Home अखेरचा जय महाराष्ट्र! मातोश्री ते शिवसेना भवन साडेपाच तास

मातोश्री ते शिवसेना भवन साडेपाच तास

0

‘मातोश्री ते शिवसेनाभवन’ हा शेवटचा प्रवास तब्बल साडेपाच तासांचा झाला. ‘यापुढे साहेब कधीच दिसणार नाहीत,’ म्हणून शोकमग्न झालेले लाखो शिवसैनिक या प्रवासात त्यांच्या सोबतीला होते.

मुंबई- ‘मातोश्री’ आणि ‘शिवसेना भवन’ या दोन्ही वास्तूंचे शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांच्याही हृदयातील स्थान अत्यंत महत्त्वाचे. शिवसेनाप्रमुखांनी आतापर्यंत असंख्य वेळा दहा-पंधरा मिनिटांत हे अंतर पार केले असेल. रविवारी मात्र त्यांचा ‘मातोश्री ते शिवसेनाभवन’ हा शेवटचा प्रवास तब्बल साडेपाच तासांचा झाला. ‘यापुढे साहेब कधीच दिसणार नाहीत,’ म्हणून शोकमग्न झालेले लाखो शिवसैनिक या प्रवासात त्यांच्या सोबतीला होते.

शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी रविवारी पहाटेपासूनच मातोश्रीबाहेर अलोट गर्दी केली होती. अनेक ज्येष्ठ, तरुण शिवसैनिक तर शनिवारी रात्रीपासूनच कलानगर जंक्शन येथे ठिय्या मांडून बसलेले होते. बाळासाहेबांच्या अखेरच्या प्रवासाला, महायात्रेला गालबोट लागू नये म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलिसांचा फौजफाटाही तैनात होता. पण शोकमग्न शिवसैनिकांनी शिवसेनेने केलेल्या आवाहनानुसार शिस्तीचे पालन केल्याने पोलिसांवरील ताण आपसूकच हलका झाला. कलानगरमार्गे धारावी येथे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. या वेळी ‘साहेबांनी आम्हाला पोरक केले,’ अशा भावना व्यक्त करणारे सर्व धर्माचे नागरिक कलानगरपाशी हजर होते.

सकाळी सात वाजता फुलांनी सजवलेला ट्रक ‘मातोश्री’बाहेर आला आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. त्यानंतर सव्वासात वाजता मुंबई पोलिसांचे बँडपथक ‘मातोश्री’वर पोहोचले. नऊ वाजता बाळासाहेबांचे पार्थिव ‘मातोश्री’बाहेर आणण्यात आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बाळासाहेबांना मानवंदना दिली.

सव्वानऊ वाजता महायात्रेला सुरुवात झाली. या वेळी एकच गर्दी उसळली होती. शिवसैनिक पार्थिवावर पुष्पवृष्टी करत ‘बाळासाहेब अमर रहे’ अशा घोषणा देत होते. ज्येष्ठ शिवसैनिकांसह अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कलानगरसमोरील उड्डाणपूल आणि स्कायवॉक येथेही मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. सव्वादहा वाजता महायात्रा माहीम कॉजवे परिसरात आली, अकरा वाजता ती एल. जे. रोड येथे पोहोचली आणि शिवसेना भवनाच्या दिशेने रवाना झाली. माहीमच्या पोलिस वसाहतीमधील अनेकांनीही अंत्यदर्शन घेतले. साडेअकरा वाजता महायात्रा माहीम चर्च येथे आली. एक वाजता शीतलादेवी मंदिर परिसरात महायात्रा पोहोचली. प्रचंड गर्दीमुळे बाळासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक झाडे, गाडय़ा यांच्यावर चढलेले दिसत होते. तब्बल साडेपाच तासांच्या प्रवासानंतर अलोट गर्दीसह ही महायात्रा शिवसेना भवनापाशी पोहचली.

डय़ुटी फर्स्ट

मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी कर्तव्याला प्राधान्य देत रविवारी स्वत:च्या मुलीच्या विवाहाचा स्वागतसमारंभ पुढे ढकलला. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर मुंबईमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी सर्व पोलिसांच्या रजा, सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. आपल्या सर्व सहका-यांप्रमाणेच पोलिस आयुक्तांनीही कौटुंबिक कर्तव्यापेक्षा पोलिस कर्तव्याला अधिक महत्त्व दिले.

