Home रिलॅक्स ‘मरहट्ट’ ‘महारठी’ ‘महाराष्ट्र’

‘मरहट्ट’ ‘महारठी’ ‘महाराष्ट्र’

2

ज्या प्रदेशाला सध्या ‘महाराष्ट्र’ या नावाने संबोधले  जाते, त्याला सहाव्या शतकाच्या पूर्वी ‘दक्षिणापथ’ असे म्हटले जात असे.  तथापि, पौराणिकदृष्टया महाराष्ट्रातील वसाहत ख्रिस्तपूर्व आठव्या शतकाच्या सुमारास झाली असावी, असे मत डॉ. केतकर यांनी आपल्या ‘प्राचीन महाराष्ट्रा’त मांडले आहे.

ज्या प्रदेशाला सध्या ‘महाराष्ट्र’ या नावाने संबोधले  जाते, त्याला सहाव्या शतकाच्या पूर्वी ‘दक्षिणापथ’ असे म्हटले जात असे.  तथापि, पौराणिकदृष्टया महाराष्ट्रातील वसाहत ख्रिस्तपूर्व आठव्या शतकाच्या सुमारास झाली असावी, असे मत डॉ. केतकर यांनी आपल्या ‘प्राचीन महाराष्ट्रा’त मांडले आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्राचे स्थुलमानाने ‘अपरांत, विदर्भ आणि दंडकारण्य’ असे तीन भाग पडतात.

अपरांत म्हणजे कोंकण. कोंकणचा विस्तार गोकर्ण (कारवार)च्या दक्षिणेपर्यंत पसरला होता. व-हाड हा शब्द विदर्भापासून झाला असावा, असा सार्वत्रिक समज आहे; पण अबूल फसल आपल्या ‘ऐने अकबरी’त या प्रांताला ‘वर्धातट’ असे नाव देतो.

महाभारतकाळी विदर्भाला सहा नावे होती. कौशिक भोज, भोजकर, वर्धातट आणि महाराष्ट्र. त्यावेळी विदर्भ आणि महाराष्ट्र ही नावे समान अर्थाने उपयोजिली जात होती. राजशेखर कवीच्या ‘बालरामायण’ नाटकात राम, सीता नि सुग्रीव विमानात बसून लंकेहून परत जात असताना विमान विदर्भावरून जाऊ  लागले, असा प्रसंग आहे. तेव्हा सुग्रीव म्हणतो, ‘भारतग्रज, अभम् अग्रे महाराष्ट्र विषय:’ (रामा, हा पुढे येणारा प्रदेश महाराष्ट्र बरे का?) तेव्हा राम सीतेला सांगतो, ‘सो यम् सुभ्रू, परा विदर्भ विषय: सरस्वती जन्मभू’ (सुंदरी, हीच ती सरस्वतीला जन्म देणारी विदर्भभूमी) त्या काळच्या वाङ्मयात विदर्भ म्हणजे महाराष्ट्र  असे अनेक उल्लेख आढळतात.

‘मगधांकडून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत,’ अशी एक उपपत्ती आहे. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश ‘मरहट्ट’ (मराठा) असा पुढे झाला. नाणेघाटातील कोरीव लेण्यांत ‘महारठी- गनकविरो’ (महाराष्ट्र गणकवीर) असा निर्देश आहे. त्यानंतर बाराव्या शतकात ‘मानभावी वाङ्मयात महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो.

श्री चक्रधर स्वामींनी आपल्या ‘लीळाचरित्रा’त महाराष्ट्राचे पुढील वर्णन केले आहे. ‘साठी लक्ष देश महाराष्ट्र। तेथिचे शहाणे सुभटू । वेदशास्त्र चातुर्याची पेठू । भरैली तिये देशी ।। ऐसे ते महाराष्ट्ररावे सुंदरू । वरी महाराष्ट्र भाषा चतुरू । तेही वसविले गंगावीरू । क्षेत्र त्र्यंबक वे-ही।। पश्चिमेस त्र्यंबकूपूर्व सागर वे-ही द्वादश। योजने उभयगंगातीरी । ऐसे ते गंगातट महाराष्ट्री । वजिसे पुण्यातन ।। तिये गंगातीरी महंतु । तेथे सदा ईश्वरावतारू ।। ’ एवढे सांगून झाल्यावर महाराष्ट्रात कोणत्या खंडमंडळाचा (विभागाचा) समावेश होतो, हे श्री चक्रधर स्वामींनी सांगितले आहे.

