Home टॉप स्टोरी ‘बँक ऑफ चायना’चे फायदे आणि तोटे

‘बँक ऑफ चायना’चे फायदे आणि तोटे

1

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ चायनाला भारतात बँक सुरू करण्याचा परवाना दिला आहे.

मुंबई- बँक ऑफ चायना ही बँक भारतात आल्याने भारताला त्याचा फायदाही आणि धोकाही आहे, फक्त आपण किती जागरूकपणे या बँकेच्या व्यवहारांकडे पाहतो हे फार महत्त्वाचे आहे आणि जागरूकता ठेवावी लागेल, असे मत अर्थतज्ज्ञ आणि सेबीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी ‘दै. प्रहार’शी बोलताना व्यक्त केले. नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ चायनाला भारतात बँक सुरू करण्याचा परवाना दिला आहे. त्या आनुषंगाने चंद्रशेखर टिळक यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

चंद्रशेखर टिळक म्हणाले, मुळात परदेशी बँक भारतात येणे ही काही नवी गोष्ट नाही. या पूर्वीसुद्धा आपल्याकडे अनेक परदेशी, युरोपीय बँका आलेल्या आहेत, त्यामुळे बँक ऑफ चायना आल्याने फार मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल, असे वाटण्याचे कारण नाही. या पूर्वी ग्रींडलेज बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, हाँककाँग, शाँघाय बँक कॉपरेरेशन म्हणजे एचएसबीसी बँक अशा अनेक बँका आपल्याकडे आलेल्या आहेत. पण बँक ऑफ चायना आणि या बँकांच्या येण्यामागे फरक आहे.

एकतर या आधीच्या परदेशी बँका या १९९० पूर्वी आलेल्या आहेत, म्हणजे जागतिकीकरणापूर्वी आलेल्या आहेत. त्यामुळे ही परदेशी बँक दीर्घ काळानंतर भारतात येत आहे ही गोष्ट म्हटलं तर नवी आणि म्हटलं तर जुनी अशी आहे.

आता विचार केला पाहिजे तो या बँकेच्या येण्यामुळे भारताला नेमका फायदा काय होईल त्याचा. एकतर अर्थव्यवस्था सध्या वेगात फोफावते आहे. त्यात चिनी उत्पादने आणि व्यवहारांचे प्रमाणही वेगाने आलेले आहे. चिनी उत्पादनाचे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान पाहता या फायदा होऊ शकतो असे दिसते. एकुणच जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेत चीनचा सहभाग पाहता त्यादृष्टीने भारताला मदत होईल. यातील राजकारणाचा भाग आपण बाजूला ठेऊ पण भारताची प्रमुख अशी सात बंदरे ही चीनच्या ताब्यात आहेत. अशावेळी या बंदरांमार्फत होणारे व्यवहार, जागतिक व्यापार, तेलासंबंधी होणारे व्यवहार यामध्ये ही बँक भारतात आल्यामुळे डायरेक्ट प्रोसेसिंग करायला सोपे जाईल.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने चीनला ही बँक काढावी म्हणावी विनंती केली नाही तर चीनने भारताला विनंती केली म्हणून रिझर्व बँकेने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे चीनचा त्यात फायदा आहे, त्याचा भारतालाही लाभ होईलच.

मात्र यामागील धोकेही लक्षात घेतले पाहिजेत. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका या सध्या अडचणीत आहेत. नीरव मोदीसारखे घोटाळे झाल्यामुळे या बँका नाजूक अवस्थेत आहेत. त्यामुळे या बँकांकडचा ग्राहक आणि व्यवसाय बँक ऑफ चायनाकडे वळला तर त्यातून फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील फार मोठा डेटा आयताच चीनला मिळू शकतो. आता कर्जच नाही तर सेव्हींग खाते काढायचे झाले तरी आपल्याला केवायसीची अट आहे. आधारकार्ड, पॅन कार्ड, टॅनकार्ड सगळे लिंक झालेले आहेत. त्यामुळे आपोआप सगळा डेटा भारतातून बँक ऑफ चायनाकडे जाऊ शकणार आहे. त्यामुळे पुढील व्यवहारांवर आपल्याला डोळयात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. सगळ्या व्यवहारांवर देखरेख करावी लागेल. हे केले तर काहीच वाईट परिणाम होणार नाही.

1 COMMENT

  1. डेटा देण्यास लागेल मग आयतेच कोलीत चीन कडे जाणार.अगोदर ज्या बॅंका आहेत त्या देशाबरोबर आपले संबंध चांगले होते चीन चे तसे नाही. अगोदरच सावध केल बरंच झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version