Home टॉप स्टोरी मुंबईकरांचा सकारात्मक विचार करू- रेल्वेमंत्री

मुंबईकरांचा सकारात्मक विचार करू- रेल्वेमंत्री

1

भाजपच्या खासदारांनी दबाव आणल्याने मोदी सरकारला आता मुंबईतील उपनगरीय भाडेवाढीबाबत फेरविचार करावा लागणार आहे.

नवी दिल्ली-  भाजपच्या खासदारांनी दबाव आणल्याने मोदी सरकारला आता मुंबईतील उपनगरीय भाडेवाढीबाबत फेरविचार करावा लागणार आहे. मुंबईकरांच्या भावना लक्षात घेऊन रेल्वे भाडेवाढीबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे.

रेल्वे भाडेवाढीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे मुंबई- ठाण्यातील दहा खासदार रेल्वेमंत्र्यांच्या भेटीसाठी मंगळवारी दिल्लीत आले होते. खासदार आणि महायुतीच्या वतीने दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री गौडा यांच्याशी केलेल्या चर्चेत रेल्वे भाडेवाढ कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली.

रेल्वेमंत्री गौडा यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून येत्या काही दिवसातच याबाबत ते घोषणा करतील, असे भाजप खासदार किरीट सोमैय्या यांनी सांगितले.

या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचीही भेट घेतली. त्यांनीही टप्प्याप्प्याने भाडेवाढ कमी करु, असे आश्वासन दिल्याचे खासदार सोमैय्या यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १४.५ टक्के रेल्वे भाडेवाढ केली आहे. याविरोधात मुंबई आणि ठाणे परिसरातील सर्व खासदार रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या भेटीला गेले. या खासदारांच्या शिष्टमंडळात पियूष गोयल, खासदार रामदास आठवले, आमदार आशिष शेलार, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आदी भाजप नेते हजर होते. रेल भवनमध्ये सकाळी दहा वाजता झालेल्या बैठकीत मुंबईत रेल्वेच्या मासिक पासच्या किंमतीत दोन ते अडीचपट वाढ झाली आहे. जी खूपच अनाठायी असल्याचे शिष्टमंडळाने रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी यात लक्ष घालून रेल्वे भाडेवाढीबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी भाडेवाढ मागे घेण्याबाबत मात्र कोणतेही संकेत दिले नाहीत.

रेल्वे खात्याने पासच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ केल्याने सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचे आर्थिक नियोजन पार विस्कटून गेले आहे. सीएसटी-ठाणे १९० ऐवजी ४८० रुपये, सीएसटी-कल्याण २८० ऐवजी ६४५ रुपये, चर्चगेट-विरार पाससाठी २८० ऐवजी ६४५ रुपये तर चर्चगेट-डहाणू पाससाठी ४४५ ऐवजी १११० रुपये मोजावे लागणार आहेत. या प्रचंड भाडेवाढीने मुंबईकर संतापले आहेत. तर प्रथम वर्गाच्या प्रवासात दुप्पट वाढ झाली आहे.

[EPSB]

रेल्वेचा नमोब्लॉक

रेल्वेने पहिल्या व दुस-या वर्गाचे मासिक पासाचे दर दुप्पट केल्याने मुंबईकरांच्या संतापाचा कडेलोट झाला असून ही बेसुमार भाडेवाढ २५ जूनपासून होणार आहे.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version