Home मध्यंतर सुखदा महिलांच्या शेतीसाक्षरतेचा ध्यास

महिलांच्या शेतीसाक्षरतेचा ध्यास

0

शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीपासून ते लावणीपर्यंत आणि खुरपणीपासून ते मळणीपर्यंतची सर्व कामे महिलाच करतात. अगदी शेतात पिकलेले धान्य नीट जपून ठेवण्यापासून ते त्याचे रुचकर पदार्थ करून कुटुंबाचे उदरभरण करण्यापर्यंत सर्व काही महिलाच करीत असतात. मात्र असे असले तरी त्या महिलांना शेतकरी म्हणून काय स्थान आहे? शेतीच्या सातबारा उता-यावरही त्यांचा कुठे उल्लेख नसतो, मग सरकारतर्फे होणा-या शेतकरी मेळाव्यात त्यांचा सन्मान होणे दूरच. शेतात खपणा-या, राबणा-या या शेतकरी महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्याबरोबरच शेतीविषयक साक्षर करण्याचा ध्यास घेतला आहे जळगावच्या ज्योत्स्ना विसपुते यांनी! स्वत: शिक्षिका, पती प्राध्यापक असा सुखाचा संसार सुरू असताना शेतकरी महिलांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि त्याबाबत त्यांच्या काय योजना आहे, हे त्यांच्याच शब्दात..ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आजही शेतीच आहे. राज्यातील ६५ टक्के जनता आजही शेतीवर अलंबून आहे. या शेतीची कष्टाची सर्व कामे ही महिलांनाच करावी लागतात. पेरणीपासून ते मळणीपर्यंतची सर्व कामे तीच करते, इतकेच नव्हे तर कोणत्या शेतात कडधान्य घ्यायचे, कोठे ज्वारी चांगली येते, तेलबियांच्या पिकांना कोणती खते वापरली पाहिजेत, याचा सर्व निर्णय ती घेत असते. इतकेच कशाला घरात आलेले धान्य नीट साठवून कसे ठेवावे इथपासून कडधान्यांच्या डाळी करण्यापर्यंत आणि त्या शिजवून ताटात वाढेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेत महिला हीच प्रमुख घटक असते. परंतु प्रत्यक्ष कुटुंबात आणि समाजात तिचे स्थान काय आहे? शेतीची सर्व जबाबदारी ती पार पाडीत असली तरी सातबारावर नाव मात्र तिच्या पतीचे असते. तो शेतीचे व्यवहार काय करतो याचा तिला कधी पत्ताही लागत नाही. अनेक व्यसनी पती शेती परस्पर कुणा सावकाराकडे गहाण टाकतात तरी त्याची माहिती तिला मिळत नसते. काम तिने करायचे, हक्क मात्र तिला कुठेही नाही. शेतीची सर्व कामे करीत असताना शेतकरी म्हणून प्रत्यक्ष तिची दखल घेतली गेल्याचे कुठे पाहायला मिळत नाही. शेतक-यांचे मोठमोठे मेळावे होतात, तिथेही तिचे अस्तित्व दिसत नाही. शेतातील ८० टक्के कामे महिला करीत असल्या तरी शेतकरी मेळाव्यात तिला पन्नास टक्के तरी स्थान का नसावे, हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करीत असायचा. ग्रामीण भागातच माझे बालपण गेलेले असल्याने शेतकरी महिलांचे दु:ख, वेदना आणि प्रश्न मला जवळून पाहता आले. म्हणून त्यांच्यासाठी काही तरी करायला पाहिजे, असे माझ्या मनात येत होते. म्हणूनच माझ्या ज्या संकल्पना होत्या, त्या मी नीट कागदावरच उतरवून काढल्या. एकटीने हे करण्यापेक्षा त्याला पक्षाने पाठिंबा दिला तर आपली संकल्पना चांगल्या प्रकारे राबविता येईल, असे वाटल्यामुळे मी त्याच्या चार-पाच फाइल्स तयार केल्या. उद्योगमंत्री नारायण राणे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे त्या दिल्या. तिघांनीही या संकल्पनेचे कौतुक केले. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिला शेतक-यांची ही चळवळ पुढे नेता यावी यासाठी माणिकराव ठाकरे यांनी ‘शेतकरी महिला विकास सेल’ स्थापन केला आणि माझी संकल्पना असल्याने त्याची जबाबदारी माझ्यावरच सोपविली.

