Home कोलाज माझी सिमॉन द बूव्हॉ!

माझी सिमॉन द बूव्हॉ!

1

मराठी कर्तृत्ववान पुरुषांनी आपल्या आयुष्याबद्दल पुष्कळच लिहिलं, पण त्यातल्या अध्र्या वाटयाच्या हिस्सेकरी असलेल्या जीवनसाथीबद्दल मात्र फारसं लिहिलेलं नव्हतं. ‘प्रहार’ने याविषयीची दखल घेऊन ‘ही आणि मी’ हे खास सदर सुरू केले. त्या सदरांमधून वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्तृत्ववान पुरुष त्यांच्या जीवनसाथीबद्दल, तिच्या कर्तृत्वाबद्दल आणि तिच्या साथसोबतीबद्दल त्यांच्याच शब्दांत व्यक्त झाले. पहिल्या लेखात मल्लिका अमरशेख यांच्याबद्दल नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला हा लेख पुनर्प्रकाशित करीत आहोत..

मुळात आम्ही दोघं एकमेकांवर निस्सीम प्रेम करतो. दुसरी गोष्ट, मल्लिकानं बालरंगभूमीवर चिक्कार काम केलं होतं आणि पुढे आविष्कारच्या अनेक नाटकांमध्येही तिनं महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र माझ्यासारख्या घुमक्कड स्वामीच्या प्रेमात पडल्यानंतर तिला या सगळ्यांचा स्वाहा करावा लागला. सतीश पुळेकर, जयदेव हट्टंगडी, नाना पाटेकर आदींबरोबर तिनं कामं केलेली आहेत. आज ते या क्षेत्रात कुठल्या कुठे गेले! माझा जो लढा होता, त्यामुळे तिला कुठेही जाता आलं नाही. त्या काळात तिनं त्याविषयी फार ओरडही केली नाही. आता तिला कळतं की, आपण फार काही गमावलं आहे. पण तीही नाममात्र कुरबूर आहे.

आमची एकमेकांत खूप गुंतागुंत आहे. मी तिला मिस करणं वा तिच्यापासून एक दिवस दूर राहणं मला जमत नाही. माझ्या सर्व बारीकसारीक गोष्टी ती पाहते म्हणून नाही; तर आमच्यातल्या ज्या काही वैचारिक चर्चा असतील, बोलणं असेल.. जो काही संवाद होतो तो फार मनस्वी असतो. त्यात ब-याचदा ती माझ्यापेक्षा जास्त व्यावहारिक असते. अकाली प्रौढ झालेल्या माणसासारखं उपजत शहाणपण मल्लिकाकडे आहे.

मी प्रत्येक गोष्टीत स्वत:ला झोकूनच देत आलेलो आहे. त्याबाबतीत मी कधीही मागेपुढे पाहिलेलं नाही. आज जे काही माझं चार भिंतींचं घर दिसतं, त्यात पुस्तकं दिसतात, खुच्र्या-टेबलं आणि इतर काही गोष्टी दिसतात.. मी कधीतरी कल्पना करतो, ही नसती तर? आपलं घरच नसतं. मी जे मिशन स्वीकारलं होतं, त्यात घरादारावर तुळशीपत्र ठेवणं हीच गोष्ट माझ्या फार आवडीची होती. आता मला कधी कधी वाटतं, आयला आपण सामाजिक चळवळीत राहून संसारही छान केला की! संघर्ष झाले, लढलो एकमेकांशी पण एवढा छान संसार कसा काय करू शकलो? त्याचं सर्व श्रेय मल्लिकालाच आहे. कुणाचीही दृष्ट लागावी असं आमचं सहजीवन आहे!

मल्लिकाची मतं फार स्पष्ट आहेत. तिला जे काही म्हणायचंय ते अत्यंत काँक्रीट आणि रोखठोक असतं. तिला जे आवडत नाही, ते ती स्वच्छपणे सांगते. त्यामुळे सेक्सपासून ते साहित्यापर्यंत आमचं फार चांगलं टय़ूनिंग जमलेलं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये ब-याचशा गोष्टी पॉझिटिव्ह आहेत.

