॅक्स व पथकराची वसुली करू नये, अशी मागणी भाजपने केली आहे.

मुंबई- मुंबईतील महापालिका इतर प्राधिकरणांच्या रस्ते व उड्डाणपुलांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मुंबईत प्रवेश करताना आकारला जाणारा प्रवेशकर (टोल टॅक्स) हा उड्डाणपुलांच्या देखभालीसाठी वसूल केला जातो. मुंबईकरांकडून मालमत्ताकरापोटी पथकर वसूल केला जातो. मात्र एवढे करूनही त्यांना चांगल्या दर्जाचे रस्ते दिले जात नाहीत. त्यामुळे मुंबईतील उड्डाणपूल व रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत या कराची वसुली करू नये, अशी मागणी भाजपचे महापालिका गटनेते दिलीप पटेल यांनी स्थायी समिती अध्यक्ष व महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पश्चिम व पूर्व उपनगरातील प्रवेशद्वारावरच टोल भरून प्रवेश करता येतो. मुलुंड, ऐरोली, दहिसर व आरे कॉलनी भागातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी टोल आकारला जातो. युती सरकारच्या काळात मुंबईत बांधण्यात आलेल्या ५५ उड्डाणपुलांचा बांधकाम व देखभाल खर्च वसूल करण्यासाठी टोल आकारला जातो. तर मुंबईकरांच्या मालमत्ता करातून पथकर वसूल केला जातो. मात्र ज्या उद्देशाने हा कर आकारला जातो, त्यानुसार महापालिका अथवा राज्य सरकारकडून नागरिकांना चांगले रस्ते पुरवले जात नाहीत.

मुंबईतील रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी महापालिकेची असून द्रुतगती महामार्ग व उड्डाणपुलाची जबाबदारी अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाची आहे. मात्र कोणीच आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. परिणामी मुंबईकरांना खड्ड्यांतूनच मार्गक्रमण करावे लागत आहे, असा आरोप भाजपचे पालिका गटनेते दिलीप पटेल यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत मुंबईच्या रस्ते व उड्डाणपुलांवरील खड्डे दुरुस्त होत नाही तोपर्यंत पथकर व टोल कर आकारला जावू नये, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून त्यांनी केली आहे.

[poll id=”359″]

खड्ड्यांना पालिकाच जबाबदार

मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना पालिकाच जबाबदार आहे. पालिकेतर्फे करण्यात येणा-या उपाययोजना कुचकामी आहेत. मागील तीन वष्रे पालकमंत्री म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. पालिकेचा कारभार सुधारत नसल्याने यंदा पाहणी केलीच नाही. – जयंत पाटील, पालकमंत्री मुंबई

महापालिकेला मिळत असलेला पथकर

वर्ष कराची रक्कम
२०१०-११ ३३२.८३ कोटी
२०११-१२ ४३८.७३ कोटी
२०१२-१३ २८६.९२ कोटी
२११३-१४ ५५०.०० कोटी

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version