Home वाचकांचे व्यासपीठ जबाबदारी सर्वाची

जबाबदारी सर्वाची

2

‘नेमेची येतो पावसाळा’.. आणि हा पाऊस मुसळधार व संततधार असेल शहर आणि उपनगरांतील सखल भागांसह अनेक भागांत पाणी हमखास तुंबतेच. रेल्वेची, रस्ते वाहतुकीची वाट लागते. त्याचा फटका प्रवाशांना बसतो.  मुंबईत पाणी तुंबण्यास नक्की जबाबदार कोण? यावर वाचकांनी पाठवलेली मते… 

पाणी निच-यासाठी नियोजन हवे
समुद्र सपाटीपासून एक मीटर उंचीवर मुंबई वसली आहे, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले आहे. यामुळे मुंबईच्या सखल भागांत पाणी साठणार यात तथ्य आहे का? समुद्रात येणारी भरती आणि समुद्रात उसळणा-या लाटा यामुळे गटारातील पाण्याचा निचरा होत नाही. पाणी तुंबले जाते. हे जरी मान्य केले तरी पाणी तुंबण्याच्या घटना दरवर्षी घडतात. २००५ मध्ये मुंबई जलमय झाली होती, त्या वेळी पडलेला पाऊस आणि मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची हे पाणी वाहून नेण्याची क्षमता यात अंतर असल्यामुळे शहरात पाणी साठले, असे निदान काढले होते. परंतु नाल्यात वाहणारे रोजचे पाणी, पावसाळय़ातील पाणी, समुद्रातील भरती आणि उसळणा-या लाटा, यामुळे निसर्गावर होणारे परिणाम आदींचा विचार करून पाणी निचरा व्यवस्थेचे नियोजन कायमस्वरूपी करणे गरजेचे आहे.- हरीश बडेकर, मुंबई


नालेसफाईसाठी पुरेसे कर्मचारी नाहीत

मुंबईत पावसाचे पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाल्यावर सर्वसाधारणपणे महापालिकेलाच जबाबदार धरले जाते. महापालिका, रेल्वे, सरकारच्या नावाने शंख करणारे त्याची इतर कारणे लक्षात घेत नाहीत. ३०-४० लाख लोकसंख्येस योग्य असणाऱ्या मुंबईत सव्वा कोटी नागरिक राहतात. यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी पुरेसे आहेत का, याचा विचार कोण करणार? महापालिका मुंबईतील प्रत्येक गटार, नाले पाऊस पडण्याच्या आदल्या दिवशी साफ करू शकत नाही. पावसाळय़ापूर्वी नालेसफाईचे काम हाती घेते, ते काम १०० टक्के चांगले होत नसेलही; पण एकदा नाले, गटारे साफ केल्यावर नागरिकांनी त्यात गोण्या भरून, प्लॅस्टिक पिशव्या भरून कचरा टाकला तर गटारे, नाले तुंबणारच. मग ती जबाबदारी पालिका, रेल्वे, शासनाची की बेशिस्त नागरिकांची? नको असलेली प्रत्येक वस्तू लोक गटारात टाकतात. त्यात प्लॅस्टिक, लाकडी, काचेच्या वस्तूंपासून पलंगावरील गाद्याही असतात. तरीही पुन्हा पाणी तुंबल्यावर महापालिकेच्या नावानेच बोंब मारणार. किती नागरिक मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ओला-सुका कचरा वेगळा ठेवतात? किती लोक वस्तूंचा पुनर्वापर करतात? बेशिस्त, बेजबाबदार नागरिकांमुळेच असे घडते. स्वच्छता, सुरक्षा यांचा बोजवारा न होण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची.- मनमोहन रोगे, ठाणे


