Home कोलाज मुंबईला गरज पर्यायी वाहतूक व्यवस्थेची!

मुंबईला गरज पर्यायी वाहतूक व्यवस्थेची!

1

मुंबई. सात बेटांचं असलेलं हे शहर पुढे ब्रिटिशांच्या ताब्यात आलं व त्यांनी त्याचा कायापालट करायला सुरुवात केली. हा कायापालट इतका होता की, त्या मुंबापुरीची सात बेटंही नष्ट झाली व तयार झालं एक लांबलचक शहर, अनेक उद्योगधंद्यांनी, बंदराने व विमानतळाने या शहराची भरभराट सुरू झाली. ब्रिटिशांनी या मुंबापुरीत अनेक इमारती उभारल्या, बॉम्बे हाय कोर्ट, मुंबई विद्यापीठ, व्हिक्टोरिया टर्मिनस हे स्टेशन आणखी बरंच काही. त्याच बरोबर ब्रिटिशांनी या शहराला एक दूरगामी अशी वाहतूक व्यवस्था दिली. या मुंबापुरीचा मुख्य रस्ता असलेल्या आग्रा रोडच्या आसपास वस्ती वाढायला लागली. त्यानंतर मुंबईत रेल्वे आली. बससेवा सुरू करण्यात आली. ट्राम आल्या. पुढे स्वातंत्र्यानंतरही या शहराचा विकास सुरूच होता. रस्ते बांधले जात होते. रेल्वेसेवा विस्तारत होती. बससेवा अधिकाधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न होत होता. त्यानंतर मुंबईत फ्लायओव्हर आले. सतत वाढत्या या मुंबापुरीसाठी तेही अपूरे पडू लागले व मग मुंबईला अधिक वेगवान व सुखकारक अशा वाहतूकव्यवस्थेचा विचार करावा लागला. त्यातून मग मोनो व मेट्रो सेवा मुंबईत सुरू झाली. मुंबईत या दोन्ही नव्या पर्यायांचं अगदी मनापासून स्वागत झालं आहे. मोनो रेल्वे अर्धवट असली तरी येणा-या काळात जेव्हा ती पूर्ण होईल, त्यावेळी त्याचाही मुंबईकरांना फायदा होणार आहे. मुंबईच्या या गर्दीच्या मानाने याहीपेक्षा अधिक प्रभावी पर्यायी मार्ग निवडावे लागणार आहेत. मुंबईत रस्त्यांचं जाळ जरी असलं तरी आज मुंबईतला एकही रस्ता धड नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचाही परिणाम या व्यवस्थेवर होतो का? मुंबईची गर्दी वाढत गेली तसं तशी अधिक नवीन उपनगरं विकसित होत गेली. त्यांना मुख्य शहराशी जोडण्यासाठी काय काय उपाययोजना करायला हव्यात या विषयावर ‘प्रहार’ने चर्चा आयोजित केली. त्या चर्चेचे हे काही अंश.

मुंबई हे एक जागतिक शहर आहे. या शहराची तुलना जगातल्या अनेक शहरांबरोबर केली जाते, मात्र देशाची अर्थिक राजधानी असलेल्या या शहराची वाहतूक व्यवस्था मात्र अद्यापही परंपरागत आहे. त्यातही गेल्या अनेक वर्षामध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. मुंबईत मोठया प्रमाणावर फ्लायओव्हर आणले गेले तरीही त्यांच्या दुरवस्थेमुळे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फार मोठा फरक पडला नाही. मोठया हौशेने मुंबईत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली तरी याच मेट्रोच्या खालून जाणारा अंधेरी-कुर्ला हा सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता जगातला सर्वात खराब रस्ता असल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. तो सुरक्षितही नाही. मुंबईच्या काही भागांना जलरस्त्याने जोडण्यात येणार असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. मुंबईच्या तिन्ही बाजूला समुद्र असल्याने त्याची उपयुक्तता अधिक असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे. त्यातही गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूपर्यंत अशा प्रकारचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, कालांतराने ते बंद पडले. सध्या बोरिवली वा गोराई ते थेट नरिमन पॉईंटपर्यंत जलमार्ग करण्याविषयीची चर्चा जोरात आहे. त्याविषयीची पुरेशी सजगता नाही. एका बाजूला बॅंकॉक, शांघाय, मकावसारखी लहान शहरंही अनेक नव्या नव्या कल्पनांनी आपली वाहतूक व्यवस्था अगदी सुरळीत करत असताना मुंबई किमान यांचं अनुकरणही का करत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य् करत आहेत. त्यात ज्यांच्यावर मुंबईच्या सध्याच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांचीही मतं या चर्चेत आली आहेत. ती व सर्वसामान्य नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा यांचा एक मेळ चर्चेतून घालण्यात आला आहे. मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने व शहरातल्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने ही चर्चा नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