माँसाहेबांच्या पुतळ्यापाशी थांबली महायात्रा

मातोश्रीहून शिवसेना भवनापर्यंत आलेल्या महायात्रेने नंतर शिवतीर्थाच्या दिशेन कूच केले. त्यानंतर ही महायात्रा शिवाजी पार्क मैदानावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रवेशद्वारापाशी बसवण्यात आलेल्या माँसाहेबांच्या पुतळ्याजवळून जाताना काही क्षण थांबवण्यात आली. या वेळी पार्थिवाशेजारी बसलेल्या उद्धव, रश्मी यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिकांनी माँसाहेबांच्या पुतळ्यास दु:खी अंतकरणाने नमस्कार केला तेव्हा त्यांना अश्रू लपवता येत नव्हते.

शिवसैनिकांनी फुलले रस्ते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी मुंबईतील रस्त्यांवर बेस्ट बस वगळता रिक्षा-टॅक्सी व इतर सर्व खासगी वाहनांची वाहतूक बंद होती. त्यामुळे शहरातील रस्ते वाहनांच्या वर्दळीऐवजी अंत्यदर्शनासाठी आलेल्या शिवसैनिकांनी फुलले होते. अंत्यविधीसाठी शिवाजी पार्ककडे येणा-या शिवसैनिकांच्या सोयीसाठी बेस्टने सर्व ठिकाणांहून जादा बस सोडल्या होत्या. तसेच शिवसैनिकांनी खासगी वाहनांचा वापर न करता पायी प्रवास केला. त्यामुळे शहरात कुठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही.

रिक्षा-टॅक्सी बंद असल्याने बेस्टने रविवारी जादा बस सोडल्या होत्या. मुंबईतील विविध भागांमधून शिवाजी पार्क आणि सर्व रेल्वे स्थानकांपर्यंत बस धावत असल्याने शिवसैनिकांची गैरसोय झाली नाही. शहरातील पार्किंग व्यवस्था व आवश्यक त्या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. अंत्ययात्रेत मोठय़ा संख्येने शिवसैनिक व नागरिक सहभागी झाल्याने काही रस्त्यांवरील वाहतूक सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.

वीर सावरकर मार्ग आणि अ‍ॅनी बेझंट मार्गापासून मोरी रोड ते बाबासाहेब वरळीकर चौक तसेच टिळक पूल वगळता दादर टीटी मार्गही वाहतुकीसाठी बंद होता. शिवाजी पार्क येथील न. ची. केळकर मार्ग, एस. के . बोले मार्ग, भवानी शंकर मार्गावरील रस्ते शिवसैनिकांनी फुलले होते. वीर सावरकर मार्ग, रानडे रोड, केळकर, केळुस्कर मार्ग, एल. जी. रोड, गोखले रोड, कठारिया मार्ग तसेच सयानी मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली होती.

अंत्यदर्शनासाठी धडपड

‘अमर रहे, अमर रहे बाळासाहेब अमर रहे’च्या जयघोषात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला सकाळी साडेनऊ वाजता ‘मातोश्री’पासून सुरुवात झाली. आपल्या दैवताचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लाखो शिवसैनिक मातोश्रीसमोर येऊन बसले होते. बाळासाहेबांचे पार्थिव ट्रकपाशी आणण्यात आल्यानंतर जमलेल्या तमाम शिवसैनिकांनी उठून त्या ट्रकच्या दिशेने धाव घेतल्याने चेंगराचेंगरी झाली.