एकमेकांना मदत करा

‘मुंबईत पाणी तुंबण्यास नक्की जबाबदार कोण,’ या प्रश्नाचे सरळ व साधे उत्तर आहे आपण सर्वच जण! विरोधकांनी महापालिकेवर, रेल्वेवर अथवा सर्वसामान्य लोकांनाच लक्ष करणे योग्य नाही. खरंतर जुन्या ‘रोटी’ सिनेमातील संवादाप्रमाणे ‘जिसने पाप ना किया हो वो पापी न हो!’ तोच चिखलफेक करण्यास पात्र आहे, आजतरी अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. तू किंवा मी न करता अपण सर्व आपल्या परीने प्रयत्न करू या. अशा परिस्थितीत एकमेकांना साह्य करण्याची जी मुंबईची रीत आहे तीच पुढे चालू ठेवून प्रत्येकाने मदतीस तयार रहावे त्यातच शहाणपण आहे.- पी. दीपक, अंधेरी


यंत्रणांमध्ये समन्वय हवा

पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबई व उपनगरांत ठिकठिकाणी पाणी तुंबले नाही, तर त्याच स्पष्ट अर्थ असा की, मुंबई महापालिका, पश्चिम व मध्य रेल्वेने आपापली पावसाळीपूर्व कामे चोखपणे पार पाडली. परंतु दुर्दैवाने ‘नेमेचि येतो पावसाळा’च्या धर्तीवर पाणी तुंबण्याच्या बाबत ‘भय इथले संपता संपत नाही..’ असेच दरवर्षी म्हणण्याची वेळ नागरिकांवर येते आणि त्याचक्षणी कामे व्यवस्थित पार पडल्याची या सर्व यंत्रणांनी दिलेली आश्वासने पाण्याच्या पुरात वाहून जातात! विशेष लक्षणीय बाब म्हणजे, या परिस्थितीत आजवर कधीच खंड पडलेला नसल्याने जनतेचा आश्वासनांवरचा विश्वास पार उडून गेला आहे. खरं तर या परिस्थितीला कोणा एका यंत्रणेला जबाबदार धरणे चुकीचे होईल; कारण उपरोक्तसंबंधित यंत्रणांपैकी एकाने जरी कामचुकारपणा केला, तरी बाकीच्यांची तत्परता निर्थक ठरते. या उपरोक्त प्रत्येक यंत्रणेतील उच्च कुशल व कार्यतत्पर तंत्रज्ञांची व अधिका-यांची उच्चस्तरीय समिती नेमून तिला अत्यावश्यक ते अधिकार बहाल केले जावेत. या समितीने दरवर्षी पावसाळय़ापूर्वी सहा महिने अगोदर अत्यावश्यक ती सर्व कामे पार पाडावीत. पाणी न तुंबण्याची जबाबदारी या समितीवरच राहील. या समितीला सहकार्य न देणा-या प्रत्येक यंत्रणेतील अधिका-यांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार समितीला बहाल करावेत. – मधुकर ताटके, डोंबिवली (पू.)


कामचुकार अधिकारीच जबाबदार

स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांच्यात असणाऱ्या ‘मैत्रीपूर्ण व अर्थपूर्ण’ घरोब्यामुळे आणि विरोधकही निष्क्रिय व मूक बनल्यामुळे, या सर्वानाच आपल्या मूळ कर्तव्याचा विसर पडला आहे. कर्मचारी कामचुकार झाले आहेत. मुंबईचा मूलभूत प्रश्न-स्वच्छता व नालेसफाई हा विषय सातत्यानं व गांभीर्याने हाताळला जात नसल्यामुळे पावसाळय़ात शहरात पाणी तुंबून असाधारण परिस्थिती निर्माण होणं नित्याचंच झालं आहे. या वर्षीही पावसामुळे मुंबई ठप्प होण्याचा आणखी एक विक्रम झाला आहे. दुसरं असं की, अल्पसंतुष्टपणा व धरसोडवृत्ती हा आपला स्थायीभाव. एखाद्या समस्येचं तात्पुरतं निराकारण झालं की, आम्ही (सर्वच) आमचा शब्द, लक्ष, ध्येय ही विसरतो. ‘तहान लागल्यावरच नव्हे, तर तहान भागल्यावरही आपण विहिरींकडे नीट लक्ष ध्यायला पाहिजे’, याची आम्हाला जाण नाही. नागरिकही स्वच्छता व कच-याच्या विल्हेवाटीसंबंधी जागरूक नाहीत. एक सक्षम कायमस्वरूपी यंत्रणा उभारून, उपाययोजना व प्रत्यक्ष कृतीची तपासणी व देखभाल सातत्यानं केल्यास ही समस्या कायमस्वरूपी सुटू शकेल. त्यात नागरिकांचा सहभाग, उत्तरदायित्वाची भावनाही तितकीच महत्त्वाची आहे. – सी. बावस्कर, परळ