मुंबईला चांगल्या दर्जाची वाहतूकव्यवस्था हवीच!

मुंबईला पर्यायी वाहतुकीची गरज आहे, असं म्हणण्यापेक्षा मुंबईमध्ये चांगल्या दर्जाची वाहतूक व्यवस्था असणं जास्त गरजेचं आहे. मुंबईत नवीन वाहतूक व्यवस्था येत आहे. म्हणजे मोनो, मेट्रो रेल्वे आली, पण ही सगळी सुधारणा फार उशिरा झाली. दिल्ली शहरात मेट्रो येऊन किती वर्ष झाली आणि त्यानंतर हल्ली हल्ली मेट्रोची सेवा मुंबईत आली. मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. लोकसंख्या इथे मोठी आहे. असं असलं तरी याबाबत तिला योग्य न्याय मिळालेला नाही. आज दिल्ली मेट्रो २०० किलोमीटरचा टप्पा पार करते आणि मुंबईत ही मर्यादा निम्म्याहूनही कमी आहे. आता मुंबईतल्या लोकल ट्रेन सुधारणं, त्यांचा स्पीड वाढवणं तांत्रिक दृष्टया बघायला गेलं तर शक्य नाही. रेल्वे ही मुंबईची लाइफलाइन आहे. यातून प्रवास करणारा वर्ग फार मोठा आहे. लोकल ही प्रत्येक स्टेशनवर थांबते. मध्य रेल्वेचं पाहायला गेलं तर दर दोन किलोमीटरनंतर एक स्टेशन आहे जर जास्त वेग असणा-या ट्रेन इथे आणल्या तर स्टेशन आल्यावर त्याचा वेग कमी करणं कठीण होईल. मग मधली मधली स्थानकंस्किप करावी लागतील, अशी परिस्थिती आहे. मोठया प्रमाणात अर्बन ट्रान्सपोर्ट डेव्हलमेंट होणं गरजेच आहे. पण, यासाठी कोण पुढाकार घेत नाही. हे काही एका झटक्यात होणार नाही. पण, यासाठी आताच प्रयत्न केले तर किमान पुढच्या काही वर्षात आपली ही वाहतूक व्यवस्था उत्तम तर होईलच, पण वाहतुकीच्या होणा-या समस्यादेखील उद्भवणार नाहीत. – नरेश पाटील, जनसंपर्क अधिकारी-मध्ये रेल्वे वाढत्या 

लोकसंख्येला पर्यायी वाहतूक हवीच!

