Home कोलाज बहाणेबाजीतलं नाटक

बहाणेबाजीतलं नाटक

1

मुलीच्या शाळेची वेळ झाली; पण तिला कंटाळा आलाय. शाळेला दांडी मारायची आहे. त्यासाठी अभिनय करतेय पोटदुखीचा.. बरं वाटत नसल्याचा. शाळेला दांडी मारण्याचा मुलीचा हा बहाणा आईला कळतोच. कोण कशी नाटकं करतात, हे समजण्यात ती तरबेज असते. मुलीची समजूत घालते आणि अशी ‘नाटकं’ करायची नाहीत, असा दमही देते.. घराघरांत बहाणेबाजी करण्यासाठी अशी नाटकं होत असतात.. पण या वरवर बहाणेबाजी वाटणा-या नाटकात वेगळंच काहीतरी दडलेलं असतं, ते शोधल्यानंतर खरं नाटक जन्माला येतं..

ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड व्याप आहे. कुणाला हा व्याप हवाहवासा वाटतो तर अनेकांसाठी तो ताप ठरतो. व्याप अंगावर घेणारे हीरो होतात आणि ताप समजून वैतागलेला कामचुकार ठरतो. हा कामचुकारपणा करण्यासाठी तो वेगवेगळी पात्रं, प्रसंग रंगवतो. कधी तो स्वत: आजारी असल्याचे कारण सांगण्यासाठी बॉसला फोन करतो. अगदी ठणठणीत असताना क्षीण आवाजात बोलण्याचा ज्या ताकदीने तो अभिनय करतो, त्या अभिनयाच्या बळावर रजा मंजूर करून घेण्यात जिंकतो. हा अभिनय करणं सर्वानाच जमत नसतं. अनेकांना तर खोटं बोलताना हसायला येतं. अशी ही पात्रं, समाजात वावरत असतात आणि प्रत्यक्ष नाटक जगतात.

हाच कामचुकार माणूस गोड बोलून वरिष्ठांची मर्जी संपादन करतो. कामावर कित्ती प्रेम करतो, हे सांगण्यातही तो पटाईत असतो. त्या सांगण्यातून पगार वाढवून घेतो. पदोन्नतीही मिळवतो. कामाचा व्याप आनंदाने पेलणा-यांना त्याच्या पदोन्नतीचा संताप येत असतो, पण हा संतप्तपणा दूर ठेवून या कामचुकार माणसाचं अभिनंदन करतो. ज्याच्या खोटारडेपणाबद्दल मनाच्या एका कोप-यात प्रचंड राग आहे, त्याच सहका-याचं अभिनंदन करण्याचे ‘अभिनय सोहळे’ अनेक शासकीय, खासगी कार्यालयात रंगतात. मनात नसताना त्याच्या पदोन्नतीच्या सोहळ्यात त्याच्यावर पल्लेदार भाषण करणारेही आपल्याला भेटतात. मनात दु:ख साठवून ठेवत आनंदी असल्याचं सांगणं, ही कमाल एखाद्-दुस-यालाच जमत असते. अशा प्रसंगात त्यातूनही मार्ग काढतात. चांगलं बोलत असतानाच, शब्दांचा खेळ करून, छोटी-मोठी उदाहरणं देऊन, ‘लेकी बोले सुने लागे’ या पारंपरिक, पण चपखल शैलीचा वापर करून, कामचुकार माणसाच्या पदोन्नतीचा राग बेमालूमपणे आणि बिनधास्तपणे व्यक्त करतो. अशी वेगवेगळी माणसं आपल्या अवतीभवती दिसतात. भेटतात. आपलं मन जिंकून घेतात. त्यात आपण रमतो. गमतो. जगण्याचा उत्सव साजरा करत असतो.

नाटक हे समाजमनाचा ‘आरसा’ आहे, असं म्हटलं जातं. त्याचीच ही काही उदाहरणं आहेत. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा नाटककाराला दिसतात. त्यातलेच नायक आणि खलनायक तो शोधतो. वृत्ती आणि प्रवृत्ती शोधतो. खलनायक हा वाईटच असतो असं नाही. अनेकदा खलनायकाचं वरवरचं वागणं हे खोटारडेपणाचं वाटत असलं तरी पडद्यामागील त्याचं आयुष्य वेगळंच असतं. त्याला कामाचा कंटाळा आलेला नसतो, तर तो नोकरीतील कामाचा व्याप सांभाळूनच समाजकार्यातही गुंतलेला असतो. त्यात रमत असतो. भाकर देणा-या नोकरीपेक्षा त्याला ही सामाजिक बांधिलकी मोठी वाटते आणि नोकरीच्या कामात चालढकलपणा करून, ती तो जोपासत असतो. त्या माणसाचं हे अवलियापण शोधण्याचे कष्ट नाटककाराला घ्यावे लागतात. नाटकाची खरी गोष्ट अशा खोदकामातूनच सापडते. तसं खोदकाम झालं नाही तर त्या पात्रावर अन्याय होतो. नाटककाराने त्याच्या कुठल्याही व्यक्तिरेखेवर अन्याय होऊ नये याचं भान जपलं पाहिजे. ते जपण्यासाठी हे खोदकाम महत्त्वाचं असतं.

मुलं शाळेत जाण्याचा कंटाळा करतात, याची कारणं केवळ त्यांचा गृहपाठ पूर्ण झाला नाही, एवढंच नसतं. ते वरवरचं कारण असतं. एखादा शिक्षक किंवा शिक्षिका, शाळेतील एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा त्याला किंवा तिला त्रास होतो आहे का? ती शाळेत जाण्याचा कंटाळा करते, त्याचं खरं कारण ती सांगत नाही, उलट बरं नाही, पोट दुखतं, असं सांगते तेव्हा तिच्या या वृत्तीची वेगवेगळी कारणं शोधली पाहिजेत. हे शोधकार्य त्या गोष्टीला कलाटणी देणारं ठरतं आणि नाटक एक वेगळी गोष्ट सांगून जातं. त्या गोष्टीत पडद्याआड असलेल्या गोष्टी नाटकाच्या कथेला ख-या अर्थाने कलाटणी देत असतात.

एखाद्या माणसाचीच नव्हे तर अनेक घटना-दुर्घटनाही नाटककाराला खुणावतात. कलावंत त्या गोष्टीच्या प्रेमात पडतात. त्यावर कधी कविता होते. कधी कथा. कधी चित्रपट तर कधी नाटक. कुणी ती घटना चित्राच्या माध्यमातून समाजासमोर मांडतो. अशा घटना-घडामोडींतही कलावंताला खोदकाम करूनच वास्तविकता शोधायची असते. ती वास्तविकता मांडली नाही, वरवरची गोष्ट सांगितली, महत्त्वाचे धागेदोरे सोडून दिले तर ती गोष्टही वरवरची वाटते. वेगळं काय सांगितलं, असा सवाल रसिक आणि जाणकार विचारतात. त्यात नाटक थांबतं. कलाकृती सकस होण्यासाठी, वास्तव मांडण्यासाठी बहाणेबाजीतली कारणं शोधताना कलावंताला चिकित्सक व्हावं लागतं. त्या व्यक्तिरेखेची, घटनेची, तपशीलवार माहिती मिळवावी लागते. तुकडया-तुकडयात मिळालेल्या माहितीचे धागे जोडून गोष्टीचं विणकाम करावं लागतं. त्यानंतर आकार घेते एक कलाकृती. त्या कलाकृतीचं माध्यम नाटक असो वा कविता, कथा असो वा कादंबरी, चित्रपट असो वा लघुपट, हे खोदकाम महत्त्वाचं आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version