सफाई यंत्रणाच कोलमडली आहे

मुंबईत सखल भागात पाणी साचणे नवे नाही. दरवर्षी ते पाणी साचेलच ही कल्पना पालिका प्रशासनास आहे. तरीही सफाईसाठी महापालिका कोटय़वधी रुपये ‘पाण्यात’ घालते. ठिकठिकाणचे कच-याचे ढीग उचलले जात नाहीत. भूमीगत गटारांची सफाई न केल्याने गटारे कच-यामुळे बंद झाली आहेत. पाणी साचल्यानंतर पाणी उपसा पंप असून काही नादुरुस्त तर डिझेलअभावी बंद. रस्त्यावरील कचरा वेळोवेळी उचलणे ही जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांची आहे. कचरा, घाण यापासून ज्या साथीचा प्रसार होतो, त्यासाठी नागरिक, सामाजिक संघटना यांनी कचरा व पाणी साचणे यावर काही पर्याय असल्यास पालिका अधिका-यांना सुचवावेत, हीच अपेक्षा.- हरिभाऊ खरनार, उल्हासनगर


आपणच जबाबदार

‘‘मुंबईत पाणी तुंबण्यास मानव जबाबदार आहे. मानवाची कृती घातक आहे. मुंबईत साक्षरतेचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असूनही मानव कचरा, दगडमाती, प्लॅस्टिक, धनपदार्थ नकळत गटारात, नाल्यात टाकतो. नाल्यात – गटारात घनपदार्थ टाकू नये. घाण करू नका. पदपथावर टपऱ्या, दुकाने थाटू नका. मोकळय़ा जागा बळकावू नका, असे सांगण्याची गरज नाही. मानवच निसर्गाला आव्हान देतो आहे. निसर्गाने एक झटका दिला तर नाकातोंडात पाणी जाईल, याचे भान ठेवावे. लुटमारीचा हव्यास सोडा, निसर्गाची तत्त्वे पाळा. त्यातच सर्वाचे भले आहे. नाले-गटारे पावसाळय़ाअगोदर साफ-सफाई करण्यासाठी मोठय़ा मोहिमा आखल्या जातात. रेल्वे हद्दीतील साफसफाई, गटारे-नाले कंत्राटदारांना काम दिले जाते; पण कंत्राटदार बेबनाव करतो, तो वरुणराजाची वाट पाहतो. वरुण राजा प्रसन्न होतो, तेव्हा संपूर्ण शहर जलमय होऊन स्वच्छ होते. मुंबईत रेल्वेचे सत्तर लाखांहून अधिक प्रवासी आहेत. त्याच्या भवितव्याची चिंता कोणाला नाही. रेल्वे हद्दीत आजूबाजूचे लोक घनकचरा टाकतात; पण त्यांच्यावर कारवाई कोणी करत नाही. ‘पाणी’ निसर्गाचे ‘दान’ आहे, त्याचा योग्य मान राखला जावा, त्याच्या मार्गात मानवाने अडथळा आणला तर तो सहन करीत नाही, याचे भान सर्व संबंधितांनी ठेवावे.’’- महादेव गोळवसकर, घाटकोपर


नालेसफाईचा निधी वाया

दरवर्षी उन्हाळ्यात महापालिका, एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाकडून नालेसफाईसाठी बराच निधी खर्च होऊनही पावसाळ्यात पाणी तुंबल्यावर त्याचे राजकारण करून परस्परांवर आरोप- प्रत्यारोप केले जातात. सर्व यंत्रणांमधील बोकाळलेला भ्रष्टाचार व वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील अर्धे नाले बुजलेले व अर्धे वाहते असून, नालेसफाई ही फक्त यंत्रणांची जबाबदारी असल्याचा नागरिकांचा गैरसमज आहे. प्लॅस्टिक बंदी फक्त कागदावर राहिल्याने प्लॅस्टिकच्या पिशव्या नाले तुंबण्यास मदत करतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक बालकावर शैक्षणिक संस्थांमधून शहरही स्वच्छ ठेवण्याचे संस्कार केले पाहिजेत. तसेच नागरिकांनी माहितीच्या अधिकारामार्फत नालेसफाईवर नियंत्रण ठेवावे. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम


