Home कोलाज महाराष्ट्रातील वक्तृत्व कलेचा ऐतिहासिक ठेवा

महाराष्ट्रातील वक्तृत्व कलेचा ऐतिहासिक ठेवा

1

एका प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताप्रमाणे ‘सहस्रेषु पंडित: व वक्ता दशसहस्रेषु’ पण पांडित्य व वक्तृत्व दोन्हींचा ‘समसमा संयोग’ झाल्यावर श्रोत्यांचे मनोरंजन व प्रबोधन होते. 

एका प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताप्रमाणे ‘सहस्रेषु पंडित: व वक्ता दशसहस्रेषु’ पण पांडित्य व वक्तृत्व दोन्हींचा ‘समसमा संयोग’ झाल्यावर श्रोत्यांचे मनोरंजन व प्रबोधन होते. पण वक्तृत्व म्हणजे नुसते बोलणे किंवा भाषणबाजी नव्हे तर समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे ‘अभ्यासोनी प्रकटावे’ अर्थात भाषण ऐकणा-याला पर्वणीच. आपल्या ज्ञानाचा स्रेत श्रोत्यांपर्यंत परिणामकारक शब्दांत पोचविणे ही सुद्धा एक कला आहे. कालौघात वक्तृत्वकला लोप पावत जावी हे आपले दुर्दैव.

भाषणकलेचा उगम जरी ग्रीक व रोमन संस्कृतीत झाला असला तरीही एकंदरीत युरोपीय व ब्रिटिश संस्कृतीचा इतिहासही फारसा वेगळा नाही. एवढेच कशाला हिटलर, स्टॅलीन, रुझवेल्ट, चर्चिल व मुसोलिनी यांनी महायुद्धांच्या काळात केलेल्या आपापल्या देशाच्या नेतृत्वात कर्तृत्वाइतकाच वक्तृत्वाचाही सिंहाचा वाटा होता हे ऐतिहासिक सत्य आहे. लोकशाही राज्यपद्धतीचा आदर्श व वस्तुपाठ असलेल्या इंग्लंड व अमेरिकेमधील अनेक यशस्वी पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दीचा पाया प्रभावी वक्तृत्वात होता.

आपल्या देशातही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी सारख्यांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून जनमानसावर राज्य केले. कॉ. डांगे, कॉ. भूपेश गुप्ता, बॅ. नाथ पै यांच्यासारख्या अनेक विरोधी खासदारांची भाषणेही गाजली तर स्वामी विवेकानंद यांचेही शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेतले भाषण आजही अलौकिक व अविस्मरणीय गणले जाते.

महाराष्ट्राच्या इतिहासाकडे ओझरती नजर टाकली तर यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे अशासारख्यांची राजकीय भाषणे गाजली. पण हातात सत्ता नसताना व असतानाही आपल्या वक्तृत्वाने तरुणाईवर छाप पाडणारा एकमेव राजकीय नेता म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी समाज प्रबोधन केले ते आपल्या भाषणकलेच्या जोरावरच.

पण पाश्चात्य देशात जशी गाजलेली भाषणे संग्रहित, संकलीत व संपादित करून त्यांचा विविध प्रसारमाध्यमातून ऐतिहासिक दस्तावेज करण्याचा तितक्या प्रमाणात यशस्वी प्रयत्न आपल्याकडे झाला नाही. नाही म्हणायला स्वामी विवेकानंद, पंडित नेहरू, वाजपेयी अशा काही निवडक व्यक्तिमत्त्वांची भाषणे इंग्रजी, हिंदीमध्ये तर लोकमान्य टिळक, पु. ल. देशपांडे, ना. सी. फडके, सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज असा प्रयत्न मराठीमध्ये झाला.

अशा पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबईतील मैत्रेय प्रकाशन (विलेपार्ले) तर्फे झालेल्या सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक व संपादक अशोक बेंडखळे यांनी संपादन केलेल्या ‘‘५१ गाजलेली भाषणे’’ या पुस्तकाचे मनापासून स्वागत करायला हवे. आकाशात चमकणा-या विजेच्या पटलावरील ध्वनिक्षेपकाचे आकर्षक व अर्थपूर्ण मुखपृष्ठ प्रभावी वक्तृत्वाचे प्रतीक वाटते व सुरुवातीपासूनच पुस्तकाचे वेगळेपण जाणवते.

