Home कोलाज मानवी मनाचं दर्शन

मानवी मनाचं दर्शन

2

आयुष्यात कळत-नकळत निर्माण होणा-या नातेसंबंधांवर भाष्य करताना, कालबाह्य सामाजिक रूढी, परंपरा यांवर कथांच्या माध्यमातून लेखिकेने अचूकपणे बोट ठेवलं आहे.

माणूस गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाचं आपलं असं एक जग असतं. त्या जगात जो-तो आपापल्या परीनं मोठं होण्यासाठी संघर्ष करत असतो. अशा प्रकारे जगत असताना प्रत्येकाला येणारे अनुभवही वेगळे असतात. यात पुरुषांपेक्षाही स्त्रीचं जगणं अधिक संघर्षमय असतं, कारण तिला सामाजिक, सांस्कृतिक बंधनात राहून संघर्ष करायचा असतो. त्यातूनही काही स्त्रिया अतिशय जिद्दीनं समोर असेल तशा परिस्थितीशी लढा देत आयुष्याला सामोरं जातात आणि स्वत:चं असं मानाचं स्थान निर्माण करून जगतात. अशाच काही स्त्रियांचा, स्त्री-पुरुषांमधील नातेसंबंधांचा, त्यांच्या विश्वाचा मागोवा लेखिका शीतल साळुंखे यांनी आपल्या ‘अंतरीचा निनाद’ या कथासंग्रहातून घेतला आहे.

‘अंतरीचा निनाद’ या पुस्तकात सोळा कथा आहेत. त्यातली पहिलीच कथा आहे निनादची. अतिलाडाने वाया गेलेल्या मुलाची कथा मांडत असताना, त्यांनी दुसरीकडे एका मूलबाळ नसलेल्या जोडप्याची वेदना आणि त्यामागील सामाजिक पार्श्वभूमी रेखाटली आहे. ‘वंचना’ कथेतून एका पुरुषाची होणारी घुसमट, समाजमान्यता नसणारा कुमारी मातेचा प्रश्न आपल्या कथेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बायकांच्या मनात अनेक सुप्त इच्छा असतात, कधीतरी सगळी सामाजिक बंधन झुगारून देऊन बायका जी काही धमाल करतात, ती गंमत त्यांनी ‘गटारी.. लेडीज स्पेशल’ मध्ये मांडली आहे. परंतु ‘स्त्री’ म्हणून जगताना प्रत्येकीलाच काही ना काही व्यथा-वेदना आहेत, त्यामुळे या गमतीलाही एक दु:खाची किनार आहे. ‘नात हवी’ कथेत एका घरजावयाचा प्रवास रंजकतेनं मांडला आहे. नेहमी मुलगी लग्न होऊन सासरी जाते, मात्र इथे मुलगाच मुलीच्या घरी राहायला आला आहे. ब-याचदा ‘नातू हवा’ म्हणून सासरी सुनेचा छळ केला जातो. इथे मात्र, जावयाचा ‘नातच हवी’ म्हणून छळ केला जातोय. खूपच मजेशीर अशा या कथेत समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब अधोरेखित केलेलं वाचायला मिळतं. एका हुंडाबळीची वेदना भोगलेल्या मुलीची आणि तिच्या आईची कथा ‘प्रतिशोध’ या कथेतून मांडली आहे. ‘समद्विभुज त्रिकोण’ ही कथा स्त्री-पुरुष यांमधील बदलत्या नातेसंबंधावर भाष्य करते. ‘वटपौर्णिमा’, ‘खेळ नियतीचा’, ‘शून्यातून शून्याकडे’, ‘सीने में सुलगते है अरमॉँ’, ‘विवेक’, ‘कथा एका लेखिकेची’, ‘भाजीवाली आजी’ अशा विविध कथांमधून लेखिकेनं मानवी स्वभावाच्या विविधांगी पैलूंचं दर्शन घडवलं आहे.

लेखिका स्वत: राज्य सरकारच्या विक्रीकर विभागात राजपत्रित अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळत त्यांनी अनेक काव्य, लेख, कथा लिहिल्या आहेत. अनेक स्पर्धामधूनही त्यांनी सहभाग घेत, त्यात बक्षीसही मिळवली आहेत. ‘अंतरीचा निनाद’ पुस्तकातल्या काही कथा या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. साळुखेंचा हा पहिलाच कथासंग्रह आहे. त्यांचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे. ज्यांना नातेसंबंध वा भावनिक विषयांवर आधारित पुस्तकं वाचायला आवडतात, त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.
अंतरीचा निनाद : शीतल साळुंखे
शुभाय प्रकाशन
पानं : १५२ किंमत : १५० रुपये

2 COMMENTS

  1. Thanks trupti mam, samir karambe sir and prahaar team.

    पहिल्‍या वहिल्‍या कथासंग्रहाचं प्रकाशन झाल्‍यानंतर खूप आनंद झाला. पण आपण या पुस्‍तकाचं परिक्षण करून प्रहारच्‍या कोलाजमध्‍ये स्‍थान दिल्‍यानंतर हा आनंद व्दिगुणित झाला. प्रहार टीमचे खूप खूप धन्‍यवाद.

    Regards,

    शीतल साळुंके.

  2. आपण या पुस्त‍काचं परिक्षण करून प्रहारच्या कोलाजमध्ये् स्थान दिल्या्नंतर पहिल्या वहिल्या कथासंग्रहाचं प्रकाशन झाल्‍यानंतरचा आनंद व्दिगुणित झाला. प्रहार टीमचे खूप खूप धन्ययवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version