Home कोलाज पुण्याची म्युरल आर्ट ठाण्यात!

पुण्याची म्युरल आर्ट ठाण्यात!

2

जबलपूर, रायपूर, इंदूर, भोपाळ, कोल्हापूर, चेन्नई, पुणे आणि बंगळूरुसारख्या विविध शहारांतून म्युरल आर्टवरील कार्यशाळांचे आयोजन करणारे पुण्याचे नामांकित भित्तीचित्र कलाकार दत्ता वैद्य यांनी त्रिमिती भित्तीचित्रांवरील अनोखी कार्यशाळा ठाण्यातही घेतली आहे. १८ एप्रिलला सुरू झालेलं हे वर्कशॉप ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. म्युरल आर्टचा प्रसार करण्यासाठी झटणा-या दत्ता वैद्य यांच्या कलाप्रवासाची गोष्ट 

दत्ता वैद्य. पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून पूर्ण केलं. प्राचार्य दिनकर थोपटे, मुरली लाहोटी, सुधाकर रणखांबे यांच्याकडून चित्र आणि शिल्प कलेतलं वेगवेगळं रंगज्ञान मिळवलं. त्यात ते तल्लीन झाले. रमले. इतके रमले की, कलाकृती साकारणं म्हणजे ध्यानधारणा करण्यासारखं आहे, इथपर्यंत ते या कलेत गुंतले. कुठल्याही कलेत असं ध्यानस्थ होणं म्हणजे समाधी लावून ते काम करण्यात एकाग्रता कमावणं होय. ही एकाग्रता पुढील प्रवासात त्यांना म्युरल आर्टचा प्रसार करण्यासाठी प्रेरणादायी ठरली आणि ते या कलेचा प्रचार करण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या गावांत कार्यशाळा घेऊ लागले.

त्यांना भित्तीचित्रे बनवण्याचा आणि त्यातील शिक्षण देण्याचा २१ वर्षाचा अनुभव आहे. देशभरात वेगवेगळ्या शहारांतून भित्तीचित्रांवरील कार्यशाळा घेऊन या कलेचा प्रसार करण्यासाठी ते त्यांच्या पत्नी सुनीतासह झिजताहेत. अलंकारिक भित्तीचित्रे हा त्यांचा हातखंडा. तसेच सुक्ष्म निरीक्षणशक्ती, वेगवेगळय़ा आशय आणि विषयांवर मनन आणि चिंतन ही त्यांची बलस्थानं आहेत.

या कार्यशाळांबद्दलची माहिती ते त्यांच्या ब्लॉगवरून शेअर करत असतात. कलाप्रांतात ज्यांना आवड आहे, अशी माणसं वेगवेगळ्या ब्लॉग, संकेतस्थळावर असतात. ठाण्यातील रिता पटेल या शिल्पकलेची आवड असणा-या अभ्यासक. त्यांनी दत्ता वैद्य यांचा ब्लॉग वाचला. त्या कलेबद्दल त्यांची उत्सुकता वाढली. वैद्य यांच्याशी संपर्क साधला. मुंबईत कार्यशाळा होणार आहे का, अशी विचारणा केली. पण तशी कार्यशाळा मुंबई किंवा ठाण्यात या आधी कधी घेतली नव्हती आणि नियोजितही नव्हती. दोघांचा संवाद सुरू राहिला. रंगमैत्री वाढत गेली. वर्ष उलटलं. कार्यशाळा घेण्याबद्दल पुन्हा नव्याने विचारण्यात आलं. तारखा जुळल्या आणि रिता पटेल यांच्या पुढाकारानेच या वर्षी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. ओम यशोधन इमारत, ५/६ दुसरा मजला, सहयोग मंदिर रोड, घंटाळी, ठाणे (पश्चिम) हा दत्ता वैद्य यांचा कायमस्वरूपी पत्ता नव्हे. हा एक फ्लॅट आहे. तो या कार्यशाळेसाठी वैद्य यांनी भाडय़ाने घेतला असून, सध्या येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत म्युरल आर्ट आकार घेत आहे.

