Home एक्सक्लूसीव्ह महाराष्ट्राच्या कमाईवर गुजरातचा डल्ला

महाराष्ट्राच्या कमाईवर गुजरातचा डल्ला

1

मुंबई बंदरातून चालणा-या मालवाहतुकीला अघोषित नियमांचा अप्रत्यक्ष अडथळा करून येथील सर्व व्यापारउदीम गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न सध्या उच्च पातळीवरून सुरू आहे. 

संग्रहित छायाचित्र

मुंबई – मुंबई बंदरातून चालणा-या मालवाहतुकीला अघोषित नियमांचा अप्रत्यक्ष अडथळा करून येथील सर्व व्यापारउदीम गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न सध्या उच्च पातळीवरून सुरू आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे केंद्रातील भाजप सरकारचे कारस्थान सुरू आहे हे सांगताना काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी याच मुद्दय़ाकडे काही दिवसांपूर्वी लक्ष वेधले होते.

‘प्रहार’च्या हाती आलेल्या माहितीनुसार, कमाल भारवाहनक्षमतेमुळे तळ अधिक बुडणा-या मोठय़ा मालवाहू जहाजांना सध्या मुंबई बंदरात जागा नाही, वाहतूक कोंडी खूप असते या सबबींखाली प्रवेश नाकारण्यात येत आहे. ही मोठी जहाजे काही हजार मोटारींसह अनेक प्रकारचा निर्यातीचा माल वाहून नेत असतात.

पण अनेक दिवस मुंबई बंदरात प्रवेशच मिळत नसल्यामुळे अशी बल्क कॅरियर शिप जहाजे गुजरातच्या मुंद्रा येथील बंदराकडे जात असून वाहन उत्पादक आणि अन्य मालवाहतूकदारांनाही नाईलाजाने माल विदेशात पाठवण्यासाठी गुजरातची वाट धरावी लागत आहे.

या प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक सुसंपन्नतेला धोका निर्माण झाला असून गुजरातची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या जिवावर बाळसे धरत आहे. वाहनउद्योगातील एका उच्चपदस्थाने दिलेल्या माहितीनुसार, एका खेपेत पाच ते दहा हजार किंवा त्यापेक्षाही अधिक मोटारी वाहून नेण्याची क्षमता असलेली मोठय़ा कार कॅरिअर शिप जपान, भारत, आफ्रिका, पूर्व आफ्रिका, युरोप अशा भागांतील बंदरांमधून मालाची आणि मोटारींची ने-आण करत असतात.

मुंबई बंदरात आलेले असे जहाज एकावेळी सहा-सात हजार मोटारी घेऊन जाते. मात्र आता अशी जहाजे मुंबईकडे येण्याऐवजी मुंद्रा बंदराकडे वळवली जात आहेत. यामुळे मुंबईतून मोटार पाठवण्यासाठी येणारा प्रति मोटर २३०० रुपयांचा एकूण खर्च गुजरातच्या प्रवासामुळे वाढून ८,७०० रुपयांवर गेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील वाहन निर्मिती उद्योगांचा वाहतूक खर्च वाढला असून अपेक्षित नफ्याचे प्रमाण घटले आहे.

महाराष्ट्राच्या कमाईवर गुजरात अशा प्रकारे डल्ला मारत असल्याने गुजरातची गंगाजळी वाढते आहे. मुंबई बंदरातील मालवाहतूक बंद करण्याचा डाव असल्याबद्दल काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी केलेल्या आरोपाला या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे.

सध्या मुंबईत छोटी आणि मध्यम स्वरूपाची आणि कमी मालवाहू क्षमतेचीच जहाजे अधिक येत आहेत. जेएनपीटीकडे कंटेनरवाहू जहाजे जात असतात. या जहाजांमधून कमी मालाची ने-आण शक्य असते. मोठय़ा प्रमाणावर माल पाठवायचा असल्यास निर्यातदारांना त्यातल्या त्यात जवळचे बंदर म्हणून गुजरातच्या मुंद्राचाच पर्याय स्वीकारावा लागत आहे.

गुजरात सरकारने मध्यंतरी वाहन उद्योगांसाठी रेड कार्पेट घातले होते. महाराष्ट्रात स्थिरावलेल्या वाहन उद्योगांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता एकतर भरमसाट वाहतूक खर्च सहन करा किंवा सरळ गुजरातला वाहन निर्मिती सुरू करा, अशा पेचप्रसंगाला या उद्योजकांना सामोरे जावे लागणार आहे.

या दोन्ही पर्यायात तोटा महाराष्ट्राचा आणि नफा गुजरातचा असेच चित्र सध्या तरी दिसते आहे. इतर निर्यातक्षम उद्योगांपुढेही हाच पेच उभा राहिला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version