Home महाराष्ट्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब… विशेष वृत्तांत…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब… विशेष वृत्तांत…

2

१४ एप्रिल १८९१ म्हणजे आज बरोबर एकशे पंचवीस वर्षे झाली. सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ डोळ्यांसमोर आला की, बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाने बिकट काळाशी झुंजून या देशातल्या कोटय़वधी जनतेत स्वाभिमानाचा प्राण कसा फुंकला, त्यांचे काम किती बिकट होते, याची कल्पना येते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

१४ एप्रिल १८९१ म्हणजे आज बरोबर एकशे पंचवीस वर्षे झाली. सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ डोळ्यांसमोर आला की, बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाने बिकट काळाशी झुंजून या देशातल्या कोटय़वधी जनतेत स्वाभिमानाचा प्राण कसा फुंकला, त्यांचे काम किती बिकट होते, याची कल्पना येते. एक असा बिकट काळ की, ज्या काळात दलित समाजाला कुणी जवळ करत नव्हते. अस्पृश्यता आली कशी, याच्या खोलात कोणी गेले नाही. परंपरा, धर्मविराज आणि धर्ममार्तंडांचे नेतृत्व यातून दलित समाजाला गावाबाहेर फेकले गेले. अशाच एका दलित समाजातल्या रामजी सकपाळ यांच्या घरात बाबासाहेबांचा जन्म झाला. मध्य प्रदेशातल्या महू येथे गावाबाहेरच घर! एक खेडे. त्या खेडय़ातली दलित वस्ती. त्या दलित वस्तीमधली एक झोपडी. १४ भावंडं.. अशा या बिकट स्थितीमध्ये जन्माला आलेले भीमराव रामजी सकपाळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले. घटनेचे शिल्पकार बनले. घटना समितीचे अध्यक्ष झाले. जी अस्पृश्यता त्यांनी लहानपणी अनुभवली होती, ज्या शाळेत त्यांना वेगळे बसावे लागत होते, त्या मानहानीवर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी जगात एक नवा इतिहास घडवला. मार्टिन ल्यूथर किंग, राजा राममोहन रॉय, नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधी अशा जगातल्या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या म्हणजे चार-पाच लोकांच्याच अति भव्य-दिव्य कामाशी ज्यांची तुलना करता येईल. असे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी हे तीन नेते या देशाचे मानबिंदू ठरले; पण बाबासाहेबांनी विद्वतेचा जो एक चमत्कार प्रतिकूल परिस्थितीतून झगडून दाखवून दिला; त्यामुळे बाबासाहेब सगळ्यांच्याच पुढे निघून गेले.

एकशे पंचवीस वर्षे मागे वळल्यानंतर खरोखर मन थक्क होईल, अशा प्रतिकूल परिस्थितीवर बाबासाहेबांनी मात केली आहे. धर्माच्या, जातीयतेच्या सगळ्या लाटांच्या विरुद्ध पोहत या बलदंड ज्ञानपुरुषाने देशातल्या कोटय़वधी जनतेला रस्ता दाखवला आहे. साता-याला पीडब्लूडीमध्ये त्यांचे वडील नोकरीसाठी जेव्हा आले, तेव्हा बाबासाहेबांना वर्गात पाटी-पुस्तके घेऊन वेगळेच बसावे लागे. ते शिक्षकांना विचारत होते.. ‘मला वेगळे का बसवता? गावाच्या विहिरीवर आम्हाला पाणी का मिळत नाही?’ १८९८-९९ म्हणजे वयाच्या सातव्या वर्षापासून बाबासाहेबांनी हे प्रश्न विचारायला सुरुवात केली. साता-याच्या इंग्रजी शाळेत पहिल्या इयत्तेत ते आले, तेव्हा त्यांच्यामधल्या बुद्धीची चमक पाहून त्यांचे शिक्षक आंबवडेकर गुरुजी यांना हे जाणवले की, हा एक अतिशय कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी आहे. दलित समाजातला असल्यामुळे त्याला हिडीसफिडीस होते आहे. त्याचा बौद्धिक कोंडमारा होत आहे आणि म्हणून या गुरुजींनी भीमराव रामजी सकपाळ हे नाव बदलून भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे नवीन नामाभिधान केले. गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब लंडनला निघाले तेव्हा या गुरुजींच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. आडनाव बदलले म्हणून भीमराव आंबेडकर यांचा जाच कमी झाला नाही. मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. शंभर वर्षापूर्वी ‘मॅट्रिक’ होणे केवढी कठीण गोष्ट होती. साठ टक्के मार्क मिळाले. म्हणजे केवढे मार्क वाटायचे. बाबासाहेब मॅट्रिक झाल्यावर त्यांचा सत्कार झाला. तेव्हा त्यांचे आणखी एक शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी ‘बुद्धचरित्रा’चे एक पुस्तक त्यांना भेट दिले. बाबासाहेबांनी पुढे बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांची मानसिक तयारी मॅट्रिकच्या परीक्षेनंतर त्यांना मिळालेल्या या पुस्तकातून झाली होती.