ब्लॉगच्या माध्यमातून त्यांची वेगवेगळ्या प्रांतातील लोकांशी घट्ट मैत्री झाली आहे. ते ज्या ठिकाणी कार्यशाळा घेतात, तिथं आपलं बिऱ्हाड घेऊन जातात. लागणारं साहित्य सोबत घेऊन जातात. कधी कधी ते साहित्य ट्रान्सपोर्टने पाठवतात. सोबत त्यांची पत्नी सुनीता असते. सुनीता यांनी या कलेचं कुठलंही रीतसर शिक्षण घेतलं नाही, मात्र दत्ता वैद्य यांच्या सहवासात त्यांनी या कलेलाही स्वीकारलं आहे. म्युरल आर्टचं काम करताना, कलाकृती आकाराला येण्यापूर्वीची पूर्वतयारी खूप असते. ती कामं सुनीता आता सहजतेने करण्यात तरबेज झाल्या आहेत. म्युरल आर्टचं प्रशिक्षण हे दाम्पत्य मिळून देत असल्याने कार्यशाळेत सहभागी होणा-या महिलांना कुठलाही संकोच राहत नाही, त्या बिनधास्तपणे या कार्यशाळेत रमतात. त्यामुळेच प्रशिक्षणार्थी कलावंतांसोबत एक विश्वासाचं नातं विणण्यात वैद्य दाम्पत्याने यश कमावलं आहे. या कार्यशाळेत महिलांचा सहभाग जास्त असतो. त्यामुळे सुनीता यांचं सहकार्य दत्ता वैद्य यांना अत्यंत मोलाचं वाटतं.

वैद्य म्हणतात, ‘शिक्षण देणं ही माझी अभिलाषा. मी दिलेल्या टिप्पण्या आणि शिकवलेले हातखंडे यांचा उपयोग करून, माझे विद्यार्थी ज्यावेळी छान भित्तीचित्रं बनवतात त्यावेळी मला भरून पावते. भावना व्यक्त करण्याचा आणि माणसांना जोडण्याचा कला सुंदर मार्ग आहे. अलंकारिक भित्तीचित्र हे असं कला माध्यम आहे ज्याचं सर्वाना आकर्षण असतं. हे माध्यम जुन्या आणि आधुनिक शैलींचा मिलाफ घडवतं. त्यामुळे ते शिल्पप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे.’

ठाण्यातील कार्यशाळेत सहभागी कलाकार चिनी माती, सिपोरेक्सवरची शिल्प (स्पंजश्म), सांधलेल्या थंड काचा, साध्या काचांवरची भित्तीचित्रे, तसंच एम सील वापरून कलाकृतींची निर्मिती करीत आहेत. या कार्यशाळेत ज्या कलाकृती तयार होतात, त्या कार्यशाळास्थळीच ठेवल्या जातात. अखेरच्या टप्प्यात त्या कलाकृतींचं एकत्रित प्रदर्शन कार्यशाळास्थळीच भरवलं जातं. कार्यशाळा संपल्यानंतर ती शिल्प प्रशिक्षणार्थी घेऊन जातात. दत्ता वैद्य त्या कलाकृतींची छायाचित्रं काढून ठेवतात. त्यांचा संग्रह हा फक्त या छायाचित्रांपुरताच राहतो, प्रत्यक्ष कलाकृती मात्र ते प्रशिक्षणार्थीना देतात. वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये प्रशिक्षणार्थीनी तयार केलेल्या वेगवेगळ्या कलाकृतींची छायाचित्रं त्यांनी काढून ठेवली आहेत. त्याचा अल्बम तयार करून, तो जपून ठेवला आहे.

ही कला शिकवताना नव्या कल्पना जन्माला येतात. त्यातून मीही शिकत जातो, असं वैद्य सांगतात. कुठलीही कला आपण पूर्णपणे शिकून भरून पावत नसतो. वेगळं काहीतरी साकार करण्यासाठी कलावंत नेहमीच आसुसलेला असतो. या कार्यशाळांच्या निमित्ताने प्रशिक्षणार्थी नवं शिकण्यासाठी ऊर्जा देतात. त्यामुळे हे प्रशिक्षण फक्त कार्यशाळेपुरतं मर्यादित नसतं, तर त्या कलेच्या तांत्रिक बाजू शिकवल्यानंतर प्रशिक्षणार्थी या कलेत तल्लीन होतात. वेगवेगळा विचार करायला लागतात, काहीतरी वेगळं साकारण्यासाठी सिरॅमिक, एम सील, चिनीमाती, काचांना ते आकार देतात, त्यातून मिळणारा आनंद दत्ता वैद्य यांच्या कलासाधनेला समृद्ध करत असतो.