सकाळी जेव्हा कॉलेजसाठी निघतो तेव्हापासून जी सुरुवात होते ती घरी येईपर्यंत. प्रथम बससाठी थांबा, कित्येकवेळाने आलेल्या बसमधल्या प्रचंड गर्दीत कसंबसं चढा. त्या बसच्या जमावाला कमी करता येणार नाही म्हणून आपलं शरीर आखडून उभं राहा. त्या गर्दीतून सुटका होत नाही तितक्यात ट्रेन पकडण्यासाठी पुन्हा एकदा गर्दीचा सामना करत ट्रेन पकडा. बरं, आपण जी रोज ट्रेन पकडतो ती नेहमीच मिळते असं नाही. कित्येकदा ट्रेन इतक्या भरलेल्या असतात की, एक पायसुद्धा राहणार नाही. अशा अवस्थेत चढायचं म्हणजे आपला जीव धोक्यात टाकण्यासारखंच आहे. ही सगळी उदाहरण देण्याचं कारण म्हणजे मुंबईतला प्रत्येक प्रवासी या रोजच्या प्रवासासाठी झुंजत असतो. त्यातील कित्येक जण आपला जीव धोक्यात घालून हा प्रवास करतात, तर कित्येकांचा जीवही जातो. कोणाचा जीव जाण्यापेक्षा पर्यायी वाहतूक केली तर बरंच होईल ना! मेट्रो आणि मोनो सारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेमुळे अनेकांना फायदाच झाला आहे. माझा अजूनही या वाहतूक व्यवस्थेशी संपर्क आला नसला तरी माणसांची संख्या विभागली गेल्यामुळे त्याचा चांगला परिणाम इतर वाहतुकी व्यवस्थेवर झाला आणि अगदी थोडी का होईना गर्दी कमी झाली. यासाठी सरकारनेच सक्षम पावलं उचलणं आवश्यक आहे. कारण, यात सामान्य जनता काहीच करू शकत नाही. तसंच इतर देशातल्या काही नियमांचं अवलंबन आपल्या देशानेही करणं गरजेच आहे. काही देशांमध्ये कार म्हणजेच गाडी विकत घेण्याची कारण तेथील सरकारला सांगावी लागतात. जर त्या देशातल्या सरकारला वाटलं की खरंच त्याला कारची गरज आहे, अशाच व्यक्तीला कार खरेदी करण्याची आणि चालवण्याची परवानगी आहे. त्यातील इतर जनतेने सरकारी वाहतुकीतूनच प्रवास करावा. हा नियम लागू केल्यामुळे ट्रॅफिकसारखी मोठी समस्या निर्माण होत नाही. तसंच तेथील सरकारने केलेल्या योग्य वाहतूक व्यवस्थेमुळे जनतेलाही त्रास होणार नाही. असा विचार आपल्या सरकारनेही करावा. आपल्याकडे जलवाहतुकीचा एक उत्तम पर्याय आहे. सरकारने अशा काही पर्यायी वाहतुकीचा विचार करून ती वाहतूक त्वरित सुरू करावी, अशी अपेक्षा सरकारकडून आहे. – दीशा खातू, कॉलेज विद्यार्थी

सायकलींचा वापर वाढायला हवा!

मुंबईत पर्यायी वाहतूक व्यवस्था हवी का, या प्रश्नाचे उत्तर नक्कीच होय, असे आहे. कारण सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवर एवढा ताण पडला आहे की, विचारण्याची सोय नाही. लोकल ट्रेनने सकाळी कॉलेजला जाताना एवढी गर्दी असते की, पाय ठेवायला जागा नसते. बसचेही तसेच असते. पूर्ण प्रवास उभं राहून आणि धक्के खात करावा लागतो. यासाठी बस आणि रेल्वेला पर्यायी अशी व्यवस्था असायलाच हवी. जलवाहतूक हा अत्यंत चांगला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो, त्याचा विचारही झाला आहे. गोराई ते नरिमन पॉइंट या जलमार्ग लवकरात सुरू केला पाहिजे. या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेवरील ताण मोठया प्रमाणात कमी होइल. यासाठी गोराई, मनोरी, जुहू, दादर या किनारपट्टया विकसित करण्याची गरज आहे. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर इतर दिवशी ही वाहतूक नियमीतपणे चालवण्यास काहीच अडचण नाही. मात्र, या प्रकल्पात सुरक्षेची काळजीही अत्यंत काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे परदेशात ज्याप्रमाणे सायकल ट्रॅक बनवले जातात त्याप्रमाणे आपल्या इथे ही अशी व्यवस्था झाली पाहिजे. मला फ्रान्समधलं एक उदाहरण द्यावंसं वाटतंय. तिथे काही कंपन्या प्रवाशांसाठी खास सायकलींची व्यवस्था करतात. त्या तिथल्या अनेक ठिकाणी कुलुप लावून स्टॅण्डवर लावलेल्या असतात. आपल्याला हवी असेल तेव्हा आपल्याकडे असलेल्या की कार्डने (एटीएम सारख्या कार्डाने) ही सायकल आपण आपल्या ताब्यात घ्यायची व काम झाल्यावर जवळच्याच सायकल स्टॅण्डवर ठेवून जायची. त्यामुळे पर्यावरणाला तर फायदा होतोच त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेवरचा ताणही हलका होऊ शकतो. लोकांचा या निमित्ताने व्यायाम होईल, तो वेगळाच. आज मुंबईत अशा अनेक जागा आहेत जिथून आपल्याला केवळ चालत वा जवळच्या अंतरासाठी या सायकली वापरता येऊ शकतील. मी चारकोप इथे राहाते, अशा प्रकारची सायकल सेवा जर आपल्याकडे आणली तर मी बोरिवली किंवा कांदिवली स्थानकापर्यंत सायकलने जाऊन पुढे कॉलेजला सहज जाऊ शकेन. यासाठी स्वस्तात चांगल्या दर्जाच्या आणि स्टायलिश सायकल उपलब्ध केल्या पाहिजेत. त्याच जुन्या पद्धतीच्या सायकल वापरण्यास आजची आमची पिढी कधीही तयार होणार नाही. यामुळे इंधनाची बचत तर होईलच आणि ट्रॅफिकही कमी होईल. – शामली राऊळ, कॉलेज विद्यार्थी