‘देश म्हणजे खंडमंडळ । जैसे फलेठाणापासेनि दक्षिणेसी । म-हाठी भाषा जेतुला ठाई वर्ते ते एक मंडळ। तयासि उत्तरे बालेघाटाचा सेवटची असे। ऐसे एक खंड मंडळ । मग उभय गंगातीर  तेहि एक खंड मंडळ। आज तयापासेनि मेधकर (मेहेकर) घाट : ते एक मंडळ : तयापासोनि आवघे वराड : तेहि एक मंडळ । पर आघवीचि मिळोनि महाराष्ट्राची बोलिजे । किंचित किंचित भाषेचा पालट असे म्हणौनी खंडमंडळे म्हणावी ।। ‘ सारांश, फलटणच्या दक्षिणेपासून आणि गोदावरीच्या दोन्ही तीरावरच्या प्रदेशापासून म्हणजे मराठवाडयापासून  ते मेहेकर घाटापर्यंतचा नि वऱ्हाडचा सर्व मराठी भाषिक प्रदेश म्हणजे ‘महाराष्ट्र’-मरहट्ट, महारठी, महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची स्वच्छ आणि स्पष्ट व्याख्या सातशे वर्षापूर्वीच श्री चक्रधर स्वामींनी करून ठेवलेली आहे.


शाहीर अमर शेख

जनतेच्या सत्तेची ज्योत जागती..
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती..
गोव्याच्या फिरंग्याला चारुनी खडे..
माय मराठी बोली चालली पुढे,
एक भाषिकांची होय संगती,
गर्जा संयुक्त  महाराष्ट्र भारती..

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर फरांदे या तीन शाहिरांनी चळवळ जागविण्याचे काम केले आहे. त्या काळात ग्रामीण भागात वीज नव्हती, त्यामुळे लाऊडस्पिकरची व्यवस्था नव्हती.

लाख-लाखांच्या सभांना माईकशिवाय शाहीर अमर शेख यांचा आवाज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत होता. एखादा शाहीर रक्त ओकला असता, इतके  प्रचंड परिश्रम या चळवळीत शाहिरांनी घेतले आहेत. दिल्लीमध्ये संसदेवर संयुक्त महाराष्ट्र समितीचा प्रचंड मोर्चा गेला. त्या मोर्चात सात तास शाहीर अमर शेख गात होते.

दिल्लीच्या रस्त्यावरचे सरदारजी शाहिराच्या त्या त्वेषाकडे बघून तोंडात बोटे घालत होते. छत्रपती शिवाजी महाराज असते तर, त्यांनी शाहीर अमर शेखांच्या पाठीवर थाप मारून ‘शाब्बास शाहीर’ अशी त्यांची भलामण केली असती आणि हातातील सोन्याचे कडे शाहिराला भेट दिले असते. दिल्लीच्या रस्त्यावर अमर शेखांच्या गळ्यातून गायले गेलेले ते गाणे होते..

जाग मराठा, आम जमाना बदलेगा..


एकटया काकासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने मतदान केले

श्री. नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जे मुख्य योगदान होते, त्याची फारशी दखल महाराष्ट्राने घेतली नाही. सुरुवातीच्या काळात ‘संयुक्त महाराष्ट्र परिषद’ स्थापन झाली. त्या परिषदेने आयोजित केलेल्या सभेत काँग्रेसचे खासदार असताना काकासाहेब गाडगीळ यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला प्रखर विरोध केला होता. एवढेच नव्हे तर ‘या लढयासाठी शमीच्या झाडावरची शस्त्रे पुन्हा बाहेर काढू’, अशी गर्जनाही काकासाहेबांनी केली होती.