प्रत्येक साहित्यप्रकार हा तत्कालीन समाज जीवनाचा आरसा असतो व लिखित स्वरूपातील भाषणेही त्याला अपवाद नाहीत. या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या भाषणांचा १०५ वर्षाचा काळ १९०८ मधील लोकमान्य टिळकांच्या भाषणाने सुरू होतो व २०१३च्या मेधा पाटकर यांच्या भाषणाने संपतो. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्यातील जवळजवळ निम्मी भाषणे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील साहित्य संमेलनातील भाषणाप्रमाणेच शि. म. परांजपे यांचे १९२९च्या बेळगाव संमेलनातीलही आहे. ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर यांचे हैदराबादमधील १९३१ चे तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकरांचे १९४१ मधील सोलापूरचे आहे. महानोपाध्याय द. वा. पोतदार (१९३९ अहमदनगर) व आचार्य कालेलकर (कल्याण- १९३७) या भाषणांचाही समावेश पुस्तकात केलेला आहे.

स्वातंत्र्य पूर्व व नंतरच्या कालखंडातील भाषणात ‘महाराष्ट्राची मुलखमैदान तोफ’ आचार्य अत्रे (१९४२- कल्याण) ग. त्र्यं. माडखोलकर (१९४६- बेळगाव) सुप्रसिद्ध विचारवंत न. र. फाटक (१९४७ हैदराबाद) आणि अ‍ॅड. आ. रा. देशपांडे ऊर्फ कवी अनिल (१९५७ मालवण) ही भाषणेही पुस्तकात आहेत. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. श्री. के. क्षीरसागर (मिरज- १९५९), रा. श्री. जोग (१९६० ठाणे), कवी अनिल यांच्या पत्नी प्रा. कुसुमावती देशपांडे (१९४१ – ग्वाल्हेर) घटना समितीचे सदस्य लेखक व वक्ते बॅ. न. वि. गाडगीळ (१९६२ – सातारा) तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ प्रा. वि. वा. शिरवाडकर (१९८९- मुंबई) अशा वक्त्यांची भाषणेही पुस्तकाचे वैभव आहे.

प्रा. वा. ल. कुलकर्णी (१९६५- हैदराबाद), पु. ल. देशपांडे (१९७४- इचलकरंजी), प्रा. गं. बा. सरदार (१९८०-बार्शी), प्रा. गंगाधर गाडगीळ (१९९१ – रायपूर), व मे. पु. रेगे (मुंबई महानगर-१९९६) ही अलीकडच्या काळातील विचारवंतांची भाषणे समाविष्ट झाल्याने पुस्तकाचे मूल्यवर्धन झाले आहे.
‘५१ गाजलेली भाषणे’चे खास वैशिष्टय़ म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांवरील चार भाषणांमध्ये सुप्रसिद्ध साम्यवादी नेते कॉ. श्री. अण्णा डांगे, खुद्द महाराजांचेच नाव असलेले प्रा. शिवाजीराव भोसले, अलीकडेच हत्या झालेले कॉ. गोविंद पानसरे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा मान्यवरांची भाषणे असावीत यावरूनच महाराजांचे विविध स्तरांवरील बुद्धिवंतातही स्थान किती अनन्यसाधारण होते, याची कल्पना येते व ऊर अभिमानाने भरून येतो.

मुंबईच्या दादरमधील वक्तृत्वाचा मानदंड मानला गेलेल्या ‘अमर हिंद मंडळातील प्रा. डॉ. धनंजयराव गाडगीळ (भाषावाद प्रांतरचना) प्रा. ना. सी. फडके (प्रज्ञा आणि प्रतिभा), आचार्य श. द. जावडेकर (सत्याग्रह व समाजवाद) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (निधर्मी राज्य) व पत्रकार पां. वा. गाडगीळ (निर्माते व नियंत्रण) अशा वैचारिक भाषणांनी पुस्तकाची उंची वाढवली आहे.

