Home क्रीडा आयपीएल मुंबईची गाठ हैदराबादशी

मुंबईची गाठ हैदराबादशी

0

आयपीएलच्या आठव्या हंगामातील आपापल्या शेवटच्या साखळी लढतीत रविवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सची गाठ सनरायझर्स हैदराबादशी पडेल.

हैदराबाद – आयपीएलच्या आठव्या हंगामातील आपापल्या शेवटच्या साखळी लढतीत रविवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सची गाठ सनरायझर्स हैदराबादशी पडेल. बाद फेरीतील आव्हान राखण्यासाठी उभय संघांना विजय आवश्यक असल्याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (उप्पल) रंगतदार लढत अपेक्षित आहे.

हैदराबाद आणि मुंबईचे १३ लढतींमधून प्रत्येकी १४ गुण झालेत. सरासरी चांगली असल्याने सनरायझर्स प्रतिस्पध्र्यापेक्षा वरच्या म्हणजे चौथ्या क्रमांकावर आहे. सलग विजयांनंतर शुक्रवारी बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सकडून डेव्हिड वॉर्नर आणि सहकाऱ्यांना पराभूत व्हावे लागले. रोहित आणि कंपनीने मागील दोन लढतींमध्ये दोन सामने जिंकत दावेदारी कायम ठेवली आहे. यंदाच्या मोसमात उभय संघांमध्ये झालेल्या पहिल्या लढतीत मुंबईने घरच्या मैदानावर बाजी मारली. परिणामी त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. मात्र ‘होम ग्राऊंड’वरील शेवटच्या लढतीत मागील पराभवाचा बदला घेण्यास सनरायझर्स उत्सुक आहेत.

पावसाने व्यत्यय आणलेल्या लढतीत शुक्रवारी बंगळूरुविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. वास्तविक पाहता प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ११ षटकांत केलेल्या ३ बाद १३५ धावा आणि त्यानंतर पावसामुळे नव्याने निर्धारित झालेले लक्ष्य (६ षटकांत ८१ धावा) पाहता हैदराबादला विजयाची संधी अधिक होती. मात्र ष्टिद्धr(164)ास गेल आणि कर्णधार विराट कोहलीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करताना बंगळूरुला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार वॉर्नरसह शिखर धवन, मॉईझेस हेन्रीकेस, इयन मॉर्गन आणि लोकेश राहुलवर यजमानांची भिस्त आहे. मध्यमगती भुवनेश्वर कुमार आणि हेन्रिकेसने गोलंदाजीचा भार वाहिला तरी बंगळूरुविरुद्धच्या पराभवानंतर या दुकलीला वेगवान ट्रेंट बोल्ट, लेगब्रेक करन शर्मा आणि मध्यमगती प्रवीण कुमारकडून चांगली साथ अपेक्षित आहे.

हैदराबादप्रमाणे मुंबईचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या आवृत्तीप्रमाणे खराब सुरुवातीनंतर कामगिरी उंचावत बाद फेरी गाठण्यापासून ते केवळ एक विजय दूर आहेत. अर्थात अव्वल चार स्थानांसाठी सहा संघांत चुरस असल्याने धावगतीही निर्णायक ठरेल. मागील लढतीत गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा विजय माजी विजेत्यांसाठी ‘लाईफलाईन’ ठरला तरी आघाडी फलंदाजांनी सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. कर्णधार रोहित शर्मासह लेंडल सिमन्स आणि कीरान पोलार्डवर मुंबईची सर्वाधिक भिस्त आहे. मात्र पार्थिव पटेल, अंबाती रायडू, हरभजन सिंग आणि हार्दिक पंडय़ा या दुस-या फळीलाही वेळ पडल्यास मोलाचे योगदान देण्याची तयारी ठेवावी लागेल. वेगवान लसित मलिंगा आणि मिचेल मॅकक्लेनॅघन तसेच हरभजनने अचूक मारा केला असला तरी मुंबईला चौथ्या ‘स्पेशालिस्ट’ गोलंदाजाची उणीव भासत आहे. त्यासाठी मध्यमगती आर. विनय कुमार किंवा फिरकीपटू जगदीशा सुचिथला आलटून पालटून वापरले जात आहे. घरच्या मैदानावरील शेवट गोड करणारा मुंबई संघ शेवटच्या लढतीत विजय मिळवून बाद फेरीतील स्थान निश्चित करतो का, याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

वेळ : रा. ८ वा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version