लोकसभेत चिंतामणराव देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले, तरी जेव्हा लोकसभेमध्ये द्विभाषिक मुंबई राज्याचे विधेयक सादर झाले, त्या विधेयकाला चिंतामणराव देशमुख यांनी विरोध केला नाही. विधेयकाच्या बाजूने त्यांनी मतदान केले. या उलट महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या ज्या एकमेव खासदाराने द्विभाषिक मुंबई राज्याच्या विरोधात मतदान केले, ते फक्त काकासाहेब गाडगीळ होते. त्या मतदानानंतर आपल्या मिश्कील स्वभावाप्रमाणे काकासाहेब गाडगीळ म्हणाले की, ‘बोराचे झाड लावले कोणी आणि बोरे पळवली कोणी, हे मी महाराष्ट्राला नंतर सांगेन!’


संयुक्त महाराष्ट्राला बाबासाहेबांचा पाठिंबा होता

घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’  या घोषणेला पाठिंबा जाहीर केला होता. पुण्यामध्ये ‘शिडय़ुल्ड कास्ट फेडरेशन’ची बैठक बाबासाहेबांनी आयोजित केली होती. त्या बैठकीत संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा असल्याचे बाबासाहेबांनी जाहीर केले होते. महाराष्ट्र राज्यासाठी समितीची चळवळ सुरू झाली आणि अत्यंत दुर्दैवाने ६ डिसेंबर, १९५६ रोजी बाबासाहेबांचे दु:खद निधन झाले, नाहीतर या लढयाचे नेतृत्वही बाबासाहेबांनीच केले असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्व अनुयायांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळेच  कर्मवीर दादासाहेब गायकवाड, अ‍ॅड. बी.सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, रा.सु. गवई आणि रिपब्लिकन पक्षाचे दुस-या फळीतले सर्व नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात आणि सत्याग्रहातही सहभागी झाले. एवढेच नव्हे तर रिपब्लिकन पक्षाचे बी.सी. कांबळे यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून समितीने उमेदवारी दिली आणि बी.सी. कांबळे नगरमधून  लोकसभेवर निवडून आले.


कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी भाऊसाहेब हिरे

महाराष्ट्राचे थोर नेते आणि मोरारजी देसाई यांच्या मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळातील नाशिकचे भाऊसाहेब हिरे हे महसूल मंत्री होते. १९५६ साली द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद यशवंतराव चव्हाण यांना मिळाले, ते मोरारजीभाई देसाई यांच्या गुजरातमधील आमदारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पारडयात मते टाकली म्हणून. त्यावेळी मुख्यमंत्री होण्याची संधी भाऊसाहेब हिरे यांना चालून आली होती, पण यशवंतरावांनी अतिशय धूर्तपणे मोरारजींच्या आमदारांना आपल्याकडे वळवून मुख्यमंत्रीपद मिळवले. यशवंतराव संयुक्त महाराष्ट्रवादी नव्हते, मात्र भाऊसाहेब हिरे यांनी अगदी उघडपणे ‘संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे’, अशी स्पष्ट भूमिका अनेक ठिकाणी मांडली होती.

डिसेंबर १९५८मध्ये नाशिक जिल्हा काँग्रेस समितीसमोर भाषण करताना भाऊसाहेब हिरे यांनी सांगितले होते की, ‘जनतेचा आवाज आम्हाला समजतो आहे. मराठी जनता संयुक्त महाराष्ट्र मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि संयुक्त महाराष्ट्र मिळाल्याशिवाय महाराष्ट्रात काँग्रेस तग धरू शकणार नाही. उभ्या महाराष्ट्राला द्विभाषिक राज्य नको आहे. द्विभाषिकांत संयुक्त महाराष्ट्र आहे, असे सांगून मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत.’


समितीने मुंबई जिंकली, पुणे जिंकले

आचार्य मो. वा. दोंदे समितीचे मुंबईचे महापौर

१९५७ च्या  विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांत संयुक्त महाराष्ट्र समितीला दणदणीत यश मिळाले. सांगली नगरपालिका वगळता पुणे नगरपालिकेतील ६५ पैकी ४८ जागा संयुक्त महाराष्ट्र समितीला मिळाल्या आणि पुण्याच्या नगर परिषदेवर समितीचा झेंडा फडकला. पण खरी लढाई होती मुंबई महानगरपालिकेची. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत १३१ जागा होत्या. त्यापैकी ७२ जागा समितीला आणि ५७ जागा काँग्रेसला मिळाल्या.