बाबासाहेब ख-या अर्थाने ग्रंथमित्र होते. एलफिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. झाल्यानंतर १९१३ साली म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी ते अमेरिकेला गेले आणि कोलंबिया विद्यापीठात त्यांनी एम. ए.चा अभ्यास सुरू केला. ‘प्राचीन भारतातील व्यापार’ आणि ‘भारतातील जाती’ या दोन प्रबंधांनंतर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली. ‘नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया, ए हिस्टॉरिक अँड अ‍ॅनॅलिटिकल स्टडी’ या त्यांच्या प्रबंधाला पीएच.डी मिळाली आहे. परदेशात उच्चविद्याविभूषित होऊन बाबासाहेब जेव्हा देशात परत आले, तेव्हा त्यांच्या बौद्धिक विचारसणीत आमूलाग्र बदल झालेला होता. ज्ञान त्यांनी पचवले होते आणि जेथपर्यंत आपला समाज शिकत नाही, तेथपर्यंत हा समाज स्वाभिमानी होणार नाही, याची खूणगाठ बांधून त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या नावाची संघटना १९२४ साली स्थापन करून समाज बांधवांना घोषणा दिली की, ‘शिका, शहाणे व्हा आणि संघर्ष करा.’

उच्चविद्याविभूषित होऊन बाबासाहेब या देशात आले आणि त्यांनी राजकीय चळवळीऐवजी सामाजिक क्रांतीला हात घातला. २७ मार्च १९२७चा चवदार तळ्याचा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचा एल्गार दिला. १९३० साली साबरमतीच्या किना-यावर मूठभर मीठ उचलणारे महात्मा गांधी आणि १९२७ साली चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी उचलून सामाजिक अन्यायाचे हलाहल पचवणारे आणि नवा एल्गार देणारे डॉ. आंबेडकर या दोघांच्या कामात तसा फरक नाही.

महाडच्या सत्याग्रहानंतर भाषण करताना बाबासाहेब म्हणाले होते..

‘‘आज आपण या तळ्यावर पाणी पिण्याचा आपला हक्क बजावला आहे. आपण माणसासारखी माणसे आहोत. हाडामासाने हिंदू आहोत, तरी पाणवठय़ावर आपल्याला पाणी मिळत नाही. सार्वजनिक ठिकाणी देवाचे दर्शन घेता येत नाही. कुत्रा, मांजर बिनदिक्कत देवळात जाऊ शकतात; पण तुम्ही आम्ही देवळात गेलो की, देव बाटतो हे कसे! माणूस म्हणून जगायचे असेल तर अन्याय सहन करू नका. मुलाबाळांना शाळेत पाठवा. माघार न घेता आपण हा लढा लढवू. त्यातच दलित समाजाची मुक्ती आहे.’’

चवदार तळ्याच्या सत्याग्रहापाठोपाठ २ मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर हरिजनांना खुले करण्यासाठी १५ हजार लोकांसह बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हे दोन्ही सत्याग्रह या देशातल्या कोटय़वधी दलितांना एक मोठी शक्ती देऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारला बजावले की, ‘एकाही सार्वजनिक विहिरीवर अस्पृश्यांना पाणी भरू दिले जात नाही.’ ब्रिटिश सरकारने चौकशी केली तेव्हा एकटय़ा नाशिक जिल्हा लोकल बोर्डाच्या ११०० विहिरींवर अस्पृश्यांना पाणी भरू दिले जात नाही. अशी माहिती बाहेर आली.