सर्वत्र भ्रष्टाचार

मुंबई शहरातील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे भरणी, रेल्वे मार्गाजवळ साचलेला कचरा, गाळ काढणे ही प्राथमिक कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे हे महापालिकेचे अत्यंत गरजेचे काम आहे. ‘तहान लागली की विहीर खणा’ हा पालिकेचा नियम झाला आहे. नाल्यातून काढलेला गाळ काळजीपूर्वक उचलला गेला तर नालेसफाईची कामे शंभर टक्के पूर्ण होतात. नालेसफाई करताना रस्त्यावर ठेवलेली घाण दहा-दहा दिवस उचलत नाही. तीच घाण व कचरा पुन्हा नाल्यात जातो. आजूबाजूला दरुगधी पसरलेली असते. यामुळे मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो व डेंग्यू साथींची लागण होते. महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे. त्यामुळे पालिकेने कितीही नालेसफाई केल्याचे दावे केले तरी नेहमीच फोल ठरतात हा इतिहास आहे.- रामचंद्र मेस्त्री, चेंबूर


३६५ दिवस सफाई मोहीम राबवा

प्रत्येक वर्षी पावसाळ्याआधी दोन्ही रेल्वेच्या हद्दीत आणि शहर व उपनगरात नालेसफाई पूर्ण झाल्याने यंदा कुठेही पाणी साचणार नाही, असा डंका रेल्वे आणि महापालिका नेहमीच पिटते. हे दावे धादांत खोटे असतात, हे पहिल्याच पावसात विस्कळीत झालेल्या जनजीवनातून स्पष्ट जाणवते. साधारण २० टक्के नालेसफाई आणि गटांरातील कचरा काढण्याचे देखावे घाईगर्दीत करून तो कचरा नाल्यांच्या बाजूला इत:स्तत टाकून कंत्राटदार निघून जातो. स्थानिकांनीही प्रशासनाच्या नावाने बोटे मोडण्यापूर्वी आपण स्वत:ही कर्तव्यात कशी कुचराई करतो हे पाहावे. जागोजागी पडलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, पावलापावलावर साचलेले कच-याचे ढीग, मिनरल वॉटर-कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांमुळे ठिकठिकाणी गटारे तुंबतात, याचा कोणीच विचार करताना दिसत नाही.- दिलीप अक्षेकर, माहीम


प्लॅस्टिकबाबत पालिका हतबल

पर्यावरणासाठी घातक ठरणा-या प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकाही अपुरी पडत आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनामध्ये प्लॅस्टिकच्या वर्गीकरणाची समस्या, नागरिकांच्या सहकार्याचा अभाव, प्लॅस्टिक बंदीच्या आदेशाला विक्रेत्यांकडून दाखविली जाणारी केराची टोपली, महापालिकेने केलेली प्लॅस्टिक बंदी या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ‘प्लॅस्टिक मुंबई आणि पर्यावरण’ या विषयावर परिसंवाद घ्यावा व लोकांमध्ये जनजागृती करावी.- शालडन रॉड्रिग्ज, विरार


ठोस उपाय हवेत

पावसाळय़ात मुंबई जलमय होते, हा दरवर्षीचा अनुभव मुंबई महापालिका, रेल्वे आणि मुंबईकरांना आहे. तरी यंदा या दोन्ही प्रशासनांचा नालेसफाई, गटारे सफाई दावा पहिल्याच पावसाने फोल ठरविला आहे. मुंबईच्या सखल भागांसह हिंदमाता, परळ, दादर आणि शीव आदी भागांत पाणी हमखास तुंबतेच. त्याचा फटका सर्वाना बसतो, हे कित्येक वर्षे महापालिकेस माहीत आहे. यासाठी अजूनही उपाय का सापडत नाही, त्याचे आश्चर्य वाटते. मुंबई शहरातील गटारे ‘अंडरग्राउंड’ केल्याने हा प्रश्न सुटू शकतो. पाणी खेचण्याचे मोठ्या क्षमतेचे पंप अथवा मशिनवर अनाठायी खर्च करण्यात अर्थ नाही. मुंबई जलमय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे आणि सर्वसमान्यांनी ठोस उपाययोजना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. – नारायण पन्हाळेकर, काळाचौकी


