महाकुंभ

1

पृथ्वीवरचा श्रद्धेचा सगळ्यात मोठा दृश्य सोहळा म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळा या शब्दाभोवतीच एक निराळं वलय आहे. तीन वर्षातून प्रयाग (अलाहाबाद), वाराणसी, उज्जन आणि नाशिक या तीर्थक्षेत्री एकेकदा हा मेळा भरतो. अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ असं मेळ्याचं स्वरूप असतं. त्यातूनही १२ पूर्णकुंभ पुरे होऊन काही ठरावीक ग्रह जेव्हा एका विशिष्ट परिस्थितीत येतात, तेव्हा होतो महाकुंभ. १४४ वर्षातून एकदा होणारा. अलाहाबादच्या महाकुंभातला असाच एक सुवर्णानुभव.

मी कुंभमेळ्याला जाणार, हे उत्सुकतेने माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं.. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती.. ‘शी! कुंभमेळा’, ‘तिथे किती गर्दी असते’, ‘घाण असते’. हे बोलणारी एकही व्यक्ती कुंभमेळ्याला प्रत्यक्ष गेली नाहीये, हे महत्त्वाचं, पण ज्याप्रमाणे पंढरीची वारी मी विठ्ठलाला न बघता केवळ त्या वारक-यांचा भोळा भाव पाहण्यासाठी केली होती. तसाच काहीसा प्रकार कुंभमेळ्याबाबत होता. या पवित्र दिवसात नदीत डुबकी मारून पाप धुण्यापेक्षा मला त्या लाखो लोकांच्या श्रद्धेत आणि या निमित्ताने एकत्र जमणा-या जवळजवळ तीन ते चार लाख साधुसंतांपैकी काहींशी तरी याबाबत बोलण्यात खरा रस होता.

जवळजवळ ५५ दिवस चालणा-या या मेळ्यात एकंदर पाच स्नानं महत्त्वाची असतात. त्यातही शाही आखाडयांच्या दृष्टीने १० फेब्रुवारीचं मौनी अमावस्येचं स्नान सगळ्यात महत्त्वाचं होतं. जवळपास कोटी लोक त्यावेळी अलाहाबादमध्ये होते. त्या महत्त्वाच्या दिवसासाठी आम्ही ७ फेब्रुवारीलाच तिथे पोहोचलो. कुंभाच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण अलाहाबादमध्ये १४ सेक्टर पाडले होते. त्यातले सेक्टर १३ आणि १४, जिथे आम्ही राहणार होतो हे गंगेच्या पल्याड होते. तर १ ते १२ सेक्टर अल्याड. तिथे सेक्टरप्रमाणे वेगवेगळ्या साधूबाबांचे आखाडे पसरले होते.

गंगेच्या पल्याड भागात ‘स्वामी परमानंद’, ‘प्रेमबाबा’, ‘हरेकृष्ण हरेराम’ यांचे कॅम्प्स होते. थोडा-फार उच्चभ्रू भारत आणि बाकी सगळे फिरंग-गोरी चमडी (स्थानिक लोकांनी दिलेली नावं) यामुळे आम्हाला काही स्वाभाविक सुखसोयी कॉट, कमोड, गरम पाणी, बॉटल्ड वॉटर, सात्त्विक आहार आणि सुरक्षा मिळाल्याने कसलाच त्रास जाणवला नाही.

८ आणि ९ तारखेला आम्ही एक गाइडच ठेवला होता. आमच्या अपेक्षा माफक होत्या. त्याने आम्हाला वेगवेगळ्या सांधूंचं दर्शन आणि बातचीत करून द्यायची. आखाडयांचे मठाधिपती किंवा महामंडलेश्वर हे सामान्य माणसांपासून नेहमीच दूर राहिले आहेत. त्यांचा संबंध फक्त बडेलोक, राजकारणी, सिनेहस्ती आणि मीडिया यांच्यापुरताच मर्यादित होता.

