Home कोलाज प्रजासत्ताक भारत कुठे निघाला आहे?

प्रजासत्ताक भारत कुठे निघाला आहे?

1

भगवद् गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करण्याची मागणी संघ परिवार करीत आहे. त्यात सुषमा स्वराजसारख्या एका स्त्री मंत्र्याने पुढाकार घ्यावा ही आश्चर्याची गोष्ट आहे. एक तर हे भगवद् गीतेबद्दलचे अज्ञान असावे किंवा प्रवाहपतिख असावे. मुळात भगवद् गीता हा ग्रंथ कोणतेही तत्त्वज्ञान सूत्रबद्धपणे सांगणारा ग्रंथ नाही. त्यात जसे कर्म आहे तसा कर्मसंन्यासही आहे. त्यात जशी भक्ती आहे तसाच सांख्यही आहे, त्यामुळे त्यावर शंकराचार्य, ज्ञानेश्वर, लो. टिळक, गांधीजी, विनोबा आणि भाऊ धर्माधिकारी यांनी केलेली भाष्ये परस्परविरोधी आहेत.
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून भारत भविष्यातील विकासाकडे निघाला आहे की मध्ययुगीन अंधाराकडे याबद्दल संभ्रम वाटावा अशा घटना दिसत आहेत. सुरुवात झाली ती तत्कालीन भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या विजयी पत्रकार परिषदेपासून. त्यांनी भारतात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणण्याच्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. वास्तविक पाहता मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या धडाक्यात ना हिंदुत्वाचा पुरस्कार केला, ना सांस्कृतिक राष्ट्रवादाचा, ते फक्त विकासाच्या मुद्दय़ावर बोलत होते, म्हणून त्यांना जनतेने भरभरून मते दिली. त्यानंतर प्रश्न निघाला इतिहासाच्या पुनर्लेखनाचा. त्यानंतर तर भारतीय संसदेतील भाजपाचे बेजबाबदार नेते अनेक अकलेचे तारे तोडू लागले. कोणी म्हणाले भगवद् गीता हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून स्वीकारला जावा, तर कोणी म्हणाले हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा. चारच का? हिंदू विवाह संस्कारात पुरोहित तर अष्टपुत्र सौभाग्यवती भव:! असा आशीर्वाद देतात. मग चारऐवजी आठ का नकोत? काही लोकांनी ‘घरवापसी’ कार्यक्रम हाती घेतला. मुस्लीम आणि ख्रिस्ती जनसमुदायांना हिंदू धर्मात परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. हिंदू धर्म सोडून परधर्मात गेलेले लोक ‘वाट चुकलेले आहेत’ असे सरसंघचालक मोहन भागवत सांगू लागले. शंकराचार्य म्हणाले, साईबाबा काही देव नाहीत. जे त्यांना भजतात त्यांनी गंगेत स्नान करायला येऊ नये. शंकराचार्याच्या भक्तांनी अनेक साई मंदिरे फोडली, तेथील साईबाबांच्या मूर्ती पळवल्या. या गोष्टी मध्ययुगीन अल्लाउदिन खिलजी आणि गझनीच्या महम्मदाचे अनुकरण करणा-या होत्या. ज्या मुस्लिमांच्या विरोधात हिंदुत्ववादी परिवार आज राजसत्तेच्या पाठिंब्यावर उभा आहे. त्यांनी मुस्लीम संस्कृतीचा या प्रकारे स्वीकार करावा याचे अनेकांना आश्चर्य वाटते. संघ परिवाराच्या विश्व हिंदू परिषदेने जाहीरपणे चातुर्वण्य आणि जातीसंस्थेचा पुरस्कार करावा आणि नरेंद्र मोदींनी या प्रकारच्या कुठल्याही प्रकारावर मौन धारण करावे ही गोष्ट चिंताजनक, निंदनीय आणि घृणास्पद आहे. हे विकासाकडे पुढे जाणे नाही, तर मध्ययुगाकडे परत फिरणे आहे.

