Home देश फुकटया प्रवाशांची संख्या वाढली

फुकटया प्रवाशांची संख्या वाढली

1
संग्रहित छायाचित्र

गेल्या तीन वर्षात रेल्वेमध्ये फुकटया प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नवी दिल्ली- गेल्या तीन वर्षात रेल्वेमध्ये फुकटया प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षात जूनपर्यंत ४९.०१ लाख विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून २२७.६७ कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी लोकसभेत एका उत्तरादरम्यान दिली.

ते म्हणाले, २०११ -१२ मध्ये ११५.८२ लाख विना तिकीट प्रवासी आढळले. २०१२ -१३ मध्ये फुकटया प्रवाशांचा आकडा १३७.६८ वर पोहोचला. तर २०१३ -१४ मध्ये १४८.७० लाख फुकटया प्रवाशांची संख्या नोंदवली गेली. यामुळे रेल्वेचे कोटयवधी रुपये थकले आहेत. विना तिकीट प्रवासाला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील. फुकटया प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी नियमित आणि विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसेच याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी भित्तीपत्रके, सूचना, रेल्वे स्थानकांवरील घोषणांसह जाहिराती आणि सोशल मीडियाचाही वापर केला जाईल, अशी माहितीही गौडा यांनी दिली.

‘जैव स्वच्छतागृहां’चा रेल्वेचा प्रस्ताव

२०२१-२२ पर्यंत देशातील ४ हजार ३५६ रेल्वेच्या डब्यांमध्ये ११ हजार ७७७ जैव स्वच्छतागृहांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. यामध्ये महानगरी एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, जन्मभूमी एक्स्प्रेस, जोधपूर एक्स्प्रेस, बुंदेलखंड एक्स्प्रेस, मसुरी एक्स्प्रेस, आरवली एक्स्प्रेससह विविध गाडयांचा समावेश असून टप्याटप्याने जैव स्वच्छतागृहे बसवली जातील. यासाठी रेल्वेने गेल्या तीन वर्षापासून जवळपास १०१ कोटी रुपये खर्च केले आहेत, असेही ते म्हणाले.

जैव स्वच्छतागृहांमुळे मानवी विष्ठा थेट रेल्वे रुळावर पडण्याचा त्रास कमी होईल. विष्ठेचे विघटन होण्यासाठी जीवाणूंचा वापर केला जाणार आहे. यामुळे विष्ठेचे रुपांतर पाण्यामध्ये होणार असल्याने ही स्वच्छतागृहे पर्यावरणपूरक असणार आहेत. यामुळे एकूणच रेल्वे कोचमधील दुर्गंधीचा त्रास थांबणार असून रुळांमधील स्वच्छता राखली जाणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version