महायात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती. मात्र अंत्ययात्रा पुढे सरकू लागताच शोकाकुल शिवसैनिकही ट्रकमागे चालू लागले. यात्रेत सहभागी होणा-या समर्थकांची संख्या वाढतच होती. चहूबाजूंनी चाहत्यांनी गर्दी केल्यामुळे ही अंत्ययात्रा अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत होती. आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होते. अंत्यदर्शनासाठी अनेक जण जीवाचीही पर्वा न करता वांद्रे ते दादर रस्त्यावरील जाहिरातींच्या फलकांसह मिळेल त्या उंच ठिकाणी बसून अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते ‘देवा, माझा राजा मला परत दे’ अशी आर्त विनवणी करणारे फलक घेऊन जाणा-या सैनिकांच्या डोळ्यांतील अश्रू हाच बाळासाहेबांविषयीच्या प्रेमाचा पुरावा होता. माहीम कॉजवेजवळील कोळीवाड्यातील महिलांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. इमारतींच्या गॅलरी, गच्ची, घरांच्या छपरावरही गर्दी करून ही अंत्ययात्रा व बाळासाहेबांचे शेवटचे दर्शन मोबाइलमध्ये टिपण्यासाठी अनेक जण धडपडत होते.

शुकशुकाट!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी मुंबई, ठाण्यासह राज्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. औषधांची दुकाने, रुग्णालये आदी अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने, हॉटेल, मॉल, कार्यालये, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या बंदमुळे सर्वत्र अघोषित शांतता पसरली होती. नेहमी गजबजलेली मुंबईही शांत होती. रस्त्या-रस्त्यांवर शुकशुकाट होता. प्रत्येक नाक्यानाक्यांवर आणि प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर असंख्य शिवसैनिक आपल्या लाडक्या नेत्यांना आदरांजली वाहत होते, तर अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आपला पक्षभेद विसरून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र आल्याचे चित्रही पाहवयास मिळत होते.

मुंबईतील प्रत्येक ठिकाणाहून शनिवारी मध्यरात्रीपासूनच बाळासाहेबांच्या चाहते, शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दादरच्या दिशेने जात होते. रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केल्याने रविवारी सकाळपासूनच शिवसैनिक शिवाजी पार्ककडे रवाना झाले. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, चेंबूर, मानखुर्द, कुर्ला, शीव आदी परिसरासोबतच बोरिवली, कांदिवली, जोगेश्वरी, मालाड, अंधेरी, वांद्रे आदी परिसरातील प्रत्येक नाक्यांवर बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. असंख्य नाक्यांवर बाळासाहेबांचे छायाचित्र लावून त्यासमोर पुष्प अर्पण करत अगरबत्ती आणि नंदादीप तेवत ठेवण्यात आले होते. केवळ राजकीय पक्षच नाही, तर विविध संघटना, मंडळे, सोसायटय़ा यांचेही आदरांजलीचे बॅनर रस्त्या-रस्त्यांवर झळकत होते. आपल्यातला एक महापुरुष, महामानव आणि कुटुंबप्रमुख सोडून गेल्याच खंतच प्रत्येक जण व्यक्त करत होता. विविध पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, भजनी मंडळ, मंदिर ट्रस्ट, सेवाभावी संस्था, स्थानिक रहिवासी मंडळ, क्रीडा मंडळ, व्यायामशाळांकडून लावण्यात आलेल्या फलकांवर ‘देश आणि राज्य एका योद्धा महापुरुषाला मुकला’ अशा प्रकारचे संदेश लिहून आदरांजली वाहण्यात आली. प्रत्येक रेल्वे स्थानकापासून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बंद आणि बंदच!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. शिवसेनेचा गड मानला जाणा-या ठाणे, रायगड जिल्ह्यांवरही शोककळा पसरली असून, रविवारी सलग दुस-या दिवशीही ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. ठाणे, रायगडच्या ग्रामीण, शहरी भागांसह अगदी गल्लीबोळात रविवारी सर्वत्र सन्नाटा पसरला होता. ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाळासाहेब तुम्हारा नाम रहेगा! अशा घोषणा देत ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत, पनवेल, महाड, अलिबाग येथून मिळेल त्या मार्गाने मुंबईच्या दिशेने निघालेले शिवसैनिकांचे जथ्थ्येच्या जथ्थे यामुळे अवघ्या मुंबापुरीवर जणू जनसागरच्या लाटाच आदळत होत्या.

