Home क्रीडा भारताची कामगिरी निराशाजनक का?

भारताची कामगिरी निराशाजनक का?

0

सध्या ओल्ड ट्रॅफर्डवर (मँचेस्टर) सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत भारताची जी दयनीय अवस्था झाली, त्याला तोड नाही. मुळात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी का घेतली, हे कोडेच होते.

सध्या ओल्ड ट्रॅफर्डवर (मँचेस्टर) सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत भारताची जी दयनीय अवस्था झाली, त्याला तोड नाही. मुळात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी का घेतली, हे कोडेच होते.

प्रथम फलंदाजीचा निर्णय का घेतला, असे विचारताच त्याने दिलेले स्पष्टीकरणही धक्कादायक आहे. खेळ उशिरा सुरू झाल्यामुळे खेळपट्टी थोडीशी दमट होती. ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीला इंग्लंडच्या गोलंदाजांना फायदा मिळेल तरीही चौथ्या आणि पाचव्या दिवशी आमच्या फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी अनुकूल होईल.

त्यामुळे हा निर्णय घेतला, असे तो म्हणाला. अर्थात मागील सामन्यातील २६६ धावांनी झालेला पराभव हा आपले फलंदाज आणि गोलदाजांच्या खराब कामगिरीमुळे झाला, हे ढोणीने लक्षात घेतलेले दिसत नाही. त्याच्यासारख्या अनुभवी संघनायकाला चौथ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीचा अंदाज आला
नाही का?

आठ धावांमध्ये पहिले चार फलंदाज बाद झाल्यावर १९७४ मधील इंग्लंड दौ-यातील वाडेकर संघाच्या सर्वबाद ४२ धावांचा नीचांक मोडला जातो का, अशी शंका आली. ढोणी, अश्विन आणि रहाणेच्या मिळून १३५ धावा आणि उरलेल्या आठ जणांसह अवांतर मिळून १७ धावा. त्यात सहा जणांनी भोपळाही फोडला नाही.

इंग्लंडच्या ब्रॉड आणि अँडरसन यांनी खेळपट्टी तसेच ढगाळ वातावरणाचा फायदा उठवत नऊ बळी मिळवले. यापुढे जाऊन सांगायचे म्हणजे इंग्लंडच्या पहिल्या डावात भुवनेश्वर कुमार आणि वरुण आरोनने पहिल्या सहा विकेट काढल्या.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी वापरून जीर्ण झालेल्या खेळपट्टीवर इतके बळी मिळवले तर आपला फलंदाजीतील कमकुवतपणा लक्षात घेऊन ढोणीने पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारले असते तर इंग्लंडचीही पहिल्या डावात तशीच अवस्था झाली असती. मग ढोणीचा प्रथम फलंदाजीचा निर्णय योग्य होता का, असा प्रश्न पडतो.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या भारताच्या दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड दौऱ्यांसह बांगलादेशात झालेल्या आशिया चषकातील कामगिरी समाधानकारक नव्हती. इंग्लंडमधील पहिला सामना अनिर्णित ठेवताना दुसरा सामना इशांत शर्माच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर जिंकल्यानंतर भारताची कामगिरी सुधारली, असे वाटले.

इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाज नेहमीच यशस्वी ठरतात, हा इतिहास आहे. मग तिस-या कसोटीत चार गोलंदाज खेळवून तसेच रोहित शर्माला तात्पुरता गोलंदाज बनवून ढोणीने काय साध्य केले? शिवाय वेगवानपेक्षा फिरकी गोलंदाजी अधिक चांगली खेळतो, अशी आपली ख्याती असताना मोईन अलीसारख्या कामचलावू ऑफस्पिन गोलंदाजी करणा-याला बळी पडून तिसरी कसोटी हरलो, हा दैवदुर्विलास नव्हे का?

शिखर धवन कायम अपयशी ठरत असताना चौथ्या कसोटीत फलंदाजी मजबूत करण्यासाठी रोहित शर्माला का घेतला नाही? त्यातच आपले सर्व फलंदाज उजव्या यष्टीबाहेरील चेंडू खेळून स्लिपमधील क्षेत्ररक्षकांना झेल देण्याचा सराव करत होते. फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला का पाठवले? त्याने या लोकांना काय धडे दिले? नजर बसेपर्यंत बाहेर जाणा-या चेंडूंना सोडून द्यायचे, हे तत्व फलंदाजांना शिकवले गेले नाही का? आणि ही जबाबदारी असताना सकाळी मैदानावर येऊन समीक्षक म्हणून कामगिरी बजावणे, कितपत योग्य आहे?

अर्थात या झाल्या सर्वसाधारण गोष्टी. परंतु, अंतिम संघनिवड आणि गोलंदाजी हाताळण्याची हातोटी यात ढोणी कमी पडतोय, हे तिस-या कसोटीत इंग्लंडने धावांचा डोंगर रचल्यानंतर हताश झालेल्या ढोणीच्या चेह-यावरून दिसत होते. भारतीय संघातही नेतृत्व बदलाची आवश्यकता आहे का, असा विचार येतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version