सामाजिक चळवळींसाठी समाज जागवण्याचे काम करताना बाबासाहेबांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘समता’ आणि ‘जनता’ अशी साप्ताहिके काढली. आपला समाज शिकणार नाही किंवा आपल्या समाजाला समान संधी मिळणार नाही, अशी पुढची दृष्टी ठेवून बाबासाहेबांनी ही गोष्ट हेरली की, आपल्या मुलांना शिकावयाचे असेल तर आपल्या संस्था आपण उभारल्या पाहिजेत. मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, औरंगाबादच्या माळरानावर उभे राहिलेले मिलिंद महाविद्यालय या सर्व शैक्षणिक संस्थांमधून कोटय़वधी तरुणांची मानसिक आणि वैचारिक मशागत आज झालेली आहे. एका चळवळीतून दुसरी चळवळ, दुसरीतून तिसरी.. अशा चळवळी उभ्या करीत बाबासाहेब अशा उंच जागेवर जाऊन पोहोचले की, पंडित नेहरू आणि सरदार पटेलांना घटना समितीचा मसुदा तयार करण्यासाठी बाबासाहेबांनाच बोलवावे लागले. ज्याने अनन्वित यातना, हालअपेष्टा आणि मानहानी सहन केली होती, त्याच्याच हातून या देशातली अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्याचे कलम लिहिले गेले. ३९५ कलमे आणि ९ परिशिष्टे असलेली भारताची राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी लिखित अशी घटना आहे. दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवस एवढय़ा अवधीत बाबासाहेबांनी हा मसुदा तयार केला. स्वातंत्र्य, समता आणि समान संधी, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, धर्मस्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण, एका व्यक्तीला एक मत.. या बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या देणग्या आहेत. बाबासाहेबांच्या घटनेतील मसुद्यांची सरदारांनी केवढी मोठी प्रशंसा केली होती. घटना समितीचा मसुदा तयार झाल्यावर बाबासाहेबांना काय वाटले होते. बाबासाहेब म्हणाले होते..

‘‘या देशाची राजकीय लोकशाही सर्वाना संतुष्ट करू शकणार नाही. राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीत रूपांतरित केली पाहिजे. राजकीय लोकशाहीचा पाया सामाजिक लोकशाहीत भक्कम झाला नाही, तर ती लोकशाही टिकू शकणार नाही.’’

‘‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे जीवनात अंतर्भूत झाली आहेत, असे भारतीय जवान असले पाहिजेत. या तत्त्वांना एकमेकांपासून अलग करण्याचा प्रयत्न कराल तर लोकशाहीचा गाभा नष्ट होईल. स्वातंत्र्याची समतेपासून कोणीही फारकत करू शकणार नाही आणि समतेची स्वातंत्र्यापासून ताटातूट कोणालाही करता येणार नाही.’’

बाबासाहेबांनी कायद्याने या देशातील अस्पृश्यता नष्ट केली. आज शंभर वर्षे झाली. सार्वजनिक ठिकाणी जात-पात पाहण्याचे दिवस संपले. परंतु, मनातून अजूनही ती जात गेली नाही. उलट, जी ‘जात नाही ती जात’ अशीच सोयीसाठी व्याख्या झाली. राजकारणाच्या सोयीसाठी बाबासाहेबांचे पुतळे उभे राहिले. राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांना वापरले आणि आजही राजकारणासाठी बाबासाहेबांचा वापर केला जात आहे. या महान युगपुरुषाला ७ कोटींचा सगळा समाज पुढारलेल्या समाजाबरोबर आणून ठेवायचा होता म्हणून आयुष्यभर त्यांनी आटापिटा केला; पण आज बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीचे गुणगान गात असताना मनातून आमच्या जात गेली आहे का..? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. चवदार तळे आपल्या मनात समतेचे पाणी शिंपडत आहे की, चवदार तळे सुकले आहे, हा प्रश्न ज्याने त्यानेच आपल्या मनाला विचारावा. मंडल आयोगाचा वापर राजकारणासाठी ज्यांना करायचा आहे, त्यांनी बेधडक केलाच आहे. पण, या आयोगामध्ये दबलेल्या समाजाला सवलती देण्याची भूमिका स्पष्ट झाल्याबरोबर उच्चवर्णीय समाजाचे अहंकार जागे झाले. मनाच्या कोप-यात दडून बसलेली जात गेल्या पंधरा महिन्यांत पुन्हा उफाळून आली. आजही दलित वस्त्या गावाच्या बाहेर आहेत. कायद्याने पाणवठे खुले असतील, पण मनाचे पाणवठे बंद आहेत आणि विशिष्ट जाती घुसखोरी करून पुढे गेल्यानंतर मागास समाज आणि इतर मागास समाज यांना सवलती देण्याच्या भूमिकेबद्दलचा एक राग अजूनही आम्हा उच्चवर्णीयांच्या मनात निश्चित दडून बसलेला आहे. संधी मिळाली की तो राग उफाळून येतो, मग नामांतराच्या निमित्ताने मराठवाडय़ात आम्ही दलित वस्ती जाळतो किंवा मंडल आयोगाच्या निमित्ताने मागासवर्गीयांबद्दलचे गरळ आम्ही ओकतो. बाबासाहेबांना जे घडवायचे होते. ते घडवायला आमची अजून तयारी नाही. ज्या चवदार तळ्यात उतरून बाबासाहेबांनी ओंजळभर पाणी घेतले. ते तळे आम्ही आमच्या मनात पूर्ण सुकवून टाकले आहे.


