Home किलबिल पेन स्टॅण्ड

पेन स्टॅण्ड

1

मित्रांनो, शाळा सुरू होऊन आता दोन-तीन महिने झाले आहेत. सहामाही परीक्षासुद्धा आता जवळ आली आहे. अभ्यासाला सुरुवात झाली ना? अभ्यासाला सुरुवात झाली असेल तर तुमच्यापैकी अनेकांना एक समस्या सतावत असेल ती म्हणजे अभ्यासाला बसलं की नेमकं पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर हरवतं. मग ते शोधण्यातच कितीतरी वेळ जातो, कधी कधी लक्षात येतं की शाळेत मित्रांना दिलेली पेन्सिल, मैत्रिणीने तात्पुरता घेतलेला खोडरबर आपण घाईघाईत परत घ्यायलाच विसरलोय. मग घरी येऊन अभ्यासाला बसलं की हा असा टाइमपास होतो. मग ओघाने आईचं ओरडणं आलंच. पण दोस्तांनो, यावर एक उत्तम आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे पेन, पेन्सिल, खोडरबर यांचा वेगळा एक सेट बनवून तो एका पेन स्टॅण्डमध्ये ठेवून देणे! आज ‘छोट्टम मोठ्ठम’ तुमच्या आवडीचे ‘पेन स्टॅण्ड’ घरच्या घरी कसे बनवायचे हे सांगणार आहे.

रंगीत कागदांचे पेन स्टॅण्ड

आपल्याकडे कोल्ड्रिंकच्या अनेक रिकाम्या बाटल्या जमतात. या बाटल्यांपासून आपण सुंदर पेन स्टॅण्ड तयार करू शकतो. या बाटल्यांच्या वरचा झाकणाचा भाग कापा. कापलेल्या बाटलीची उंची पेन्सिलीच्या उंचीपेक्षा थोडी कमी असेल, याची दक्षता घ्या. जेणेकरून त्यामध्ये पेन किंवा पेन्सिल ठेवल्यावर ते बाहेर काढण्यासाठी तुम्हाला त्रास होणार नाही. या कापलेल्या बाटलीला गिफ्ट पेपर किंवा वर्तमानपत्राचे रंगीत कागद चिकटवा. वेगवेगळ्या रंगांचे हे कागद लावल्यामुळे पेन स्टॅण्ड छान दिसतो.


बांगडयांपासून पेन स्टॅण्ड

मुलींना हा पेन स्टॅण्ड करायला नक्कीच आवडेल. पण मुलांनो, तुम्ही निराश व्हायचं कारण नाही. बांगडयांपासून तयार केलेला पेन स्टॅण्ड तुमच्या बहिणीला देऊन बघा, स्वारी कसली खूश होईल! तुमच्याकडे जुन्या झालेल्या, रंग उडालेल्या, बांगडयांच्या जोडीतली एक बांगडी हरवलेल्या किंवा तुटलेल्या अनेक बांगडया असतील. अशा आपल्या आवडीच्या बांगडयांबाबत झालं तर त्या बांगडया टाकवतसुद्धा नाहीत आणि वापरताही येत नाहीत. त्यामुळे अशा बांगडया आपल्या कपाटातील खणात नुसत्या पडून राहतात. त्याऐवजी आपण त्यांच्यापासून जर पेन स्टॅण्ड तयार केला तर त्या बांगडया वापरल्याचं समाधान आपल्याला मिळेल. या वेगवेगळ्या रंगांच्या बांगडया एकावर एक चिकटवा. चिकटवताना शक्यतो रंगसंगती छान दिसेल अशा पद्धतीने चिकटवा. त्या बांगडयांच्या मनो-याला खालच्या बाजूने पुठ्ठा लावा. झाला तुमचा पेन स्टॅण्ड तयार!


ग्लास की पेन स्टॅण्ड?

पूजा, वाढदिवस किंवा अन्य काहीही समारंभ असेल तर आपण थर्माकोलचे ग्लास आणतो. बरेचदा हे ग्लास उरतात. पण आपण यापासून छानसा पेन स्टॅण्ड तयार करू शकतो. या ग्लासला तुम्ही रंगवू शकता किंवा त्यावर तुमच्या आवडीचं डिझाइन काढू शकता. इतकंच नव्हे तर टिकल्या, आरसे, शंख-शिंपले, पिस्त्याची टरफलं, मणी, रिबिन्स, रंगीत दोरे यांसारख्या पदार्थाचा वापर करून त्या पेन स्टॅण्डची शोभा आणखी वाढवू शकता. हे ग्लास वजनाने हलके असतात. त्यामुळे आधारासाठी त्यात छोटे खडे किंवा गोटया घालून ठेवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version