Home महाराष्ट्र कोकण मेवा बांधावरचे दिवस

बांधावरचे दिवस

1

तारामुंबरीची खाडी आमच्या बेलवाडीतून खालच्या बाजूने वाहत जाते. या खाडीच्या अस्तित्वामुळेच अनेक लोकांची उपजीविका होते. फार पूर्वी म्हणजे ट्रॉलर नव्हते तेव्हा तारामुंबरीतील मच्छीमार लोकांचे जीवन या खाडीवर अवलंबून होते. वाडीतील आजूबाजूच्या वाडयांतील लोक चिव्याची भाळी लावून वा जाळी लावून मासे पकडीत. ब-याच वेळा हे मासे लोकांच्या खर्चापुरते असत. भाळी लावण्यासाठी कमीत कमी पाच-सहा लोकांची तरी मदत लागे. ज्याच्या मालकीचे भाळे किंवा जाळी असे त्याला मासळीचा एक वाटा जादा मिळे. अमावस्या पौर्णिमेला माशांचा हंगाम असल्यामुळे मासे खूप मिळत. तो माशांच्या चढावाचा हंगाम असे.

पहाटेच्या वेळी तारामुंबरीतील मच्छीमार छोटया छोटया होडया घेऊन जाळी फेकून मच्छीमारी करीत. तारामुंबरीत येऊन मासळी विकत घेणारे नारायण जगताप, वसंत गोळवणकर रात्री तारामुंबरीला येत व पहाटे मासळी घेऊन व बर्फ घालून कोल्हापूरला किंवा बेळगावसारख्या मोठया शहरात पाठवीत. दिवसाही काही मच्छीमार मासळी पकडण्याचा व्यवसाय करीत.

समुद्रात रापणी घालून मोठया प्रमाणात मासळी पकडली जाई. या मासळीला बहुतेक स्थानिक गिऱ्हाईक असे. काही मच्छीमार बाया मासळी विकत घेऊन त्या वाळवीत. निरनिराळया बाजारात नेऊन त्या विकत. वरच्या गावांतून शेतीच्या हंगामात या मासळीला चांगला दर येतो. बैलगाडीने या मासळीची वाहतूक केली जाई. ओळखीच्या व परिचयाच्या ठिकाणी जाऊन या मच्छीमार बाया ही वाळवलेली मासळी विकीत किंवा पैशाऐवजी धान्य वगैरे घेऊन येत.

खाडीत केवळ मासळीच मिळत नसे. तेथे मुळे, तिस-या, कालवे, खेकडे, तोडई, शिनाने हे लोकांचे आवडीचे मत्स्य पदार्थही मिळतात. बाजारात त्याला किंमतही चांगली मिळते. मोठाली कालवे मुंबईसारख्या मोठया पंचतारांकित हॉटेलात पर्यटक मोठया आवडीने खात असतात. देवगडच्या खाडीत वाडातरजवळ मिळणा-या तिसऱ्यांना मुंबईच्या हॉटेलातून मोठी मागणी असते. हंगामाच्या दिवसात टेम्पो भरून तिस-या मुंबईला जात असतात. शिनानेही आवडीने खाल्ले जातात.

मासे, तिस-या, मुळे इत्यादींत व्हिटॅमिन असते. शरीराला या गोष्टी पोषक असतात. महागडी कडधान्ये खरेदी करण्यापेक्षा हा मत्स्याहार किमतीच्या दृष्टीने खूपच कमी पडतो. इतर महागाईप्रमाणे या मत्स्यान्नाच्या किमती आता वाढल्या आहेत. परंतु गोरगरिबांना त्या परवडणा-या आहेत. एखादी बाई खाडीत जाऊन अर्धा पाऊण तास आमटीसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी काही आणू शकते.

मुळे किंवा कालवे वेचून काही कुटुंबे आपल्या छोटया कुटुंबाचे उदरभरणही करू शकतात. मी देवगडहून सुट्टीच्या दिवसात बेलवाडीत गेलो की खाडी काठच्या बांधावर खाडीतील सारे दृश्य न्याहाळण्यासाठी मुद्दाम जात असे. अजूनही जावेसे वाटते. परंतु बांधावर जाण्यासाठी चढ-उतार असल्यामुळे जाणे शक्य होत नाही. वयाचाही विचार करावा लागतो. लहानपणी खाडीतील सारे दृश्य मी न्याहाळून पाहत असे. खाडीतून तुरूतुरू पळणा-या होडया, त्यांच्या जाळयांत मिळणारे फडफडणारे मासे, मच्छीमारांच्या होडीच्या शर्यती बांधाच्या मुळाशी चढ-उतार करणारे खेकडे पूर्वी दाभोळ, वरंडवाडी येथेपर्यंत रस्ता नव्हता.