बाबासाहेबांची भाषणे…

सामाजिक विषमतेने देश उद्ध्वस्त होईल!

भारतातील सामाजिक परिस्थितीत दोन्ही तत्त्वांचा अभाव आहे, हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यास सुरुवात केली पाहिजे. या दोन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समता. सामाजिक बाबतीत पाहावयाचे तर आपल्या भारतातील समाजरचना चढती भाजणी व उतरती भाजणीच्या तत्त्वावर उभारलेली असल्यामुळे काही जातींना उच्च दर्जा देण्यात आला आहे. आर्थिक बाबतीत पाहावयाचे तर भारतातील समाजात काही लोकांच्या घरी गजांत लक्ष्मी वावरत आहे, तर बहुसंख्य लोकांच्या घरात अठरा विश्वे दारिद्रय़ नांदत आहे. अशा परस्पर विरुद्ध स्वरूपाच्या घटनांनी भरगच्च भरलेल्या आपल्या नव्या राष्ट्रीय जीवनास आपण २६ जानेवारी १९५०ला सुरुवात करणार आहोत. या दिवसापासून राजकीय बाबतीत आपणाला समता मिळणार आहे. पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपणामध्ये असमता राहणार आहे. एका माणसाला एका मताचा अधिकार आणि एका मताची किंमत या तत्त्वाची जाणीव आपणाला राजकीय बाबतीत होणार आहे. सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपल्या विशिष्ट सामाजिक व आर्थिक रचनेमुळे आपण उपरनिर्दिष्ट तत्त्वाला २६ जानेवारी १९५० पासून हरताळ फासणार की पूर्वपरंपरागत कार्य पुढे चालू ठेवणार आहोत? परस्पर विरुद्ध अशा प्रकारांनी भरलेले आपले हे आयुष्य आणखी किती दिवस यापुढे चालू ठेवणार? सामाजिक व आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्याची टाळाटाळ आपण आणखी किती काळ करणार आहोत? ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ आपणाला टिकविता येईल. ही परस्पर भिन्नतादर्शक परिस्थिती शक्य तो लवकर आपण नष्ट केली पाहिजे. नाही तर या परिस्थितीबद्दल मनात धुसफुसत असलेले लोक या घटनासमितीने प्रचंड परिश्रम घेऊन जी ही राजकीय लोकशाही निर्माण केलेली आहे, तिचे तळपट आकाशात भिरकावून देतील.

आपण बंधुभावाचे तत्त्व आचरणात पाळीत नाही. ही आपणामधील दुसरी उणीव होय. अखिल हिंदी लोक हे परस्परांचे सख्खे भाऊ होत, ही सर्व हिंदी जनता ही एका जिव्हाळ्याची एकच एक जनता होय, अशी जी मनात भावना असते ती बंधुभावना या नावाने ओळखली जाते. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृतसिंचन जर कोणते तत्त्व करीत असेल, तर ते बंधुभावाचे तत्त्व होय. हे तत्त्व दररोजच्या व्यवहारात यशस्वी रितीने पाळणे हे मोठे बिकट कार्य आहे. भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत, याचे पहिले कारण हे की जाती सामाजिक जीवनात तुटकपणा उत्पन्न करतात. जाती देशहितविघातक आहेत. याचे दुसरे कारण हे की त्या जाती जातीत मत्सर आणि तिरस्कार निर्माण करतात. राष्ट्र या पदाला पात्र होण्याची आपणाला खरोखर इच्छा असेल तर आपण या सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे राष्ट्र अस्तित्वात असते तेथेच बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता व स्वातंत्र्य यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार?