प्रशासनाबरोबर लोकही जबाबदार

मुंबईत पाणी तुंबल्यास रेल्वे प्रशासन व महापालिकेइतकेच काही प्रमाणात लोकही जबाबदार आहेत. मुळातच या बाबींकडे गांभीर्याने बघितलेच जात नाही. लोक चार दिवस ओरडतील व गप्प बसतील ही रेल्वे व महापालिका प्रशासनाची मानसिकता बनलेली आहे. मुंबईतील गटारे, नाले यांची व्यवस्थित व वेळेवर साफसफाई झाली तर पाणी तुंबणार नाही. लोकांनीही रेल्वे लाइन, गटारे व नाल्यांमध्ये कचरा टाकू नये. रेल्वेमार्ग, गटारे व नाले ही कचरा टाकण्याची जागा नाही, हे लोकांनी पक्के मनावर बिंबविले पाहिजे. प्लॅस्टिकचा वाढता वापर हेही पाणी तुंबण्यास कारणीभूत आहे. लोकांनी नाल्यांची ‘कचरपट्टी’ करून ठेवली आहे. थोडी तसदी घेऊन लोकांनी कचरापेटीचा उपयोग केला तर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर होईल व पाणी तुंबण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल.- मिलिंद मोहिते, दादर


पालिकेने गांभीर्याने विचार करावा

पावसाळय़ात मुंबईतल्या सखल भागांत पाणी साचून मुंबई जलमय होण्याचा प्रकार दरवर्षीच घडतो. नालेसफाई होऊनही पाणी का तुंबते याची कारणेही माहीत आहेत. मात्र ती दूर करण्याचे धाडस पालिकेने दाखवायला हवे. पावसाळा आला की, जोरदार पावसाच्या लोंढय़ामुळे उंचवटय़ांवरचा, डोंगर भागात वर्षभर खचून राहिलेला कचरा, माती गटारात घुसते आणि पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद होतात. पालिकेची जबाबदारी आहे ती ज्या ठिकाणी अडगळीला कचरा टाकला जातो, त्या ठिकाणच्या रहिवासी मंडळांना नोटिस देऊन तो कचरा, माती कचरापेटीपर्यंत टाकण्यास सांगितले पाहिजे. खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवला जातो का? हे पाहायला हवे. – आनंदराव खराडे, विक्रोळी


मानसिकता बदला

‘नेमेचि येतो मग पावसाळा.. हे दरवर्षी ठरल्याप्रमाणे! पाऊस कुठे कमी, कुठे जास्त, मात्र यंदाचा पाऊस रेकॉर्डब्रेक आहे; जरा संततधार राहिली की, मग पाणी सर्वत्र तुंबण्यास सुरुवात होते. परंतु पाणी भरण्यास सर्वच जण जबाबदार आहेत, कामचुकारपणा वाढला आहे. जबाबदारीची जाणीव नाही. नाले-गटारे साफ केली की, नागरिकांनी त्यात पुन्हा कचरा टाकायचा, पुन्हा वर बोलायला तयार. शेवटी निसर्गापुढे माणूस पालापाचोळा आहे. तरीही सर्वानी पाणी साठू नये म्हणून कचरा बाहेर टाकू नका, प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, यासाठी सर्वानी मानसिकता बदलायला हवी!- सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी पूर्व


निष्काळजीपणाचा कळस !

