Home रिलॅक्स मराठमोळा ‘कृष्णन अय्यर’

मराठमोळा ‘कृष्णन अय्यर’

1

काही मालिका टीव्हीवर वर्षानुर्वष चालतात. या वर्षानुर्वष चालत असल्या तरी त्यांचं कथानक कधीच रटाळ वाटत नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यात असतं, वर्षानुर्वष चालत असलेल्या मालिकांच्या यादीमध्ये टॉपवर असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. ही मालिका तर हिट आहेच, पण या मालिकेने त्यात काम करणा-या प्रत्येक कलाकाराला इंडस्ट्रीत स्वत:ची अशी वेगळी ओळख दिली. या मालिकेतलं आणखी एक मराठमोळं नाव म्हणजे तनुज महाशब्दे. 

तारक मेहता या मालिकेमधला अत्यंत हुशार, व्यवसायाने शास्त्रज्ञ असलेला दक्षिण भारतीय कृष्णन अय्यर म्हणजे तनुज महाशब्दे, ‘गोकुळधाम सोसायटी’मधली सगळ्यात सुंदर बायको त्याचीच, तिच्याशी गोडीगुलाबीने वागणारा जेठालाल आणि त्याची सगळ्यांसमोर जिरवायला मागेपुढे न बघणा-या अय्यरची भूमिका तनुज करत आहे..

मोठं झाल्यावर आपल्याला अभिनेता व्हायचं आहे हे खूळ लहानपणापासून तनुजच्या डोक्यात. शाळेत सातवी-आठवीत असताना रामलीलामध्ये बालराक्षस म्हणून त्याने पहिल्यांदा काम केलं होतं. पहिल्याच स्टेज शोमुळे आत्मविश्वास वाढल्याने तनुजची या क्षेत्रातली गोडी वाढत गेली. तनुज मूळचा इंदूरचा, अभिनयाच्या वेडाने झपाटलेला तनुज म्हणतो, ‘‘मला या क्षेत्रात नाव कमवायचं होतं, पण अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:ची ओळख मिळवण्यासाठी धडपडणा-या लोकांची कमी नाही. या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी दररोज कित्येक लोक येतात. मीही त्यातलाच एक होतो. मुंबईत आमच्या ओळखीचं कोणीही नव्हतं, लगेच काम मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती, तरी मुंबईला येऊन काम मिळवायचं, असं मनाशी मी पक्कं केलं आणि मुंबईला आलो.’’ मुंबईतल्या भारतीय विद्याभवनच्या कला केंद्रात तो सुरुवातीच्या दिवसांत त्याची नेहमी फेरी मारायचा. कला केंद्रात सादर होणा-या नाटकातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, असा त्याला वाटायचं. नाटकातले सगळे बारकावे तो तिथेच शिकला घेतली. या क्षेत्रातले त्याचे गुरू दिलीपभाई देसाई. त्यांचं नाव तो घ्यायला अजिबात विसरत नाही. मला शेवटपर्यंत विद्यार्थीच होऊन शिकायला आवडेल, हे त्याच्या ओठी असलेलं नेहमीचं वाक्य.

स्ट्रगलच्या दिवसांतील आठवणींत न रमता तनुज म्हणतो, ‘‘जीवनात वाईट काळ प्रत्येकाला धडा शिकवून जातो आणि चांगले दिवस आयुष्यभर पुरतील अशा आठवणींची शिदोरी देऊन जातात. मुंबईत काम मिळवण्यासाठी आलो, तेव्हा एक गोष्ट मात्र ठाऊक होती की, इथे दोन घासही खायला मिळणार नाहीत. घरी दोन वेळचं जेवायला तरी मिळायचं. इथे तर दोन दिवसांनीसुद्धा जेवायला मिळेल का, याचीसुद्धा खात्री नसायची. मालिकांमध्ये मिळणा-या छोटेखानी भूमिकांतून समाधान मानावं लागायचं. मी जेव्हा जेव्हा याबद्दल घरी येऊन आईला सांगायचो, ती मला नेहमी एक गोष्ट सांगायची, मेहनत इतनी खामोशीसे करो, की सफलता सारी दुनिया में शोर मचाऐ.’’

तनुजने मालिकांमध्ये छोटेखानी भूमिका केल्या, कुठे लेखनात सहाय्य केलं, अनेक एकांकिका केल्या. त्याची मेहनत चालूच असायची आणि या मेहनतीला यश मिळालं ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमधून. या मालिकेच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल तो सांगतो, ‘‘मी याआधीही असीफ मोदींबरोबर काम केलं होतं. ते २००८मध्ये नवी मालिका घेऊन येत आहेत, हे कळताच मी काम मिळवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. मला बघताच त्यांना वाटलं की, मी मूळचा दक्षिण भारतीय आहे. त्यांनी मालिकेतल्या अय्यरच्या भूमिकेसाठी मला विचारलं. माझ्यासारख्या मराठमोळ्या मुलासाठी हे आव्हानच होतं. मी ते स्वीकारलं. दक्षिण भारतीय लोक कसे बोलतात, ते भांडताना आपल्या मातृभाषेतच कसे भांडतात. त्यांचे डोळे लाल कसे होतात वगैरेचा अभ्यास केला हिंदीत बोलतानाही त्यांच्या उच्चारात तो दक्षिण भारतीय प्रभाव आढळतो. या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. या भूमिकेसाठी मी माझ्या दक्षिण भारतीय मित्रांबरोबर राहिलो. त्यांच्या वागण्या-बोलण्यातले बारकावे शिकून घेतले आणि हा ‘अय्यर’ मालिकेतल्या इतर पात्रांबरोबर चर्चेत आला.’’ मालिकेतल्या प्रत्येक पात्राला वेगवेगळे अनुभव येत असतात. तनुजलाही ते आले. तो म्हणतो, ‘‘मला इतर लोक किंवा माझे मित्र मस्करीत नेहमीच म्हणतात, कुछ भी हो टीव्हीपेही सही पर तुझे बीबी बहौत अच्छी मिली है.’’

तनुज उत्तम अभिनेता आहे. त्याने दक्षिण भारतीय कृष्णन अय्यरचं पात्र अगदी चोख रंगवलं, हे त्याच्या अभिनयातून दिसून येतं. त्याचबरोबर तो लेखकही आहे. मराठी इंडस्ट्रीत आपल्या लेखनातून पाय रोवण्याचा त्याचा विचार चालू आहे. त्यामुळे या एक-दोन वर्षात स्क्रीन-प्ले रायटिंग करताना तनुजचं नाव आलं तर काही आश्चर्य वाटायची गरज नाही.

1 COMMENT

  1. मला पण तारक मेहत का उलटा चष्मा ह्या मालिकेत काम कार्याचे इच्छा आहे. कृपा करून मला यौग मार्ग दाखवावा,

    धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version