बससाठी स्वतंत्र मार्गिका हव्यात!

मुंबईला पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे, असं आपण म्हणत असतानाच इतर पर्यायांचाही विचार करायला हवा. त्यातही सध्या रस्ते व रेल्वे मार्गाच्या माध्यमातून जी आपली मुख्य वाहतूक व्यवस्था आहे तिच्यातली आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. आता सध्या मेट्रोला जो प्रतिसाद मिळतोय तो पाहाता आपल्याला ती फार चांगली वाटत असली तरी सध्या ती मुंबईतल्या सर्वात गर्दीच्या दोन टोकांवर चालतेय हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी जितका वेळ व पैसा खर्च झाला ते पाहता सर्वच मार्गावर ते शक्य होईल, असं वाटतं नाही. साधारण एक मेट्रो तयार व्हायला सहा ते सात वर्षाचा वेळ गृहित धरला, जसं मुंबई मेट्रोच्या बाबतीत झालं तर इतके दिवस आपण काय करायचं, याचाही विचार केला पाहिजे. सध्या कमीत कमी खर्चात चांगली वाहतूक व्यवस्था आपल्याकडे अमलात येईल, त्याचाही विचार करायला पाहिजे. आपण सर्व पर्यायांचा विचार करतो. मात्र, रेल्वेला समकक्ष असलेल्या रस्त्यांवर जर बससाठी वेगळी स्वतंत्र मार्गिका जर आपण आणू शकलो, तर त्याने बस वाहतूक अधिक सुरळीत व वेगवान होऊ शकेल. रेल्वे मार्गाशी समांतर असलेल्या रस्त्यांवरच्या या मार्गिका आपल्याला रेल्वेत काही गडबड झाल्यास त्या काळातही अगदी सहज वापरता येऊ शकतील. त्याचबरोबर आपण रेल्वे ऑन टायर या संकल्पेकडेही पुरेसे गांभिर्याने पाहिले नाही. त्यामुळे एकाच फेरीत वा एकाच वेळेस अनेक प्रवाशांना एकीकडून दुसरीकडे सहज घेऊन जाता येईल, असे मला वाटते. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी पर्यायी मार्गाचा विचार करण्याबरोबरच सध्या उपलब्ध असलेल्या मार्गावर अधिक प्रभावी असे बदल करण्याचा विचार करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. नव्या तंत्राचा वापर जरुर करावा. मात्र, त्याचबरोबर सध्याच्या व्यवस्थेलाही नव्या तंत्रांच्या वापराने अधिक प्रभावी करायला हवं, असं मला वाटतं. – अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

नियोजनबद्ध वाहतूक पर्याय हवेत!

