Home टॉप स्टोरी मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब!

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब!

1

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बहुप्रतिक्षित निर्णयावर बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुंबई- राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बहुप्रतिक्षित निर्णयावर बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी शिफारस केली होती. ती सरकारने स्वीकारली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच मुस्लीम समाजालाही ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाबरोबरच मुस्लीम समाजाला आरक्षण दिले जावे ही गेली कित्येक वर्षापासून होत असलेली मागणीही या निर्णयांमुळे मार्गी लागली आहे. हे आरक्षण मराठा आणि मुस्लीम समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया विशेष मागास प्रवर्गास लागू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही समाजांना यापुढे शैक्षणिक आणि नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळेल. हे आरक्षण धर्म किंवा जात या आधारावर देण्यात आलेले नाही. तर राज्यघटनेअंतर्गत शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणाच्या आधारानुसार देण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

मुस्लीम समाजात असलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. त्या अभ्यासगटाने दिलेल्या अहवालानुसार मुस्लीम समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्यांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण शासकीय आणि निमशासकीय विभागांमध्ये लागू होईल. त्याचबरोबर शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही याचा लाभ होणार आहे. हे आरक्षण देताना इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. सध्या अनुसूचित जाती-जमाती, इतर मागसवर्गीय यांना मिळून ५२ टक्के आरक्षण आहे. त्यात आता आणखी २१ टक्क्य़ांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात जवळपास ७३ टक्के आरक्षण असणार आहे.

जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय

मराठा समाज आरक्षण समितीचा मी अध्यक्ष होतो. समितीने मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. परंतु लोकसंख्येच्या आधारावर १६ टक्के आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. माझ्या जीवनातील हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. माझ्या हातून झालेले हे चांगले कार्य आहे. ते मला कायम स्मरणात राहील. या निर्णयामुळे मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये चांगली संधी मिळणार आहे. – नारायण राणे, उद्योगमंत्री व मराठा समाज आरक्षण समिती अध्यक्ष

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version