Home टॉप स्टोरी भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट

भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट

2

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी प्रदेश भाजपच्या पत्रकार परिषदेत युती तोडत असल्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.

मुंबई- विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी प्रदेश भाजपच्या पत्रकार परिषदेत युती तोडत असल्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. खडसे म्हणाले की, शिवसेनेकडून जागावाटपाबाबत समजूतदारपणाची भूमिका घेतली जात नसल्याने आणि भाजपबरोबरच अन्य घटक पक्षांचा सन्मान न राखल्याने नाइलाजाने ही युती तोडावी लागत आहे. ही निवडणूक भाजप महायुतीच्या माध्यमातूनच लढणार असून तीन घटकपक्षांना सोबत घेऊन लढणार आहे. घटकपक्षांची गळचेपी होत असताना त्यांना वगळून युती पुढे नेण्यास भाजपचा विरोध होता.

निवडणुकीला सामोरे जाताना घटक पक्षांना सोबत घेण्याचा आग्रह भाजपने घेतला होता. जागावाटपाबाबत त्यांनाही विश्वासात घेण्याची भाजपची भूमिका होती, असे असतानाही शिवसेना मात्र एकाच आकडयावर अडून बसली होती. ‘आम्ही सांगतो तेच ऐका’, असा हेका त्यांनी धरला होता. त्याचबरोबर युतीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांकडून होत होता. आम्हाला भाजपने ताटकळून ठेवले, असे वृत्त शिवसेना नेत्यांकडून पसरवण्यात आले. ते चुकीचे आहे.

यापुढे आमचे मार्ग वेगळे असतील. आम्ही कोणाशीही चर्चा करणार नाही. राज्यात भाजपचे सरकार आणणे हे आमचे ध्येय असेल. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. ही युती विचारांवर आधारलेली होती. ती तोडावी लागत असल्याने प्रचंड दु:ख झाले आहे, असे खडसे यांनी सांगितले. गेले २० ते २२ दिवस महायुतीतील जागावाटपाची चर्चा सुरू होती. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघत नव्हता. शिवसेनेचे प्रस्ताव अन् चर्चा ही केवळ एका आकडयाभोवती आणि मुख्यमंत्रीपदाभोवती फिरत होती. शिवसेनेकडून दिल्या जाणा-या प्रत्येक प्रस्तावात कधी भाजपच्या तर कधी मित्रपक्षांच्या जागा कमीअधिक केल्या जात होत्या. मात्र, शिवसेनेचा आकडा बदलत नव्हता. शिवसेनेच्या या वर्तणुकीमुळे भाजप व मित्रपक्षांना न्याय मिळत नव्हता. शिवसेनेचा मित्रपक्षांना अवघ्या ७ जागा देण्याचा प्रस्ताव अतिशय वाईट होता. तो आपण फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर नवीन प्रस्तावात भाजपच्या जागा कमी करण्यात आल्या. त्यामुळे भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीला ठोस निर्णय घेणे अनिवार्य होते. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक आहे. तरीही ही युती टिकवण्याचे प्रयत्न भाजपने शेवटपर्यंत केले. पण त्याला शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. त्यामुळे युती तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

आता महाराष्ट्रात भाजप स्वतंत्रपणे मित्रपक्षांसह प्रचाराला सामोरा जाईल. मात्र, शिवसेनेशी कोणतीही कटुता राहणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाजन, बाळासाहेबांनी केलेली युती संपुष्टात

१९८९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजप नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर युती केली होती. या युतीमध्ये वारंवार धुसफूस, अडचणी येत होत्या. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी समजूतदार भूमिका घेऊन ती टिकवली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना-भाजपबरोबरच चार पक्षांची महायुती केली. मात्र काही महिन्यांतच महायुतीला ग्रहण लागले.

राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी भाजपबरोबर राहण्याचे ठरवले आहे. जागांची वाटपाबाबत सहमतीही झाली आहे. त्याची घोषणा गुरुवारी केली जाणार आहे. या युतीत रिपाइंलाही घेण्याचा प्रस्ताव आहे. गोपीनाथ मुंडेमुळे आपण युतीत आलो आहोत. त्यामुळे भाजपला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

2 COMMENTS

  1. गेला उडत भाजप ,आता फक्त शिवसेना…
    कसली लाट ? लावून टाकू वाट …. इथे फक्त हिंदूहृदयसम्राट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version