Home मनोरंजन फिल्मसिटी मराठीसाठी!

फिल्मसिटी मराठीसाठी!

1

रुपेरी वाळूचे किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, हापूसच्या गंधाने दरवळणा-या आमराया, असं निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या कोकणात यापुढे ‘साउंड.. कॅमेरा.. अ‍ॅक्शन..’चा पुकारा झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ‘महाराष्ट्र कलानिधी’चे प्रवर्तक नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे खास मराठी चित्रपटांसाठी अत्याधुनिक चित्रनगरी उभी राहत आहे. या चित्रनगरीच्या पहिला टप्प्याचं काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. या चित्रनगरीत काय असणार आहे?
मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षात मोठी झेप घेतली आहे. वर्षभरात प्रदर्शित होणा-या मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे, त्याचवेळी कमाईचा आकडाही नवनवे उच्चांक गाठत आहे. तरीही मराठी चित्रपटांच्या निर्मिती करताना आजही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, लोकेशन न मिळणं, स्टुडिओचं भाडं न परवडणं वगैरे. त्यामुळे भारतातील चित्रपटसृष्टी जिथे जन्मली, वाढली आणि बहरली, त्या मुंबईतच मराठी चित्रपटांची उपेक्षा झाल्याची भावना निर्माण होते. यावर बरेचदा ओरड केली जात असली तरी उपाय सुचवायला कुणीच पुढे येत नाही. म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी आता ‘महाराष्ट्र कलानिधी’चे नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी हक्काची चित्रनगरी उभारण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी या चित्रनगरीची घोषणा केली आहे.

मालवण येथे होणा-या या चित्रनगरीच्या पहिल्या टप्प्याचं काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. दीडेक वर्षात हा पहिला टप्पा पूर्ण होईल. या चित्रनगरीत नेमकं काय काय असणार आहे, मुळात मुंबईत एक चित्रनगरी असताना कोकणात ही दुसरी चित्रनगरी उभारण्याचं कारण काय, असे अनेक प्रश्नं मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्याची उत्तरं नितेश राणे स्वत:च देतात.

या चित्रनगरीची संकल्पना स्पष्ट करताना ते सांगतात, ‘मुंबईत गोरेगाव येथे एक चित्रनगरी आहे, हे खरं आहे, पण तिथे शूटिंग करण्यासाठी मराठी निर्मात्यांना अनेक अडचणी येतात. बरीच धावपळ करावी लागते. कधीकधी आंदोलनंही करावी लागतात. या विरोधात अनेक जण आवाज उठवतात, पण महाराष्ट्र कलानिधीच्या स्थापनेपासून आम्ही हे सांगत आहोत की, आम्ही केवळ आवाज उठवण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला आमच्या पद्धतीने यावर उपाय करायचा आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आधार द्यायचा आहे. मराठी चित्रपटसृष्टी आज ख-या अर्थाने भरारी घेतेय. हळूहळू ती हिंदीशीही स्पर्धा करते आहे. दुनियादारी आणि टाइमपाससारखे चित्रपट यांचं उत्तम उदाहरण आहेत. भविष्यात आणखी अनेक चांगले चित्रपट येणार आहेत. हे सगळं करताना मराठी निर्मात्यांना जो मान, प्राधान्य आणि सवलत मिळायला हवी, ती मिळताना दिसत नाही. गोरेगावच्या फिल्मसिटीत शूटिंग करण्यासाठी त्यांना बराच खटाटोप करावा लागतो. अनेकदा आर्थिकदृष्टया परवडत नाही. अनुदानाचे पैसे लवकर मिळत नाहीत. ही परिस्थिती पाहून आम्ही असा विचार केला की, सगळे आंदोलन करताहेत, तेव्हा आपण वेगळ्या मार्गाने ही समस्या सोडवावी. म्हणून आम्ही कोकणात कलावंतांची भूमी असलेल्या सिंधुदुर्गात चित्रनगरी उभारायचं ठरवलं आहे. यासाठी आम्ही मालवणजवळचं ठिकाण निश्चित केलं आहे. ही चित्रनगरी शंभरहून अधिक एकरवर वसणार आहे. हे खूप मोठं काम असल्याने ते टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला १० एकरच्या पहिल्या टप्प्याचं काम करणार आहोत. पहिल्या टप्प्यात चित्रीकरणासाठी लागणा-या गरजेच्या गोष्टी पूर्ण करण्यात येतील, त्यानंतर आम्ही तिचा विस्तार करू. या चित्रनगरीत मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि एकूणच मराठी मनोरंजन विश्वाला तिचा फायदा होणार आहे.’

एकदा मराठी निर्माता या चित्रनगरीत आल्यावर त्याला कुठलीही गोष्ट करण्याकरता बाहेर जायला नको, अशा प्रकारे या चित्रनगरीचं बांधकाम होणार आहे. प्रसिद्ध बॉलिवुड कलादिग्दर्शक आणि वास्तुरचनाकार जयंत देशमुख या चित्रनगरीचं बांधकाम करणार आहेत. या चित्रनगरीत काय काय असणार आहे, याची माहिती देताना नितेस राणे सांगतात, ‘या चित्रनगरीत सगळ्या अत्याधुनिक सोयी असतील. पहिल्या टप्प्यात आम्ही कॉलेज, मंदिर, तुरुंग, पोलीस ठाणं, इनडोअर स्टुडिओ अशी अनेक लोकेशन आम्ही उभी करणार आहोत. तसंच कलाकार-तंत्रज्ञांना राहण्यासाठी निवासस्थानंही बांधणार आहोत. म्हणजे इथे राहूनच ते आपल्या सिनेमांचं चित्रीकरण करू शकतील. मुंबईतील गोरेगावच्या चित्रपटनगरीत सध्या मराठी निर्मात्यांना भाड्यात सवलत दिली जाते, परंतु मालवण येथील चित्रनगरीत निर्मात्यांकडून त्याहीपेक्षा कमी भाडं आकारलं जाणार आहे. कमीत कमी दरात चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.’

सिंधुदुर्ग हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. या चित्रनगरीमुळे या पर्यटनालाही चालना मिळेल, तसंच स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या चित्रनगरीच्या माध्यमातून कोकणच्या स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे. नितेश राणे हे सगळं आवर्जून सांगतात, तेव्हा या चित्रनगरीच्या उभारणीमागचा त्यांचा उद्देश किती व्यापक आहे, हे लक्षात येतं.

मराठी निर्मात्यांना कमीत कमी दरात चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. – नितेश राणे

1 COMMENT

  1. Good idea with good thought. In future, it can be converted into major tourist spot like Ramojee Film City of Hyderabad. In all, Malwan is going to be a tourist attraction .Certain type of guideline may be taken from Goa for this purpose. North Goa has developed into cluster of Beaches where tourists come every year.
    Transport facility plays major role in development of such spot. Hence trains from Mumbai to Malwan should be started. Now, Goa highway is to be four lanned and that will be benefit for Malwan. So also , transport communication from Pune, Kolhapur, Mahabaleshwar etc. will have to be upgraded. Boat rides,
    will play good role in development of tourist place.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version