Home कोलाज पाणी जीवन नव्हे मरण

पाणी जीवन नव्हे मरण

1

‘मुंबईत दोन दिवसाआड पाणी येणार’, ‘ठाण्यात एक दिवसाआड पाणी येणार,’, ‘पुण्यात एक दिवसाआड पाणी येणार..’ महानगरे असलेल्या या शहरांमध्ये पाणीकपात होणार म्हटल्याबरोबर वृत्तपत्रांची ती ‘मुख्य बातमी’ होते.

‘मुंबईत दोन दिवसाआड पाणी येणार’, ‘ठाण्यात एक दिवसाआड पाणी येणार,’, ‘पुण्यात एक दिवसाआड पाणी येणार..’ महानगरे असलेल्या या शहरांमध्ये पाणीकपात होणार म्हटल्याबरोबर वृत्तपत्रांची ती ‘मुख्य बातमी’ होते. वाहिन्यांवर लगेच पाणी तज्ज्ञ, पत्रकार, आमंत्रित केले जातात आणि हे पाणीकपातीचे ‘गंभीर संकट’ याची चर्चा सुरू होते.

शहरांत एक दिवस वीज गेली तरी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे वृत्तपत्र ‘मुंबई इन डार्क’ अशा मथळयाखाली बातमी छापतं. शहरांचे हे असे अतोनात महत्त्व आहे की, इथली कुठचीही बातमी लगेच पाचपट मोठी बनते आणि चर्चेत येते. आताही मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधले पाणी २६६ दिवस पुरेल, असा अंदाज आहे.

वर्षाचे दिवस ३६५ आहेत, म्हणजे १०१ दिवस पाणीटंचाई आहे. ती भरून काढण्याकरिता दोन दिवसांआड पाणी द्यावे, असा पर्याय आहे. शहरात पाणीटंचाईची बातमी मोठी होते; पण शहरा-शहरांमध्ये फरक बघा. मुंबई, ठाणे, पुणे ही मोठी शहरे आहेतच; पण औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नगर, सोलापूर ही शहरेही महानगरपालिकांची शहरे आहेत.

जालना, बीड, परभणी ही जिल्हा ठिकाणे आहेत. लातूरला महापालिका झाली असली तरी ते प्रामुख्याने जिल्हा ठिकाणच आहे. नांदेडलाही महानगरपालिका आहे. या सर्व त्या मानाने महाराष्ट्रातल्या मोठया शहरांमध्ये पाच ते आठ दिवसांनी पाणी येत आहे, त्याची बातमी होत नाही. जालना शहरात तीस दिवसांनी पाणी येते, त्याची बातमी होत नाही.

आता लोकांना हे अंगवळणी पडलेले आहे. त्या मानाने जिल्हा ठिकाणे आणि महानगरपालिकांची शहरे इथे ही स्थिती. तालुका पातळीवर परिस्थिती आणखी वाईट, खेडयापाडयात त्याहून भयंकर; पण त्याची चर्चा करायला मुंबई, पुण्यातल्या वृत्तपत्रांजवळ वेळ कुठे आहे आणि जागा कुठे आहे? आम्ही शहरापुरतेच पाहणार. खेडी ओस पडली काय आणि तिथली लोकं तडफडली काय? आमचे काही घेणेदेणे नाही, अशी तटस्थता आज आपोआप निर्माण झालेली आहे. परिस्थिती अतिशय बिकट आहे.

ग्रामीण भाग होरपळत आहे. रोजगार नाही, कामे नाहीत, शेतात पीक नाही, घरात धान्य नाही. रोजगार हमीची कामे नाहीत आणि मुख्य म्हणजे प्यायला पाणी नाही. गुरे कशी वाचवायची, हा प्रश्न आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली. त्याचे उत्तर शास्त्रीयदृष्टया शोधले पाहिजे. पहिली गोष्ट अशी की, पावसाचे प्रमाण कमी होण्याची कारणे शोधायला हवीत.

पाऊस आकाशातून पडतो, हे भौगोलिक सत्य आहे; पण आकाशात पावसाची फॅक्टरी नाही. पृथ्वीवरून जेवढे बाष्पीभवन होईल त्याचे ढगात रूपांतर होऊन वर गेलेला पाऊस खाली कोसळत राहील. बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी कमी होत गेले की, पावसाचे प्रमाण कमी कमी होणार. बाष्पीभवन का कमी होत आहे? कारण बाष्पीभवन होण्यासाठी संथ पाणीसाठयाची जी गरज आहे, ते संथ पाणीसाठे झपाटयाने उपसले जात आहेत. ते उपसले का जात आहेत? तर पाण्याची गरज वाढली. गरज का वाढली? तर लोकसंख्या वाढली.