मुंबईचा विस्तार दिवसेंदिवस अफाट वाढतो आहे. त्यामुळे इथे आणखी सशक्त वाहतूक व्यवस्थेची गरज आहेच. पूर्वी लोकल रेल्वेशिवाय कोणतीची भरवशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोकांना उपलब्ध नव्हती. मात्र, आता नव्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही मेट्रोचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार करणं हा पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी अजून एक उपाय आहे. मेट्रोमुळे सध्या अंधेरी-घाटकोपर-वर्सोवा भागातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षणीयरीत्या कमी झालेला आहे. दोन महिन्यांपूर्वी हेच चित्र वेगळं होतं. त्यामुळे मेट्रोचं जाळं अजून विस्तारलं तर नक्कीच रस्त्यावरील वाहतुकीची गर्दी व ताण कमी होईल. वाहनांची संख्या अतोनात वाढलेली आहे. प्रवाशांच्या वाहतुकीच्या संदर्भातील समस्याही वाढलेल्या आहेत. या सर्व समस्यांना मेट्रोचा विस्तार झाल्यावर आपोआपच विराम मिळेल. जगातील कित्येक मोठया शहरांत अशा प्रकारे अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण केल्यावर वाहतुकीवरील ताण कमी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मुंबईतही असं होऊ शकतं. मेट्रोचा आवाका वाढला तर मुंबईतील रस्त्यांवरील अपघातांची संख्या, प्रदूषण कमी होईल. तसंच मोठया प्रमाणात इंधन व वेळेची बचतही होईल. मेट्रो रेल्वे मुंबईच्या इतर वाहतूक व्यवस्थांशी चांगल्या प्रकारे जोडली गेलेली आहे, अशाच प्रकारे भविष्यातील इतर कोणतीही नवी वाहतूक व्यवस्था ही सुसंगतरीत्या नियोजनबद्ध पद्धतीने इतर मार्गाशी जोडली गेलेली पाहिजे. – प्रवक्ता, एमएमओपीएल

ट्रामचाही विचार व्हायला हवा!

मुंबईच्या दळणवळणात सुधारण होण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार व्हायलाच हवा, त्याच बरोबर आधी वापरण्यात आलेल्या पर्यायांच्या व त्यांच्या उपयुक्ततेचाही विचार करायला हवा. शेवटी मुंबई ही सात बेटांचं शहर आहे. आपण भरावावर किती इमले बांधायचे व त्याचे पुढे काय होणार, याचाही विचार आपण करायला पाहिजे, असं मला वाटतं. आता तंत्रामध्ये बराच बदल झाला आहे. त्याचा वापर करून आधी वापरण्यात आलेल्या ट्रामचाही विचार करायला हवा, असं मला वाटतं. एक तर ट्राम ही अधिक सुरक्षित आहे. ती सरळ रेषेत जाते. त्याचबरोबर ट्रामच्या बरोबरीने रस्त्यावरचं ट्रॅफिकही सुरुच राहातं. तुलनात्मक दृष्टीने तो एक स्वस्त पर्याय आहे, असंही आपल्याला म्हणता येईल. त्यासाठी फार मोठं बांधकाम, बरीच मोठी यंत्रणा काही उभारावी लागत नाही. आम्ही गिरगावातली मंडळी आजही ट्रामच्या आठवणी काढतो. आज गिरगावातून कुलाब्याला जायला चांगली वाहतूक व्यवस्था नाही. बसने वा ट्रेनचा वापर करुनही सहजपणे आपण कुलाब्यात किंवा इतर ठिकाणी पोहोचू शकत नाही. ट्राम तुलनेने कमी वेगात जरी जात असली तरी सध्याच्या वाहतूक व्यवस्थेइतकाच तिचाही वेग असेल, असं मला वाटतं. ट्राम ही मुंबईच्या जीवनाची एक अविभाज्य घटक होती. अनेकांनी आपल्या आठवणीत या ट्रामचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा शेवटची ट्राम आपल्या प्रवासाला निघाली होती त्यावेळी गिरगावकर मंडळींनी या ट्रामला मानवंदना दिली होती. आजही अनेक विभागांमध्ये जर ट्राम सुरू झाली तर तिच्याही स्वागतासाठी अशीच मानवंदना दिली जाईल, असा मला विश्वास आहे. – दीपक वेलणकर, वृत्तनिवेदक व व्हॉईसगुरू

वाहतूक व्यवस्थेवर ताण जास्त!

