Home महाराष्ट्र कोकण मेवा फिरायलाच पाहिजे यार..!

फिरायलाच पाहिजे यार..!

1

‘प्रवास.. नित्य नवा सहवास’.. स्वत:ला नवीन काही गवसण्याचा प्रवास, नव्या वाटा-नवी वळणे, नवा देश, नवा प्रदेश, स्वत:च्याच प्रवासानंतरचा नवा कोरा वास.. प्रवास केला पाहिजे यार. मला तर एकटय़ानं प्रवास करायला आवडतो. नवे प्रदेश, नवे देश, नवी माणसे, नवे चेहरे बघायचा मला ध्यास लागतो.. आणि अनोख्या प्रसंगांना मला सामोरं जायला मिळतं.. काही माणसं बसमध्ये, रेल्वेमध्ये खिडकीकडे तोंड करून बसून राहतात, त्यांना सहप्रवाशाच्या जीवनात अजिबात डोकोवायला आवडत नाही. काही आपल्याच मोबाईलवर तासन्तास टुकुटुकु करत राहतात. नंतर गाणी ऐकतात. काही लॅपटॉप काढून ‘आपण खूप कामाची माणस आहोत’ अशा अविर्भावात असतात. काही घरचेच अन्न आपल्याला चालते असे सांगत आपला डबा खात बसतात. या कोणाबद्दलही मला राग नाही. त्यांचे त्यांचे स्वभाव!! पण मला मात्र गप्प बसता येत नाही. मला सहप्रवासी आवडतात. त्यांच्या सुख-दु:खांशी समरस व्हायला आवडते. माझी झटपट मैत्री होते. 

एकदा गोवा- रत्नागिरी प्रवासात मला सावंतवाडीची ‘नीला आपटे’ नावाची मैत्रीण मिळाली. सहप्रवाशाची ती ‘मैत्रीण’ कधी झाली कळलंच नाही. अत्यंत नैसर्गिक राहण्यानं तिच्यातलं सौंदर्य मला आगळंच भासलं. एकदा तिच्या घरी जायचा योग आला. तिचं घरही तिच्यासारखंच अत्यंत अकृत्रिम.. मला एक पुस्तक तिनं भेट दिलं. एकदा मुंबई प्रवासाला निघताना गोरेपान, उंच, निळय़ा डोळय़ांचे एक काका स्टेशनवर मला भेटले. त्यांच्या उतार वयामुळे त्यांना सामानही उचलणं शक्य नव्हतं. त्यांनी एक हमाल केला होता. मी स्टेशनवर त्यांना शेजारी बसायला जागा करून दिली. त्यांना करंट बुकिंग मिळालं होतं. माझं सेकंड एसीचं तिकीट होतं. तेही लोअर बर्थचं. मी त्यांना सांभाळून ट्रेनमध्ये चढवलं. माझ्या बर्थवर बसवलं. टी. सी. आल्यावर त्यांनी तिथे बसल्याबद्दल पावती केली. त्यांना या गोष्टीचं एवढं कौतुक वाटलं की मी त्यांच्या प्रवास सुखकर केला. मी कुठे केला? त्यांचा भाग्ययोग! बोलता बोलता ते म्हणाले,

‘मी दिलीपकुमारच्या घरासमोर राहतो’ त्यांच्या गाडय़ा, व्यवसाय आदीबद्दल मला त्यांनी सांगितलं. अत्यंत श्रीमंत माणूस होता तो.. शिरीषकाका! मुंबईला उतरल्यावर त्यांची एक गाडी आली. त्यांनी मलाही माझ्या इच्छितस्थळी सोडलं. काकांनी माझा पत्ता घेतला. माझ्या वाढदिवसाला अचानक एक पार्सल घरी आलं. अत्यंत सुंदर रोझ गोल्डचं टायटन रागाचं घडय़ाळ आतमध्ये. कोण कुठले सहप्रवासी पण केवढी आपुलकी.. स्नेह!

रोमानियाला गेले असता एका आंतरराष्ट्रीय परिषदेत स्लोवेनियाची माया थ्रायनर मला भेटली. दोन दिवसात आम्ही जीवाभावाच्या मैत्रिणी होऊन गेलो. कधी कधी जन्मभर सोबत राहून लोक फक्त ‘ओळखी’चे होतात आणि कधी एखाद्या दिवसाच्या ओळखीत जन्मभराचे मित्र. मायाने स्लोवेनियाचे नुसते आमंत्रण दिले नाही, सगळय़ा सुविधा पुरविल्या. पाच वर्षानंतर मी तिला जाऊन भेटले. हिरव्या हिरव्या डोंगरात आमची मैत्री अधिक ‘हिरवीगार’ झाली. जाण्यापूर्वी तिनं तिच्या हातातलं एक सुंदर कडं मला स्वत: घातलं. अश्रू भरल्या नयनांनी निरोप दिला.

प्रवासानं मला खूप साधं आणि खरं राहायला शिकवलं. जगण्यावर प्रेम करायला शिकवलं. प्रेम वाटायला शिकवलं. जे जे नैसर्गिक आहे ते ते सुंदर आहे, त्याचा सन्मान राखायला शिकवलं. अनेक त-हेचे स्वभाव असतात. त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकवलं. अजूनही बरेचसे सहप्रवासी आहेत. डॉ. अंजू व डॉ. ऊर्मी बडोदा, फरीदाआंटी वसरेवा अंधेरी, अगदी रत्नागिरीचेही मणी नायर आहेत. त्यांच्याविषयी मी सांगितलंच नाही, कारण प्रातिनिधिक नाव सांगून विषय पूर्ण करायला हवा नाही तर लेखनप्रवासात मी वाहत जाईन..

प्रवासानंतर घरी परतावंच लागतं.. दैनंदिनी सुरू होते. पण डोक्यात आठवणी असतात आणि मनाच्या गाभा-यात मिळालेलं नि:स्वार्थी, निरलस, निर्व्याज प्रेम आणि आनंद! आणि घरच्या दिवाणखान्यात असतात नीलानं दिलेलं पुस्तक, काकांनी दिलेलं घडय़ाळ आणि मायानं दिलेलं कडं!

1 COMMENT

  1. डॉ,निधी पटवर्धन ,आपला लेख आवडला ,प्रवासातली मैत्री ! विषय छान आहे ,धन्यवाद !

    धनंजय हळर्णकर .
    दोहा / कतार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version