मल्लिकाचा मोठा मेव्हणा अनिल बर्वे मोठा नाटककार. त्याला नक्षलवादी म्हणून पकडलेलं होतं. तुरुंगात त्याची अन् माझी दोस्ती झाली. तो बाहेर आल्यावर मी त्याच्याकडे जायचो. त्यानं पुढे यथाकाल शाहीर अमरशेखांच्या मोठया मुलीशी लग्न केलं. मी त्या वेळेला ताडदेवलाच राह्यचो आणि अनिल अमरशेखांच्या घरीच राहायचा. मी त्याला तिथं भेटायला जायचो. तिथं मला मल्लिका भेटायची. अमरशेखांचं जे कलापथक होतं, त्यांचा दरवर्षी बॉम्बे सेंट्रलला मोठा कार्यक्रम व्हायचा. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचा प्रचार अमरशेखांनी आपल्या कलापथकाच्या माध्यमातून केलेला आहे. तोपर्यंत माझं ‘गोलपिठा’ हे पुस्तक आलं होतं. त्याला राज्य पुरस्कार मिळाला. त्या एका पुस्तकानं मला मोठा कवी म्हणून मराठी साहित्यात मान्यता मिळवून दिली. या बाईसाहेबही कविता करायच्या. त्यामुळे आमचं एकमेकांशी बोलणं होता होता प्रेम जमलं. तेव्हा मी ख-या अर्थानं प्रेमात पडलो. तेव्हा मला प्रेम म्हणजे काय असतं ते समजलं.

तसं माझं आयुष्य स्वैराचारी होतं. सामाजिक चळवळीतही ते माझ्याबरोबरच होतं. आम्ही लग्न केलं तेव्हा मल्लिका सतरा वर्षाचीच होती. त्यात मी असा लफडी करणारा आणि मारामा-या करणा-या! दलित पँथरसारख्या संघटनेचा पुढारी. बाळासाहेब ठाक-यांच्या घरावर चार वेळा ज्यानं हल्ला केला. मी पुढारी होतो, कवी होतो, माझं नाव होत होतं पण मला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. आणि राहतो कुठं तर अरब गल्लीतल्या अत्यंत घाण वस्तीमध्ये. त्यात आमच्या चाळींची रचना तुरुंगासारखी होती. यामुळे मल्लिकाच्या घरच्यांनी सुरुवातीला आमच्या लग्नाला विरोध केला होता. मल्लिकाची मोठी बहीण प्रेरणा. तिची मैत्रीण भक्ती बर्वे म्हणाली की, मुलगा चांगला आहे पण त्याला काही कामधंदा नाही. त्यामुळे लग्नाला नकार मिळाला.

मी मल्लिकाला म्हणालो, ‘तुला लग्न करायचं नसेल तर मी चाललो.’ तर ती म्हणाली, ‘लग्न करणार तर तुझ्याशीच.’ आमचं लग्न ठरलं. आमचं लग्न म्हणजे व्हेरी पोएटिक! लग्न अमरशेखांच्या घरी झालं. ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचं, स्वातंत्र्याच्या लढयाचं केंद्र होतं. पण त्यांनी अट घातली की, ‘जाहीर लग्न करायचं नाही, आमंत्रणं द्यायची नाहीत. तुमच्याकडचे काय दोनचार लोक आणि आमच्याकडचे काही लोक..’ बाबासाहेबांचा पुतळा साक्षी ठेवून आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. रजिस्टर वगैरे काही झालं नाही. त्यामुळे उद्या मल्लिका म्हणू शकते की, आमचं लग्नच झालेलं नाही. हिंदू लोकांच्या गांधर्वविवाहापेक्षाही आमचा विवाह वेगळा आहे.

आणखी एक गंमत सांगतो. अमरशेखांच्या कलापथकामध्ये प्रेरणा फार सुंदर नाचायची. मला त्या वेळेला असं वाटायचं की आपल्याला बायको असावी तर अशी! तिच्या मी फार प्रेमात असायचो. ती नृत्यात एम. ए. झालेली आहे. गुरू पार्वतीकुमारांची ती शिष्या. भाईंचा आवाज तर काय नाक्यावर जाईल असा. त्यामुळे माझा त्यांच्याकडे ओढा होता, तर मल्लिकाचं माझा बंडखोरपणा, कवीपणा यावर प्रेम होतं. या दोन परस्परविरोधी गोष्टींनी आम्हाला जवळ आणलं.