आम्ही वेगवेगळे आखाडे पालथे घालायला सुरुवात केली. एका मोठया कॅम्पमध्ये त्या-त्या पंथाच्या वेगवेगळ्या साधूंच्या १००-२०० ओपन राहुटय़ा होत्या. प्रत्येक राहुटीच्या दारातच बाजूला धुनी पेरलेली असायची. उदासीन आखाडा जो नागा साधूंसाठी प्रसिद्ध होता. तिथेच लोकांची दर्शनासाठी गर्दी जमली. मग त्यात कोणी बाबा सदैव उभा राहिलेला, तर कोणी हात वर केलेला, तर कोण काटयांवर झोपलेला.. असे वेगवेगळे नागाबाबा पाहिले. त्यांना पाहिल्याक्षणापासून त्यांच्या विवस्त्र असण्याने कसलाच संकोच वाटला नाही.

एका नागाबाबांना आम्ही काही प्रश्न विचारू का, असं विचारलं. त्यांनीही आनंदाने हो, म्हटलं. त्याच्या चेल्याने आमच्यासाठी धुनीशेजारीच चहा बनवायला सांगितला. कसलीशी खीर प्रसाद म्हणून वाटीभर खायला दिली. कसलीही शंका-भीती मनात न ठेवता आम्ही खीर खाल्ली. बाबा बोलता बोलता हाताने गांजा मारत होते. त्यात सिगारेटी तोडून त्यातली तंबाखू मिसळत होते. मग एकदा हवी तशी चिलीम भरून त्यांनी एक दीर्घ झुरका घेतला. आमच्याशी बोलू लागले. या पंथाची विचारधारा काय आहे, पंथात कोण येऊ शकतं, कांदा-लसूण खाणं वर्ज्य असताना तुम्ही चिलीम कशासाठी पिता, चिलीम पिणं खरंच गरजेचं आहे का, कुंभमेळ्याच्या दिवसातच तुम्ही दिसता.. इतर दिवसांत कुठे असता.. असे अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारत होतो.

तेवढयात कॅम्पमधल्या आतल्या भागातून २५-३० मुंडण केलेले पंचाधारी बाबा आनंदाने नाचत-गात बाहेर आले. हे असं का वागतायत? असे प्रश्नार्थक भाव आमच्या चेह-यावर ज्या नागाबाबांशी आमचं बोलणं चाललं होतं, त्यांना जाणवले. त्या बाबांकडूनच माहिती कळली. त्या मुंडण केलेल्या लोकांची दीक्षा झाली आहे. त्यामुळे आज ते घाटावर जाऊन पिंडदान करणार. नागाबाबा होणार.

स्वत:चं पिंडदान करताना माणूस इतका आनंदी असू शकतो, भौतिक जगाशी संबंध तोडण्यासाठी इतका उत्सुक असतो हे पाहून मन चकीत होत होतं. आमची आखाडा भ्रमंती चालूच होती. सर्वसामान्य माणसांप्रमाणे आम्हालाही नागपंथ-अघोरीपंथ याबद्दल कुतूहल होतं. अघोरीपंथाचे साधू सहजासहजी दिसणार नाहीत, असं आमच्या गाइडने सांगितलं होतं, पण नंतर त्यानेच दूर नदीकिनारी बसलेल्या तीन काळ्या कफनीधारकांकडे आम्हाला नेलं. गळ्यात मोठया-मोठया माळा, भस्म जवळ असलेला वाडगासदृश कवटी, विचित्र आकाराची काठी जी कसली होती ते कळलंच नाही.

नमस्कार करून आम्ही चूपचाप त्यांच्या शेजारी बसलो. आमच्या कपाळाला त्यांनी कसलीशी राख (भस्म) लावली. त्या बाबांची परवानगी घेऊनच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. ते साधूबाबा सांगतात, ‘मला साधूच व्हायचं होतं आणि तेही जी तपस्या सगळ्यात कठीण आहे अशा पंथाचाच. साधूमार्गातील सगळ्यात खडतर तपस्या अघोरी. मी ती करायचं ठरवलं. नशिबाने एक गुरू भेटले. त्यांनी दीक्षा देण्याचं कबूल केलं. एकूण १२ वर्षाचा कालावधी असतो. त्यांनी मला एक कवटी शोधायला सांगितली. ती शोधण्यात माझे बरेच दिवस गेले.