ठाण्यात रिक्षा, टॅक्सी बंद असल्याने रस्ते सुने पडले होते. ठाणे परिवहन सेवा आणि मध्य रेल्वे सुरू असल्याने प्रवाशांना त्याचा फारसा त्रास जाणवला नाही. ठाणे शहरात अनेक ठिकाणी स्क्रीन लावून बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न काही संस्थांनी केला. शहरातील दुकाने आणि खासगी कंपन्याही बंद असल्याने फारशी वर्दळ जाणवली नाही. अंबरनाथमध्ये सलग दुस-या दिवशी रिक्षा व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय दुकाने, उपाहारगृह व एमआयडीसीतील शेकडो अभियांत्रिकी आणि रासायनिक कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. कुळगाव-बदलापूरमध्येही शनिवार, रविवार असे दोन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आला. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अंबरनाथ शहरातील पत्रकारांतर्फे शिवाजी चौकातील चव्हाण नाटय़गृहाच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. वाडा तालुक्यातही अत्यावश्यक सेवा वगळता उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. शनिवारी रात्रीपासून वाडय़ात ठिकठिकाणी भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवसेना शाखा कुडूसतर्फे कुडूस नाका येथे बाळासाहेबांना आदरांजली वाहणारा फलक लावण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील नागोठणे बाजारपेठेतील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकाने, कपडय़ांचे व्यापारी, चहा टपरीवाले, मिनिडोअर रिक्षा यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला होता.

यंत्रमागनगरीही थंडावली

यंत्रमाग कामगारांची नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या भिवंडीतील सुमारे सात लाख यंत्रमागाचा खटाव खटावच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे प्रथमच बंद झाला. शहरातील हिंदू-मुस्लीम परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे छोटे- मोठे कारखाने, उद्योग ते अगदी हातावर पोट असलेले हातगाडीवाले यांनी रविवारी स्वत:हून बंद ठेवला होता. भिवंडी शहरात प्रथमच िहदू -मुस्लीम या परिसरात शुकशुकाट पसरल्याने ‘हमसब एक है! असे चित्र दिसत होते. भिवंडीच्या इतिहासात प्रथमच असा कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे बोलले जाते. गोदामाची नागरी म्हणून भिवंडीतील अंजूर फाटा ते कशेळीदरम्यान असलेल्या हजारो गोदामे बंद ठेवण्यात आली होती.

आठवण १९८६च्या सभेची

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८६मध्ये नागोठणे येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेला मोठा जनसागर लोटला होता. बाळासाहेबांच्या निधनाने जुन्या शिवसैनिकांना या सभेची प्रकर्षाने आठवण झाली व त्यांचे मन भरून आले.

महाडमध्ये जागल्या बाळासाहेबांच्या आठवणी

शिवसेनेची पहिली शाखा महाडमध्ये सुरू झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाडला भेट दिली होती. या भेटीच्या आठवणी शहरवासीयांनी जागवल्या. शनिवारी दुपारी बाळासाहेबांच्या निधनाची बातमी वा-यासारखी पसरल्यावर अवघ्या काही मिनिटांत शहराच्या बाजारपेठांत शुकशुकाट पसरला तो रविवारीही कायम होता. महाडमध्ये ठिकठिकाणी सर्वपक्षीयांतर्फे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. महाडमध्ये एका सभेसाठी आलेल्या शिवसेनाप्रमुखांचे त्यावेळचे छायाचित्रही यावेळी शिवाजी चौकात झळकावण्यात आले होते.

कर्जत, नेरळमध्ये बंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही काळ कर्जत तालुक्यात वास्तव्य केले होते. त्यामुळे येथील शिवसैनिकांचे त्यांच्याशी वेगळे नाते आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेकडून कोणत्याही बंदचे आवाहन करण्यात आले नव्हते. मात्र तरीही तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. कर्जत व नेरळमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला. कडाव, कशेळे, कळंब, डिकसळ येथील बाजारपेठाही तत्काळ बंद ठेवण्यात आल्या. नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने सकाळपासून टॅक्सी वाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांचे हाल झाले.

राज्यात सर्वत्र बंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शनिवारी दुपारी निधन झाल्याचे वृत्त समजताच राज्यात सर्वत्र सायंकाळपासूनच उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. शोकाकुल नागरिकांनी रविवारीही व्यवहार बंद ठेवून शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण केली. रविवार असल्याने कार्यालये बंदच होती, मात्र शहरातील बाजारपेठा, वाहतूकही बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.

