Home कोलाज फुलांच्या रांगोळ्यांची जादू

फुलांच्या रांगोळ्यांची जादू

1

यश चोप्रांच्या हिंदी सिनेमात टयुलिपच्या बागा हमखास दिसतात. हॉलंडमधील या बागांना प्रत्यक्ष भेट देण्याचा अनुभव अद्भुत असतो.
हिंदी सिनेमांनी गेल्या अनेक पिढय़ांना-आपण सगळेच त्यात आलो-ज्या गोष्टी दाखवल्या, त्यात दृष्टीसुखाचा भागही महत्त्वाचा मानला जातो. रंगीत सिनेमांची सुरुवात झाल्यावर तर हे विशेष जाणवतं. अर्थात त्यात पाहिलेल्या काही जागांनी मनात घर केलेलं असतं. मग त्या प्रत्यक्षात पाहण्यासाठी आपण जमेल तेवढी धडपडही करतो. माझा विचार तरी यापेक्षा वेगळा कसा असणार?

सगळं सुरू झालं ते ‘सिलसिला’ या सिनेमामुळे. त्यातलं अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं गाणंच नव्हे तर त्या चित्रीकरणासाठी वापरलेलं ‘लोकेशन’ही लोकांच्या तितकंच लक्षात राहिलं. त्यानंतर ‘कुली नंबर वन’, हॅलो ब्रदर’, ‘प्रेमरोग’ या सिनेमांमध्ये ‘ते’ पुन:पुन्हा मनावर ठसलं. अलीकडच्या ‘अन्नीयन’ या २००५ मध्ये प्रकाशित झालेल्या तमिळ सिनेमात ‘कुमारी’या गाण्यासाठी दिग्दर्शक एस. शंकर यांनी हीच जागा दाखवल्यानंतर तर तो पाहणा-या अनेकांना वाटलं की, ही फुलं खोटी आहेत. (त्यांना ‘रामोजी फिल्म सिटी’त चित्रीकरण केलेले सिनेमे पाहायची सवय होती ना!) एस. शंकर चित्रीकरणासाठी भारतीय सिनेमात वापरल्या न गेलेल्या जागा शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सिनेमा नंतर ‘अपरिचित’ या नावाने हिंदीत डब झाला होता.

‘सिलसिला’ प्रदर्शित झाला तो जमाना महाजालचा (‘इंटरनेट’चा) नव्हता. त्यामुळे वाचीव माहितीवर सगळा भर देत मी ‘ते’ लोकेशन कोणतं हे शोधण्याचा प्रयत्न केला होता. ते होतं हॉलंडमधलं ‘टयुलिप गार्डन’! सापडली माहिती तरी लगेच ‘तिकडे जाऊ या’ असं म्हणण्याची त्या काळात पद्धत नव्हती वा माझी तशी परिस्थितीही नव्हती.

मग जेव्हा ‘जाऊ या’ असं म्हणणं जमलं तेव्हा मग कसं जायचं, हा विचार सुरू झाला. मुंबईतल्या घराजवळच्या प्रवासी कंपनीकडे गेल्यावर समजलं की, त्यांची टूर तिथे जातंच नव्हती. अनेक प्रवास कंपन्यांनी मला तेच उत्तर दिलं. मला तर हॉलंडमधल्या त्या जागेला भेट देणं हे स्वप्न पुरं करायचं होतं. मधल्या काळात तिथली एक पुस्तिका हाती लागली. त्यातले फोटो एवढे सुंदर होते की, ते अनेकदा पाहून माहिती वाचून झाली. नंतर महाजालाच्या उपलब्धतेमुळे तेथील बागेचे व फुलांचे शेकडो फोटो पाहून झाले. पण तरीही फक्त फोटो पाहून माझं मन भरेना. तिथे जायचा ध्यास मला लागला होता.

माहिती शोधताना माझ्या हे लक्षात आलं होतं, की ही बाग (कुकेनहॉफ) वर्षातले फक्त दीड-दोन महिनेच (साधारणपणे मध्य मार्च ते मध्य मे) फुलते व तेव्हाच ती पर्यटकांसाठी खुली असते. त्यातही एप्रिल अधिक चांगला! शिवाय ती खुली असण्याची वेळ आधीच जाहीर केली जाते. त्यामुळे तिथे जाण्याची माझी वेळही त्या वेळेशी जुळणारीच असायला हवी होती. शेवटी असं ठरवलं होतं की, अ‍ॅमस्टरडॅमला पोहोचायचं व तिथून ती मग असलेल्या ‘लिसे’ या गावाला जाणारी बस पकडायची, कारण अ‍ॅमस्टरडॅमच्या स्किफॉल विमानतळावरून तिथे जाणारी बस मिळते. तिथे दिवसभर काढायचा हेही पक्क होतंच, कारण बाग बत्तीस हेक्टरमधे पसरलेली व १५ किलोमीटर पदपथ असलेली आहे.