माझं पूर्वायुष्य अनेक घटनांनी भरलेलं होतं, व्यसनी होतं. माझ्यावर ३६० खटले होते. वरळीचा दंगलीचा खटला, त्यात माणसं मेलेली. पुण्याला शंकराचार्याना जोडयानं मारलेलं, इंदिरा गांधी पुण्याला डी. लिट ही पदवी घ्यायला आल्या तेव्हा पळवून लावलं होतं. असं सगळं. त्यात मल्लिकानं ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ हे पुस्तक लिहिलं. त्यामुळे माझी प्रतिमा बरीच डॅमेज झाली. काही लेखक मंडळी म्हणायची, ‘मीच मल्लिकाला लिहायला सांगितलंय.’ काहींनी मला विचारलं की, ‘तुम्ही असं कसं काय लिहू दिलं त्यांना? परवानगी कशी दिली?’ मी त्यांना म्हणालो, ‘अहो, ती माझी बायको असली तरी तिला स्वत:ची मतं आहेत. आपला नवरा नालायक आहे की कस्साय हे सांगण्याचा अधिकार तिला आहे ना! मी जर मॉडर्न आहे, मला बाकीच्या सर्व गोष्टी कळतात. मी स्त्रीमुक्तीचा पाठीराखा आहे. फुले-आंबेडकरांचा अनुयायी स्वत:ला म्हणवून घेतो तर मी तिचा अधिकार कसा काय नाकारू?’ तो जो आमचा काळ आहे ७८च्या आसपासचा, त्यानं आमच्या आयुष्यात अशी छोटी वादळं उठवली. पण त्यानंतरही आम्ही एकत्रच राहिलो आणि राहतो आहोत. सांगायचं असं की, माझ्यासारख्या राक्षसाला मल्लिकानं एवढं बदललं की विचारता सोय नाही!

आमच्या अयुष्यातला एक काळ अत्यंत वाईट होता. तेव्हा सोविएत लँडची घरी भरपूर रद्दी यायची, ती विकून मल्लिका आमचा संसार चालवायची. तेव्हा चळवळी लाखाच्या पण जवळ पैसे नाहीत अशी माझी अवस्था होती. कुठलीही स्त्री मग ती प्रेमात पडलेली असो वा नसो तिला जगण्यापुरंतही मिळालं नाही तर ती राहत नाही. मल्लिकाचं हे खरंच मोठं वैशिष्टय़ आहे की, ती माझ्या दारिद्रयातही अतिशय आनंदानं राहिली.

आमचा मुलगा आशू लहान असताना त्याला अचानक अ‍ॅटॅक यायचा. त्याचे डोळे पांढरे व्हायचे. पण माझ्या भानगडीमुळे मल्लिका एवढी वैतागली की, एक दिवस निघूनच गेली. वर्षभर आलीच नाही. माझ्या आईला तर आमचा प्रेमविवाह मान्यच नव्हता. इकडे वडिलांनी माझं दुसरं लग्न करायचं ठरवलं. पण एक दिवस मल्लिका आली भेटायला. पण ती दारातच उभी राहिली. मी तिला म्हणालो, ‘अगं, आत ये.’ माझ्या घरी तेव्हा राहायला आलेल्या माझ्या मैत्रिणीने पाहिलं, ‘अरे, यांचं तर प्रचंड प्रेम आहे’ मग तिनं सरळ बॅग भरली आणि ती निघून गेली.

१९८१पासून मी मायस्थेनिया ग्रेविसचा डेडली पेशंट आहे. त्यामुळे मल्लिकाला स्वत:पेक्षाही माझ्या निगराणीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे अर्थातच तिच्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत, लेखन/ कविता असतील, कथा असतील, त्यांना वेळ मिळत नाही. त्याची खंत मला आहे. पण दुसरा काही पर्यायही नाही.

आणखी एक सांगायचं म्हणजे मल्लिका स्वयंपाक फार उत्तम करते. माशांचे पदार्थ तर अप्रतिमच. ती कुठलाही स्वयंपाक इतका मन लावून करते. त्यामुळे ते मला गोडच वाटतं. टेस्टी. पण आमचं लग्न झालं तेव्हा मल्लिकाला स्वयंपाक फारसा येत नव्हता. तिला भाकरी करायला मीच शिकवलं. आता इथपर्यंत आम्ही आलो. मल्लिकानं मला एवढं संसारी बनवलं की चळवळीपासून तोडण्याचंही काम केलं आहे. झोकून देण्याचा माझा जो स्वभाव आहे, त्यावर बंधनं घालण्याचा तिचा आटोकाट प्रयत्न असतो.