ती स्वच्छ करून दगडाने तिला मी वाडग्याचा आकार दिला. माझ्यासाठी ती कवटी देव होती. पिण्याचं पात्र होती. जेवणाचं ताट होती. तिचीच पूजा, त्यातूनच पाणी प्यायचं, चितेशेजारचा भात त्यातच खायचा. राखेच्या धगीत रोटी शेकायची. प्रेतावरचं कफन ओढून तिथेच राहायचं. माणसाला हवंय काय? एकदा का, चितेची राख अंगाला फासली की, थंडी वाजत नाही. डास चावत नाही. कसला संसर्ग होत नाही. शिवबाबाला समर्पित झाल्यासारखं वाटतं. अशी वर्षे गेल्यानंतर गुरूने दीक्षा दिली. आता आम्ही परमेश्वराच्या जवळ आहोत. मजेत आहोत. त्याच्यापुढे काही नाही.’ तो अनुभव ऐकून अंगावर काटा आला.

एक गोष्ट मात्र जाणवली की, या लाखो साधू-संतांमध्ये खरं ज्ञान असणारे महात्मा फार कमी असावेत. ज्यांना आपण भटके म्हणतो, अशा बाबा लोकांची गर्दी होती. बरेचसे त्यातले अशिक्षित होते. त्यामुळे वेद-धर्मग्रंथ याचं वाचन-मनन असं काही नाही. आहे ती फक्त त्यांच्या गुरूवरची अढळ श्रद्धा. त्यामुळे ‘असंच का’ हे प्रश्न त्यांना पडत नाहीत. कुंभमेळा कशासाठी, त्यातले विशिष्ट दिवसच खास स्नानासाठी का, गंगेचा प्रवाह जसा आज आहे, तसाच उद्या असणार, मग सर्व दिवस समान का नाहीत? माघ महिन्यात सत्त्वगुण जास्त असतात म्हणजे काय, डुबकी मारल्याने ना पाप धुतलं जात ना षड्रिपू कमी होतात. मग हे जनजागरणदेखील स्वत:च्या उत्थानाबरोबर संतांनी करायला नको का, त्या दृष्टीने निदान स्वच्छता आणि शिक्षण या दोन गोष्टींबद्दल तरी त्यांनी आपल्या सतत चाललेल्या सत्संगातून काही सांगायला नको का, असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच!

काही साधूबाबांच्या बोलण्यातून एक जाणवलं की, या धार्मिक क्षेत्रातही प्रचंड हेवेदावे आहेत. राजकारण आहे. काहींनी कबूल केलं की, कुंभमेळयाच्या निमित्ताने इकडे-तिकडे विखुरलेल्या संत-महात्म्यांनी एकत्र यावं, धर्माबाबत चर्चा करावी, अडाणी-साधा माणूस देव-धर्माला मानतो, त्याला धर्माचा हवाला देऊन काही जनजागरणाची दिशा ठरवावी, पण आज-काल असं होत नाही. काही ठरावीक संत एकत्र येतातही ‘गौ (गाय) गंगा गौरी (मुली) बचाव’सारखी अभियानं चालवतात. मात्र त्यातही परदेशी एनजीओ, समाजातील अति विशिष्ट लोकं, मीडिया आणि राजकारणी यांचाच भरणा असतो.

