Home मध्यंतर सुखदा पिढयांमधील अंतर

पिढयांमधील अंतर

1

दोन पिढयांमधलं अंतर आणि कोण कोणापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हा वाद खूप जुना आहे. पारंपरिक आहे असं म्हटलं तरी चालेल. पण गेल्या तीन-चार दशकांमध्ये आपल्या समाजरचनेत आणि समाजाच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांमधून गेलेली आमच्या आधीची पिढी आणि त्याचदरम्यान उभारणी झालेली आमची पिढी यांच्यात मतभेद जरूर आहेत. पण कितीही मतभेद असले तरी त्या पिढीचा संघर्ष पाहिलेली, अनुभवलेली आणि त्याची जाणीव असलेली आमची ही एकमेव पिढी आहे यात शंकाच नाही.

‘पेरेन्टहूड’ या इंग्रजी सिनेमातल्या मुख्य पात्राच्या भूमिकेत असलेला पीटर क्राऊस म्हणतो की पेरेन्टहूड-पालकत्व म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणं आणि मागच्या पिढीच्या चुका माफ करणं! हे विधान कुठल्याही देशातल्या कुठल्याही पिढीसाठी अगदी समर्पक आहे. नवी पिढी निर्माण करत असताना एका पिढीतून दुस-या पिढीकडे समाजाचा प्रवास सुरू होत असताना मागचं मागे ठेवून पुढे पाहण्याची आणि त्याचसोबत आपल्या अनुभवांमधून पुढच्या पिढीला सजग करण्याची मोठी जबाबदारी विद्यमान पिढीवर येते. ही जबाबदारी उमगायला अनेकदा थोडा वेळ लागतो आणि तेव्हा सुरू होतं दोन पिढयांमधलं द्वंद्वयुद्ध! दोन पिढयांमधली तफावत ज्याला आपण सहजपणे ‘जनरेशन गॅप’म्हणतो तीच घरातल्या कौटुंबिक स्वास्थ्याचा (किंवा अस्वास्थ्याचा ) पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे वडील-मुलगा, आई-मुलगी आणि अगदी सासू-सुनेच्या नात्यावरही या तफावतीचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळतो. या दोन पिढयांमधले मतभेद आणि वाद सहसा या जनरेशन गॅपमुळेच उद्भवत असतात.

मी म्हणेन, आता माझ्या आधीची पिढी आणि आमच्या पिढीत प्रचंड तफावत आहे. पण कदाचित असं प्रत्येकच पिढीला वाटत असेल. आधीच्या पिढीचे सिनेमे, कपडयांच्या पद्धती, सणवार साजरे करण्याच्या पद्धती, आनंद-दु:ख व्यक्त करण्याच्या पद्धती, देव, श्रद्धा, खाण्या-पिण्याच्या सवयी, भाषा, संगीत, साहित्य, खेळ, अभ्यास, पर्यटन, आíथक गणितं, सगळं सगळंच पुढच्या पिढीकडे जाईपर्यंत पूर्णपणे बदलून गेलेलं असतं. जे हा बदल स्वीकारू शकत नाहीत ते स्वत: कायम अडकून राहतात आणि पुढे जाणा-यालाही मागे खेचत राहतात.

आमच्या घरात सात ते साठ दरम्यानच्या प्रत्येक वयोगटातली माणसं आहेत. हे ज्या वेळी माझ्या लक्षात आलं तेव्हा मला फार गंमत वाटली. मग मी त्यांच्या बोलण्याकडे, वागण्याकडे आणि अर्थात विचार करण्याच्या पद्धतीकडे थोडं बारकाईने पाहू लागले. त्यातही मजा अशी असते की सर्वात लहान पिढीचं वयाने सर्वात मोठया असलेल्या पिढीशी जास्त चांगलं जमतं. कारण त्यांच्या विचारांवर आणि कृतींवर या दोन्ही पिढया ठाम असतात. मधल्या सर्व पिढया मात्र ना इथले ना तिथले म्हणून कधी आर तर कधी पार असा खेळ खेळत राहतात.

म्हणजे सर्वात मोठी पिढी असलेली घरातली मोठी माणसं आम्हाला जे काही सांगतात त्यावर फार वाद-विवाद न करता मोठयांची आज्ञा म्हणून आम्ही निमूटपणे पाळत असतो आणि त्याच वेळी काळासोबत धावताना आणि लहानांच्या पिढीला मागासलेले वाटू नये म्हणून आधुनिकतेची कास धरण्याचीही आमची सतत धडपड सुरू असते. सर्वात लहान असलेली पिढी मात्र ‘आम्ही हे करणार नाही किंवा हेच करणार’ असं ठामपणे सांगून विषय संपवून मोकळी झालेली असते. मोठेदेखील ती ‘नवीन पिढी आहे, ती अशीच वागणार’ म्हणून सोडून देतात पण अनेकदा त्यांच्या आणि छोटयांच्या पिढीदरम्यान एक पिढी आमचीही आहे आणि आमच्या पिढीचीही काही तत्त्व आणि मर्यादा असू शकतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या बोलण्याला किंवा सूचनांना अनुभवाचं पाठबळ आहे हे आमच्याही लक्षात यायला अनेकदा वेळ लागतो.