१९६० सालचा महाराष्ट्र तीन कोटी लोकसंख्येचा होता. २०१५ सालचा महाराष्ट्र ११ कोटी लोकसंख्येचा आहे. ८ कोटी लोकसंख्या वाढली. म्हणजे आठपट पाऊस वाढला पाहिजे, असे गणित थोडेच लावता येते. पाऊस वाढण्याचे प्रमाण कोणाच्याही हातात नाही. शहरे वाढत आहेत. शहरांची पाण्याची गरज वाढत आहे. बांधकामे वाढत आहेत. बांधकामांना पाण्याची गरज वाढत आहे. ज्या एका मुख्य कारणाने पाऊस खेचला जातो, ती जंगले तुटत आहेत.

जिथे जंगल जास्त तिथे पाऊस जास्त. मनुष्य वस्ती वाढली की, झाडे आपोआप तुटतात. एकाच वेळी झाडे तोडणे आणि पाऊस कमी होणे, या एकमेकांत गुंतलेल्या प्रक्रिया आहेत. शिवाय भूगर्भामध्ये पाण्याचे जे नैसर्गिक साठे आहेत त्यावरही माणसाने हल्ला केलेला आहे. जमिनीत जास्तीत जास्त खोल जाऊन पाणी उपसायला सुरुवात झाली. त्यामुळे नैसगिर्क स्त्रोत आटत गेले आणि ते आटल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खाली गेली.

आता तर महाराष्ट्रातल्या ९० टक्के खेडय़ांतल्या विहिरी कोरडया ठाक पडलेल्या आहेत. नद्या, नाले, ओढे कोरडे ठाक आहेत. वरून कडाडणारे ऊन असले तरी बाष्पीभवन व्हायला पाणीच नाही. परिणामी जशी लोकसंख्या वाढेल, तस तसे पाणी अधिक लागेल. जसे पाणी अधिक लागेल, तसा उपसा वाढेल. जसा उपसा वाढेल, तशी भूगर्भातील पाण्याची पातळी आणखी खाली खाली जाईल आणि पुढच्या काही वर्षात सगळी जमीन रखरखीत होईल. जमिनीचा ओलावा संपेल. आकाशातून पडणारा पाऊस कमी होत जाईल. या दुष्टचक्रात मानवजात सापडली आहे.

आता याला उपाय काय? उपाय असा की पाणीतज्ज्ञांची फार मोठी गरज नाही. सुरुवात स्वत:पासून करा. आपण किती पाणी फुकट घालवतो, याचा हिशोब स्वत: करा. प्रत्येक कार्यालयात भरभरून ग्लास टेबलावर ठेवले जातात. त्यातले अध्रे पाणी कोणीही पीत नाही. ग्लासातले अध्रे पाणी फेकून दिले जाते. हा हिशोब काढला तर करोडो लीटर पाण्याची फेकाफेकी आपण सहज करतो.

घरात आज भरलेल्या कळशी, हंडा किंवा पिंप किंवा अलीकडच्या काळातल्या प्लॅस्टिकच्या बादल्या सोर्स म्हणून भरून ठेवून द्यायच्या आणि आज तेवढे पाणी संपले नाही की, ‘शिळे पाणी कशाला वापरा,’ असे म्हणत अर्धे हंडे, अर्धी घागर किंवा अध्रे पिंप हात घालून घुसळायचे आणि ते पाणी फेकून द्यायचे. असे ओतून टाकले जाणारे पाणी लाखो लीटरमध्ये आहे. म्हणून पाण्याची बचत माणसाच्याच हातात आहे. मानवजातीवर आलेल्या या संकटामधून मानवच मार्ग काढू शकतो. फक्त विवेक हवा.

इथून पुढे पाणीटंचाई अधिक तीव्र होत जाणार आहे. लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात पाऊस पडला पाहिजे, असा कायदा करून पाऊस पडणार नाही. हजार वर्षापूर्वी पडणा-या पावसाचे गणित आता उपयोगी पडणार नाही. कारण पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक वातावरण मानवानेच दूर करून टाकले. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढळण्याला माणूसच कारण आहे. तो समतोल ढळला की, निसर्गाची शिक्षा माणसालाच मिळणार आहे.

अनेक विषयांचा गंभीर विचार आपण करत नाही. त्सुनामी आली की, चार दिवस त्याची चर्चा होते, वृत्तपत्रं मोठमोठी हेडिंग देतात. त्सुनामीचे मोठमोठे फोटो छापले जातात. त्सुनामीने केलेली तबाही हा पुरवण्यांचा विषय होतो. त्सुनामी का येते? गेल्या काही वर्षात समुद्र हटवून तिथे जमीन मिळवण्याचा प्रयत्न माणूस करतो आहे.

