Home टॉप स्टोरी महागाईचा आगडोंब

महागाईचा आगडोंब

1

सार्वजनिक तेल पुरवठा करणा-या कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटलमागे एक रुपया ६९ पैसे तर डिझेलच्या दरात  ५० पैसे वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- देशात ‘अच्छे दिन आयेंगे’चा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. रेल्वेचे भाडे आणि साखरेपाठोपाठ केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात केलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. पाऊस लांबल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले असताना सर्वसामान्यांना दिलाशाची गरज आहे. मात्र त्याऐवजी सरकारने दरवाढीचा सपाटा लावल्याने मोदी सरकारच्या विरोधात जनतेची नाराजी वाढू लागली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पेट्रोल लिटरमागे १.६९ रुपये तर डिझेल ५० पैशांनी महागणार आहे. मात्र या दरांमध्ये स्थानिक विक्री कर किंवा व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षातील दर आणखी जास्त असणार आहेत. तसेच हे दर शहरांनुसार बदलते असतील. ही दरवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू केल्याची घोषणा सरकारने केली. पेट्रोल व डिझेल महागल्याने आता जीवनावश्यक वस्तूंचे दरही भडकणार आहेत.

गेल्या दोन आठवडयांपासून इराकमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे तेलाचे दर पिंपामागे ४ अमेरिकन डॉलरने वाढले आहेत. तसेच डॉलर्सच्या तुलनेत रुपया घसरल्याने तेल आयात महागडी बनली आहे, असे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या यूपीए सरकारने केलेल्या दरवाढीला अनुसरूनच डिझेलच्या दरात वाढ केली आहे. जानेवारी २०१३ पासून एकूण १७ वेळा दरवाढ केल्यानंतरही तेल कंपन्यांना डिझेलवर प्रतिलीटर ३.४० पैशाचा तोटा सहन करावा लागत आहे. या पूर्वीच्या महिन्यात हा तोटा २. ८० पैसे होता.

साखर झाली कडू

रेल्वे प्रवास महाग झाल्यानंतर जीवनावश्यक असलेल्या साखरेवरील निर्यातमूल्य १५ वरून थेट ४० टक्के नेले. यामुळे साखरेच्या घाऊक भावात क्विंटलमागे ६० रुपयांनी वाढ झाली. तर किरकोळ भावात तीन रुपयांची वाढ झाली. पाऊस न पडल्याने ऊस लागवड धोक्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

मेट्रोची दरवाढ

मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे ‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर’ हिच्या भाडयात बेसुमार वाढ झाली आहे. घाटकोपर ते अंधेरी या ११ किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना आता ४० रुपये मोजावे लागणार आहेत.

भाडेवाढीचे मोदी सरकार

उन्हाळा लांबल्याने देशासमोर दुष्काळाचे संकट असतानाही मोदी सरकारने २० जून रोजी रेल्वेच्या भाडयामध्ये ‘विक्रमी’ वाढ केली. प्रवासी भाडयात १४.२ टक्के वाढ करण्यात आली तर मुंबईतील मासिक पासांमध्ये २५० टक्के वाढ केली.

1 COMMENT

  1. हाहाहा…..कॉंग्रेस होते तय्वेली काय फुकट वाटत होते का वो….!!!!साला सर्वात जास्त महागाई कॉंग्रेस चा वेळी झालीय…जी येवडी घाण करून तेव्लीय ती काढायला ताएम तर लागणारच न..?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version