Home टॉप स्टोरी मराठीचा ‘तारा’ निखळला

मराठीचा ‘तारा’ निखळला

1

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी नाट्य-चित्रपट अभिनेते सतीश तारे यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले.

मुंबई- बोलका चेहरा, अफाट शब्दसामर्थ्य, डोळ्यांमधले विलक्षण भाव, विनोदाच्या अचूकसमयसूचकतेने हसवता हसवताच रसिकांना डोळे पुसायला लावणारा मराठी रंगभूमीवरचा अनुभवी कलावंत सतीश तारे यांनी अचानक एक्झिट घेतली. बुधवारी दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी जुहू येथे एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

सतीश तारे यांनी अनेक नाटकांमधील भूमिका अजरामर केल्या. वळू, बालक पालक, नवरा माझा नवसाचा अशा चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘मोरुची मावशी’ या गाजलेल्या नाटकाचे पुनरुज्जीवनही केले होते. ‘फु बाई फु’सारख्या विनोदी कार्यक्रमातून सतीश तारे यांच्या अभिनयाची उंची सा-या महाराष्ट्राने पाहिली होती. या कार्यक्रमात त्यांनी विविध भूमिका जरी केल्या असल्या तरी त्यातल्या ‘राजा’ला रसिकांनी प्रचंड दाद दिली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातले लेखन गुणही जगासमोर आले होते. नाटय़ परिषदेबरोबर झालेल्या वादामुळे त्यांचे नाटकही बंद पाडण्यात आले होते. मात्र तरीही एक कलाकार म्हणून ते रसिकांचे सदैव लाडके राहिले. लहान-सहान भूमिका असो की मध्यवर्ती, सतीश तारे त्यात आपले खास रंग भरत असत. अभिनयाबरोबरच अनेक वाद्यही ते वाजवत होते. त्यांना लिखाणाचाही छंद होता. मराठी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रेम होते.

मधुमेहामुळे त्यांच्या पायाला गॅंगरिन झाले होते. त्यातच त्यांचे यकृतही निकामी झाल्यामुळे त्यांना सोमवारपासून कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांची प्रकृती ढासळत गेली व मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही काळ यशवंत नाटयमंदिरात ठेवण्यात आले होते. या वेळी नाटय व चित्रपट क्षेत्रातल्या कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनयाबरोबरच लेखक आणि गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. सारेगमपमधून ते गायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर सतिश तारे यांच्या निधनामुळे सोशल नेटवर्कींग साईट्सवरही त्यांच्या चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अकाली एक्झिट – (फोटो फिचर)

 

सतीश तारे यांच्या ‘गोडगोजिरी’ या नाटकाचे यावर्षी काही प्रयोगही झाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version