Home प्रतिबिंब परीक्षा ‘एन्जॉय’ करूया!

परीक्षा ‘एन्जॉय’ करूया!

2

माणसाचे आयुष्य वेगवेगळ्या परीक्षांमध्येच खर्ची जात असते. रोजचे जगणे हीच एक परीक्षा असते. त्यामुळे कुठल्याही परीक्षांचे ओझे उरावर घेऊन ताणतणावात वावरण्यापेक्षा जीवनातील सा-या परीक्षा आपण ‘एन्जॉय’ करण्याचे ठरवले तर जगणे आनंददायी होऊ शकेल.

सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. ज्या घरात ही परीक्षा देणारा परीक्षार्थी आहे, त्या बहुतांश घरातील वातावरण सामसूम असेल. नेहमीचा गजबजलेपणा कोसो दूर पळाला असेल. टीव्ही २४ तास बंद. घरात शांतता. मुलाच्या अभ्यासासाठी पालकांचे शेडयुल बदललेले. काहींनी तर खास सुट्टयाही घेतल्या असतील. पाल्याला कुठलीही अडचण येऊ नये म्हणून काळजी वाहिली जात असेल. आपला मुलगा बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावा म्हणून हे सारे चालले असेल. असेच वातावरण दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या घरात असेल. आपल्या पाल्याविषयी मायबाप जागरूक झालेत, होताहेत, ही स्वागतार्ह बाब असली तरी, त्या परीक्षेचे एवढे ओझे पांघरायचे का? हे आपण सा-यांनी ठरवले पाहिजे.

काही घरांमध्ये तर वर्षभर मुलाचे किंवा मुलीचे दहावी-बारावीचे वर्ष आहे, म्हणून सांगितले जाते. आपल्या मुलाच्या दहावी-बारावीला असण्याचा पालकांच्या डोक्यावर या सांगण्यातून एक ताण दिसत असतो. अभ्यास मुलाला करायचा आहे. परीक्षा त्यालाच द्यायची आहे. ताण मात्र पालकांनी वाहायचा आहे. एवढी काळजी वाहणा-या घरामधील मुलांनाही त्या काळजीचे ढग व्यापून टाकतात. त्या ढगांमुळे वर्षभराच्या आनंदाचा विचका होऊन जातो. लहानपणापासून ज्या मुलाला हसत-खेळत अभ्यास करायचे संस्कार देणा-या घरात, दहावी-बारावीच्या वर्षी मात्र अभ्यासात गुंतवून ठेवण्याची ही पद्धत मुळातच चुकीची वाटते. एवढे सारे करूनही, मुलाला एखादा पेपर कठीण वाटला, पास होण्याची शक्यता नसली तर त्याच्या मनात नैराश्य घर करते. मनात वेगवेगळे विचार गर्दी करत राहतात. मनातल्या मनात तो स्वत:शीच झगडत राहतो. नापास झाले तर काय होईल, या भीतीने तो आतल्या आत थरथरतो. त्याच्या अंतर्मनातले भाव पालकांनी ओळखले पाहिजेत. पेपर कठीण गेल्याचे शल्य त्याला वाटणार नाही, अशा पद्धतीने त्याला धीर दिला पाहिजे, हे पालकांच्या गावीही नसते. त्यामुळे परीक्षार्थी मुलाच्या आत्महत्येसारख्या घटना घडत असतात. हे रोखण्यासाठी दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने घराघरांतील भयांकित वातावरणाचे ढग दूर करण्याची गरज आहे.

आपले आयुष्य फुलवण्यासाठी, ते रंगवण्यासाठी अभ्यासक्रमाची पुस्तके तोकडीच असतात. अवांतर वाचन, अवांतर लेखन, संवाद, खेळांसोबतच वेगवेगळ्या कला ख-या अर्थाने आपले जगणे समृद्ध करत असतात. त्याकडे पालक आणि मुलेही दुर्लक्ष करतात. एखाद्या मुलाला दहावी-बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील, पण तो एखाद्या खेळात तरबेज असेल, गाणी गात असेल, चित्रात रमत असेल, नृत्य करत असेल, अभिनयाची आवड असेल किंवा त्याला उपकरणांत रमायला आवडत असेल तर ते त्याची बलस्थाने आहेत, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. त्यानुसार त्याला त्याच्या क्षेत्रात मोठं होण्याची मुभा दिली पाहिजे. त्याच्यात असलेले कलाभान किंवा क्रीडाज्ञान इतरांकडे नसते. दहावी-बारावीत शंभरपैकी शंभर गुण मिळवणाऱ्यांनाही ते सहजासहजी जमत नसते. ते आपल्या मुलाला जमत असेल तर त्याच्याकडून अशा परीक्षेत खूप गुणांची अपेक्षा करणे म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध, त्याच्या उरावर ओझे टाकणे होय. अशा ओझ्यांनी त्याच्यातला कलावंत, खेळाडू, गायक, कवी, चित्रकार आपण मारून तर टाकत नाही ना? या प्रश्नाचे उत्तर पालकांनी शोधले पाहिजे.

