Home देश भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केले हृदयरुग्णांसाठी नवे औषध

भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केले हृदयरुग्णांसाठी नवे औषध

1

भारतीय शास्त्रज्ञांनी रक्तातील गुठळ्या नष्ट करणारे आणि अंतर्गत रक्तस्रव रोखणारे एक नवीन औषध तयार केले असून ते किफायतशीर असल्याने त्यामुळे हृदयरुग्णांना दिलासा मिळण्याची अपेक्षा हे शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. 

जगभरात हृदयविकाराची समस्या वाढत चालली आहे. अयोग्य प्रकारचा आहार, मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली यांमुळे हा आजार होत असतो.

अ‍ॅँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया करून या विकारावर उपचार करण्यात येतात. हे उपचार रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि रक्तातील गुठळ्या दूर करण्यासाठी केले जातात. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी रक्तातील गुठळ्या नष्ट करणारे आणि अंतर्गत रक्तस्रव रोखणारे एक नवीन औषध तयार केले असून ते किफायतशीर असल्याने त्यामुळे हृदयरुग्णांना दिलासा मिळण्याची अपेक्षा हे शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. ‘क्लॉट स्पेसिफिक स्ट्रेप्टोकायनेस’ (सीएसएसके) असे नाव असलेले हे औषध असून त्याचे स्वामीत्व हक्क घेण्यात आले आहेत.

या औषधाची दुसरी क्लिनिकल चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. हे औषध बाजारात येण्यासाठी मात्र २०१६ची वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मायक्रोबियल टेक्नॉलॉजी संस्थेचे संचालक गिरीश सहानी यांनी दिली.

सीएसआयआर, आयएमटीईसीएच आणि अमेरिकेतील ‘नोस्ट्रम फार्मास्युटिकल्सने हृदयात होणा-या गुठळ्या नाहीशा करण्यासाठी तिस-या टप्प्यातील हे औषध सात वर्षाच्या संशोधनाने तयार केले आहे. भारताच्या औषध नियंत्रकांनी त्याला मान्यता दिली आहे. दुस-या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आता ७५ ते ८० रुग्णांवर घेण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारणपणे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येतो. कारण या गुठळ्यांमुळे हृदयाकडे जाणारा रक्ताचा पुरवठा बंद पडतो. रक्तामधील गुठळ्या नष्ट करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी औषध द्यावे लागते. या औषधाचे इंजेक्शन दिल्यास रुग्णांना आराम पडू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदयविकाराचा धोका असण्याबरोबरच या गुठळ्यांमुळे उपचारांदरम्यान अंतर्गत रक्तस्रव होण्याचा मोठा धोका असतो. मात्र, या नव्या औषधामुळे अंतर्गत रक्तस्रवाचा धोका मोठय़ा प्रमाणावर कमी होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या औषधाची किंमत २ ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या गुणकारी औषधामुळे रक्तस्रवाचा धोका मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकेल. बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांच्या तुलनेत या औषधाची किंमत निम्मी आहे.

या औषधाच्या पहिल्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version