Home क्रीडा भारताच्या महिला संघाची विजयी सलामी

भारताच्या महिला संघाची विजयी सलामी

0

बांगलादेशवर ७२ धावांनी मात करत भारताच्या महिला संघाने (ब गट) मंगळवारी विजयी सलामी दिली. 

बंगळूरु- बांगलादेशवर ७२ धावांनी मात करत भारताच्या महिला संघाने (ब गट) मंगळवारी विजयी सलामी दिली. उंचावलेली सांघिक कामगिरी यजमानांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.

प्रतिस्पर्धी संघाने सपशेल हार पत्करल्याने लढत एकतर्फी झाली. भारताच्या १६४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला ५ बाद ९१ धावा करता आल्या.

कोल्हापूरची ऑफस्पिनर अनुजा पाटील (४-०-१६-२) आणि लेगब्रेक पूनम यादवच्या (४-०-१७-२) प्रभावी मा-यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. अष्टपैलू हरमनप्रीत कौरनेही (२ षटकांत ६ धावा) अचूक गोलंदाजी केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी देण्याचा बांगलादेशचा निर्णय चुकीचा ठरला. कर्णधार मिथाली राज (३५ चेंडूंत ४२ धावा) आणि वेलास्वामी वनिथाने (२४ चेंडूंत ३८ धावा) दमदार ६२ धावांची सलामी देत मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली. मिथाली सुदैवी ठरली. २८ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा तिने फायदा उठवला.

‘वनडाउन’ स्मृती मंधानाने (०) निराशा केली तरी मधल्या फळीतील हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्तीने चौथ्या विकेटसाठी ४५ धावा जोडताना भारताला ५ बाद १६३ धावा अशी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. हरमनप्रीतने केवळ २९ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा फटकावल्या. वेदाने २४ चेंडूंत नाबाद ३६ धावांची खेळी केली. त्यात २ षटकारांचा समावेश आहे. हरमनप्रीतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक :

भारत – ५ बाद १६३(मिथाली राज ४२, हरमनप्रीत कौर ४०, वेदा कृष्णमूर्ती नाबाद ३६, वनिथा ३८) वि बांगलादेश – ५ बाद ९१(निगार सुलताना नाबाद २७, अनुजा पाटील १६-२, पूनम यादव १७-२). निकाल : भारत ७२ धावांनी विजयी. सामनावीर : हरमनप्रीत कौर.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version