खड्डे व नाल्यातील गाळ व्यवस्थित साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी योग्यरीत्या प्रवाहित न होता, ते तुंबून राहते व वाहतुकीस अक्षम्य खोळंबा होतो. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचते. हे साचलेले पाणी महापालिकेच्या नाल्यामध्ये सोडले जाते; पण पालिकेचे नालेच स्वच्छ न केल्यामुळे त्यातलेच पाणी रेल्वेच्या रुळांवर आल्यामुळे रेल्वे मार्ग विस्कळीत झाले. याचाच अर्थ पावसाळय़ापूर्वी तयारी करताना रेल्वे प्रशासनाने या बाबींकडे लक्ष दिले नाही, हे उघड आहे. नालेसफाई करून पावसाचे पाणी भुयारी गटारामार्फत नेता येईल, अशी योजना करायला हवी.- राजा मयेकर, लोअर परळ


प्लॅस्टिक विरोधातील मोहीम तात्पुरती

महापालिका व रेल्वे प्रशासन नालेसफाई पूर्ण झाल्याचे सांगते. याचे कारण त्यांनी ते काम विश्वासाने कंत्राटदारांवर सोपविलेले असते; परंतु कंत्राटदार आपल्या कामाशी किती प्रामाणिक असतो, हा प्रश्नच आहे. कोणत्याही प्रकारची तपासणी किंवा नालेसफाई व्यवस्थित झाल्याची खातरजमा पालिकेकडून होत नाही. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याची नालेसफाईची देखभाल करण्यासाठी नेमणूक झालीच तर कंत्राटदार व अधिकारी यांचे साटेलोटे होऊन नालेसफाईच्या कामाचा नुसता उरक केला जातो. प्लॅस्टिकच्या विघटन न होणाऱ्या पिशव्यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर महापालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांच्या विरोधात मोहिम उभारली होती. पालिकेच्या कार्यालयातही प्लॅस्टिक पिशव्या घेऊन जाण्यास मनाई केली जात होती; परंतु काही कालांतराने पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या..!’- नरेश नाकती, टिटवाळा (प.)


नैतिक जबाबदारीचा विसर

पाणी तुंबण्याच्या बाबतीत तटस्थपणे आणि वास्तववादी भूमिकेतून पाहिले तर यासाठी नागरिक प्रशासनामधील संबंधित यंत्रणा, मग ती महापालिका वा रेल्वे असो, हे सर्वच जबाबदार आहेत; परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे हे घटक आपली जबाबदारी विसरून दुस-यावर जबाबदारी ढकलतात. आपणही नागरिक या नात्याने आपली नैतिक जबाबदारी विसरून गटारात, नाल्यात, नदी किंवा समुद्रकिनारी कचरा, पिशव्या अगदी बिनधास्तपणे फेकत असतो. याच पिशव्या गटारात, नाल्यात अडकून पाणी तुंबते आणि ते रस्त्यावर येते आणि त्यानंतर ते घरात शिरते. आपले शहर स्वच्छ ठेवण्याच्या आपल्या जबाबदारीला हरताळ फासून ती महापालिकेवर ढकलून मोकळे होतो. महापालिकेने आणि लोकांनीही आपापल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत. पालिकेने नालेसफाई व्यवस्थित केली पाहिजे आणि लोकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या गटारात, नाल्यात फेकता कामा नयेत. – प्रमोद कडू, पनवेल


ठेकेदाराची बेपर्वा वृत्ती कारणीभूत

पावसाला सुरुवात झाली, पाऊस धो धो सुरू झाला, रस्ते, गटारे तुडुंब भरून वाहू लागल्यावरच पालिका अधिकाऱ्यांना व नगरसेवकांना जाग येते. सर्वसाधारणपणे पावसाळा जूनमध्ये सुरू होतो. त्याआधी कमीत कमी दोन महिने आधी गटारांची साफसफाई, मोठय़ा नाल्यांतील गाळ काढून स्वच्छ करणे तसेच जनतेलाही कचरा, कचरापेटीत टाकण्याचे आवाहन करणे इ. गोष्टी आवश्यक असताना महापालिकेस पावसाळा सुरू झाल्यावरच जाग येते. उशिरा सुरू झालेल्या नाल्यांच्या सफाईत ठेकेदार व प्रशासन यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे पाणीच पाणी व घाणच घाण हिंदमाता, परळ, दादर,अंधेरी सब वे येथे साठते. पाण्याचा उपसा करणारे पंप बंद असल्याचे पावसाला सुरू झाल्यावर अधिका-यांच्या लक्षात येते. पाणी भरल्यास, तुंबल्यास पालिकेने १९१६ ही हेल्पलाइन सुरू केली आहे; परंतु तेथे संपर्क साधल्यावर अधिकारी, कर्मचारी प्रतिसादच देत नाहीत. अशा सेवेचा काय उपयोग! – लक्ष्मण टिकार, मालाड


