Home मनोरंजन मनोरंजन कट्टा- सुवर्ण सचिन

मनोरंजन कट्टा- सुवर्ण सचिन

2

भारतीय चित्रपट क्षेत्रात आतापर्यंत अनेक बालकलाकार आले. ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून आलेला एक बालकलाकार मात्र या चित्रपटसृष्टीत टिकला, बहरला. एक अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता म्हणून सचिन यांची कारकीर्द तब्बल पन्नास वर्षाची झाली आहे.

सुवर्ण सचिन

भारतीय चित्रपट क्षेत्रात आतापर्यंत अनेक बालकलाकार आले. ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून आलेला एक बालकलाकार मात्र या चित्रपटसृष्टीत टिकला, बहरला. एक अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता म्हणून सचिन यांची कारकीर्द तब्बल पन्नास वर्षाची झाली आहे. त्यांच्या या कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव नुकताच ‘झी टॉकीज’ने एका खास कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा केला. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी सचिन यांच्या ‘हाच माझा मार्ग’ या आत्मचरित्राचं प्रकाशन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालं. एका सचिनने दुस-या सचिनचा केलेला हा गौरव विलक्षण ठरला. सचिन पिळगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश सिप्पी यांनी यावेळी ‘शोले’ चित्रपटातल्या सचिनच्या योगदानाचा उल्लेख केला.


हिंदीतला मोठा सायकोथ्रीलर लवकरच

हॉलिवुडमध्ये सायकोथ्रीलर चित्रपटांची एक मोठी परंपरा आहे. या परंपरेत बसणाऱ्या काही चित्रपटांची हिंदीतही निर्मिती होताना आपण पाहत असतो. असे प्रकार भारतात जरी फार यशस्वी होताना दिसत नसले तरी आजकाल त्यांच्या निर्मितीची संख्या वाढत चालली आहे. अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा ठरणारा सायकोथ्रीलर लवकरच प्रदर्शित होत आहे. सायकोथ्रीलर श्रेणीतला ‘रक्त एक रिश्ता’ हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. आपल्या आईच्या प्रेमासाठी वेडया झालेल्या एका मुलीची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. आपल्या या सावत्र आईच्या प्रेमात ती इतकी आंधळी झालेली आहे की या प्रेमात कुणीही आड येऊ नये अशीच तिची इच्छा आहे. यासाठी ती काय काय करते हे दाखवणारा हा चित्रपट आहे. शिना शहाबदी हिने वेगळया प्रकारची भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात गुलशन ग्रोव्हर एका मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामुळे रहस्यमय चित्रपट आवडणा-या प्रेक्षकांसाठी एक चांगला चित्रपट पाहण्याची संधी मिळेल, असा विश्वास या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.


‘स्वामी समर्था’वर चित्रपट

महाराष्ट्राच्या आधुनिक संतपरंपरेतील एक संत स्वामी समर्थ यांच्या जीवनावर मराठीत लवकरच चित्रपट येत आहे. ‘मी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘कृपा सिंधु’ या मालिकेत स्वामी समर्थाची भूमिका साकारणारे प्रफुल्ल सामंत याही चित्रपटात त्यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून, या चित्रपटात मराठीतले आघाडीचे कलाकार चमकणार आहेत. ‘स्वामी समर्थ क्रिएशन’ या निर्मिती संस्थेनं या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं असून, ते लवकरच आणखी दोन मराठी व दोन हिंदी चित्रपटांची घोषणा करणार आहेत.या आधी ‘डेहराडून डायरी’ या त्यांच्या चित्रपटाला चांगलं यश मिळालं होतं.


बेशरम’चं गाणं रसिकांसाठी 

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कधी काय काय कार्यक्रम आयोजित केले जातील, याचा काही नेम नाही. कधी एखाद्या चित्रपटाचा फर्स्ट लुक येतो, कधी म्युझिक लाँच होतं तर कधी कलाकार एखाद्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी वा एखादा सामाजिक संदेश देण्यासाठी मैदानात उतरतात. ‘बेशरम’ या रणबीर कपूरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने आता एक नवी वाट चोखाळलेली दिसून येतेय. त्यांनी या चित्रपटाचं एक गाण माध्यमांसमोर रसिकार्पण केलं. त्यासाठी फिल्मसिटीतल्या एका खास सेटवर चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार व तंत्रज्ञ एकत्र आले होते. यावेळी या गाण्यावर नाचण्याकरता काही पत्रकारांनाही पाचारण करण्यात आलं होतं. रणबीर तर या दिवशी अगदी खास अशा मूडमध्ये होता. त्याच्या पदलालित्याने उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. ‘बेशरम’ या चित्रपटातलं ‘आ रे आ रे’ हे गाणं खास तरुणाईसाठी संगीतबद्ध करण्यात आलेलं आहे. आता हे गाणं खरोखरच लोकांना किती आवडतं ते येणाऱ्या काळात कळेलच. मात्र या गाण्यावरचा रणबीरचा डान्स मात्र जबरदस्त आहे, यावर सगळय़ांचं एकमत आहे.

2 COMMENTS

  1. Sachin Pilkgaokar, positively he is a Great Man. I saw his first picture
    ( Ha maza Marg Ekla ) The Best song ever ,Thaook Ahe ka Tuz Kahi !Kashi Hoti re mazi Aaie ? With late Raja Paranjape.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version