Home टॉप स्टोरी मनसेमध्ये धुसफूस

मनसेमध्ये धुसफूस

1

विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आता धुसफूस सुरू झाली आहे.

मुंबई- विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आता धुसफूस सुरू झाली आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. अनेक माजी आमदार आणि पदाधिकारीही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाची वारंवार बदलणारी धोरणे आणि समन्वयाचा अभाव यामुळे मनसेमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोष आहे. हीच कारणे पराभवासाठी कारणीभूत असल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यापुढच्या काळात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पक्ष टिकवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जवळपास २३०पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र त्यापैकी मनसेचा एकमेव आमदार निवडून आला. त्यानंतर पक्षात मोठय़ा प्रमाणात बंडाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यताही आता काढली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आमदारांनी कामे केली नाहीत असा काही ज्येष्ठ नेत्यांचा आरोप आहे. त्यामुळे ज्या आमदारांनी कामे केली ते आमदार कमालीचे नाराज झाले आहेत.

उलट पक्षाच्या एखाद्या विषयाच्या धरसोड वृत्तीमुळेच नुकसान झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. एक वेळ मोदींना समर्थन करायचे आणि दुसरीकडे टीका करायची हे लोकांना पटले नाही. त्यातच राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करायची, नंतर त्यापासून पळ काढायचा यामुळे नेत्याबाबतही विश्वासार्हता राहिली नाही. या सर्वामुळे पक्षातील माजी आमदार आणि पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्याची सुरुवात प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा राज ठाकरेंकडे दिल्याचे समजते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अन्य नेतेही येत्या काही दिवसात राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच एकमेव विद्यमान आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे मनसेची गळती थोपवण्याची मोठी जबाबदारी राज यांच्यावर आहे. शिवाय दुस-या फळीतील नेत्यांमध्ये सुरू असलेली धुसफूसही थांबवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन ठेपली आहे.

1 COMMENT

  1. सध्या मनसेचे दिवस फिरलेले आहेत राज साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार केला परंतु जनतेने पाहिजे त्याप्रमाणे
    त्यांना साथ दिली नाही अतिशय गंभीर बाब आहे हि राज साहेबांसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version