शेतकरी आणि महिला शेतकरी मोठया प्रमाणात शेतात कष्ट उपसतात, त्यांनी केलेल्या कष्टाच्या बदल्यात त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. कारण कच्चा माल मातीमोल भावाने बाजारात विकावा लागतो. आपण इतर कोणताही माल घ्यायला बाजारात जातो त्या वेळी विकणारी व्यक्ती त्यांच्या मालाचा भाव ठरवते. शेतकरी हा एकमेव घटक असा आहे की, जो आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन जातो आणि तिथे मिळेल तो भाव स्वीकारतो. त्याच मालावर पुढे प्रक्रिया केली जाते आणि त्याच्या कितीतरी पटीने पैसे मग मधले दलाल कमवितात. यासाठी माझी एक संकल्पना आहे. प्रत्येक गावात शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत. शेंगदाणा, करडई, सरकी, सोयाबीन तुमच्या शेतात पिकतात, मग काढा की आपल्या गावात एक तेल गाळण्याचा घाणा. मातीमोल भावाने शेंगदाणे घालून महागाचे तेल खरेदी करण्यापेक्षा आपल्याच मालाचे तेल काढा. तुम्हाला आवश्यक असेल तेवढे घरात ठेवून घ्या, बैलांना पेंड ठेवा आणि उरलेले तेल व पेंड बाजारभावाने नेऊन विका, असे छोटे-छोटे प्रक्रिया उद्योग सुरू करता येतात. कडधान्याच्या डाळी बनविल्या, त्या नीट पॅक केल्या तर त्याला चांगला भाव मिळू शकतो. उद्योगमंत्री नारायण राणे यांना ही संकल्पना सांगितली तेव्हा त्यांना खूप आवडली. त्यांनी कोकणामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रक्रिया उद्योगाची माहिती दिली आणि अशा समूहाने महिला शेतकरी काही प्रक्रिया उद्योग सुरू करीत असतील तर त्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा प्रयत्न करता येतील, असे सांगून माझा उत्साह वाढविला आहे. शेतीचे माती परीक्षण ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्याबाबत शेतकरी महिलांमध्ये मोठया प्रमाणात अज्ञान दिसते.

जोपर्यंत कोणत्या मातीमध्ये कोणते घटक कमी आहेत हे समजणार नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्या प्रकारचे खत द्यायचे हे कसे कळणार? एखाद्या शेतीमध्ये एखादा घटक पुरेसा असतानाही खताच्या माध्यमातून तो जर आणखी वाढविला तर त्या खताचा अनुकूल परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. जसे आपण जेवलेले असताना कुणी तरी आग्रह केला म्हणून आपण खातो, मग आपल्याला अजीर्ण होते. त्याबाबत महिला शेतक-यांमध्ये जागृती करण्याचा आमचा मनोदय आहे. माती परीक्षणाबरोबर आंतरपिके आणि बांधांवरील फळझाडांची लागवड याचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे. पूर्वीच्या महिला आताच्या महिलांपेक्षा जास्त काम करायच्या, परंतु त्यांना फारसे आजार नसायचे. कारण आपल्याच शेतात होणारे सीताफळ, करवंद, बोर, आंबे, जांभूळ अशी विविध फळझाडे बांधावर, पडिक जमिनीत असायची. त्या फळांतून मिळणा-या पौष्टिक घटकांमुळे शरीरस्वास्थ्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असायची. आता पडिक जमीन उरलेली नाही. बांधांवर फळझाडे लावण्यासाठी सरकारचे अनुदान मिळते ते अनेकदा कुणाला माहीतच नसते. म्हणून ती झाडे कुणी लावत नाहीत. त्याबाबत महिला शेतक-यांमध्ये जागृती करण्याचा माझा मानस आहे.

शेतीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजना राज्यातील शेतकरी महिलांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. शेतीसाठी खूप चांगली आधुनिक अवजारे आलेली आहेत. ती कमी कष्टात जास्त कामे करतात. त्याची माहिती नसल्याने शेतकरी महिला जुन्याच परंपरागत पद्धतीने शेती करतात. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी अशा आजारांचा सामना त्यांना करावा लागतो, त्या अवजारांच्या बाबतीत जागृती आणणे गरजेचे आहे. शेतकरी मेळाव्यात याबाबत माहिती दिली जाते. परंतु तिथे महिला शेतक-यांना स्थानच नसते. मी आता कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना सुचविले आहे, आपण आदेश काढावा की, शेतकरी मेळाव्यामध्ये महिलांची संख्या वाढली पाहिजे. नाहीतर थेट काही मेळावे फक्त महिला शेतक-यांसाठी बोलवावेत. शक्य असेल तर महिला शेतक-यांसाठी एखादे स्वतंत्र धोरण जाहीर करावे. महिलांमध्ये शेतीविषयक साक्षरता निर्माण झाली पाहिजे, यासाठी माझी धडपड आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीच्या सातबारावर महिलांचे नाव आले पाहिजे. सरकारने योजना जाहीर करतानाच तशी तरतूद करणे गरजेचे आहे. त्यासाठी कायदा झाला पाहिजे. ज्या सातबारांवर महिलेचे नाव आहे, त्यांनाच शेतीविषयक योजनांचा लाभ मिळेल, अशी सक्ती केली तरच शेतात कष्टणा-या महिलांना त्यांचा हक्क मिळू शकेल. कामे खूप आहेत. शेतकरी महिलांचे दु:ख हलके करीत असतानाच तिच्या हक्काची तिला जाणीव करून देणे, त्यांना ते हक्क मिळवून देणे हाच एक ध्यास घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. काही अडचणी असल्या तरी अनेकांचे सहकार्यही मिळत आहे. ही केवळ एक मोहीम न राहता तिचे चळवळीत रूपांतर व्हावे आणि जगाला जगविणारी शेतकरी महिला सुखी व्हावी, यासाठीच अखेपर्यंत प्रयत्न करण्याचा माझा निर्धार आहे.

(शब्दांकन : शामसुंदर सोन्नर)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version