Home एक्सक्लूसीव्ह फेरीवाल्यांवर कारवाई कराच!

फेरीवाल्यांवर कारवाई कराच!

0

मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईचे समर्थन करत सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि मनसेने आयुक्तांची पाठ थोपटली.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईचे समर्थन करत सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि मनसेने आयुक्तांची पाठ थोपटली. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करणा-या शिवसेनेनेच मुंबईत शिव वडाच्या अनधिकृत हातगाडया लावल्या असून त्या अनधिकृत असल्यामुळे महापालिकेच्या वतीने त्यांच्यावर कारवाई केली जाते.

मात्र, या अनधिकृत शिव वडाच्या हातगाडय़ांना हात लावून नका, त्यांच्या गाडया तोडू नका, मात्र फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी शिवसेना आणि भाजपाने केली. त्यामुळे अनधिकृतरीत्या पथारी पसरून बसलेले फेरीवाले नको म्हणणा-या शिवसेना-भाजपाला रस्ता अडवून लावलेल्या शिव वडा हातगाडया कशा चालतात, असा सवाल विरोधी पक्षाने केला आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली जात नसून ऑगस्ट २०१४ रोजी फेरीवाल्यांचा सव्‍‌र्हे करताना भरून घेतलेल्या अर्जाची अजूनही पडताळणी झालेली नाही. त्यामुळे याबाबत नऊ फेरीवाला संघटना न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयात गेलेल्या संघटनांशी संबंधित आणि गेल्या ३० ते ४० वर्षापासून फेरीचा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र बनवेपर्यंत केली जाऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली.

मुंबईतील तब्बल २२ हजार हातगाडया या महापालिका अधिका-यांच्या आहेत, असा आरोप आंबेरकर यांनी करत गरीब फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, मात्र अधिका-यांच्या हातगाडय़ांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याला शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी तीव्र विरोध केला. फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई योग्यच आहे.

परंतु ही कारवाई करताना अधिका-यांना मारण्याची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडून केली जाते. हे योग्य नसून भविष्यात फेरीवाल्यांकडून अधिका-यांवर कारवाई झाल्यास निरुपम यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे स्पष्ट करत सपाचे गटनेते रईस शेख यांनी गोवंडीमध्ये अनधिकृत शिव वडा हातगाडीवर कारवाई झाल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी हंगामा का केला, असा सवाल शिवसेनेला केला.

फेरीवाला धोरणाबाबत मुंबई महापालिका सुस्त आहे. मात्र शेजारील ठाणे महापालिकेने या धोरणाची अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना परवानेही दिले, असे काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी स्पष्ट करत फेरीवाल्यांवरील कारवाईचा विरोध केला. शिवसेनेचा या कारवाईला पाठिंबा आहे. पण याच शिवसेनेने ६५ हजार रुपयांना शिव वडाचे स्टॉल विकले. ते सर्व अनधिकृत आहेत.

घाटकोपरमध्ये या स्टॉलवर कारवाई केल्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी थयथयाट केला. हा स्टॉल तोडून टाकल्यामुळे जे नुकसान झाले ते महापालिकेने द्यावे, अशी मागणी करण्यात आली. अनधिकृत शिव वडाच्या स्टॉलवर कारवाई केली तर विरोध आणि फेरीवाल्यांवर कारवाई करायला समर्थन ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप छेडा यांनी केला.

मुंबईत रेल्वे स्थानकाच्या परिसरात आणि ३० फूट रुंदीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांना बसू देऊ नये, अशी मागणी विनोद शेलार यांनी केली. तर मनसेचे संदीप देशपांडे यांनी केंद्राने मंजूर केलेल्या फेरीवाला धोरणाचा पुनर्विचार करण्यात यावा, असे सांगत फेरीवाल्यांवरील कारवाई योग्यच असल्याचे सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव, मनसेच्या अनिषा माजगावकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, डॉ. अनुराधा पेडणेकर आदींनी कारवाईचे समर्थन केले तर शीतल म्हात्रे, धनंजय पिसाळ यांनी विरोध केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version