हटवलेला समुद्र कुठे तरी फुटणार आहे की, नाही. तो कुठे तरी उफाळणारच. शास्त्रज्ञ असे सांगतात की, एक हजार चौरस किलोमीटरमध्ये समुद्र हटवला तर पाच हजार चौरस किलोमीटरच्या परिसरात तो कुठेही फुटू शकतो आणि अमावस्या पौर्णिमेच्या मोठया उधाणाच्या वेळी त्याचे प्रताप तो दाखवू शकतो.

बॅक बे रिक्लेमेशन येथे १९७२ साली समुद्र हटवून सहाशे चौरस किलोमीटर परिसरात जमीन निर्माण केली आणि तिथे नव्याने द्वारका उभारली गेली. चाळीस वर्षानंतर चेन्नईला आलेली त्सुनामी ही अशा समुद्र हटवण्यातूनच आलेली आहे. निसर्गाला रोखणे मानवाला अशक्य आहे. कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) यांनी ६० वर्षापूर्वी एक कविता लिहिली. त्या कवितेत सांगितले होते की,

‘हटून हटतो काय सागर  
हटेल एकीकडे
उफाळेल तो दुसरीकडूनी
गिळूनी डोंगर-कडे
ज्वालामुखीला बघता लिंपू
काय कल्पना खुळी
तोच अनावर उद्यास होईल
तुम्हास शहाण्णव कुळी’

यशवंतांनी साठ वर्षापूर्वी जे सांगितले त्याचा प्रत्यय आता अतिशय वेगाने येत आहे. निसर्गाच्या विरुद्ध मनुष्य जेवढा वागेल तेवढेच त्याचे परिणाम माणासला भोगावे लागणार आहेत.

महाराष्ट्रातल्या उद्याच्या पाणीटंचाईचे संकट हे पुढच्या पंचवीस-तीस वर्षात अत्यंत गंभीर होणार आहे. शिवाय ‘ज्या जिल्हयात पाणी आहे’ त्या जिल्हयातल्या नद्यांचे पाणी दुस-या जिल्हयात द्यायला आता तो जिल्हा तयार नाही. त्यामुळे ‘पाण्यावरून युद्ध पेटवू’ अशी भाषा सुरू झालेली आहे. आपली घोषणा आहे की, ‘मेरा भारत महान’ पण व्यवहारात ‘भारतातली माणसे मनाने लहान’ अशी स्थिती झालेली आहे.

पाकिस्तानने आक्रमण केले तर त्या विरुद्ध लढायला आम्ही तयार आहोतच; पण ‘अ’ जिल्हयातले पाणी ‘ब’ जिल्हयाने उचलले तरी त्या जिल्हयातल्या लोकांशीही आम्ही लढायला तयार आहोत. ‘अ’ म्हणजे पाहिजे तर अहमदनगर समजा आणि ‘ब’ समजायचे असेल तर बीड म्हणा. आपल्यापुरतेच प्रत्येक जण पाहतो आहे. त्यामुळे ज्या भागात विपूल पाणी आहे, ते पाणी ‘लिफ्ट’ करून दुष्काळी भागाला पोहोचवायचे म्हटले तर तशी योजना अंमलात आणताना निसर्गाची अडचण येणार नाही.

माणसाचीच अडचण येईल. पुढच्या पन्नास वर्षात पाऊस आताच्या प्रमाणात अध्र्याने कमी होणार आहे; पण २०५०ची भारताची लोकसंख्या २०० कोटींच्या आसपास जाईल आणि महाराष्ट्र २० ते २२ कोटींवर जाईल. तेव्हा लागणारे पाणी, तिथपर्यंत तुटणारी जंगले, तिथपर्यंत वाढणारी लोकसख्ंया, तिथपर्यंत उभी राहणारी काँक्रीटची जंगले, या सगळयाचा विचार केला तर पुढचे संकट हे ‘पाणीसंकट’ आहे. निसर्गाशी तुम्ही युद्ध करू शकणार नाही.