आपलं नशीब आपल्याला काय व कसं दाखवतं ते आपल्यालाच माहीत नसतं. आमचे एक मित्र फ्रान्सला राहायला गेले व काही वर्षानी त्यांच्याबरोबर फिरायचा-भटकायचा आमचा प्लॅन ठरला. त्यांची मोटार होती व ती प्रवासासाठी वापरायची ठरलं. एका मे महिन्याच्या सुरुवातीला आम्ही स्वित्झर्लंडलडच्या विमानतळावर भेटलो व तिथून कुकेनहॉफ या स्वप्ननगरीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.

अ‍ॅमस्टरडॅमजवळच्या जंगलातल्या एका रिसॉर्टमध्ये आम्हाला राहायला जागा मिळाली होती. तिथून ‘लिसे’ १०० कि. मी. वर होतं, पण मोटारीमुळे तिथे जायची सोयही होती. एका सकाळी लवकर बाहेर पडलो, फुलांच्या दिशेने! साधारण तासाभरातच तिथे पोहोचलोसुद्धा. तिथे गाडय़ा ठेवण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होती. बागेच्या प्रवेशापाशीच मोठय़ा अक्षरात बागेचं नाव लिहिलेली कमान स्वागत करत होती. आत जाण्यासाठी तिकीट होतं व तिकीट काढण्यासाठी रांगही होती. हुशारीने आम्ही महाजालावरून आधी तिकिटं काढून ठेवली होती, त्यामुळे आत जाण्यासाठी वाट पाहावी लागली नाही.

आत गेल्यावर लगेच फुलांचे ताटवे दिसू लागले. आम्हा चौघांचे चेहरेही फुलले. सगळीकडे हिरवी झाडं सावली धरून होतीच. सगळ्या दिशांनी चांगली उंच व जुनी झाडं होती. खाली लहानखुरी मुद्दाम लावलेली झुडुपं फुलं लेवून नटली होती व वर काही मोठे वृक्ष फुलारले होते. आम्ही लगेचच त्यांचे आकार व रंग चित्रबद्ध करण्यास सुरुवात केली. उजवीकडे त्याच भागात तयार होणारी, फुलांची रंगीबेरंगी चित्र काढलेली, लाकडी बुटांची जोडी ठेवलेली होती. माझी मैत्रीण जरा जास्तच हौशीने त्यात उभं राहून पोझ देत म्हणाली, ‘‘ए, माझा फोटो काढा कुणी तरी.’’ ती फोटो काढून घ्यायला हौशी होती व मी फोटो काढायला. त्यामुळे आमची जोडी चांगली जमली. तशी ती एकूण प्रवासात जमलीच होती कारण मोटारीत आम्ही दोघंही मागे बसून ब-याच गोष्टी करत होतो. एकत्र सकाळचा नाश्ता बनवत होतो. खूप ‘विंडो शॉपिंग’ करत होतो. ही बाग पाहणं तिच्याही खूप मनात होतं.

सगळ्याभर फुलंच फुलं होती. कुठे बघावं ते कळत नव्हतं. नजरेत वा चित्रबद्ध करून किती साठवावं तेवढं थोडच होतं. शिवाय वेगवेगळ्या कोनातून तीच फुलं वेगळी दिसत होती. देखावा बदलत होता. पदपथावरून जसजसे पुढे जात होतो तसतसे नवनवीन रंग व रंगसंगतीची फुलं भोवती फेर धरून उभी होती. प्रकारांना मर्यादा नाहीये, असंच वाटत होतं. बत्तीस हेक्टरच्या या बागेमध्ये सत्तर लाख फुलांचे ‘बल्बस्’ इथे दरवर्षी नव्याने लावले जातात व दरवर्षी फुलांच्या रांगोळ्यांची वेगळी जादू या बागेला भेट देणा-यांसाठी निर्माण केली जाते. फुलांची जागाही बदलत राहते. नवीन कल्पना फुलत असतात. प्रकारांत भर पडत असते. काही वर्षापूर्वीच तर ऐश्वर्या रायचं नाव टयुलिपच्या एका फुलाला देण्यात आलं. अनेक मोठ मोठय़ा हॉलिवुड व बॉलिवुड सिता-यांची नावं इथल्या नवीन संकरीत जातींना देण्यात आली आहेत.