महापौरपदाच्या निवडणुकीत समितीचे उमेदवार आचार्य दोंदे ७७ मते मिळवून विजयी झाले. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आचार्य दोंदे यांना मते दिली. या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेत प्रभाकर कुंटे यांनी मुंबईत झालेल्या अन्यायी गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करणारा ठराव मांडला होता आणि तो ठराव बहुमताने मंजूर झाला.


फिरोज गांधी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूचे

श्रीमती इंदिरा गांधी यांचे पती खासदार फिरोज गांधी यांनी लोकसभेत महाराष्ट्राची बाजू न्याय्य असल्याचे पहिल्याप्रथम स्पष्ट केले होते. महाराष्ट्राची मागणी न्यायाची आहे, हे नाकारता येणार नाही. इतर भाषिक राज्यांना त्या त्या भाषेची राज्ये मिळाल्यानंतर महाराष्ट्राची मागणी कशी नाकारणार, असा स्पष्ट प्रश्न फिरोज गांधी यांनी विचारला होता.

श्रीमती इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना खासदार फिरोज गांधी यांचे लोकसभेतील भाषण अत्यंत सुसंगत आहे, असे मत इंदिरा गांधी यांनी व्यक्त केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने इंदिरा गांधी यांनी आपले मत लिखित स्वरूपात व्यक्त करताना, फिरोज गांधी यांच्या भूमिकेचा आवर्जून उल्लेख केला होता.


जयप्रकाशजींनी नेहरूंना पाठवले पत्र

‘संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा सुरू झाल्यानंतर ज्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राची मागणी न्याय्य आहे, असा स्पष्टपणे अभिप्राय दिला होता, त्यात जयप्रकाश नारायण हेही एक नेते होते. १९५५ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र पाठवून जयप्रकाश नारायण यांनी असे स्पष्ट कळवले होते की, मुंबईसह महाराष्ट्राचे राज्य हा मराठी भाषिकांचा हक्क आहे आणि म्हणून हे राज्य तातडीने मंजूर करणे न्यायसंगत ठरणार आहे. जर हे राज्य नाकारले तर निर्माण होणारा उद्रेक जनआंदोलनात रूपांतरीत होईल.’

2 COMMENTS

  1. मराठी माणसाच्या मनगटात जोर आहे.म्हणून त्यांनी दिल्लीच्या बादशहाच्या शिहासनाचे सोने काढून आणले.पण दिल्ली ताब्यात घेवून दिल्ली वर राज्य करण्याची हिम्मत झाली नाही का ?मुंबई सह महाराष्ट्र मिळविला पण मुंबई वर सत्ता गुजराती भाईची.मराठी माणूस गुजराती भाईची भांडी घासतो का ? मुंबईतील मराठी माणूस आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही का ? मराठी माणूस दादागिरी करतो आपल्या कवरेज क्षेत्रा बाहेर जात नाही. हे कारण खोटे आहे. मराठी माणूस मोठ्ठा होवू नये म्हणून गल्ली पासून दिल्ली पर्यंत प्रयतन केले जात आहेत.हेच मराठी बांधवाना समजत नाही.गुजराती माणूस मोदींच्या मागे ऊभा राहिला.मोदी पंतप्रधान झालेत.मराठी माणूस दिल्लीची हुजरेगिरी करण्यात दंग आहे. मराठी माणूस अक्कलेने कमी आहे.म्हणून महाराष्ट्र महान आहे. बोला जय महाराष्ट्र करा कष्ट व्हा नष्ट.हे किती दिवस चालणार.

  2. स्व भाऊसाहेब हिरेंवरच नाहि तर खान्देश वर नेहमीच अन्याय होत आला आहे. भाऊसाहेब हिरे नंतर खान्देशात तसा नेता जन्माला आला नाहि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version