आपणा भारतीय लोकांपुढे जे मोठे कार्य पडलेले आहे, त्याबद्दल माझी विचारसरणी ही अशी आहे. ती काही जणांना पसंत पडणार नाही. भारतातील काही थोडक्या लोकांनी राजकीय सत्ता गाजविण्याची मिरासदारी पुष्कळ काळ उपभोगलेली आहे. बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत राहून कसेबसे जीवन कंठणारे पददलित लोक होत. राजकीय सत्तेच्या मिरासदारीमुळे बहुजन समाजाला आपली सर्वागीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळाली नाही. यामुळे मानवी जीवनाचे महत्त्व काय, याची जाणीव सुद्धा या बहुजन लोकांमध्ये उरलेली नाही. सत्ताधीशाच्या टाचेखाली चेंगरलेले हे लोक आता दुस-याच्या वर्चस्वाला कंटाळून गेलेले आहेत. स्वत:चे व्यवहार स्वत:च चालवावेत असे त्यांना वाटते व त्यासाठी तसा त्यांना अधिकार पाहिजे आहे व तो मिळविण्यासाठी ते आता सिद्ध झालेले आहेत. बहुजन लोकांचा स्वाभिमान आता जागा झालेला आहे. त्यांच्यात स्वयंसिद्धपणाची जी ज्योत पेटलेली आहे, तिचे रूपांतर वर्गकलहात अगर वर्गयुद्धात होऊ देता कामा नये. तसे होऊ दिले तर देशात बेकीचे पीक उमाप पिकेल. अशी स्थिती ज्या दिवशी उत्पन्न होईल, तो देशाचा घातवार ठरेल. कारण छिन्न विछिन्न झालेले घर फार काळ टिकू शकत नाही, असे अब्राहम लिंकनने म्हटलेले आहे. म्हणून बहुजन लोकांना आपले स्वयंसिद्धपणाचे ध्येय साध्य करून घेण्यासाठी मूठभर सत्ताधीशांच्याही हिताचे, देशाच्या प्रगतीचे व देशस्वातंत्र्याला पोषक आहे. लोकशाहीसत्ता व तत्त्वे पाळण्यात आली तरच वरील परिस्थिती निर्माण करता येईल. म्हणूनच या दोन तत्त्वांच्या चर्चेवर मी जास्त भर दिलेला आहे.

स्वातंत्र्य ही आनंददायक चीज आहे, यात शंका नाही, परंतु या स्वातंत्र्याने आपणावर मोठय़ा जबाबदा-या टाकलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नये. काही अनिष्ट घडून आले की आपण पूर्वी ब्रिटिशांना जबाबदार धरीत होतो. ती परिस्थिती आता स्वातंत्र्याने नष्ट केलेली आहे. आतापासून पुढील काळात जर काही चुका झाल्या तर त्यांची जबाबदारी आपणाला दुस-यावर टाकता येणार नाही; तर ती आपण स्वत:च स्वीकारली पाहिजे. अशा प्रकारच्या अनिष्ट गोष्टी घडल्या तर त्या देशावर संकटे ओढवून आणणार आहेत. काळ दिवसेंदिवस झपाटय़ाने बदलत चाललेला आहे. इतर देशातील लोक व आपले लोक हे नव्या नव्या मतप्रणालींची कास धरीत आहेत. सत्ताधीश लोकांनी चालविलेल्या राज्याला ते कंटाळलेले आहेत.

लोकांच्यासाठी चालविलेले राज्य स्वीकारण्यास ते तयार आहेत ते राज्य लोकांचे आहे की लोकांनी चालविलेले आहे ते पाहण्यास ते लोक फारसे उत्सुक नाहीत. लोकांनी चालविलेले आणि लोकांसाठी चालविलेले राज्य या तत्त्वांची मूर्ती आपण ज्या घटनामंदिरात प्रस्थापित केलेली आहे, ते घटनामंदिर आपणाला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टींची धोंड पडून राहिलेली आहे हे समजावून घेण्यास आपण वेळ घालविता कामा नये. लोकांनी चालविलेल्या राज्यांपेक्षा लोकांसाठी चालविलेले राज्य चांगले, अशी जनतेत जागृती व्हावयास हवी. ही धोंड आपल्या मार्गातून दूर करण्यात आपण काडीचीही कसूर करता कामा नये. देशसेवा करण्याचा हा एकुलता एक मार्ग होय, याशिवाय दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही.

