Home Uncategorized बाजारात अवकळा

बाजारात अवकळा

0

 वॉलस्ट्रीटवरील निराशेने जगभरातील शेअर बाजारांना आपल्या कवेत घेतले. याला मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारही अपवाद ठरले नाहीत.

मुंबई – वॉलस्ट्रीटवरील निराशेने जगभरातील शेअर बाजारांना आपल्या कवेत घेतले. याला मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारही अपवाद ठरले नाहीत.

गुंतवणूकदारांनी घेतलेल्या विक्रीच्या पवित्र्यामुळे गुरुवारी सेन्सेक्सने द्विशतकी घट नोंदवली आणि गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच हा निर्देशांक १९ हजारांखाली घसरला. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेली सुधारणांची ग्वाहीही या वेळी बाजाराच्या मदतीला धावून आली नाही.

वॉलस्ट्रीटने बुधवारची निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवल्याने आशियाई बाजारांत विक्रीचा मारा झाला. गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या दबावात सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे २१३.९७ आणि ६१.१० अंकांनी आपटले. सेन्सेक्स १८,८२७.१६ तर निफ्टी ५,६९९.१० अंकांवर
बंद झाला.

फिचने देशाचे पतमानांकन नकारात्मक श्रेणीतून स्थिर श्रेणी आणल्यानंतर हुरूप वाढलेल्या अर्थमंत्र्यांनी आणखी सुधारणांची ग्वाही दिली. कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या किमतीवर सरकार त्वरेने निर्णय घेईल तसेच विविध क्षेत्रातील परकीय गुंतवणूक मर्यादाचा आढावा घेईल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र ग्वाहीलाही गुंतवणूकदारांनी न जुमानता विक्रीचा मारा सुरूच ठेवला. बाजारावर औद्योगिक क्षेत्राची निराशाजनक कामगिरी आणि महागाईचाही बाजारावर नकारात्मक प्रभाव राहिल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

सेन्सेक्समधील ३० पैकी २५ कंपन्यांचे शेअरचे मूल्य घटले. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली. १४,५०० कोटींच्या कूपर टायर अधिग्रहणाच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर अपोलो टायरच्या कर्जाच्या चिंतेने गुंतवणूकदारांना ग्रासले. यामुळे झालेल्या विक्रीने या कंपनीचा शेअर्स २५.४३ टक्क्यांनी आपटला.

शेअर बाजारांच्या आकडेवारीनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी १०६०.१७ कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्याच वेळी चालू वर्ष जागतिक बँकेसाठी खडतर राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज यांनी बाजाराला आणखी खेचल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version