Home टॉप स्टोरी बारावीच्या परीक्षेत यंदाही कोकणच अव्वल!

बारावीच्या परीक्षेत यंदाही कोकणच अव्वल!

1

बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून सलग तिस-या वर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

रत्नागिरी- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. या परीक्षेत कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के लागला आहे. राज्यातील आठ विभागांना मागे टाकत कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी कोकणातून ३२ हजार ३९६ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यातील ३० हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ९४.८५ टक्के लागला आहे.

कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल ९५.८७ टक्के लागला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला. रत्नागिरी जिल्ह्यात २० हजार ३८७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील २० हजार ३७६ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यामध्ये १९ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ४१ तर विद्यार्थिनींची संख्या ९ हजार १६२ इतकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ हजार २६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यापैकी १२ हजार २० विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यातील ११ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्यात शास्त्र विभागाचा निकाल ९३.१६ टक्के इतका लागला असून, कला विभागाचा ९२.०७ टक्के, वाणिज्य विभागाचा ९६.६५ टक्के इतका लागला आहे. व्होकेशनल विभागाचा ९७.१३ टक्के निकाल लागला आहे.

कोकणातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश मिळवले आहे, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. कोकणच्या नावलौकिकाला साजेसे यश मिळवून विद्यार्थ्यांनी कोकणची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम यश संपादित करत नवा इतिहास रचला आहे. – नारायण राणे, उद्योगमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री

विक्रमी निकाल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यातील ९०.०३ टक्के विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले. सोमवारी जाहीर झालेला हा निकाल राज्याच्या शिक्षण मंडळाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक टक्केवारीचा ठरला असून सीबीएसईसह विविध मंडळांच्या बारावीच्या निकालातील टक्केवारीची मक्तेदारीही यंदा मोडीत काढली गेली. यंदाही राज्यभरात मुलींनीच बाजी मारली असून गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम राखले. त्यातही कोकणातील मुलींनी उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीतही एक नवा विक्रम केला.

कोकणातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक ९६.८८ टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने एकूण निकालात लागोपाठ चौथ्या वर्षी अग्रस्थान कायम ठेवले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आठ विभागांना मागे टाकत कोकण विभागाने अव्वल क्रमांक कायम ठेवण्यात यश मिळवले. कोकण विभागातील ९४.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच ८८.३० टक्के इतका लागला. मुंबईप्रमाणेच नागपूर आणि नाशिक विभागालाही ९० टक्क्यांचा टप्पा गाठता आलेला नाही. इतर सर्व विभागांनी या वाढलेल्या निकालात पहिल्यांदाच नव्वदी पार करण्याची किमया केली आहे. कोकण विभागापाठोपाठ अमरावती विभागाने ९१.८५ टक्के यश मिळवत दुसरा क्रमांक पटकावला; तर ९१.५४ टक्के यशस्वी विद्यार्थ्यांमुळे कोल्हापूर तिस-या स्थानी राहिले. त्यापाठोपाठ औरंगाबाद ९०.९८ टक्के, पुणे ९०.७३ टक्के, लातूर ९०.६० टक्के, नागपूर ८९.०७ टक्के, नाशिक ८८.७१ टक्के आणि सर्वात शेवटी मुंबई ८८.३० टक्के इतका निकाल लागला.

गेल्या वर्षी एकूण ७९.९५ टक्के निकाल लागला होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल तब्बल १४ टक्क्यांनी वाढला आहे. नियमित विद्यार्थी आणि फेरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल ८४.०४ टक्के इतका लागला. राज्यातील ७७८ कनिष्ठ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये पुणे विभागातील १६८, तर कोकण विभागातील ४८ कनिष्ठ विद्यालयांचा समावेश आहे. १० शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.  बारावीच्या परीक्षेला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून १२ लाख ५४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १० लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. हा निकाल मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक ठरला आहे. यामध्ये उत्तीर्ण होणा-या मुलींचे प्रमाण ९३.५० टक्के तर मुलांचे प्रमाण ८७.१३ टक्के इतके होते. म्हणजेच यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली.

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

विज्ञान शाखेत सर्वाधिक ९३.६७ टक्के, कला शाखेत ८६.३३ टक्के, कॉमर्स शाखेत ८९.९७ टक्के आणि एमसीव्हीसी शाखेत ८९.६६ टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दरम्यान, १२वीच्या विद्यार्थ्यांना १० जून रोजी दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

» राज्याचा एकूण निकाल ९० टक्के  

विभागवार निकाल…

कोकण- ९४.८५ टक्के

मुंबई- ८८.३० टक्के

पुणे- ९०.७३ टक्के

नागपूर- ८९.०७ टक्के

औरंगाबाद- ९०.९८ टक्के

कोल्हापूर- ९१.५४ टक्के

अमरावती- ९१.८५ टक्के

नाशिक- ८८.७१ टक्के

लातूर- ९०.६० टक्के

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version