Home देश भाजपकडून कर्नाटकची लूट- राहुल गांधी यांची टीका

भाजपकडून कर्नाटकची लूट- राहुल गांधी यांची टीका

1

कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या राज्याला लुटण्याचेच काम केले असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होणार आहे,अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

सिंधनूर (कर्नाटक)- ‘‘कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या राज्याला लुटण्याचेच काम केले आहे. त्यामुळे पाच मे रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होणार आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली. उत्तर कर्नाटकमधील सिंधनूर येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘‘गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांचा भाजपला विसर पडलेला आहे. जनतेचा पैसा कसा लुटायचा एवढेच माहीत असून, यात त्यांचा हातखंडा आहे,’’ अशी टीका राहुल यांनी केली.

‘‘भाजपने जनतेला रोजगार, पाणीपुरवठा आणि २४ तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वानांच्या जोरावर भाजपने विजय मिळवला. मात्र ही आश्वासने पूर्ण झाली आहेत का, राज्यातील जनतेला २४ तास वीज मिळते का,’’ असे सवाल राहुल यांनी केली.

भाजप सरकारने जनतेच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला आहे. त्यामुळे या राज्यात भाजपचा पराभव झाला पाहिजे,’’ असे राहुल यांनी ठणकावून सांगितले.

लोह खनिजाच्या निर्यातीत भाजप सरकारने घोटाळा केल्याचा आरोप करून राहुल म्हणाले, ‘‘तुमच्या राज्यातील लोह खनिज चीनला विकून त्यांनी कोटयवधी रुपये कमावले. राज्यातील तरुणांना रोजगार देण्याची गरज होती. मात्र भाजपने रोजगारही उपलब्ध केला नाही.

काँग्रेसने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केले. मात्र भाजपने कर्नाटकमध्ये या योजनेलाही हद्दपार केले, अशी टीका राहुल यांनी केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version