Home मध्यंतर वास्तू वेध प्लम्बिंग कामाकडे दुर्लक्ष नको

प्लम्बिंग कामाकडे दुर्लक्ष नको

0

कामाच्या व्यापात आपण अनेक छोटय़ा- छोटय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. विशेषत: घराच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे. त्यामुळे त्याचा कालांतराने मोठा फटका बसून मनस्ताप होतो. अशापैकीच एक महत्त्वाची बाब असते, ती म्हणजे घरातील प्लम्बिंग कामाची. घरातील सगळे नळ, ड्रेनेज सिस्टीम याकडे आपण जातीने लक्ष देऊन अधूनमधून त्याच्या निगराणीकडे लक्ष दिले, तर आपले फार मोठे नुकसान टळते. त्यासाठी या काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे.

आपल्याकडे ब-याचवेळा भांडी घासण्याच्या कामासाठी येणारी बाई सगळे करेल म्हणून आपण तिच्यावर सोपवून जातो. प्लॅट किंवा टॉवरमध्ये राहताना भांडी काम करणा-या महिलांकडे अनेक कामे असतात. त्यामुळे ही कामे घाईघाईत केली जातात. ब-याच घरातून पती-पत्नी नोकरी करणारी असतात. मुले शाळेत मागाहून जातात. ती जाताना ताट भांडी तसेच अर्धवट अन्न टाकून सिंकमध्ये ठेवून जातात. भांडीवाली त्याचे खरकटे काढताना केराच्या टोपलीत न टाकता ड्रेनेजची सिंकची जाळी काढून तेथून ढकलण्याचा प्रयत्न करते. हे रोज साचत जाणारे खरकटे एखाद दिवशी मोठा फटका देऊन घरात पाणी तुंबण्याच्या संकटात नेते. त्यासाठी सिंकमध्ये जाळी पक्की ठेवावी आणि घरातील मुलांना शक्यतो अन्न टाकू नये, पण शिल्लक टाकले तर ते ताटात न ठेवता ताटे स्वच्छ करून घासायला टाकण्याची सवय लावावी. खरकटे केराच्या टोपलीत नीट टाकण्याची सवय लावावी. महिन्यातून एकदा सिंकच्या खालचे व्हॉल्व चेक करावेत आणि आतील अडकलेले कण काढून टाकावेत. त्यामुळे सिंक चोकपचा प्रश्न निर्माण होत नाही.

घरातील बाथरूममध्ये असणारे नळ, बेसिन आणि सिंकचे नळ अनेकवेळा गळत असतात. त्यातून पाणी वाहत असते. त्याकडे दुर्लक्ष केले की, टॅब आणखी सैल होऊन कारंजी उडू लागतात. हे प्रकार घडू नयेत यासाठी सर्व टॅब वरचेवर चेक करावेत. त्याचे नट, आटे नीट आहेत का, तपासावेत आणि ते वेळच्या वेळी दुरुस्त करावेत. ब-याचवेळा साध्या उपायांनी ते दुरुस्त होतात. लांबी, दोरा आटय़ांना लावूनही ही गळती थांबते. पण, ही गळती वेळच्यावेळी थांबवणे महत्त्वाचे असते. नाहीतर नळाखाली बादली ठेवली जाते आणि रात्रभर टपटप आवाज येत राहतो. याने झोप खराब होतेच, पण त्यापेक्षा एकप्रकारची नकारात्मकता मनात तयार होते, भीती वाटू लागते. त्यासाठी या नळांची गळती थांबवण्यासाठी योग्य प्रकारे वापर करावा.

आपल्या बाथरूमध्ये असलेल्या गरम आणि गार पाण्याच्या मिक्सरची सिस्टिम नीट चेक करून घ्यावी. यामुळे गिझरकडून होणारा गरम आणि गार पाण्याचा पुरवठा यातील ताळमेळ व्यवस्थित होतो. गरम आणि गार पाण्याचे मिश्रण करताना दोन्हींचे प्रवाह किती प्रमाणात असावेत, याचे काँबिनेशन समजून घ्यावे. त्यामुळे गिझरवर लोड येऊन अपघात टळतील. विशेषत: गॅस गिझरबाबत ही प्रिकॉशन महत्त्वाची ठरते.

पाण्याचा फ्लो सर्वात व्यवस्थित असावा, अशी आणखी एक जागा म्हणजे आपले शौचालय. कमोडच्या प्लशची व्यवस्था नीट आहे की नाही, त्याकडे नीट लक्ष द्यावे. आजकाल चायनीज बनावटीचे प्लश वापरले जातात. ते सहज बटण दाबले तरी बटणे अडकून पडतात आणि प्लश तसाच सुरू राहतो. सगळी टाकी रिकामी झाली, तरी प्लश बंद होत नाही. यामुळे पाण्याचा अपव्यय होतोच, पण इतरांचीही अडचण होते. त्याचप्रमाणे कमोडचा सव्‍‌र्हीस शॉवरही नीट काम करतो ना? ओव्हरफ्लोमुळे त्याचा स्वीच तुटण्याची शक्यता असते. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. अत्यंत साध्या गोष्टी असतात. पण, त्या ठीक नसतील, तर सगळा दिवस खराब होतो आणि मूड ऑफ होतो. म्हणून आपल्या घरातील सर्व प्लम्बिंगची यंत्रणा कधी बंद पडणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version