पाऊस पडला नाही म्हणून आभाळात ढगांवर चाल करून जाता येणार नाही आणि म्हणून शांतपणे चिंतन करून कायमस्वरूपी योजना आखणे, यात शहाणपण दिसणार आहे. तसा विचार करण्याची कोणाची तयारी दिसत नाही. मध्य आशियामध्ये दोन-तीन इंचापेक्षा जास्त पाऊस पडत नाही. सगळीकडे रखरखीत आहे. तिथेही माणसेच आहेत. त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी बुद्धिवादी आहोत; पण त्यांच्या अल्पबुद्धीने ते हातावर घडी घालून न बसता त्यांनी समुद्राच्या खा-या पाण्याचे गोडे पाणी करून दाखवले. आपल्याला असे पर्याय शोधून काढावे लागतील. १९८० साली

बॅ. अंतुले यांनी हा पर्याय सुचवला होता. त्यावेळी पंधरा हजार कोटी रुपये खर्च येणार होता; पण तेव्हा अंतुले हे सगळय़ांचे ‘टार्गेट’ होते. म्हणून त्यांच्या चांगल्या योजना मातीत घालण्यात गोविंदापासून माधवापर्यंत सगळे सरसावले आणि त्यांना बदनाम केले. मराठी पत्रकारिता ही अशी भरकटते की, मग ‘बळी राजालाही बोगस’ ठरवले जाते आणि म्हणून येणा-या दिवसातली संकटे भीषण आहेत हे दिसत असताना हंडे, दोन हंडे पाणी कसे मिळेल, या प्रश्नाची जुजबी उत्तरे मिळवून हा प्रश्न सुटेल, असे समजणे हा वेडेपणा ठरेल.

ज्या भागात मुबलक पाणी आहे आणि गरजेपेक्षा अतिरिक्त पाणी आहे त्या कोकणातला प्रत्येक ओढा आणि नदी अडवण्याचा कार्यक्रम हातात घेतला असता तर हे पाणी फिरवता आले असते. पाण्याची नासाडी थांबवणे, हे तर निश्चितच आपल्या हातात आहे. या प्रश्नात राजकारण न आणता ‘मानवजातीवरचे उद्याचे भीषण संकट’ असे त्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. या उपाययोजना दोन प्रकारच्या हव्यात.

एक तातडीच्या म्हणजे काम चलावू आणि दुसरी दीर्घकालीन. म्हणजे लांब पल्ल्याच्या. इथून पुढे आणखी एक धोका लक्षात घ्या. पूर्वी सर्व गावे नद्यांच्या काठी वसली होती ती पाण्यासाठी. गाव म्हटला की, नदी असणारच किंवा जवळपास तरी असणार. आता गंगेपासून कुठलीही नदी घ्या. या नद्या गावातल्याच लोकांनीच घाण करून टाकल्या. गंगा आणि यमुनेचे सोडूनच द्या. कोकणातल्या बहुसंख्य नद्या केमिकल उद्योगांनी नासवून टाकलेल्या आहेत.

रोहयाची ‘कुंडलिका’ घ्या, महाडची ‘गांधारी’ घ्या, माणगावची ‘काळ’ घ्या. कर्जतची ‘उल्हास’ घ्या. या सगळ्या नद्यांचे पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. ज्या नद्या त्या त्या गावाची आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीची पाण्याची गरज भागवत होत्या. तेच पाणी आम्ही काठावर राहणा-या गावकऱ्यांनी खराब करून टाकले आणि उद्योगांनी नासवून टाकले. पाण्याचा मुख्य आधार नदी होता. त्या सगळया नद्या नासल्यानंतर केवळ पावसाच्या पाण्यावर महाराष्ट्र आता इथून पुढे जगू शकेल का? प्रश्न गंभीर आहे.

उत्तर गंभीरपणेच सोडवावे लागेल. अन्यथा आज मराठवाडा जे भोगतो आहे, ती वेळ उद्या अख्ख्या महाराष्ट्रावर येईल. कोकणात भरपूर पाणी आहे; पण मे महिन्यात आमच्या कोकणाच्या माऊलीच्या डोक्यावर हंडा आहेच. पाण्याच्या शोधासाठी डोक्यावर हंडे वाहून महाराष्ट्रातल्या भगिनी बेजार झाल्या. त्यांचा डोक्यावरचा हंडा कधी उतरवणार, या चर्चाही वांझोटया ठरल्या. आता विषय हंडयाच्या पलीकडे गेला आहे. पाण्याला जीवन म्हटले जाते. भविष्यात घोटभर पाणी मिळाले नाही तर, पाणी मरण ठरण्याची शक्यता आहे.

खेडयापाडयात पाणी नाही. तालुक्यात, जिल्हयाच्या ठिकाणी पाणी नाही. आता मुंबई, पुणे, ठाणे महानगरातही दोन दिवसांआड, तीन दिवसांआड पाणी. आजार वाढत चालला आहे आणि उपचार सापडत नाही. हाच माणूस ‘पाणी पाणी’ करत टाचा घासत ग्रामीण भागात मरेल इतकी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version