व्यक्तिपूजेपासून अलिप्त राहा

लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपणाला दुसरी जी गोष्ट करावयाची आहे, ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी जॉन स्टुअर्ट याने जो भयसूचक संदेश दिला आहे. तो पाळणे, ही होय.

तो संदेश असा : ‘‘आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत.’’ ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे, अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही; परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा मर्यादा आहेत. याबाबतीत आर्यलडचा देशभक्त डॅनियल ओ कोनेल याने मर्मिकपणे म्हटलेले आहे की, ‘‘स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही, शीलाला बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही, आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.’’

या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की, भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालत नाही. एखाद्याने धार्मिक बाबतीत भक्ती दाखविली तर ती त्याची जन्ममरणाच्या फे-यातून कायमची मुक्तता करू शकेल; परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मपूजा दाखवली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित करील.

सामाजिक व आर्थिक समता

लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट आपणाला करावयाची आहे ती ही की आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. राजकीय लोकशाहीमुळे सामाजिक लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरव्ही नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनतत्त्वे होत, हे मान्य करणारी पद्धती. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही तत्त्वे म्हणजे त्रिवेणी संगमातील निरनिराळे भाग होत, असे मानता येत नाही. ही तत्त्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात. ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्त्व नष्ट केल्यासारखे होते. समतेपासून स्वतंत्रतेला अलग करता येत नाही व स्वतंत्रतेपासून समतेला अलग करता येत नाही. त्याचप्रमाणे स्वतंत्रता आणि समता यांना बंधुत्वापासून अलग करता येत नाही. स्वातंत्र्याच्या जोडीला समता नसेल तर नुसते स्वातंत्र्य मूठभर लोकांची सत्ता सर्वावर प्रस्थापित करू शकेल. समतेच्या जोडीला स्वातंत्र्य नसेल तर नुसती समता वैयक्तिक कर्तृत्वशक्तीची ज्योत मालवून टाकील. स्वातंत्र्य व समता ही दोन्ही सामाजिक व्यवहाराला गती देऊ शकणा-या नाहीत. त्या यंत्राला गती देणारा कोणी तरी पुढे आला पाहिजे.


दारिद्र्य व आर्थिक विषमता हे तर देशापुढील सर्वात उग्र प्रश्न

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले नि २६ जानेवारी १९५०पासून भारताने लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार केला. डॉ. अब्राहिम लिंकनने लोकशाहीची जी व्याख्या केलीय ती सर्वश्रृत आहे. डॉ. लिंकन म्हणतात, लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी व लोकांसाठी चालविलेले राज्य होय. येथे लोक म्हणजे प्रजा, नागरिक असा अर्थ आहे. लोकशाहीत प्रजा सार्वभौम आहे. लोकशाहीत प्रजेला सर्वाधिक महत्त्व डॉ. लिंकनने दिले आहे. ज्या डॉ. लिंकनने जगाला सर्वमान्य अशी लोकशाहीची व्याख्या दिली ते लिंकन चर्मकार समाजातील म्हणजे भारतीय भाषेत सांगायचे तर मागासवर्गीय (दलित) होते. ज्या भारताला संसदीय लोकशाही राज्यपद्धती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली तेही मागासवर्गीय म्हणजे पूर्वाश्रमीचे महार होते. त्यांनी लोकशाहीची जी व्याख्या केली ती भारतीय समाजव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून ते म्हणतात, ‘लोकशाही म्हणजे निव्वळ राजसत्तेचा प्रकार नाही. तर लोकशाही ही प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे. समाजबांधवांबद्दल योग्य तो आदर व मानसन्मान राखण्याचा तो दृष्टिकोन आहे.’ बाबासाहेबांचे हे विचार कोणत्या नेत्याला कळले?

१९५० साली भारतात लोकशाही नव्याने निर्माण झाली किंवा लोकशाही ही काय चीज आहे हे भारताला माहीत नव्हते, असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील लोकशाहीचे प्राचीनत्व सांगताना स्पष्ट केलेले आहे की, असा एक काळ होता की, त्यावेळी भारतात (सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी) पुष्कळ लोकसत्ताक राज्ये होती. ज्या प्रदेशात राजेशाही होती, तेथेही राजे लोक लोकमताने नेमले जात असत. बौद्ध भिक्षू संघाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना हेच दिसून येईल की, हे बौद्ध संघ म्हणजे मूर्तिमंत लोकसभा होत्या. कारण आजकालच्या लोकसभेत ज्या बाबी पाळण्यात येतात त्या सर्व बाबी भिक्षूक संघाच्या बैठकीत पाळण्यात येत असत. मध्यंतरीच्या काळात भारताने लोकशाही पद्धती गमावली. ती पुन्हा दुस-यांदा गमावणार काय? ही चिंता प्रारंभीच डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केली होती.