आपण कधी सुधारणार

पाणी तुंबण्याच्या बाबतीत तटस्थपणे आणि वास्तववादी भूमिकेतून पाहिले तर यासाठी नागरिक, प्रशासनामधील संबंधित यंत्रणा, मग ती महापालिका वा रेल्वे असो, हे सर्वच जबाबदार आहेत; परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे हे घटक आपली जबाबदारी विसरून दुस-यावर जबाबदारी ढकलतात. आपणही नागरिक या नात्याने आपली नैतिक जबाबदारी विसरून गटारात, नाल्यात, नदी किंवा समुद्रकिनारी कचरा, पिशव्या अगदी बिनधास्तपणे फेकत असतो. याच पिशव्या गटारात, नाल्यात अडकून पाणी तुंबते आणि ते रस्त्यावर येते आणि त्यानंतर ते घरात शिरते. आपले शहर स्वच्छ ठेवण्याच्या आपल्या जबाबदारीला हरताळ फासून ती महापालिकेवर ढकलून मोकळे होतो. महापालिकेने आणि लोकांनीही आपापल्या जबाबदा-या ओळखल्या पाहिजेत. पालिकेने नालेसफाई व्यवस्थित केली पाहिजे आणि लोकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या गटारात, नाल्यात फेकता कामा नयेत. – प्रमोद कडू, पनवेल


निष्काळजीपणाचा कळस

तहान लागली की विहीर खोदायची या पालिकेच्या सवयीमुळे यंदाही पावसाळ्यात तुंबणा-या मुंबईचे चित्र पाहायला मिळाले, हे आता नव्याने सांगायची गरज उरलेली नाही, खड्डे व नाल्यातील गाळ साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी योग्यरीत्या प्रवाहित न होता ते तुंबून राहिले व वाहतुकीस अक्षम्य खोळंबा झाला. तसेच अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले. हे साचलेले पाणी महापालिकेच्या नाल्यामध्ये सोडले जाते. पण पालिकेचे नालेच स्वच्छ न केल्यामुळे त्यातलेच पाणी रेल्वेच्या रुळावर आल्यामुळे रेल्वे विस्कळीत झाली. याचाच अर्थ पावसाळ्यापूर्वी तयारी करताना रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. पालिका प्रशासनही कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे ना, पालिका प्रशासन, हे खरे दुर्दैव आहे! – राजा मयेकर, लोअर परळ


 पालिका व नेत्यांची करणी

वर्षानुवर्षे हेच रडगाणे पावसाळा आला की मुंबईत गायले जाते. तरीही सरकार, प्रशासन व राजकारण्यांना त्याचे काही घेणे-देणे नाही. याचे एकमेव कारण म्हणजे प्रशासन आणि राजकारण्यात बोकाळलेला भ्रष्टाचार होय. पावसाळा येण्यापूर्वी मुंबई शहरात पाणी तुंबू नये म्हणून गटारे, नाले, मिठी, बोयसर नदी साफ करणे याची तरतूद केली जाते. काम सुरू केल्याचा डंका केला जातो. त्याची पाहणी केल्याच्या चित्रफिती दाखविल्या जातात, पण प्रत्यक्षात काहीच घडलेले नसते. ठेकेदार, राजकारणी, प्रशासन आणि त्यात आता एमएमआरडीएची भर पडली आहे. पावसाळ्याच्या एक वर्ष अगोदर प्रामाणिकपणे नालेसफाई, मिठी नदी सफाई झाली तरी मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार होणार नाहीत. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाने सर्वानाच चांगला हिसका दिला आहे, तरीही आपण जागे होणार नसू तर ते मुंबईकरांचे दुर्दैव होय. – शंकर पानसरे, काळाचौकी


 जबाबदार कोण?