निश्चितच मुंबईकरांना पर्यायी वाहतूक व्यवस्था हवीच आहे, किंबहुना तिची नितांत गरज आहे. आता मेट्रो व मोनोरेल सुरू झालीय खरी. पण, कितीजणांना त्याचा फायदा होतोय, हे पाहण्यासारखं आहे. अगदी मेट्रो-मोनोरेलची स्टेशन्स सोडून बाकीच्या विभागांमध्ये जाणारा जो सर्वसामान्य मुंबईकर आहे तो तर इतर वाहनांनीच जाणार ना.. मग त्याच्यासाठी नवे पर्याय हे हवेच आहेत. आता त्यामध्ये काय करता येईल, यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारनं विचार करावा. आम्ही आमच्या परीनं वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करतोच आहोत. आम्ही गेल्या वर्षी ‘स्मार्ट मुंबईकर’ नावाची मोहीम सुरू केली. मुंबईकर प्रवाशांच्या अडचणी ओळखूनच आम्ही ही मोहीम सुरू केली. मुंबईकरांना टॅक्सी, रेल्वे, बस, रिक्षा अशा अनेक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. तरीही इथल्या प्रत्येक वाहतूक व्यवस्थेवर ताण पडलेला आहे. ऑफिस सुटायच्या किंवा सकाळच्या वेळी तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सी घेण्याचा प्रयत्न करून पाहा, तुम्हाला अजिबात रिक्षा, टॅक्सी मिळणार नाही. दुसरीकडे बसला लांबच लांब रांग असते. अशा परिस्थितीत वाहन उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही ही शेअर ऑटो व टॅक्सीची योजना संकल्पना सुरू केली. जेणेकरून तुम्ही एकटेच प्रवास करत असाल तर तुमच्या रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये इतर सहप्रवासी घेता येतील. त्यांनाही याचा फायदा मिळेल. शिवाय यामागे आम्ही प्रदूषण व ट्रॅफिक जॅम कमी करण्याचाही विचार केला. मागे कारपुलिंगची संकल्पना देखील आली होती. मात्र, त्यामध्ये मर्यादा पडतात. खासगी कार असल्याने आपण फक्त ओळखीच्याच लोकांना किंवा अत्यंत विश्वासू वाटणा-या लोकांनाच कारमध्ये घेऊ शकतो. पण शेअर टॅक्सी-ऑटोमध्ये तसं नाही, त्या सार्वजनिक असल्याने सर्वासाठीच उपलब्ध आहेत, पण हे प्रयत्न आपल्यासारख्या मुंबईकरांना करावे लागतायत, याचाच अर्थ अजून वाहतुकीच्या साधनांची गरज आहे. परंतु, नवी वाहतूक व्यवस्था निर्माण करताना सरकारने खूप जास्त पैसै खर्च करू नये, नाहीतर मोनोरेलसारखा तोटा व्हायचा. शिवाय, मुंबईकर प्रवाशांनाही उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त योग्य तऱ्हेने वापर करणं शिकलं पाहिजे. – रक्षित सेठी, संस्थापक, स्मार्ट मुंबईकर

पर्यायी वाहतुकीचा विचार बेस्टच्या विचाराधीन!

सध्या मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न मोठा जटिल आहे. त्यासाठी बेस्ट प्रशासनसुद्धा प्रयत्नशील आहे. सध्या मेट्रोला समांतर काही बसचे वाहतूक मार्ग सुरू आहेत. इतर पर्यायांचा आम्ही विचार करत आहोत. कारण या सगळ्या प्रोजेक्टचं काम सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू असतं. त्यामुळे त्याविषयी अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही. – जनसंपर्क अधिकारी, बेस्ट

संकलन

राजेश शिरभाते

शब्दांकन

विशाखा शिर्के, प्रतीक्षा चौकेकर,
श्रद्धा पाटकर-कदम, तृप्ती राणे, अक्षय देठे

1 COMMENT

  1. वरील सर्वांशी मी सहमत आहे, वाहतुकीची कोंडी फुटली पाहिजे, सायकल हा एक उत्तम आणि चांगला उपाय असू शकतो, त्यामुळे इंधन बचत , प्रदूषण सारख्या गोष्टीला आळा , सायकल चालवून मिळणारा व्यायाम उत्तम आरोग्य देऊ शकते
    ट्राम हा उपाय आहे पण सध्याच्या रस्त्याची अवस्था पाहता ते शक्य होईल असा वाटत नाही …
    पण मेट्रो हा त्यावर एक उत्तम उपाय ठरू शकतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version