बरेचदा ते त्यांच्या जागी आणि आम्ही आमच्या जागी योग्यच असतो. गरज असते ती फक्त दोघांनीही आपापल्या पिढीच्या कुंपणांचे काटेरी वेल अलगद बाजूला सारून दुस-याच्या कुंपणात डोकावण्याची! प्रत्येक पिढीचा स्वत:चा संघर्ष असतोच. मग तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. स्थैर्य आणि अस्तित्वासाठी आमच्या आधीच्या पिढीला म्हणजेच माझ्या आई आणि सासूच्या पिढीला जेवढा संघर्ष करावा लागला तेवढा आम्हाला कदाचित करावा लागत नाही, लागणार नाही. कारण ही पिढी त्या काळातली आहे जेव्हा समाजरचनेत आमूलाग्र बदल घडत होते, औद्योगिक क्रांती होत होती, महागाई वाढत होती. पूर्वीच्या २०-२५ जणांच्या एकत्र कुटुंबाच्या गोतावळ्यातून बाहेर पडून आपली विभक्त कुटुंबं चालवण्याची पद्धत हळूहळू मान वर काढत होती. हे सगळं त्या काळी अगदी नवीन असल्यामुळे नवं घर शोधण्यापासून, घरच्यांचा रोष पत्करण्यापर्यंत सारं काही त्यांना सहन करावं लागत होतं. पण तेव्हा जर त्यांनी ते सहन केलं नसतं तर कदाचित आज आमची पिढी वेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेली असती. विभक्त कुटुंब पद्धतीत वाढल्यामुळे आमच्या पिढीत अधिक मोकळेपणा आला. आपल्या आधीच्या पिढीने ख-याअर्थी कोणती चळवळ पुकारून आपल्याला हे ‘स्वातंत्र्य’ मिळवून दिलंय याची जाणीव आमच्या पिढीला थोडया अधिक प्रमाणात आहे तरी आमच्या पुढच्या पिढीला ती असेलच हे नक्की सांगता येत नाही. कारण त्यांच्यापुढे आणखी वेगळी आव्हानं वाढून ठेवलेली असतील. आताची पिढी अधिक शिकलेली आणि व्यावसायिकदृष्टया सक्षम आहे.

मुळात शिक्षण असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कमावता येण्याची शक्यता आहे. आता अगदी वेगळा संसार थाटायची वेळ आलीच तरी हल्ली नवरा-बायको दोघंही कमावती असतात. गृहकर्जाच्या हजारो योजना दिमतीला उभ्या असतात. पूर्वी शिक्षणच जेमतेम असायचं कारण शिक्षणाचं महत्त्व लक्षात आलेलं नव्हतं. त्यामुळे पुढचा प्रवास अधिक खडतर होत असे. आमच्या वयात जेव्हा त्यांना कुटुंबापासून वेगळं होऊन कुठे राहायचं असे प्रश्न पडत होते, त्याच वयात आज आम्ही घराच्या हॉलमध्ये एसी कोणत्या कंपनीचा लावायचा हा विचार करत असतो. कारण आमचा घराचा प्रश्न त्यांनी एक पिढी आधीच सोडवून ठेवलेला असतो. आम्ही अधिक शिकलेले आणि अधिक कमावते म्हणून अधिक यशस्वी असं म्हणता येईल का? तर नाही. ख-याअर्थी यशस्वी ती पिढी आहे ज्यांनी समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा यशस्वी पायंडा पाडला, ज्यामुळे अनेक कुटुंबांचं आयुष्य सुखकर झालं. सुरुवातीचे काही दिवस संघर्ष केल्यानंतर आज मिळणारा मोकळेपणा आणि स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवंहवंसं आहे. प्रत्येकच गोष्टीला दोन बाजू असतात त्याप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीलाही चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेतच. एकत्र कुटुंबात अडी-नडीला नातेवाईक धावून येऊ शकत होते असा जर कुणी युक्तिवाद केला तर आताही मोबाइलच्या एका रिंगवर किंवा एखाद्या मेसेजवर हे सहज शक्य आहेच. शेवटी एकत्र राहून मनाने दूर राहण्यापेक्षा दूर राहून मनाने जवळ राहणं कधीही योग्य आणि सगळ्यांच्याच सोयीचं असतं हे त्यांना पटलं म्हणून आमची पिढी एक पाऊल पुढे जाऊन इतर आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली.

भविष्यात आणखी मोठी आव्हानं असतील त्या वेळी या मागच्या पिढीचे अनुभवच कामी येतील आणि या आव्हानांतून आम्ही कमावलेले अनुभव आमच्या पुढच्या पिढीला उपयोगी ठरतील. हे चक्र अविरत चालत राहील. गरज आहे ती फक्त प्रत्येक पिढीचा, त्यांच्या विचारांचा आदर करण्याची आणि काळासोबत सतत पुढेच चालत राहण्याची!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version