इतिहास म्हणजे काय? याचे कणभरही ज्ञान नसणारे इतिहासाचे पुनर्लेखन करायला निघाले आहेत. त्यांना भूतकाळातील राजे-राण्या, त्यांचे जनानखाने, त्यांचे वैभव, त्यांनी केलेल्या लढाया, परकीय आक्रमकांचे क्रौर्य, त्यांनी केलेला विध्वंस या संबंधीच्या मोडतोड केलेल्या घटना, स्फूर्तिदायक आणि मनोरंजक बनवून सांगायच्या आहेत. वास्तविक पाहता त्या अनेक वर्षे तशा रंगवून सांगणारी मंडळी आपल्याकडे आहेत. त्याचा जातीय तेढ निर्माण करण्यासाठी उपयोगही होतो; परंतु तो तत्कालिक असतो. इतिहास हा भूतकाळातील घटनांचा तपशील असतो, अशी या मंडळींची चुकीची धारणा असते. इतिहास हा भूतकाळातील घडलेल्या घटनांचा केवळ तपशील नसतो. इतिहासकाराला नेहमी ‘का?’ असा प्रश्न भूतकाळाला विचारावा लागतो आणि त्या घटनांची उत्तरे शोधावी लागतात. म्हणून इतिहास हे घटनांचे विश्लेषण असते. भारताचा हजार एक वर्षाचा इतिहास पराभवाचा इतिहास आहे, परंतु तो तसा का बनला? भारतीय जनता आक्रमकांच्या विरोधी एकसंधतेने लढली नाही याची कारणे कोणती? मुस्लीम सैन्यात हिंदू राजाविरोधी लढणारे हिंदू लढवय्ये का होते? औरंगजेबाचा सेनापती हिंदू का होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या तैनाती फौजेत हिंदू बहुसंख्येने का सामील झाले? औरंगजेबाच्या मुलाचा छ. शिवाजी महाराजांच्या विरोधी विजय व्हावा, म्हणून वाईत पुरोहित मंडळींनी यज्ञ का केले? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास शूद्र लेखून विरोध कोणी आणि का केला? छ. राजर्षी शाहू यांच्यासाठी वेदमंत्र का नाकारले गेले? इ. अनेक प्रश्नांची सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या पायावर विश्लेषणं करून उत्तरे शोधणे हे इतिहासकाराचे काम आहे. आपला सारा इतिहास दंतकथा, पुराणे, बखरी यांनी बरबटलेला आहे. आता तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्रे असतो, हा समज नष्ट झाला आहे. इतिहास कोणीही महापुरुष घडवित नसतो. जिवंत माणसेच इतिहास घडवित असतात. म्हणून इतिहास लेखनाचे केंद्र राजा-राणीऐवजी सामान्य कष्टकरी जनता, सामान्य माणूस बनलेला आहे. त्याला कालौघात पश्चिमेकडे झालेल्या प्रबोधन चळवळीने आत्मभान दिले आहे. राजा राममोहन रॉय, म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मचिकित्सेतून स्वत:ची, समाजाची आणि इतिहासाची जाणीव करून दिल्याने भारतातील शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया भारतीय इतिहासात आपले नेमके काय होते याचा शोध घेत आहेत. शेतकरी, मजूर, कष्टकरी वर्गातून पुढे आलेले तरुण इतिहासात आपले स्थान कोणते होते, याचा शोध घेत आहेत. ही भारतीय इतिहासाकडे पाहण्याची एक क्रांतिकारी दृष्टी आहे. या दृष्टीला अंध करणे म्हणजे संघ परिवाराचे इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा कार्यक्रम आहे. हा प्रयत्न हानून पाडणारे संशोधक बहुजन समाजातून पुढे येतील. त्यांना कोणीही अडवू शकणार नाही.

भगवद् गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करण्याची मागणी संघ परिवार करीत आहे. त्यात सुषमा स्वराजसारख्या एका स्त्री मंत्र्याने पुढाकार घ्यावा ही आश्चर्याची गोष्ट आहे. एक तर हे भगवद् गीतेबद्दलचे अज्ञान असावे किंवा प्रवाहपतिख असावे. मुळात भगवद् गीता हा ग्रंथ कोणतेही तत्त्वज्ञान सूत्रबद्धपणे सांगणारा ग्रंथ नाही. त्यात जसे कर्म आहे तसा कर्मसंन्यासही आहे. त्यात जशी भक्ती आहे तसाच सांख्यही आहे, त्यामुळे त्यावर शंकराचार्य, ज्ञानेश्वर, लो. टिळक, गांधीजी, विनोबा आणि भाऊ धर्माधिकारी यांनी केलेली भाष्ये परस्परविरोधी आहेत. हा ग्रंथ खासगी मालमत्तेच्या उदयानंतरचा आहे. खासगी मालमत्तेसाठी आप्तजनांचा संहार करणे धम्र्य कसे आहे हे तत्त्वज्ञानाच्या आवरणाखाली सांगणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे तो भांडवलदार वर्गात प्रतिष्ठित आहे. वास्तविक पाहता इसवी सनाच्या नवव्या शतकापर्यंत तो फारसा कुणाला माहीत नसावा, असे स्वामी विवेकानंदानी नोंदवून ठेवलेले आहे. शंकराचार्यानी त्याच्यावर भाष्य केल्यानंतरच तो प्रसिद्धीस आला. भगवद् गीतेवर मी माझ्या ‘धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह’ या ग्रंथात विस्ताराने भाष्य केलेले आहे. भगवद् गीतेत आजच्या भारतातील सर्व स्त्रिया, वैश्य, आणि शूद्र समूहाने आक्षेप घ्याव्यात अशा भरपूर जागा आहेत. या ग्रंथाने भारतातील अर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना, व्यापा-यांना (वैश्य) आणि शेतकरी, मजुरांना (शूद्र) ‘पापयोनी’ असा शब्द वापरलेला आहे आणि तो पूर्णपणे निषेधार्ह आहे. गीतेचा दोनच श्लोकांचा संदर्भ या ठिकाणी दिला तरी तो पुरेसा आहे.
भगवद् गीतेच्या नवव्या अध्यायातील बत्तिसावा श्लोक म्हणतो,