८-९ फेब्रुवारी २०१३ची ही भ्रमंती संपवून १० फेब्रुवारीच्या मौनी अमावस्येसाठी आम्ही उत्सुक होतो. आमच्या बाजूच्या गंगेच्या पल्याड तीरावर कॅम्प्सच्या लोकांखेरीज कोणाचीच गर्दी नव्हती, पण वारुळातून मुंग्या याव्या तसे भाविक आपला डेरा नदीतीरावर, रस्त्यावर, जिथे मोकळी जागा मिळेल तिथे टाकायला लागले. १० तारखेला पहाटे २ वाजून २० मिनिटांनी अमावस्या सुरू होणार होती. नदीकाठ आता खचाखच भरला होता. संगमावर स्नानाला जाण्यासाठी कालपर्यंत ५० रुपये घेणारा बोटवाला १०० रुपये सांगायला लागला, तरी बोट मिळणं कठीण झालं होतं.

आल्याड तीरावर साधूबाबांसाठी खास रस्ता केला होता. त्यांच्या मिरवणुका पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती. या सगळ्यातून तावून-सुलाखून पहाटे बारा वाजता निघालेलो आम्ही सकाळी नऊ वाजता कॅम्पवर आलो. कशीबशी बोट मिळवली आणि त्या संगमावर लाखो लोकांसमवेत पाण्यात उभं राहून सूर्याला अर्ध्य देताना विचारांचं मोहोळ मनात उठत होतं. एकीकडे मन शांत-शांत वाटत होतं. १४४ वर्षानी आलेला हा महाकुंभ. परत हाच योग १४४ वर्षानी येईल, म्हणजे आज असं स्नान करणारे कोटी लोक या आधी नव्हते. नंतर नसणार. या एका अविस्मरणीय घटनेचे आपण साक्षीदार नव्हे तर भागीदारपण आहोत या कल्पनेनेसुद्धा मन फुलून आलं.

समारोप करताना खास सांगावंसं वाटतं, कुंभमेळा ही अशी एक गोष्ट आहे, जी जगात कुठेही नाही. असं असूनही प्रत्येक भारतीयाला कुंभमेळय़ात स्नान जमतं असंही नाही. टीव्ही-व्हीडिओद्वारा जे काही पाहिलं होतं त्यातला एक वेडेपणा भावला होता. मुलगा आणि त्याचे मित्र जाणार होते. मला बरोबर न्यायची त्यांची तयारी होती. असा मोका आयुष्यात परत कधी आला नव्हता. मी तो घेतला. त्यात धार्मिकता हा मुद्दा नव्हताच, पण तिथे गेल्यावर जाणवलं की माझ्या व्यक्तिमत्त्वात जो एक उपजत भारतीयपणा आहे तो या माती-पाणी-हवेचा.

माझ्या पूर्वजांचा एक हिस्सा आहे आणि नाही-नाही म्हणता मी कधी त्या प्रचंड समुदायाचा भाग बनले, माझं मलाच कळलं नाही. मेळ्याला जाण्याआधी मी गंगेत स्नान करीन, हे माझ्या स्वप्नीसुद्धा नव्हतं, पण त्या वातावरणात लाखो लोकांच्या साक्षीने घाण, अस्वच्छता याबाबतचे कोणतेही किंतू मनात न येता, किंबहुना मला ते आठवलेच नाहीत. मी पहिली डुबकी मारली.

पाण्याचं आचमन केलं. कसला तरी प्रचंड आनंद झाला होता. किती पिढयांनी या नदीत डुबक्या मारल्या असतील, किती लोकांच्या मनातल्या इच्छा-राग-लोभ या नदीने ऐकल्या असतील, ही नदी आता नदी नव्हती, तिचं पाणी, पाणी नव्हतं. तो होता भावनेच्या असंख्य प्रवाहांचा समुद्र. माझा कोणी तरी पूर्वज इथे आला असेल आणि आज मी.. आज माझी कडी त्या साखळीत अडकली. संस्कृतीच्या गोफात माझापण एक धागा गुंफला गेला. घाटावर गंगेची गाणी लागली होती. त्या गाण्यांचे शब्द ओठी रुळू लागले..
आज हिमालय से तू आई गंगा मेरे द्वारे
युगो युगों की कथा सुनाए तेरे बहते धारे
तुझको छोडके भारत का इतिहास लिखा ना जाय
गंगा तेरा पानी अमृत.. घर घर बहता जाय..

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version