Home ताज्या घडामोडी माझे एन्काउंटर करण्याचे षड्यंत्र- तोगडिया

माझे एन्काउंटर करण्याचे षड्यंत्र- तोगडिया

1

पोलिसांनी माझे एन्काऊंटर रचण्याचे षडयंत्र रचले असून, जुने खटले काढून मला अडकविण्यात येत आहे, असा गंभीर आरोप करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना मंगळवारी भर पत्रकार परिषदेत रडू कोसळले.

अहमदाबाद- केंद्रीय गुप्तचर विभागाकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांनी माझे एन्काऊंटर रचण्याचे षडयंत्र रचले असून, जुने खटले काढून मला अडकविण्यात येत आहे, असा गंभीर आरोप करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना मंगळवारी भर पत्रकार परिषदेत रडू कोसळले.

तोगडिया यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुजरातच्या शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तोगडिया यांनी मंगळवारी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर हे आरोप केले आहेत. त्यांच्यावर सध्या येथील चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.

काल एक माणूस माझ्या घरात घुसला व माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र असल्याचे मला सांगितले. दहा वर्षापूर्वीची जुनी प्रकरणे उकरुन काढून मला त्यामध्ये मला गोवण्याचा डाव आहे. आयबीच्या माध्यमातून मला धमकावण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप तोगाडिया यांनी केला आहे.

हिंदूंसाठी मी आतापर्यंत लढत आलो आहे. यामध्ये राम मंदिर, गोहत्या बंदी, शेतक-यांना दीडपट हमीभाव द्या अशा मुद्यांचा समावेश होता. आता मात्र गुप्तचर विभागाकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजस्थानचे पोलिस मकर संक्रांतीदिवशी मला अटक करण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट काढून आले होते. पण राजस्थानच्या गृहमंत्र्यांशी मी बोललो त्यावेळी त्यांनी माझ्या नावे कुठलेही अटक वॉरंट नसल्याचे सांगितले. मी लगेच माझा फोन स्विचऑफ केला, असे तोगडिया म्हणाले.

मी मृत्यूला घाबरत नसल्याचे सांगून मी सुरक्षा रक्षकांना सांगून तेथून निघालो आणि रिक्षात बसलो. राजस्थानमधील वकिलांशी संपर्क करून मी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा प्रयत्न केला. जयपूर येथे जाऊन कार्यकर्त्यांसह न्यायालयात जाण्याचे मी नियोजन केले होते. पण, मला रिक्षात त्रास होऊ लागला. त्यानंतर मी रुग्णालयात होतो. माझे पोलिसांशी कोणतेही वैर नाही, असे त्यांनी सांगितले. मी कधीही न्यायव्यवस्थेचा अवमान केलेला नाही. मी गुन्हेगार नाही. त्यामुळे जेव्हा डॉक्टर परवानगी देतील, तेव्हा जयपूरला जाऊन कोटार्पुढे शरण जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा रक्षक न घेताच तोगडिया बाहेर पडले..

तोगडिया यांना ‘झेड’ सुरक्षा आहे. परंतु सोमवारी सकाळी ते सुरक्षा रक्षक सोबत न घेताच एका दाढीवाल्या माणसासोबत विहिंपच्या कार्यालयातून बाहेर पडले व रिक्षेत बसून गेले. पण ते नेमके कुठे गेले किंवा कुठे आहेत याची माहिती नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे अहमदाबाद पोलिसांनी स्पष्ट केले.

एकेकाळचे मित्र झाले शत्रू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया एकेकाळी जीवलग मित्र होते. सार्वजनिक ठिकाणी ते नेहमीच एकत्र फिरायचे. मात्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यात दुरावा वाढला. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर तोगडियांचा सरकारच्या कामात विशेषत: गृह खात्यात कमालीचा हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळे मोदींनी त्यांना खडय़ासारखे बाजूला केले होते. कालांतराने हा दुरावा इतका वाढत गेला की त्यांच्या मैत्रीत कमालीचे वितुष्ट आले. मोदींनी गुजरातमधील २०० मंदिरे पाडल्यानंतर तसेच लालकृष्ण अडवाणी यांनी मोहम्मद अली जीना यांचा गौरव केल्यानंतर तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेचे मोठे आंदोलन उभे केले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकारने लाठीमार केला. त्यामळे मोदी आणि तोगडिया यांच्यातील वाद आणखी चिघळला. तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेचे कार्यक्रम संघाच्या मार्गदर्शनाखाली घ्यावेत असे संघ परिवारातील ज्येष्ठांना वाटत होते. परंतु तोगडिया त्यांना जुमानत नव्हते. त्यामुळे संघ परिवारही तोगडिया यांच्याशी फटकून वागत होता. त्यामुळे तोगडिया यांनी यापूर्वीही संघाचे नाव घेता आपल्या पदाला धोका असल्याचे वक्तव्य करतानाच राम मंदिर, गोरक्षेच्या मुद्यावर भाजपवर टीकास्त्र सोडून काँग्रेसची स्तुती केली होती.

तोगडियांसाठी हार्दिक मैदानात

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवीण तोगडिया यांची पाटीदार नेता हार्दिक पटेलने मंगळवारी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर हार्दिकने मोदी-शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. तोगडियांची अनेक मते मला पटत नाहीत. मात्र, त्यांच्या विरोधात कट-कारस्थान होत असल्याचा आरोप खरा आहे. मोदी व शहा यांच्या सांगण्यावरूनच हे सगळे सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तोगडियाच्या विरोधात आहे हे उघड गुपित आहे, असे हार्दिक पटेल म्हणाला. तोगडिया बेपत्ता झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर हार्दिकने ट्विटरवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. झेड प्लस सुरक्षा असतानाही तोगडिया बेपत्ता होतात. मग सामान्य माणसाचे काय होऊ शकते, याची कल्पनाही करवत नाही, असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version