Home रिलॅक्स बालनाटयांचं जग बदलतंय का?

बालनाटयांचं जग बदलतंय का?

1

एप्रिल-मे महिन्याची सुट्टी पडल्याने आपल्याकडे आता बालनाटयांचा मोसम सुरू होईल. आज मुलांच्या भोवतीचं पर्यावरणच बदलत चाललं आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी इतर अनेक गोष्टी आहेत, उपकरणं आहेत. त्यातून त्यांचं भावविश्वही बदलून गेलं आहे. सतत ‘बिझी’ असलेल्या मुलांच्या या भावविश्वात आज नाटकाला किती स्थान आहे, या प्रश्नाचं उत्तर बालनाटयाचे धडपडे निर्माते राजू तुलालवार यांच्याशी बोलून शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.

एप्रिल-मे महिना किंवा मुलांच्या सुट्टीच्या काळ हा आपल्याकडे बालनाटयांचा मोसम समजला जातो. बालनाटयाची चळवळ तशी आपल्याकडे साठहून अधिक र्वष सुरू आहे. परदेशात मुलांच्या मनावर एक संस्कारक्षम उपचार बालनाटयांकडे पाहिलं जातं. त्यातून तिथे बालनाटयाची चळवळ समृद्ध झाली आहे. आपल्याकडे अजून तरी बालनाटयांकडे तशा दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. नाही म्हणायला मराठी रंगभूमीवर रत्नाकर मतकरी, सई परांजपे, अरुण काकडे, दिलीप प्रभावळकर, सुधा करमरकर, सुलभा देशपांडे यासारख्या दिग्गजांनी बालनाटय चळवळीला उलटवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. त्यांच्यानंतर राजू तुलालवार यांच्यासारख्यांनी ही चळवळ पुढे चालवली. तुलालवार गेली सव्वीस र्वष ते बालनाटकं रंगभूमीवर आणून मुलांमध्ये रंगजाणीव तयार करण्याचं काम करत आहेत. ‘चिल्ड्रन थिएटर्स’तर्फे ‘चला मुलांनो नाटक बघूया’सारखे अनेक उपक्रम ते राबवतात.

दुस-या बाजूला आज मुलांच्या भोवतीचं पर्यावरणच बदलत चाललं आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी इतर अनेक गोष्टी आहेत, उपकरणं आहेत. त्यातून त्यांचं भावविश्वही बदलून गेलं आहे. सतत ‘बिझी’ असलेल्या मुलांच्या या भावविश्वात नाटकाला किती स्थान आहे? मुलांवर लहानपणापासून नाटयसंस्कार झाले असले पाहिजेत, हे नेहमीच बोललं जात असलं तरी त्यात अनेक अडथळे आहेत. बालनाटय चळवळ क्षीण होत चालली आहे. मुलांना पुन्हा बालनाटयाकडे वळवायला काय करता येईल, त्यांच्या बदललेल्या जगातले विषय नाटकं सादर केली तर ती त्यांना आवडतील का, मुळात आजकालच्या मुलांमध्ये येणा-या अकाली मोठेपणाचा याच्याशी काही संबंध आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. बालनाटयांचे धडपडे निर्माते, अशी ओळख असलेल्या राजू तुलालवार यांच्याशी या विषयावर बोलताना बालनाटयाचं आजचं जगच उलगडत जातं.

