Home टॉप स्टोरी महाराष्ट्र पेटला

महाराष्ट्र पेटला

1

राज्यातील विविध भागात उष्णतेची लाट पसरली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 

मुंबई- एप्रिल पुढे पुढे सरकत आहे तसतसा उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागला आहे. मुंबईत कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान असले तरी आद्र्रता ६० ते ७२ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. दुसरीकडे राज्यातील विविध भागात मात्र उष्णतेची लाट पसरली आहे. विदर्भ चांगलाच तापला असून वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या ४८ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

वर्धा मागोमाग अकोला, अमरावती, गोंदीया, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी पा-याने चाळीशी पार केल्याने उष्णतेचा कहर झाला आहे. पूर्वेकडून येणा-या कोरडे, बाष्पयुक्त वा-यांमुळे दिवसागणिक कमाल तापमानाचा पारा चढाच आहे. राज्यातील विविध भागात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला अवकाळी पावसाचा शिडकाव झाला होता. यामुळे काही क्षण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे कमाल तापमानात काही अंशी घट झाली. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पुन्हा उन्हाचे चटके वाढू लागले. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात कमाल तापमानाने चाळीशी गाठल्यामुळे नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे.

दुष्काळाला सामोरे जाताना तीव्र उन्हाच्या चटक्याने प्रत्येकजण सर्वजण हैराण झाले आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३३ अंश सेल्सिअसदरम्यान स्थिरावल्याने तुलनेत उकाडा कमी आहे. मात्र आद्र्रता जास्त असल्याने उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. स्कार्फ, रूमाल, गॉगल घेऊन घराबाहेर पडण्याशिवाय मुंबईकरांपुढे पर्याय उरलेला नाही. कोरड पडलेल्या घशाला थंडावा देण्यासाठी लिंबू सरबत, नारळपाणी आदी शीतपेयांच्या स्टॉलभोवती नागरिकांची गर्दी दिसत आहे.

देशातही उष्णतेची लाट

नवी दिल्ली- एप्रिलमध्येच देशाच्या विविध भागात वैशाख वणवा पेटला असून अंगाची लाहीलाही करणा-या उन्हाने नागरिक भाजून निघत आहेत. मध्य व दक्षिण-पूर्व भारतात तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. विदर्भातील तापमान ४० ते ४५ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. तसेच मराठवाडय़ात उष्णतेची मोठी लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम व पूर्व-मध्य प्रदेश, विदर्भ, बिहार, झारखंड, ओदिशा, प. बंगाल, हरियाणा, चंदीगड, पश्चिम व पूर्व राजस्थान, तेलंगण, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुचेरी येथे उष्णतेची लाट पसरणार आहे. तेलंगण, आंध्र प्रदेश व तामिळनाडूत तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे.

स्कायमेट या खासगी हवामान कंपनीच्या अंदाजानुसार, ओदिशातील टिटलगढ येथे ४५.५ अंश तापमान नोंदवले आहे. तर तेलंगण, आंध्र, ओदिशा, बिहार, झारखंड येथे तापमानाचे विक्रम मोडीत निघण्याचे संकेत आहेत. तेलंगणात आतापर्यंत उष्णतेने ३५ जणांचे बळी गेले असून ओदिशात ३० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तेलंगणच्या निझामाबाद येथे ४४ अंश तापमान नोंदवले गेले आहे. दिल्लीत ४२.२ अंश, ओदिशातील सोनेपूर ४५.८ अंश, भुवनेश्वर येथे ४० अंश तापमान नोंदवले गेले. तसेच राजस्थानच्या कोटा शहरात ४३.४ अंश, चुरू येथे ४३.३ अंश, श्रीगंगानगर येथे ४२.३ अंश, जैसलमेर येथे ४२.२ अंश तापमान नोंदवले गेले.

खडसेंसाठी १० हजार लिटर पाण्याची उधळपट्टी

लातूर- मराठवाडय़ातील भीषण दुष्काळामुळे एकीकडे लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली आहे. लातूरपासून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेल्या बेलकुंड गावात वाहनाने जाण्याऐवजी राज्याचे महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना हेलिकॉप्टर हवे झाले. खडसेंच्या हवाई हौसेसाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. लातूरनंतर औसा तालुक्याच्या बेलकुंड गावाला ते भेट देणार होते. या बेलकुंडमध्ये हेलिपॅड उभारणीसाठी १० हजार लिटर पाण्याची फवारणी करण्यात आली आहे. बेलकुंड हे गाव लातूरपासून ४० किलोमीटर लांब आहे. मात्र, खडसेंना वाहन प्रवासाऐवजी हेलिकॉप्टर प्रवास महत्त्वाचा वाटला. या हवाई हौसेसाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.

राज्यातील तापमान (अंश सेल्सिअस)

वर्धा ४५
चंद्रपूर ४४.४
नागपूर ४४.२
ब्रह्मपूरी ४४
अमरावती ४३.२
यवतमाळ ४३
गोंदीया ४१.६

1 COMMENT

  1. अहो जर तुम्हाला ४९ ते ५० सेल्सिअस ची garmagaram हवा खायची असेल तर आमच्या गल्फ मध्ये या आणि पहा आम्ही
    भारतीय ह्या हवामानात कशी कामे करतात ते, !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version