Home मनोरंजन मनोरंजन कट्टा

मनोरंजन कट्टा

0

भारतात प्रथमच एखाद्या चिनी चित्रपटाचं चित्रीकरण होतं आहे. 

लाँजिनस फर्नाडिस देतोय चिनी कलाकारांना नृत्याचे धडे

राजस्थानातील क्रिशनगड येथील रूपानगड किल्ला आणि फूल महल पॅलेस.. अस्सल भारतीय पारंपरिक पोशाखातील अर्थात साडीतील अभिनेत्री आणि शेरवानी आणि पगडी परीधान केलेला मुख्य अभिनेता वांग झुबिंग.. एखाद्या आलिशान लग्न सोहळ्याचं वातावरण..मध्ये एखादी घोडागाडी तर मध्येच रिक्क्षा.. असा सगळा अस्सल भारतीय लवाजमा.. या वातावरणात सगळे कलाकार बॉलिवुडच्या गाण्यांवर नृत्याचे धडे घेत होते, असं वाटावं की जणू एखाद्या हिंदी चित्रपटाचंच चित्रीकरण आहे. मात्र तिथे चक्क एका चिनी चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं. त्यात ही हे नृत्याचे धडे देणारा होता ऑस्कर पुरस्कार विजेता लाँजिनस फर्नाडिस. प्रत्येकाच्या मनात घर केलेल्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाचा नृत्यदिग्दर्शक.

भारतात प्रथमच एखाद्या चिनी चित्रपटाचं चित्रीकरण होतं आहे. भूषण पेडणेकर यांची निर्मिती असणा-या ‘माय अमेझिंग ट्रिप टू इंडिया’ या चिनी भाषेतील चित्रपटातल्या गाण्याचं नुकतंच क्रिशनगडमध्ये चित्रिकरण झालं. या चित्रपटातलं बॉलिवुडच्या गाण्यांवर आधारीत असलेलं हे गाणं लाँजिनस फर्नाडिस यानं दिग्दर्शित केलं. तो म्हणतो, ‘ इथल्या सेटवरचं वातावरण खूप उत्साही होतं. वास्तविक या रणरणत्या वातावरणात नृत्याचं शूटिंग कसं करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्नच होता. पण कलाकारांनी प्रत्येक दिवशी अतिशय संयमानं काम केलं. वँग भारतीय पोषाखात खुपच छान दिसतोच त्याचबरोबर बॉलिवूडच्या गाण्यांवर अगदी सहजगत्या नृत्य करतो.’

डॅनी बोयल(स्लमडॉग मिलेनियर दिग्दर्शक) आणि जॉन मॅडेन(द बेस्ट एक्झॉटिक मॅरिगोल्ड-२) यांच्या सोबत नृत्यदिग्दर्शन केल्यानंतर लाँजिनस आता या चिनी चित्रपटाची नृत्य कशी बसवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

जागरण फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात

चित्रपट महोत्सवांमध्ये प्रतिष्ठेचा व चर्चेचा विषय असलेला पाचवा ‘जागरण फिल्म फेस्टिव्हल’ ५ जुलैपासून नवी दिल्लीत सुरू झाला आहे. तो ९ जुलैपर्यंत चालणार आहे. हा चित्रपट महोत्सव २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबईतही भरणार आहे. आतापर्यंत विविध चौदा शहरात यशस्वी झालेल्या या महोत्सवात अस्तित्वाच्या लढाईवर आधारित चित्रपटांचं खास दालन असेल.

यात सात चित्रपटांचा समावेश आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या या चित्रपटांमध्ये ‘बिअ‍ॅट्रिझ वॉर’ (पूर्व तिमोर), ‘आउटसाइड द लॉ’(अल्जेरिया आणि फ्रान्स), ‘बॅटलशिप पोटेमकिन’(रशिया),‘द ट्रायल ऑफ जोन ऑफ आर्क’(फ्रान्स), ‘बिर्सा मुंडा’(भारत), ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’(भारत) आणि ‘केरला वर्मा फझासी राजा’(भारत) या चित्रपटांचा समावेश आहे. ‘बिअ‍ॅट्रिझ वॉर’ या चित्रपटात पूर्व तिमोरमधील एका महिलेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

‘आउटसाइड द लॉ’ मध्ये नायजेरीयन जनतेचा फ्रान्सच्या वसाहतवाद विरोधातला संघर्ष दाखवला आहे. ‘द ट्रायल ऑफ जोन ऑफ आर्क’ हा फ्रेंच चित्रपट असून तो बिगबजेट आहे. ‘बिर्सा मुंडा’ हा झारखंडच्या अशोक शरन नामक दिग्दर्शकाचा चित्रपट असून त्यात एका हिंमतवान मुलाची कथा आहे. ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारून शस्त्र उपसणा-या मुलाची ही कथा आहे. श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या चित्रपटाचाही यात समावेश आहे. अर्थातच नावाप्रमाणे ब्रिटिशांविरुद्धचा नेताजींचा संघर्ष दाखवला असून त्यातूनच त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘केरला वर्मा फझासी राजा’ हा एक मल्याळम चित्रपट असून त्यात १८व्या शतकात ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवणा-या ‘फझासी राजा’ नावाच्या एका हिंदू राजाचा संघर्ष दाखवला आहे. याशिवाय शॉर्ट फिल्मच्या सत्राचाही या महोत्सवात समावेश असून या ‘जागरण शॉर्ट्स’ फेस्टिव्हलमध्ये २० आंतरराष्ट्रीय लघुपटांचा समावेश आहे.

देवदत्त साबळेंच्या सदाबहार संगीताची जादू ‘आक्रंदन’मध्ये

‘हि चाल तुरुतुरु..’ असो, ‘मनाच्या धुंदीत लहरीत..’ अशा असंख्य प्रेमगीतांनी गेल्या दोन पिढयांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार देवदत्त साबळे यांच्या संगीताची लोकप्रियता ४० वर्षानंतर देखील कायम आहे. त्यांच्या सदाबहार संगीताची जादू ब-याच कालावधीनंतर ‘पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स’च्या ‘आक्रंदन’ या आगामी मराठी चित्रपटात अनुभवता येणार आहे. गोिवद आहेर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांनी केलं आहे. ८० हून अधिक मालिकांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर ‘आक्रंदन’ चित्रपटाच्या माध्यमातून शशिकांत देशपांडे चित्रपट दिग्दर्शनात प्रवेश करीत आहेत.

देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिली असून हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय. सुधीर मोघेंच्या शब्दांची किमया ‘आक्रंदन’ या आशयघन सिनेमात पाहता येईल. सुधीर मोघेंच्या शब्दातील आर्तता संगीताच्या साथीतून देवदत्त साबळे यांनी अचूक व्यक्त केली असून यातील ‘देव जेवला आम्ही पाहिला’ हे आदिवासी उत्सवी गीत स्वत:च गायले आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, मििलद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी यांच्या भूमिका आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version