‘बालरंगभूमीची व्याप्ती फार मोठी आहे आणि आपण तिथे खूप जबाबदारीने काम केलं पाहिजे.’ असं मत व्यक्त करत तुलालवार म्हणतात, ‘बालरंगभूमी दोन गोष्टींत विभागलेली आहे. एक शालेय रंगभूमी म्हणजे जिथे बालनाटयाच्या स्पर्धा वगैरे होतात. काही संस्थांकडून या स्पर्धा घेतल्या जातात, तसंच राज्य सरकारतर्फे राज्य नाटय स्पर्धाही घेतली जाते. दुसरा प्रकार म्हणजे व्यावसायिक रंगभूमी. या रंगभूमीवरची नाटकं केवळ सुट्टीच्या काळात केली जातात. शालेय रंगभूमीवर जी नाटकं सादर केली जात आहेत ती मुख्यत्वे एकांकिका स्वरूपातील असतात, काही संस्था चांगलं काम करताहेत. म्हणजे वेगवेगळे विषय हाताळत आहेत. पण काय होतंय की, स्पर्धेमुळे त्यातील मनोरंजकता कमी झालेली आहे. मी परीक्षक म्हणून ज्या स्पर्धा बघितल्या त्यात मला असं आढळलं की, स्पर्धेसाठी मुलांना न झेपणारे अगदी न झेपणारे विषय घेतले जात आहेत. त्यामुळे या स्पर्धाना प्रेक्षक मिळत नाहीत. कारण राज्य नाटय स्पर्धेला परीक्षक म्हणून उपस्थित राहिल्यानंतर मी सांगतो की, तिथे जे विषय होते, ते कुमारवयीन मुलांचे होते. हे विषय किंवा नाटकांची नावं मुलांना आकर्षित करू शकत नाहीत. गेली अकरा वर्ष राज्य नाटय स्पर्धा होते आहे, परंतु तिथे फार कमी प्रेक्षक दिसतात. मुंबईच्या बाहेर काही ठिकाणी स्पर्धा होतात तिथेही अशीच परिस्थिती आहे. कारण या नाटकांचा प्रयत्न, सादरीकरण चांगलं असलं तरी त्यांचे विषय प्रेक्षकांना आकर्षित करू शकत नाहीत. दुसरीकडे व्यावसायिक रंगभूमीबद्दल बोलायचं तर ही नाटकं केवळ जाहिरातीवर चालतात. या जाहिराती पाहून प्रेक्षक येतात. या प्रेक्षकवर्गाला काय आवडतंय, तर गेल्या काही वर्षाच्या अनुभवावरून मी असं म्हणेन की, तो टीव्हीवरच्या कार्टूनभोवती अधिक घुटमळतोय. तसाच हा प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक या वर्गातला आहे. तो शालेय रंगभूमीवरील नाटकं अजिबात पाहत नाही. कारण तिथली जी नाटकं होत आहेत त्याचे विषय आणि नाटकं आठवी-नववी-दहावीच्या मुलांचे आहेत. तर व्यावसायिक रंगभूमीवर नाटकांची नावं पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिकच्या मुलांना आकर्षित करणारी आहेत.’

हल्ली मुलंच पालकांएवढी ‘बिझी’ झालेली आहेत. कारण मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळा, क्लासेस, इतर अॅक्टिव्हिटी यात इतकी पळत असतात की, त्यांना वेळच नसतो. ती केवळ सुट्टीतच उपलब्ध होऊ शकतो. ही गोष्ट तुलालवारही मान्य करतात. ‘काही वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मतकरी, सुधा करमरकर नाटकं करायचे तेव्हा असलेली परिस्थिती आता बदललीय. त्यावेळी मोकळी असलेली मुलं आता खूप व्यग्र झालीत. आठवी ते दहावीची मुलं इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्समध्ये, मग तो मोबाइल असो की, व्हीडिओ गेम्स, अडकल्याने तो प्रेक्षक म्हणून कमी झालीत आणि प्रेक्षक म्हणूनदेखील. ही चिंताजनक गोष्ट आहे. विशेषत: मुलांच्या बाबतीत हे विधान खरं आहे. मुली अजूनही मोठया प्रमाणावर नाटकांकडे येत आहेत, परंतु मुलांची संख्या खूप घसरलीय. हे प्रमाण चारास एक आहे. म्हणजे चाळीस मुलं असतील तर मुलांचं प्रमाण केवळ दहा आहे. याबाबतीत आम्ही एक सव्र्हेदेखील केला तेव्हा त्यात वेगवेगळी कारणं समोर आली. ही गेल्या पाच वर्षातील परिस्थिती आहे, ’ ते सांगतात.