इथले बरेच लोक शिडाच्या होडीने दाभोळे येथे जात. आता रस्ता झाल्यामुळे खाडीतील ही होडयांची वाहतूक बंद झाली आहे.  बांधावर उभे राहिले की विविध दृश्ये न्याहाळता येतात. बांधातील आतील बाजूस गुडघाभर पाण्यातील खूप गाळ साचलेला असतो. लहान-मोठी कांदळाची झाडे असतात. त्या झाडाच्या आधाराने मासे राहत असतात. ते मासे पकडण्यात मोठी गंमत असते. ते मासे खूप चवदार असतात. आकळी या पाळयाच्या साधनाने ते पकडता येतात. या आतील भागाला पुरांगळ म्हणतात.

कांदळाच्या झाडाच्या आसपास मुळाशी या माशांचे वास्तव्य असते. बारीक प्रॉन्स, शेतके, गुंजल्या अशा प्रकारचे हे मासे असतात. बांधाच्या आत खूप पाणी असलेली कोंड आम्ही लहान मुले त्याच कोंडीत पोहायला शिकलो. पहिल्याने कडेकडेने पोहायला शिकत असू. नंतर खोल पाण्यात पोहायला जात असू. नाका-तोंडात पाणी जाई. पण धाडसाने मी खूपच चांगला पोहायला शिकलो. मात्र खाडीच्या भागात पोहण्याची भीती वाटायची.

खाडीतील पाण्याचा प्रवाह जोरदार असतो. आकळीचे जाळे घेऊन कोंडीत मासे पकडण्याचा प्रयत्न आम्ही करीत असू. कोंडीतील गढूळ पाणी वर आल्यानंतर बारीक शेंगटयांच्या डोळयांत पाणी जाऊन त्या वर येत व त्या भरपूर मिळत. मोठया शेंगटया आपल्याला आवडत नाही. चिकित्सेने व आवडीने मासे खाणारे लोक शेंगटी नजरेलाही धरीत नाहीत.

पुरंगळयाच्या आतील बाजूस मुळे असतात. या मळयात काही वष्रे उसाची लागवड करीत. उसापासून रस काढण्यासाठी रगाडाही होता. त्या रसापासून काकवी तयार करीत. काकवी भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी वापरली जाई. ती मधासारखी लागे. मळयांत उसाची शेती फारच थोडी वर्षे केली गेली. त्यानंतर मळयांत भातशेती केली जाई. भातशेतीचा प्रयोग मीही केला आहे.

मळा कसदार असल्यामुळे मळयांत भाताची शेती खूप चांगली होई. कारण पाऊस गेला तरी मळयांत पाणी साचून राही व भातशेतीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नसे. उन्हाळयात मात्र मळा रिकामा असे. आम्ही वाडीतील मुले मळयाचा उपयोग हुतुतू खेळण्यासाठी करीत असू. मळयात फुरडया ही कंदमुळेदेखील मिळत. कुदळी या हत्याराने खणून आम्ही ती कंदमुळे खणीत असू. या कंदमुळांची खारट चव असे. पण ती खायला आवडत.

आता तारामुंबरी-मिठमुंबरी पूल होऊ घातला आहे. त्यांचे काम वेगाने सुरू आहे. तारामुंबरी मिठमुंबरी पुलामुळे मालवण भाग जवळ आला आहे. पर्यटन व्यवसाय व संरक्षणाच्या दृष्टीनेही या पुलाचा उपयोग होईल. नदीतील बंधारेही बांधले जात आहेत. या बंधा-यामुळे ज्या ठिकाणी खारे पाणी भरत होते ते खारे पाणी तिथे प्रवेश करू शकणार नाही. पावसाळी व उन्हाळी पिके त्या ठिकाणी होऊ शकतील. शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळेल. खाडी काठचा एक समृद्ध भाग तयार होईल.

खाडी काठच्या या मळयांतून कंदमुळे सुद्धा तयार होतात. ही कंदमुळे खारट व चवदारसुद्धा असतात. डुक्कर हा प्राणी या कंदमुळांना लंपट असतो. रात्रीच्या वेळी संधी साधून शिकारी लोक त्याची शिकार करतात.  नदीच्या काठावर काळया रंगाचे अडथ, कुडम या पक्ष्यांची देवगडहून शिकारी येऊन त्यांची शिकार करीत. पांढ-या बगळयांची कोणी शिकार करीत नसे. खेकडयांच्या बिळांत हात घालून लोखंडी शिगेच्या सहाय्याने खेकडे पकडणारे खूप लोक दिसतात.  खाडीत गेलो की बांधावर जाऊन खाडी, खाडीतील सारा परिसर न्याहाळावा असे वाटते. परंतु शरीर थकले आहे. नजर खूप अंधूक झाली आहे.

वय ८५ झाले आहे. वयाच्या सत्तर वर्षापर्यंत खाडीकाठच्या बांधावर बसून विविध निसर्ग, विविध दृश्ये पाहण्याचा आनंद घेतला. आता त्या गोष्टी फक्त स्मरणात आणावयाच्या आहेत. त्यातला आनंद पुनश्च घ्यायचा आहे. एवढेच माझ्या हातात आहे. बांधावरचे दिवस स्वप्नासारखे केव्हाच निघून गेले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version