Home टॉप स्टोरी भाजपाने प्रत्येक उमेदवाराला १ कोटी रूपये दिले

भाजपाने प्रत्येक उमेदवाराला १ कोटी रूपये दिले

1

या निवडणुकीतले यश भाजपाने राजकीय विचारांवर मिळवले नसून पैशावर मिळविलेले आहे, असा स्फोट ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी एका विशेष मुलाखतीत केला.

मुंबई- या निवडणुकीतले यश भाजपाने राजकीय विचारांवर मिळवले नसून पैशावर मिळविलेले आहे. एका उमेदवाराला १ कोटी रूपये आणि ग्रामीण भागात मताला ५ हजार रूपये हा दर होता. असा दणदणीत स्फोट ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीवर विशेष मुलाखतीत केला.

नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत खालच्या पातळीवर उतरून भाषणे केली. औकात काढली, पाणी पाजले आणि त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी भाजपाचा विजय हा ‘सत्ता संपत्तीचा विजय आहे’, असे सांगितले, हे तेच बोलू शकतात. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी इतक्या खालच्या पातळीवर उतरून भाषा केली नव्हती. असे असले तरी, शिवसेना हे सरकार पाडणार नाही, ते पाच वर्षे सत्तेवर राहतील, असेही भाकीत त्यांनी वर्तवले.

दरम्यान, नारायण राणे यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वावरही स्पष्टपणे झोड उठवली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खमके नाहीत आणि निवडणूक गांभीर्याने घेण्यात आली नाही. पक्षाचे नेते महाराष्ट्रभर फिरले नाही. प्रचाराचे नियोजन झाले नाही, झेंडे, बॅनर, बिल्ले, ही नंतरची गोष्ट. पण कॉंग्रेसचा विचार सांगायला नेते गावागावात गेलेच नसल्यामुळे ही निवडणुक गांभीर्याने घेतली नाही. २०१९ ची विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, असा विचार स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत, असा विचार नेत्यांनी केला नाही, अशी स्पष्ट भूमिका नारायण राणे यांनी मांडली.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी पक्षाची तिकीट कुठेतरी घाटकोपरला वाटून टाकली, कोणाही नेत्यांना विश्वासात घेतले नाही. मुंबईत सभा घेतल्या पण, निरूपमच्या सभांना जाणार कोण? लोकांनी त्यांनाही गांर्भीयाने घेतले नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांवर नागपूरात शाईफेक झाली. यासंदर्भात प्रश्न विचारला असता श्री. नारायण राणे म्हणाले की, पक्षनेतृत्वाचा दरारा नसेल तेव्हा अशा गोष्टी घडतात. या निवडणूकीत कॉंग्रेसने पुरेसा नियोजन केलं नाही. त्यामुळे ईर्षेने ही निवडणूक लढवली गेली नाही. जर ईर्षेने निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं असतं.

या निवडणूक प्रचारात मी माझ्य़ाकडून औरंगाबाद, सोलापूर, यवतमाळ, कोकण, अशा सर्व?ठिकाणी शक्य आहेत तेवढय़ा सभा घेवून वातावरण निर्मिती केली होती. पण २५ जिल्हा परिषदांच्या प्रचारात एकटा किती फिरू शकणार?

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version