Home विदेश बांग्लादेशात रोहिंग्यांची नसबंदी

बांग्लादेशात रोहिंग्यांची नसबंदी

1

ढाका – बांगलादेशने त्यांच्या देशात राहात असलेल्या शरणार्थी रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहे. रोहिंग्यांची वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या सर्व योजना अयशस्वी ठरल्यानंतर ही योजना तयार केल्याचे सांगण्यात येते. गेल्या महिन्यात बांगलादेशने रोहिंग्यांच्या शिबिरात निरोधही वाटले होते. पण त्याचा काही परिणाम दिसून आला नाही. म्यानमारमधील हिंसाचारानंतर सुमारे ६ लाखांहून अधिक रोहिंग्या बांगलादेशात राहात आहेत.

म्यानमारहून आलेल्या या शरणार्थीनी जेवण आणि स्वच्छ पाण्यासाठी झगडावे लागत आहे. काही अधिका-यांच्या मते, अशा परिस्थितीत जर त्यांच्या संख्येवर मर्यादा आणली नाही तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. ज्या जिल्ह्यात रोहिंग्यांचे शिबीर आहे, त्या जिल्ह्यात कुटुंबनियोजन विभागाचे प्रमुख पिंटू कांती भट्टाचार्य यांच्या मते, रोहिंग्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जागरूकता नाही.

‘एएफपी’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, संपूर्ण समुदायाला जाणूनबुजून मागे सोडण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. अशा स्थितीत लोकसंख्या नियंत्रणाबाबतही त्यांच्या जागरूकता नाही. रोहिंग्या शिबिरात मोठा परिवार असणे, हे सामान्य आहे. काहीजणांना १९ हून अधिक मुलं आहेत. अनेक रोहिंग्यांना एकाहून जास्त पत्नीही आहेत.

जिल्हा कुटुंब नियोजन अधिका-यांनी निरोध वाटण्यासाठी एक अभियान सुरू केले होते. रोहिंग्यांना आतापर्यंत फक्त ५५० निरोधाची पाकीटे वाटण्यात आली आहेत. अनेक लोक त्याचा वापर करण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारला रोहिंग्या पुरूष आणि महिलांसाठी नसबंदी अभियान सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.

रोहिंग्या शरणार्थी शिबिरात काम करत असलेल्या फरहाना सुल्ताना या कार्यकर्तीने म्हटले की, या शिबिरातील महिलांना जन्म दर कमी करणे म्हणजे पाप आहे, असं वाटतं. हे लोक म्यानमारमध्येही कुटुंब नियोजन रुग्णालयात जात नव्हते. म्यानमार सरकार त्यांना धोकादायक औषध देईल, अशी भीती त्यांना वाटत होती.

शिबिरात राहत असलेल्या सबुरा नावाच्या  ७ मुलांच्या आईने म्हटले की, तिच्या पतीच्या मते ते दोघे मिळून त्यांच्या मोठय़ा कुटुंबाचे पालनपोषण करू शकतात. कारण म्यानमारमध्ये त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे. त्यामुळे आमच्या मुलांना काहीच अडचण येणार नाही, असे ती म्हणाली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version