‘‘मां हि पार्थ व्यपाश्वित्य येडपिस्यु: पापयोनय:।
स्त्रियो वैशास्तया शुद्रास्तेडपि यान्ति परां गतिम्।।

या श्लोकावर भाष्य करताना शंकराचार्यानी लिहिले आहे, ‘‘जो कोणी पापयोनी म्हणजे ज्याच्या जन्माचे कारण पाप आहे असे प्राणी, ते कोण आहेत तर ते स्त्री, वैश्य आणि शूद्र होत.’’ पुढे लो. टिळकांनी त्यांच्या ‘गीतारहस्यात’ पापयोनी म्हणजे गुन्हेगार जाती असा शोध लावला. त्यावर भटक्या विमुक्तांच्या चळवळीने मध्यंतरी आंदोलने केली. शंकराचार्याना प्रमाण मानायचे झाले तर सर्व स्त्रिया, वैश्य आणि शूद्र हे पापयोनी मानावे लागतात, कारण त्यांनी मागच्या जन्मी पाप केले होते. सुषमा स्वराज यांनी मागच्या जन्मात असे कोणते पाप केले होते म्हणून त्यांना पापयोनीत जन्म घ्यावा लागला? त्यांना भगवद् गीतेतील स्त्रीबद्दलच्या उत्पत्तीची कल्पना मान्य आहे काय? सत्तर टक्के जनता असलेल्या जनसमुदायास ‘पापयोनी’ म्हणणारा धर्मग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकतो काय? भगवद् गीतेतील दुसरा एक श्लोक आहे, चातुर्वण्य ईश्वरानेच मागील जन्माच्या गुणकर्मावरून या जन्मात निर्माण केले आहेत आणि त्यांची कामेही निश्चित केली आहेत. ती सदोष असली तरी ती प्रत्येकाने केलीच पाहिजेत. गीता म्हणते,

‘सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यज्येत।
सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निदिना वृत्ता:’(१८.४८)

या श्लोकावर शंकराचार्याचे भाष्य असे की, ‘सहजं सह जन्माना एव उत्पन्नं सहजं किं तत् कर्म’ म्हणजे जे जन्मासोबत उत्पन्न होते त्याचे नाव सहज असते. ते काय आहे? ते कर्म आहे. भगवद् गीतेचा उद्देशच चातुर्वण्य भक्कम करण्याचा होता. प्रत्येकाने पूर्वजांनी केलेली कर्मे करायची म्हणजे प्रत्येक वर्ण-जातीने वंशपरंपरागत कामेच करायची अशी भगवद् गीतेची सक्ती आहे.

भगवद् गीतेप्रमाणे समाज निर्माण करायचा असेल तर सुषमा स्वराज यांनी मंत्रिपद सोडून ‘चूल आणि मूल’ यातच गुंतवून घ्यावे. हिंदू शास्त्राप्रमाणे अविवाहित स्त्रियांना मोक्ष नाही. त्यामुळे उमा भारती, ऋतुंभरा वगैरे स्वत:ला साध्वी म्हणून घेत असल्या तरी त्यांना स्वर्ग नाही. केरळात अविवाहित मृत मुलीशी स्मशानात पुरोहिताशी विवाह लावला जाई व नंतर तिला अग्नी दिला जाई. अरुण जेटलींनी पळी पंचपात्र घेऊन पौरोहित्य करावे. स्वत: नरेंद्र मोदी यांनी दुग्धजन्य पदार्थाचा किंवा तेलाचा धंदा करावा. मंत्रिमंडळातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांनी मृत ढोरे ओढण्याचे आणि कातडी कमावण्याचे काम करावे. हा भगवद् गीता आणि मनुस्मृतीचा आदेश आहे. लाचार बनून तो या सर्वानी पाळला तरी आधुनिकतेचा स्वीकार केलेली सुशिक्षित, बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ भारतीय स्त्री-पुरुष तो धुडकावून लावील.

1 COMMENT

  1. कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्हीही मोठे राजकीय पक्ष खरे धर्मनिरपेक्ष नाहीत त्यामुळे खर्या धर्मनिरपेक्षता पाळणाऱ्या नागरिकांना पर्यायच नाही. आप कडे त्या अपेक्षेने लोक बघू लागले होते पण त्यांनीपण संधी गमावली..
    भयानक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे भारतात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version