व्यावसायिक रंगभूमीवरील नाटक व्यावसायिक पद्धतीने सादर व्हावं, अशी पालकांची अपेक्षा असते. ते तिकीट काढून नाटक बघायला आलेले असतात. त्या प्रकारे आपल्याकडे नाटकं सादर होतात का? तुलालवार या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात, ‘एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, इथे एका बालप्रेक्षकाबरोबर एक पालकही नाटक बघायला आलेला असतो. त्यामुळे नाटक सादर करणा-यावर मुलांबरोबर पालकांचंही मनोरंजन करण्याचीही जबाबदारी असते. पण बहुतेक नाटकांच्या बाबतीत ते होत नाही. कारण आकर्षक नाव आणि जाहिरात यातून प्रेक्षकांना नाटयगृहापर्यंत खेचण्यात ती यशस्वी होत असली तरी प्रेक्षक जेव्हा नाटक बघून बाहेर येतो तेव्हा आपल्याला काहीच न बघायला मिळाल्याची त्याची भावना होते. त्याचं कारण असं की, कार्टून पात्रांवर नाटकं केली तर ती टीव्हीवर दिसतात तशी प्रत्यक्ष दाखवणं अवघड असतं. त्यामुळे मुलं मनात काही तरी कल्पना घेऊन येतात, मग त्यांचा हिरमोड होतो.’

बालनाटयांमध्ये कुठले विषय असावेत, हा मुद्दा सध्या अनेकदा चर्चेला येतो. तुलालवार यांची याबाबतीत ठाम मतं आहेत. ‘बालरंगभूमीवर वयानुसार नाटकं सादर झाली पाहिजेत, या मताचा मी आहे. कारण पूर्व-प्राथमिक किंवा प्राथमिकचा विषय आहे तो सातवी-आठवीच्या मुलांना चालणार नाही. शालेय रंगभूमीवर असे विषय येतात, पण ते मोठयांच्या शैलीने केलेले असतात. थोडक्यात सांगायचं तर शालेय रंगभूमीवर बालनाटय मोठयांच्या पद्धतीने सादर केली जातात. त्यात मुलं अभिनयही मोठयांच्या पद्धतीने करतात, तो तुम्हाला बघायला आवडतो, पण त्यात बालसुलभता नसते. म्हणून आम्ही त्याला कुमारनाटय म्हणतो. या नाटयात मुलांच्या अवतीभवतीचे विषय, म्हणजे गॅजेट्स वगैरे, पण ते पाचवी ते आठवीच्या मुलांचेच होऊ शकतात, पण चौथीपर्यंतच्या मुलांना ते रुचणारे नसतात. त्यांना राक्षस, परी वगैरे हेच विषय असतात. मी पंचवीस र्वष नाटकं करतोय. त्यात सुरुवातीपासून आम्ही राक्षस, परीची नाटकं करत आहोत. ‘फुग्यातील राक्षस’ हे नाटक आम्ही करतो तेव्हा प्रेक्षकांना ते राक्षसावरचं नाटक वाटतं, पण ही फँटसी आहे. अभ्यास न करणा-या मुलाच्या मागे तो राक्षस लागतो आणि त्याचा पिच्छा सोडवण्यासाठी तो मुलगा अभ्यास करायला लागतो. आम्ही जेव्हा फँटसी म्हणून ते दाखवतो, तेव्हा हा विषय दुसरी-तिसरीच्या मुलांना आवडतो आणि सातवीच्याही. ‘रोबो आणि राक्षस’ या नाटकामध्ये आम्ही एकाच वेळी रोबो दाखवला आणि राक्षसही. यात अल्लादिनच्या राक्षसाची आम्ही पुढची गोष्ट सांगितली. राक्षसामुळे अल्लादिन आळशी होतो, तो काहीच काम करेनासा होतो. तो या जगात येतो, तेव्हा त्याला रोबो मिळाला. रोबोमुळेही तो पुन्हा आळशी झाला, असं आम्ही नाटकात दाखवलंय. ही पात्रं मुलांना आवडतात, पण राक्षस घेऊन मी काय सांगतो, हे महत्त्वाचं आहे. मी परी दाखवली तरी मी आता परीकथा आणि सात बुटके दाखवणार नाही. ती मी या काळाला सुसंगत केली तर मुलांना आवडेल.