अभ्यासक्रमबाहय उपक्रमात रमणा-या मुलांचे विश्व वेगळे असते. अनेक पालकांना त्यांच्यातल्या त्या गुणांची पारखच करता येत नसते. जे पारख करतात, ते त्याच्या स्वभावानुसार त्याला किंवा तिला घडवतात. एखादा मुलगा लहानपणीच बोलण्यात तरबेज असेल, तर त्याच्या त्या बोलण्याला ते आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्याची शब्दसंपदा वाढवतात. त्या संस्कारातून उद्याचा उत्तम निवेदक तयार होतो. नट होतो. अभिनेता घडत असतो. एखादी मुलगी गाण्यावर ताल धरत असेल तर तिच्या तालाचे संदर्भ ओळखले पाहिजे. बहुतांश मुलांमध्ये असे गुण लहानपणी दिसतात, पण त्याकडे दुर्लक्ष होते, अभ्यासात गुंतवले जाते. त्यात काही टिकतात. काही कंटाळा करूनही जेमतेम गुण कमावतात. काही वारंवार नापास होतात. त्यांच्या नापास होण्यामागे फक्त अभ्यास अपुरा पडला एवढेच कारण नसते, त्याच्या घडण्यात आलेले अडथळेही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्याला ज्यात रमायचे आहे, त्यात त्याला रमू दिले तर तो पास होण्याइतपत अभ्यास नक्कीच करतो. कारण तो विचलित नसतो.

तो समाधानी झालेला असतो. तो कुठल्याही दडपणात नसतो. मुक्त आणि स्वच्छंदपणे तो त्याला आवडणा-या खेळात, कलेत रमल्यानंतर तो तृप्त होतो. तृप्त मन कुठलीही गोष्ट मनापासून करते. अभ्यास हा तृप्त मनाने केल्यास तो आनंद देणारा ठरतो. आपला पाल्य तृप्त आहे का? याचा विचार न करता, त्याला अभ्यासाला जुंपले तर तो अभ्यासक्रमाची पुस्तके वाचेल, पण रात्रंदिवस वाचूनही त्याच्या लक्षात मात्र काहीच राहणार नाही, याचे भान पालकांनी ठेवायलाच हवे.

परीक्षा फक्त दहावी-बारावीपुरती मर्यादित नाही. आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या परीक्षेला आपल्याला सामोरे जावेच लागते. त्या वळणांचा अंदाज चुकला तर आपण परीक्षेत नापास होत असतो. दहावी-बारावीची परीक्षा तर साचेबद्ध अभ्यासक्रमावर आधारित असते. ही परीक्षा पास करण्याचे आव्हान पेलताना, नापास होण्याचे भय झटकून त्या परीक्षांना हसत-खेळतच पुढे जाऊया. हसत-खेळत, रमतगमत परीक्षा देऊन आपल्या आयुष्याचा प्रवास सुखकर करूया!

2 COMMENTS

  1. या लेखाने परीक्षार्थींना नक्कीच ‘दिलासा’ मिळाला असेल. लेखाला साजेसे प्रदीप म्हापसेकर यांनी काढलेले रेखाचित्रही खूपच ‘बोलके’ आहे!

  2. The observations and thoughts expressed in this article are very relevant to the well-being of students in the age groups of 13 to 16 years. Parental, Social, and Peer pressure, I feel, are the main ‘spoilsports’ for many of these school and junior college level kids. Again a very well written from the PRAHAAR team. I wish this article must be reprinted either at the start of every academic year or at the exam-result declaration time, in Collage, Chottam Mottham or perhaps even in Umang.I would have been happier typing this comment in Marathi, but I am not yet updated with the Unicode Keys Support yet, hence please bear with me. Thanx once again, Shri Mahendra Suke and the PRAHAAR team.

Leave a Reply to JAIDEEP SAWANT Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version