Home महामुंबई बेस्टमध्ये दहावी पास उपमुख्य सुरक्षा अधिकारी

बेस्टमध्ये दहावी पास उपमुख्य सुरक्षा अधिकारी

1

बेस्टमध्ये जिथे सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, तिथे उपमुख्य सुरक्षा अधिकारीपदी बढतीसाठी चक्क दहावी ते बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच प्राधान्य दिले जात आहे.

मुंबई – बेस्टमध्ये जिथे सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, तिथे उपमुख्य सुरक्षा अधिकारीपदी बढतीसाठी चक्क दहावी ते बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. बेस्टच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाकडून सुरक्षा विभागातील या वरिष्ठ पदावर पदवीधरांचीच वर्णी लावली जावी, असे स्पष्ट केलेले असतानाही सत्ताधारी पक्षाने महाव्यवस्थापकांवर दबाव आणून बिगर पदवीधारकांना अधिकारी बनवण्याचा डाव आखला आहे. यासाठी १९९३च्या परिपत्रकाचा आधार घेतला जात असून यामुळे पदवीधारकांवर अन्याय होत असल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बेस्ट उपक्रमाने वाहतूक विभागातील सुरक्षा विभागातील वरिष्ठ अधिकारी पदावर बढती देण्यासंदर्भात शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या नियमाबाबतचा ठराव मागील बेस्ट समितीच्या बैठकीत मांडला. यामध्ये सर्वसाधारण प्रशासन विभागामध्ये श्रेणी ए -५ मधील अधिका-यांच्या पदाच्या बढतीकरता बिगर पदवीधर अधिका-यांचा विचार करण्याचे विद्यमान धोरण पुढे सुरू राहील,असे नमूद करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर १९९३मध्ये बेस्टने हे धोरण बनवलेले असून बेस्टच्या सुरक्षा विभागातील श्रेणी दोनमधील अधिका-यांना श्रेणी एकमधील उपमुख्य सुरक्षा अधिकारीपदी बढती देताना पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नसून बिगर पदवीधारकाची वर्णी यावर लावली जाणार आहे. त्यामुळे याला मान्यता देण्याचा हा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे मांडण्यात आला असला तरी मागील बैठकीत राखून ठेवण्यात आलेला हा प्रस्ताव या वेळी मंजूर करण्याचा घाट सत्ताधा-यांनी घातला आहे.

बेस्टमध्ये एका बाजूला सुरक्षारक्षक म्हणून भरती करताना त्याची शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असावी आणि पुढील सहायक सुरक्षा अधिकारीपदी बढती देताना पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी, असा नियम आहे. परंतु त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारीपदी वर्णी लागताना मात्र, चक्क बिगर पदवीधर असलेल्या कर्मचारी असला तरी चालेल, असे धोरण बेस्टने ठरवल्यामुळे खुद्द सध्या हा विषय बेस्टमध्ये चर्चेचा ठरला आहे.

दोन जुलै २०१२ रोजी सर्वसाधारण प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार श्रेणी एकमधील पदे ही बढतीने भरताना पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट घालण्यात आली होती. परंतु या परिपत्रकाचा बेस्टला विसर पडला असून आजही १९९३च्या परिपत्रकाचा आधार घेत बिगर पदवीधरांनाच बढती देण्याचा प्रयत्न बेस्टकडून होत असल्यामुळे या उरफटय़ा कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १९९३ रोजी बनवलेल्या धोरणांमध्ये बदल होण्याची गरज असतानाही बेस्ट प्रशासन याकडे लक्ष देत नाही. एका बाजूला भरतीमध्ये पदवीची अट समाविष्ट केली जात असताना वरिष्ठ अधिकारी पदावर मात्र बिगर पदवीधरांची निवड करण्यात येत असल्यामुळे बेस्टच्या या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

1 COMMENT

  1. दहावी पास आहे का पदवीधर आहे? या फालतू वादात पडण्यापेक्षा उमेदवार त्या पदाला लायक आहे का नाही ते बघितले जावे असे मला वाटते. बेस्ट काही आय टी कंपनी वा अन्य उच्च बौद्धिक श्रम करणार्या कंपन्यांपैकी नाहीये. तेव्हा हे शिक्षणाचे निकष बेस्ट च्या बाबतीत अर्थशुन्य असू शकतात. तेव्हा उमेदवाराची (अनुभवातून तयार झालेली) लायकी व काम करण्याची क्षमता या गोष्टी विचारात घेऊनच अशा वरिष्ठ पदांसाठी बढत्या दिल्या जाव्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version