कुकेनहॉफ ही गेली पन्नास वर्षावर जगातली सगळ्यात मोठी फुलांची बाग आहे. शिवाय मला टयुलिपबरोबर डॅफोडिल्स व हायसिंथ याचेही प्रकार दिसले. त्यांच्या सुवासांनी व रंगांनी भरलेली ही जगातली सर्वात सुंदर ‘स्प्रिंग गार्डन’ आहे, हे विधान मला, ती पाहताना पूर्णपणे पटत होतं. ‘कुकेनहॉफ’ म्हणजे ‘किचन गार्डन’. एवढी मोठी व सुंदर बाग असणारं तर स्वर्गातलंच ‘किचन’ असावं. अर्थात नाव पडण्यालाही कारण आहे. ‘जॅकोबा व्हां बैरेन’ या किल्ल्यातील स्वयंपाकघरासाठी लागणा-या मसाल्याचं पीक इथेच घेतलं जाई. नंतर १९४९ मध्ये तिथल्या त्या वेळच्या मेयरने ही बाग बनवली. कल्पना अशी होती की नेदरलँड व युरोपमधल्या फुलांची शेती असणा-यांना त्यांच्या फुलांचं प्रदर्शन करता यावं व नेदरलँडला फुलांची निर्यात करण्यास मदत व्हावी. त्याची परिणिती म्हणूनच की काय, आज हा देश जगातला सर्वात मोठा फुलांचा निर्यातदार आहे.

कितीतरी वेगवेगळ्या देशातून आलेले लोक तिथे फिरत होते. फुलांचा आनंद घेत होते. इतर अनेक रंगांबरोबर काळ्या रंगाचे टयुलिपही तिथे होते. सगळेच किती टपोरे होते! सगळी बाग स्वच्छ व सुंदर दिसत होती. एका ठिकाणी तर समोर चक्क वाहतं पाणी होतं. ते बागेच्या मधून व आजूबाजूने वाहत होतं. यातून बोटीतून सर करता येते. या बोटींना ‘व्हीस्पर बोटस्’ असं अगदी योग्य नाव आहे. कारण इलेक्ट्रिक इंजिनवर चालणा-या या पर्यावरण साभाळणा-या बोटी अगदी आवाज न करता चालतात. पाण्याचा काय आवाज येईल तेवढाच. उथळ पाण्यातही त्या वापरता येतात. पूर्वीपासूनच तशा बोटी तिथले शेतकरी व माळी सगळ्या प्रकारच्या कामासाठी वापरत आले आहेत. सुमारे ४५ मिनिटांच्या या सहलीत अतिशय मनमोहक नजारा दिसतो असं वाचलं होतं, परंतु आमच्या नशिबात ती सर नव्हती, कारण खराब हवेमुळे त्या दिवशी बोटी बंद होत्या. त्यासाठी पुन्हा येण्याचं जमवायचं मी मनात ठरवलं.

दुपार झाल्यावर खूपच भूक लागली. तशी बागेत अधूनमधून खाण्यापिण्याची चांगली सोय उपलब्ध होती. त्याचा फायदा सगळेच पर्यटक घेत होते. एका ब-यापैकी गर्दीच्या जागी आम्ही पोट भरण्यासाठी थांबलो. गर्दीच्या ठिकाणी यासाठी की, जिथे गर्दी असते तिथे नक्कीच जेवण चांगलं असतं. शिवाय खप चांगला होतोय दिसत असल्याने ते शिळं असण्याचीही शक्यता नसते. हे सगळं मी प्रवास करूनच तर शिकले होते.

उदरभरण झाल्यावर पाय परत फुलांकडे वळले. मधूनच पाण्याची कारंजी होती. तसे तिथे बागेचे चार प्रकार दिसले इंग्लिश लॅण्डस्केप गार्डन, हिस्टॉरिकल गार्डन (ऐतिहासिक बाग-इथे अगदी पूर्वीपासूनचे ‘बल्ब्स’ चे प्रकार आत.), नेचर गार्डन (यात पाण्यातील उगवणारी झुडुपं इतर ‘बल्बस्’ बरोबर दिसतात.) व जॅपनिज कन्ट्री गार्डन! या सगळ्या बागांतून आम्ही चौघांनी खूप फोटो घेतले. एकत्र काढले. एकमेकांचे काढले. फुलारलेल्या झाडांचे काढले. फुलांचे तर काढलेच.