आम्ही प्राणीनाटय वगैरे करतो, तेव्हा एखादी मुलांची गोष्ट प्राण्यांच्या नाटकातून सांगतो. उदा. चॉकलेट जास्त खाऊ नये, ही गोष्ट जेव्हा मुलं प्राण्यांच्या तोंडून ऐकतात तेव्हा मुलांना जास्त पटतं. फुगा किंवा कार या गोष्टी आजही मुलांच्या भावजीवनाचा भाग असतातच, फक्त त्यांचं स्वरूप बदललं आहे. त्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी चेटकिणीची जी कथा संगितली ती आता न सांगता त्यांचा वापर करून नवीन कथा सांगतो. आताची चेटकीण टीव्ही बघते, मोबाइलवर बोलते. मुलं जे करतात ते सगळं ती करते. म्हणजे चेटकीण तीच आहे, फक्त ती मॉडर्न झालीत. म्हणूनच मी असं म्हणतो की, मुलांना पात्रं आवडतातच, फक्त तुम्हा ती कशी वापरतात, हे महत्त्वाचं आहे. पूर्व-प्राथमिक म्हणजे पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना फँटसीचं खूप आकर्षण आहे. बालनाटय करणाऱ्यांनी फँटसीला थोडा वास्तवाचा स्पर्श दिला तर ती मुलांना अधिक भावतील. आपण उगाच त्याचं वावडं मानू नये. बालनाटय कसंही असू दे, ते उपदेशकारी असलं तरी मूलत: मनोरंजक असलं पाहिजे.’ ते सांगतात.

स्पर्धेतील बालनाटकं नुसती उपदेशकारी असतात, त्यात मनोरंजन कमी असतं, असं म्हटलं जातं. त्यावर तुलालवार यांचं असं म्हणणं आहे, ‘बालनाटयाचा मुख्य हेतू हा मनोरंजन असला पाहिजे, प्रबोधन दुय्यम असलं पाहिजे. स्पर्धेतल्या नाटकात याउलट प्रबोधनाला इतकं महत्त्व असतं की, मनोरंजन बाजूला राहिलं तर चालेल. एक उदाहरण देतो. मी फायनलला आलेलं एक नाटक पाहिलं. ग्रामीण भागातील एका कुटुंबावर आधारित असलेल्या नाटकात बलात्काराचा विषय होता, असा विषय होता. त्यात पुढे मुलीला एड्स वगैरे होण्याचेही संदर्भ होते. आम्ही नाटक सादर करणाऱ्यांना विचारलं की, तुम्ही हे काय दाखवलंय. त्यांचं म्हणणं असं होतं की, ग्रामीण भागात या समस्या आहेत. दुसरी एक एकांकिका अशा पाहिली की, आई-वडील घटस्फोटित आहेत, अशा दोन मुलींची भेट होते आणि त्यांच्यात खूप जवळीक निर्माण होते. आता प्रश्न असा की, पालकांचं भांडण हा विषय असलेलं हे नाटक बघायला मुलं किवा पालक तिकीट काढून जातील का? यातला मुलांचा जो अभिनय वगैरे असतो तो मोठयांसारखाच असतो. हे नाटक सादर करणाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की, सिंगल पेरेंटची समस्या आम्ही दाखवलीय. लेखकाचा मुद्दा पटण्यासारखा असला तरी हे बालनाटय आई-वडील मुलांना दाखवतील का? ही व्यावसायिक बालनाटय आणि शालेय बालनाटयातली सीमारेषा आहे. हे नाटक नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्नही स्वाभाविक आहे. आणखी एका नाटकातही बलात्कार हा विषय होता. हे नाटक करणा-या शाळेच्या मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं की, सध्या मुंबई-दिल्लीसारख्या शहरात ज्या घटना घडत आहेत, त्यांच्यासंदर्भात जागरूकता आणणं हा आमचा उद्देश आहे. आजकाल मुलांना टीव्ही, इंटरनेटमुळे आजूबाजूला काय चाललंय याची माहिती खूप लहान मिळत असते, पण तरीही हे विषय नाटकातून थेटपणे मांडायचे का? म्हणून मी या नाटकांना कुमारनाटय म्हणतो. कारण ते जी नाटकं सादर करतात, त्यातून त्यांना काहीतरी समस्या मांडायची असते, पण मग बालनाटयाचा प्रेक्षकवर्ग कुठला? म्हणून सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना कुमारनाटय म्हणून ओळखलं जावं असं मला वाटतं.’ तुलालवार यांच्या या मताशी सगळेच सहमत होतील यात शंका नाही.

1 COMMENT

  1. far divasani balnatyavar ek changala lekh vachayala milala.balnyavar ajkal far kami lihale jate ani charchahi kami hote.ya lekhmule samadhan zale.samir karmbe yani nemaki vastusthiti mandli ahe.kumar balnatyavar ajun charcha apekshit ahe.shaley balrangbhumivar ajun likhan apekshit ahe.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version