भारतातील लोकशाहीविषयी चिंता व्यक्त करताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग व्यवस्थितपणे शाबूत ठेवू शकेल; परंतु ती व्यवहारात हुकूमशाहीला आपली जागा बळकाविण्यास वाव देईल. डॉ. आंबेडकरांचे हे भाकीत ब-याच अंशी सत्यात उतरलेले आहे, असे दिसून येत आहे. भारतात लोकशाहीचा कसा खेळखंडोबा चालू आहे, हे आता सर्वानाच ज्ञात आहे. लोकशाहीच्या मार्गातील अडथळे किंवा तिचे मारेकरी कोण आहेत, याची चर्चा डॉ. आंबेडकरांनी प्रारंभीच केलेली होती.

१) असनदशीर मार्ग : आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण सनदशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झालीत; परंतु आपल्या देशातील सामाजिक व आर्थिक प्रश्न तर सुटलेच नाहीत, उलट अधिक कूट व गुंतागुंतीचे झालेले आहेत. देशातील दारिद्रय़ व आर्थिक विषमता हे तर देशापुढील सर्वात उग्र प्रश्न आहेत. या देशातील दलित, आदिवासी, भटक्या जमाती, दारिद्रय़ रेषेखालील जीवन जगणारे कामकरी-श्रमकरी यांच्या मागे गरिबी हजार पिढय़ांपासून लागलेली आहे. हिंदू हा धर्म जर सनातन धर्म मानला जातो, त्याप्रमाणे या देशातील गरिबी ही सुद्धा सनातनच आहे. तर जे उच्चवर्णीय आहेत, धनिक आहेत, बडे उद्योगपती आहेत, त्यांना ‘लक्ष्मीपुत्र’ म्हटले जाते. त्यांची श्रीमंतीही वाढतेय. समाजात ही जी प्रचंड आर्थिक विषमता आहे, त्यामुळेच सतत समाजात असनदशीर मार्गाचा लोक वापर करीत असतात. साहजिकच भारतीय जनतेला सामाजिक व आर्थिक गोष्टी साध्य करताना विविध तऱ्हेचे झगडे करावे लागलेले आहेत आणि आतापर्यंत असनदशीर मार्गाचाच अधिक्याने वापर करण्यात आलेला आहे. संप, टाळेबंदी, मोर्चे, धरणं, दंगल, दगडफेक, जाळपोळ, मारामा-या, खून इत्यादी गोष्टी (असनदशीर) लहान मुलांच्या खेळाप्रमाणे नित्याच्या झालेल्या आहेत. डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे की, ‘असनदशीर मार्ग म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत.’ आज तर बेबंदशाहीचाच नंगानाच विविध पद्धतीने देशात चालू आहे.

२) राजकारणातील घराणेशाही : लोकशाहीला मारक राजकारणातील घराणेशाही ठरत असल्याची असंख्य उदाहरणे आहेत. नेहरू घराण्याची घराणेशाही आजही चालू आहे. शिवसेनेत ठाकरे घराणेशाही ६० वर्षे चालू आहे. परंतु अब्राहम लिंकनने इशारा दिला होता की, ‘ज्या घरात फूट आहे ते घर फार काळ टिकू शकत नाही.’ आज याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ठाकरे कुटुंबाचेच देता येईल. सत्तेसाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे भाऊ आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. अब्राहम लिंकनचे विचार यावेळी प्रकर्षाने आठवतात.

डॉ. आंबेडकरांनी या घराणेशाहीलाच लोकशाहीचे मारेकरी म्हटले आहे. ते म्हणतात, भारतातील काही लोकांनी राजकीय सत्ता गाजविण्याची मिरासदारी पुष्कळ काळ उपभोगली आहे. बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत राहून कसेबसे जीवन जगणारे पददलित लोक आहेत. राजकीय सत्तेच्या मिरासदारीमुळे बहुजन समाजाला आपली सर्वागीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळाली नाही. सत्ताधीशांच्या टाचेखाली चेंगरलेले हे लोक आता दुस-याच्या वर्चस्वाला कंटाळून गेले आहेत. परंतु या मिरासदारांच्या विरोधात बहुजन समाजक्रांती करून उठत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.