अहमदनगरमध्ये शिवसेनेचे कार्यालय असलेल्या शिवालयाचा परिसर, नेता सुभाष चौक, कापडबाजार, घासगल्ली, दिल्ली दरवाजा, माळीवाडा, एसटी बस स्टँडचा परिसर या नगर शहरातील मध्य भागाबरोबरच उपनगरी परिसरातही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद केली. रविवारी सकाळीदेखील शहरातील विविध चौकांमध्ये ठाकरे यांना आदरांजली अर्पण करणारे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले. तसेच शहरातील सर्व व्यवहार कडकडीतपणे बंद ठेवून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

अमरावतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली म्हणून रविवारी येथील बाजारपेठ बंद होती. रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. जिल्ह्यातील बहुतांश शिवसनिक, नेते आणि पदाधिकारी मुंबईला बाळासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी गेले आहेत. शहरातील बाजारपेठ उघडलीच नाही, चिल्लर बाजारही भरला नाही. अनेकांनी बाळासाहेबांचे अंतिम दर्शन, महायात्रा घरीच बसून टीव्हीवर बघण्यात धन्यता मानली.

शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषिक युवा आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलेल्या बेळगाव बंदच्या हाकेला बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बेळगाव शहर आणि परिसरातील जनतेने व्यवहार बंद ठेवले. विविध संघटनांनी धर्मवीर संभाजी चौकात जमून दोन मिनिटे मौन पाळून ठाकरे श्रद्धांजली वाहिली. रविवार पेठ, नेहमी वर्दळ असणा-या, गणपत गल्ली, मरतीगल्ली, खडे बझार, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली येथील व्यापा-यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. शहरातील प्रमुख चौक राणी कित्तूर चानाम्मा चौकात अत्यंत तुरळक वाहतूक दिसून येत होती.

उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यवहार रविवारी बंद झाले. स्वयंत्स्फूर्तीने जिल्ह्यातील व्यापा-यांनी रविवारीदेखील कडकडीत बंद पाळून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात रविवारी सकाळी शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस आदी राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. रविवारी उस्मानाबाद शहरात आठवडी बाजार भरतो. परंतु आज रविवार असूनदेखील शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे येथील आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून येत होता. तालुक्यातील बेंबळी येथे शिवसनिकांनी बाजारपेठेत फेरी काढून बंदचे आवाहन केले. तुळजापुरात सर्वपक्षीय सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेपूर्वी शहरातून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. परंडय़ात, भूम, लोहारा, वाशी, नळदुर्ग, अणदूरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बारामतीत सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. शनिवारी सायंकाळपासूनच या परिसरातील संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील गजबजलेले रस्ते ओस पडले होते. नागरिक आणि व्यापा-यांनी स्वयंत्स्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याचे चित्र होते. सुमारे ४ ते ५ हजार कार्यकर्ते रविवारी मुंबईला अंत्यविधीसाठी रवाना झाले. शहरात शिवसेना प्रमुखांना फ्लेक्स लावून अनेक ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती नगरपालिकेसमोरील मैदानात ही शोकसभा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापा-यांनी दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीड आणि लातूर जिल्ह्यात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील मुख्य परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राज्य राखीव दल व दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. बीडमध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास एका बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे रविवारी पोलिस बंदोबस्तात एसटी बस शहराबाहेर पाठवण्यात आल्या.

रविवारचा घटनाक्रम

  • राज ठाकरे मातोश्रीवर आले : ७.३४
  • अंत्ययात्रेला सुरुवात ९.२४
  • माहीम कॉजवे सकाळी ११.००
  • माहीम बस आगार : ११.३०
  • सेंट मायकल चर्च : ११.४०
  • शीतलादेवी मंदिर : १.०५
  • सिटीलाईट सिनेमा येथे पुष्पवृष्टी : १.५४
  • राजाबढे चौक : २.३०
  • शिवसेना भवनसमोर : ३.१५
  • शिवसेना भवनात अंत्यदर्शन : ३:३०
  • शिवसेनाभवन येथून शिवतीर्थावर महायात्रेस सुरुवात: ४:००
  • शिवतीर्थावर महायात्रा दाखल : संध्याकाळी ५.३०
  • पोलिसांची मानवंदना : ६.००
  • अंत्यसंस्कार : ६.१५

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version