यंदा पावसाच्या पहिल्याच इनिंगमध्ये मुंबई व ठाण्यातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. बळींची आणि जखमींची संख्येनेही शेकडोंचा आकडा पार केला आहे. मुंब्रा, माहीम, दहिसरमध्ये कोसळलेल्या इमारतींचे खरे गुन्हेगार कोण आहेत? त्यांना शिक्षा होणार तरी कधी? धोकादायक नसणा-या इमारतीसुद्धा का पडत आहेत? सध्या मुंबई व परिसरातील बांधकामे विश्वसनीय राहिली नाहीत का? या इमारतींची काळजी घेण्यासाठी नक्की काय करावे? प्रशासनाबरोबरच रहिवाशांनी कोणती पावले उचलली पाहिजेत? पावसाळ्यातील ही पडझड थांबवण्यासाठी काय केले पाहिजे? रहिवासी, विकासक आणि मालकांमध्ये पुनर्विकासावरुन निर्माण झालेल्या वादांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी सरकारने पावले उचलावीत का? … याबाबत वाचकांनी आपली मते सुवाच्य अक्षरात शुक्रवापर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा : शंभर शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा. आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता. तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही नोंदवू शकता.

शब्दमर्यादा : शंभर शब्द.

पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा. आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता. तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही नोंदवू शकता.

प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर, 
नववा मजला, ज्युपिटर मिल्स कंपाउंड, 
लोअर परळ, मुंबई – ४०००१३, 
फॅक्स : ०२२-४०९६९९००.
०२२- ६१२३९९६६

 

2 COMMENTS

  1. जबाबदारी सर्वांचीच – संततधार पावसात सखल भागात पाणी साचणे ही नित्याचीच बाब व्हायला लागली आहे. मुंबई मनपा अथवा रेल्वेने याबाबत कितीही दावे केले तरी नाल्यांची दूरवस्था कायमच असते. रेल्वेलगत असणा-या झोपडपट्ट्यांमधील सांडपाणी, प्लॅस्टिक, कचरा, मलमूत्र हे या नाल्यांतच सोडले जाते. रेल्वे प्रवासीही प्लॅस्टिक, फळांची आवरणे खिडकीबाहेर भिरकावतात यामुळे अस्वच्छतेत अधिकच भर पडते. मुंबई जलमय होण्यास निसर्ग नव्हे तर मानवच जबाबदार आहे. सफाई यंत्रणांना दोष दिला तरी आत्मपरीक्षणही महत्त्वाचे ठरते. कर्तव्य बजावण्यात आम्ही कमी पडतो म्हणूनच प्लॅस्टिकच्या पिशव्या, फळांची आवरणे, भिकारी-फेरीवाल्यांनी केलेला कजरा या सर्वांवरती निर्बंध आणण्याकरिता प्रसंगी दंडात्मक कारवाई केली पाहिजे. वैयक्तिकरित्या प्रत्येक मुंबईकराने निदान स्वतःपासून सुरूवात करत स्टेशन परिसर, रेल्वेगाड्यांमध्ये घाण फेकू नये त्याकरिता जवळ पिशवी बाळगावी. झोपडपट्ट्यांकरिता शौचालये बांधली तरी शीव-माटुंगा दरम्यानचे रोजचे चित्र बोलके आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे रेल्वे आणि मनपा या दोघांनी एकमेकांना दोष न देता समन्वयाने हाती घेतली पाहिजेत. सदर यंत्रणांनी स्टेशन परिसर व रेल्वेत कचरा करणा-यांवर लक्ष ठेवण्याकरिता होमगार्डना अधिकार दिले पाहिजेत. एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट-गाईड्स, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा कृतीशील जनतेचा सहभागही वाढवला पाहिजे. नदी-नाल्यांचे झालेले उकिरडे दूर करण्यास प्रत्येकानेच खारीचा तरी वाटा उचलला पाहिजे. अन्यथा पुन्हा २६ जुलै २००५ पाहणे मुंबईकरांच्या नशिबी येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version