३) लोकशाहीचे प्रकार : लोकशाहीचे अनेक प्रकार असू शकतात. पण डॉ. आंबेडकरांना लोकशाहीचे दोन प्रकार अभिप्रेत होते. त्यांनी राजकीय लोकशाही व सामाजिक लोकशाही असे दोन प्रकार मानले. या संदर्भात डॉ. आंबेडकर म्हणतात की, आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे.

डॉ. आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक लोकशाहीला अधिक महत्त्व दिलेले आहे. सामाजिक लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांचा समावेश केला जातो. या तीनही गोष्टी तोलामोलाच्या आहेत.

डॉ. आंबेडकर यासंदर्भात म्हणतात की, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही तत्त्वे म्हणजे त्रिवेणी संगमातील निरनिराळे भाग होत असे मानता येत नाही. ती अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्त्व नष्ट केल्यासारखे होईल. आज खेदाने म्हणावेसे वाटते की, भारतात आज सामाजिक लोकशाही (जी बाबासाहेबांना अभिप्रेत होती) तर नाहीच नाही, पण राजकीय लोकशाहीसुद्धा बहुजनांसाठी शिल्लक नाही. विशिष्ट वयाची अट पूर्ण करणा-या कोणाही भारतीय नागरिकांस (अंध, देशद्रोही यांचा अपवाद) मतदानाचा अधिकार आहे, निवडणुकीस उभे राहता येते, राज्यकारभार पाहता येतो, इत्यादी राजकीय अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांस बहार केलेत. परंतु राजकीय लोकशाही प्रत्यक्षात अस्तित्वात आहे काय? निवडणुकीला उभी राहणारी व्यक्ती लखपती सुद्धा चालत नाही, ती करोडपतीच असायला हवी. इतकी निवडणूक महागडी झालीय. पाण्यासारखा पैसा ओतल्याशिवाय निवडून येताच येत नाही. त्यामुळे निवडणुका लढणे हा श्रीमंतांचाच खेळ झालाय. या निवडणुकीकरिता हुशारी, सज्जनपणा यांची फारशी आवश्यकताच भासत नाही. आज बुद्धिमान माणसे, सज्जन माणसे राजकारणापासून दूर राहतात.

भारतीय राजकारणाची स्थिती पाहता जॉन स्ट्रॅचीच्या विचारांची आठवण होते. त्यांनी म्हटले होते की, ‘राजकीय पक्ष ही काय चीज आहे?’ अगदी रांगडय़ा भाषेत सांगायचे तर राजकीय पक्ष हे राजकीय लोकांचे कंपू आहेत.

आज भारतीय राजकारणाची दुरवस्था अशीच झाली आहे. येथे सामान्य नागरिकास किंमतच नाही.

डॉ. आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकास एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य ही अनमोल देणगी दिलेली आहे. पण राज्यकर्त्यांनी त्याची माती केलीय. मतदार हा लोकशाहीचा कणा मानला जातो. निवडणुका आल्या की, पक्षांचे नेते- पुढारी गावागावात जातात, घराघरात जातात, चुलीपर्यंत जातात, हात जोडतात, हातावर म. गांधीची १००-५०० रुपयांची नोट ठेवतात व मतांचा सौदा होतो. ज्या डॉ. आंबेडकरांनी भारतीयांना संसदीय लोकशाही अर्पण केली त्याच भारतीयांना ती सांभाळता येत नाही. बाबासाहेब कळवळून सांगायचे, बंधूनो, तुमच्या मताची किंमत मीठ-मिरचीसारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच किंबहुना जास्तच तुमच्या मताची किंमत आहे, हे विसरू नका, परंतु याच गोष्टीचा विसर सर्वाना पडलाय, भारतीय लोकशाहीचे काही खरे नाही!…..

2 COMMENTS

  1. भारतीय लोकशाहीचे काही खरे नाही!…..असा विचार कधिच करायचा नाही.कारण कमळ हे चिखलात वुगवते.कमळ हे राष्ट्रीय फुल आहे.भारतातील धार्मिक, जातीय, राजकारणाच्या चिखलात, मी भारतीय आहे.भारत देशाचा मालक आहे.म्हणून मी कर्ज बाजरी आहे.म्हणून मला ३५००० रुपयांचे कर्ज फेडायचे आहे.या विचाराचे कमळ वूगवलेले लवकरच आपणास दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version