हे सगळं फिरत असताना आम्हाला एक युरोपियन कपल भेटलं. गर्दी होती म्हणून आम्ही एकाच टेबलावर जेवायला बसलो होतो. बोलताना कळलं की ते इथे चौथ्यांदा येत होते आणि तरीही दरवेळेस नवीन बाग रचना व काही नवीन फुलं, पान पाहून चकित होत होते. तरीही परत आयुष्यात किमान एकदा तरी इथे यायचा त्यांचा मानस होता. माझी तर खात्री झाली होती की, सर्व वयांच्या व्यक्तींना आकर्षक वाटेल, अशी या बागेची ख्याती अत्यंत योग्य आहे.

डोळे व पोट भरल्यावर नाक काम करावं म्हणू लागलं. इतका सारा वेळ आसमंतात भरून आलेला गंध नाकातही भरलेला होता. एकूणच सगळ्या फुलांचा एकवटलेला गंध ज्याला कळला नसेल तो कपाळकरंटाच म्हणायचा. त्यातला वर झाडांवर फुललेल्या फुलांचा व खाली वनस्पतींवर फुललेल्या फुलांचा वास कोणता सांगणं कठीण होतं. ते कळावं म्हणून आम्ही चौघांनी काही टयुलिप्सचा वास घेऊन पाहायचा ठरवलं, तर प्रत्येक रंगाच्या फुलाचा वास वेगळा वाटू लागला. शिवाय डॅफोडिल्स व यसिंथ होतेच. शेवटी नाकाचा एवढा गोंधळ उडाला की, कशाचा कोणता वास हेच आठवेना. (याची आठवण म्हणून मी विमानतळावर ‘टयुलिपा डे’ नावाचा परफ्यूम विकत घेतला.)

सगळ्यात शेवटी एका टोकाला पोहोचल्यावर आमच्या तोंडातून शब्द फुटेना. आमच्या सारखीच काही मंडळी तिथे मंत्रमुग्ध होऊन उभी होती. समोर टयुलिप्सचं कितीतरी मोठं शेत होतं. जवळजवळ नजर पोहोचेल तिथेपर्यंत ते पसरलेलं होतं. अगदी तेच. हिंदी सिनेमांतून पाहिलं होतं तेच. एका बाजूला मोठी पवनचक्कीदेखील तशीच. वेगवेगळ्या रंगांच्या टयुलिप फुलांचा स्वप्नापलीकडला गालिचा पसरलेला होता. अनेक रंगाच्या लांबलचक ओळी! त्या संपूर्ण जागेचा डोळ्यांत मावत होता तेवढा मोठा ‘शॉट’ मात्र कोणत्याही सिनेमात दिसला नव्हता. सगळे पवनचक्कीवर जायला धडपडत होते. मीही त्यात होतेच. तिथून ते सगळं आणखीच सुंदर दिसत होतं. नजर जास्त दूरवर पोहोचत होती. जणू इंद्रधनुष्य आकाशात मावेना म्हणून जमिनीवर पसरलं होतं. पडलेल्या स्वच्छ उन्हात वाळवत ठेवलं होतं. तो नजारा डोळ्यांत साठवून घेत त्या दृश्याने भारलेले लोक ते कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. काही जण तर तिथेच फतकल मारून बसत होते. शेवटी आणखी थांबता येत नाहीये हे लक्षात येऊन सुस्कारे टाकत बाहेर पडत होते.

तरीही उरलेला भाग होताच, तोही बघायचा होता. तेथीही आणखी काही आश्चर्य आमची वाट बघत असण्याची शक्यता होतीच. फार संध्याकाळ होण्याआधी निघायला हवं होतं कारण बरंच दूर जायचं होतं. लोक परत-परत इथे का येतात कळलं होतं. दोघांचे कॅमेरे मिळून आम्ही साधारण तीनशे तरी फोटो काढले होते. संपूर्ण दिवस घालवला होता. खूप खूप फुलं पाहिली होती. खूप मजा करत दिवसभर रंगात बुडलो होतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या जागेला भेट देण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.

(२०१४ मध्ये ही बाग २० मार्च ते १८ मे दरम्यान पर्यटकांसाठी खुली असणार आहे. संपूर्ण आठ आठवडे परत एकदा लोकांसाठी नवनवीन फुलं व रचना घेऊन!)

1 COMMENT

  1. Dear Mangal Gogte, I think this is complete tore u have don from Holland, one thing is good u know most of the film also about Tulip Garden, any way I have suggestion If u can make article on Vienna world (Old name is Strawberry Kasseri tore) any way is good article to know the part of world have good day.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version