धार्मिक विचारधारेतील भाषणांमध्ये ‘सनातन आर्यधर्माची लक्षणे’ (न्या. महादेव गोविंद रानडे), बुद्ध धर्माचे अधिष्ठान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर), ‘देवळांचा सनातनी धर्म’ (प्रबोधनकार ठाकरे), ‘ज्ञानेश्वरीचा प्रवास’ (प्रा. राम शेवाळकर), ‘राष्ट्रनिर्माता भगवान कृष्ण’ (प्रा. नरहर कुरुंदकर) असा परस्पर विरोधी संघर्ष आहे तर सामाजिक विषयावरील ‘शेतक-यांचा आसूड’ (जोतिबा फुले), ‘ग्रामराज्य आणि रामराज्य’ (आचार्य विनोबा भावे) ‘भारताच्या लोकसंख्येची समस्या’ (डॉ. वसंत गोवारीकर), ‘स्त्रिया सामाजिक – राजकीय प्रश्न’ (मृणाल गोरे), ‘आत्मगौरव मानवी अस्तित्वाचा कणा’ (पांडुरंगशास्त्री आठवले) आणि ‘जनआंदोलने लोकशाहीचा पाचवा स्तंभ’ (मेधा पाटकर) अशांची भाषणे पुस्तकाच्या वैचारिक विविधतेत भर घालतात. पण त्याचबरोबर ‘अणू आणि विश्व या डॉ. जयंतराव नारळीकर तसेच ‘विज्ञानतंत्रज्ञानाने भारत घडवू या डॉ. रघुनाथराव मालशेकर यांच्या भाषणांमधून अखेरीस वैज्ञानिक दृष्टिकोनच आधुनिक युगाचा मूलमंत्र असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

उर्वरित भाषणांपैकी ‘स्वराज्य आणि शिक्षण’ (राजर्षि शाहू महाराज), ‘कुमारांपुढील कार्य’ (साने गुरुजी) सहकारी चळवळ (यशवंतराव चव्हाण) अशासारखी वेगळ्या वाटेने जाणारी भाषणेही उद्बोधक आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे यज्ञकुंड धगधगत असताना जाज्ज्वल्य ‘मराठी बाणा’ दाखवणा-या तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे ‘मी राजीनामा का दिला?’ हे लोकसभेतील भाषण आजही उत्कंठावर्धक वाटते.

बुद्धिवंतांच्या, प्रज्ञावंतांच्या व विचारवंतांच्या महाराष्ट्रात अजूनही अनेक विषयांवरील अनेक भाषणे मिळू शकतील, ज्यांच्या पुस्तकात समावेश होऊ शकला असता. पण समुद्राच्या तळाशी कितीही खोल बुडी मारली तरी दर वेळी चार-पाचच मोती पाणबुडय़ाच्या हाती लागू शकतात. तसेच या पुस्तकात घेतली गेलेली भाषणे प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक असतीलच असे म्हणता येणार नाही. अखेरीस भाषणांच्या संख्येवर पृष्ठसंख्येची व पुस्तकांच्या किमतीची मर्यादा आहेच. पुस्तकात प्रत्येक वक्त्याचे छायाचित्र दिले गेल्याने पुस्तकाच्या सौंदर्यात अर्थवाही भर पडली आहे.

मुंबई महानगर टेलिफोन निगमसारख्या शासकीय उपक्रमातून प्रदीर्घ सेवेनंतर उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर श्री. बेंडखळे यांचा लेखन प्रवास ख-या अर्थाने सुरू झाला. गेली अनेक वर्षे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, नवशक्तीसारख्या दैनिक नियतकालिकांमधून ते लिखाण करत असले तरी स्तंभलेखन त्यांच्या विशेष आवडीचे आहे व त्यांची सदरेही वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
आतापर्यंत २४ पुस्तकं लिहिणारे श्री. बेंडखळे नऊ साहित्य पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. त्यामध्ये डॉ. सी. डी. देशमुखांवरील पुस्तकाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) आणि २००० सालच्या बाल साहित्य पुरस्काराचा समावेश आहे.

‘५१ गाजलेली भाषणे’ सारख्या पुस्तकातून महाराष्ट्राच्या वक्तृत्वकलेचा शंभर वर्षाचा ऐतिहासिक ठेवा मराठी वाचकांना बहाल केल्याबद्दल अशोक बेंडखळे यांचे मनापासून अभिनंदन, सदर पुस्तकातील भाषणे वाचताना ज्येष्ठांना भूतकाळाचा आनंद घेता येईल तर तरुणाईला अमोघ वक्तृत्व म्हणजे काय असते याचा अंदाज येईल आणि बालवाचकांच्या हातात हे पुस्तक पडले तर? पण सध्याच्या वाचन संस्कृतीची व मराठी भाषेची अवस्था बघता तशी कल्पना करणेच आपल्या हातात आहे.

५१ गाजलेली भाषणे
संपादन : श्री. अशोक बेंडखळे
मैत्रेय प्रकाशन
मूल्य : ३००/-

1 COMMENT

  1. माझे शिक्षण M.S.W झाले आहे. तरी मला पुस्तक मिळावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version