वैद्य यांनी त्यांच्या कलाकृतींचं एकही प्रदर्शन भरवलेलं नाही. तशा कलाकृती त्यांच्याकडे नाहीतच. कार्यशाळेत तयार होणा-या कलाकृती ते त्या-त्या प्रशिक्षणार्थीना देऊन मोकळे होतात. असं रितं होणं म्हणजे नवं काही तरी मिळवण्यासाठी पुन्हा गुंतून राहणं अशातलाच हा भाग आहे. कार्यशाळेत सहभागी होण्याचं शुल्क प्रशिक्षणार्थीने भित्तीचित्रांचा जो आकृतीबंध निवडला, त्यावर ठरला आहे. म्युरल आर्टसाठी लागणारं साहित्य जरासं महागडं असल्याने या प्रशिक्षणाचा खर्चही जरासा जास्त वाटतो. मात्र तयार होणा-या कलाकृती घराला आकर्षक करणा-या ठरत असल्याने प्रशिक्षण घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, असं वैद्य यांचं मत आहे. साधारणत: साडेतीन हजारांपासून या प्रशिक्षणवर्गाची फी आहे. कार्यशाळा हेच वैद्य यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असलं तरी त्यातून कमाई करणं एवढाच त्यांचा उद्देश नाही. अलीकडे कार्यशाळांची संख्या वाढते आहे. देशातील वेगवेगळ्या गावांतून निमंत्रणं येत असतात. बंगळूरुमध्ये दर दोन महिन्यांनी एक कार्यशाळा असतेच. इतर शहरांतही आता घराघरात म्युरल आर्ट्सच्या वस्तू पोहोचू लागल्याने आकर्षण वाढलं आहे, असं वैद्य यांचं मत आहे.या कार्यशाळेत प्रशिक्षणादरम्यान आणि प्रशिक्षण झाल्यानंतरही कलावंतांना जे साहित्य लागणार असतं, ते कुठं मिळेल याबद्दलची सर्व माहिती ते देतात. एखादी वस्तू मिळाली नाही तर ती स्वत:कडची देतात. आपल्याजवळ असलेलं सारं कौशल्य प्रशिक्षणार्थ्यांना द्यायचं, काहीही लपवून ठेवायचं नाही, त्यातूनच विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केल्याचं ते अभिमानाने सांगतात.

वैद्य स्वत: कलाकृतींचं कुठलंही प्रदर्शन भरवत नसले तर त्यांच्याकडून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळ्या वस्तू तयार करून प्रदर्शन भरवत असतात. त्यांच्या कलाकृतींना किंमतही चांगली मिळते, याबद्दल वैद्य समाधानी आहेत. कलादालनात भरलेल्या प्रदर्शनातील वस्तू घराघरात पोहोचत असतील तर ते वैद्य यांनी कलेच्या प्रसारासाठी केलेल्या कामाला मिळालेली पावती आहे, असंच म्हणावं लागेल.
कास्टिंग, पेंटिंग, सिलिकॉनचा मोल्ड तयार करून कधी बुद्ध, कधी राधाकृष्ण, कधी गणपती, कधी कोल्हापूरची महालक्ष्मी तर कधी आकर्षक वेगवेगळी शिल्पं जन्माला येतात. ती शिल्पं आपल्या घराची शोभा वाढवतात. त्यातील वेगवेगळे भाव आकर्षित करतात. गुंतवून ठेवतात. दत्ता वैद्य स्वत:ला गुरू समजत नाहीत. प्रशिक्षण घेणा-यांना सहकारी कलावंत मानतात. फार तर कार्यशाळेचा मॉनिटर आहे, असं सांगतात. या कार्यशाळेतूनच कलावंत जोडले जातात. ओळखी होतात, त्या टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी www.dattavaidya.blogspot.com हा ब्लॉग तयार केला. त्यावर माणसं भेटत जातात आणि रंगमैत्रीचं नातं फुलत जातं, हे फुलणं म्हणजेच आपलं आयुष्य समृद्ध करणं होय.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version