मल्लिकावर मी ‘महासत्तेचा प्रदोष’, ‘बायकोसाठी’ आणि ‘माझ्या काळ्यासावळ्या मादीस’ अशा काही कविताही लिहिल्या आहेत. त्यातल्या ‘मादी’ या शब्दाला तिनं तेव्हा आक्षेपही घेतला होता. त्यावर माझं म्हणणं असतं की, आपण तसे जीवजंतूच ना? टिपिकल अर्थाने तो शब्द नाही. इनसेक्ट – कीटक म्हणून आपण जेव्हा स्वत:ला काम्यू किंवा काफ्कासारखं पाहतो, त्या अर्थाचा तो शब्द आहे.

मात्र हे सगळं असलं तरी मल्लिका प्रतिभावान लेखिका आहे. तिनं जे काही लेखन केलं आहे, ते सकस आणि तिच्या स्वभावासारखं स्पष्ट व परखड आहे. स्त्रीमुक्तीवाल्या लोकांसारखी ती नाही. पण स्त्रीमुक्तीची ती खरीखुरी प्रतिनिधी आहे! स्त्रीमुक्ती म्हणजे संबंध स्वैराचार हे तिच्याही डोक्यात नाही. ती माझी सिमॉन द बूव्हॉ आहे. लौकिकार्थानं आमच्या लग्नाला लग्न म्हणता येणार नाही. म्हणजे सार्त् आणि सिमॉन द बूव्हॉ आयुष्यभर ज्या पद्धतीने राहिले, तसंच घट्ट नातं आमचं आहे. कवितेतूनही मी ते सांगितलं आहे.

मल्लिका प्रतिभावान लेखिका आहे. तिनं जे काही लेखन केलं आहे, ते सकस आणि तिच्या स्वभावासारखं स्पष्ट व परखड आहे. स्त्रीमुक्तीवाल्या लोकांसारखी ती नाही. पण स्त्रीमुक्तीची ती खरीखुरी प्रतिनिधी आहे! स्त्रीमुक्ती म्हणजे स्वैराचार हे तिच्याही डोक्यात नाही. ती माझी सिमॉन द बूव्हॉ आहे. लौकिकार्थानं आमच्या लग्नाला लग्न म्हणता येणार नाही. म्हणजे सार्त् आणि सिमॉन द बूव्हॉ आयुष्यभर ज्या पद्धतीने राहिले, तसंच घट्ट नातं आमचं आहे. कवितेतूनही मी ते सांगितलं आहे.

बायकोसाठी

तू जनित्रे माझी, तू माझी ऊर्जा
माझ्या अंतर्यामीच्या आकाशात उडणारी तू एकमेव चिवचिव चिमणी.
मी शोधत राहतो स्वत:लाही तुझ्या सोबत
स्तन आणि जनेंद्रियांच्या दरम्यान
हे नाभीखालचे अमेद्य माझ्यासाठी झाले आहे पवित्र
मीही पवित्र होऊन फाडतो धर्मग्रंथाचे एकएक पान
आणि असे चिमटीत धरून वा-यावर सोडून देतो.
किती सहजगत्या या पशूला तू माणसात आणलेस
मरणाची गोष्ट ऐकवू नकोस मला
मेल्यानंतर जमिनीखालून तुला माझ्याकडे यायची गरज नाही.
मीच शोधत आलो आहे तुझ्या अस्तित्वाचा दर्वळ जिवंत असताना
बायको, या सोंगाढोंगाच्या दुनियेत मी माझ्याजवळ
असोनसो, तू माझ्याजवळ आहेस
आणि मी एकुलता तुझा.

(‘या सत्तेत जीव रमत नाही’ या कवितासंग्रहातून)

 

1 COMMENT

  1. तेव्हा सोविएत लँडची घरी भरपूर रद्दी यायची, ती विकून मल्लिका आमचा संसार चालवायची. तेव्हा चळवळी लाखाच्या पण जवळ पैसे नाहीत अशी माझी अवस्था होती. कुठलीही स्त्री मग ती प्रेमात पडलेली असो वा नसो तिला जगण्यापुरंतही मिळालं नाही तर ती राहत नाही. yatun chalval ani tyasathee dilela ladha kasa dila he vichar hi karu shakat nahee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version