Home क्रीडा आयपीएल मुंबईसमोर सांघिक कामगिरी उंचावण्याचे आव्हान

मुंबईसमोर सांघिक कामगिरी उंचावण्याचे आव्हान

0

माजी विजेत्या मुंबई इंडियन्सला आठव्या मोसमाची सुरुवात झोकात करता आलेली नाही.

अहमदाबाद- माजी विजेत्या मुंबई इंडियन्सला आठव्या मोसमाची सुरुवात झोकात करता आलेली नाही. तिस-या लढतीत मंगळवारी (१४ एप्रिल) त्यांची गाठ फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सशी पडेल.

अपयशी मालिका खंडित करायची असल्यास सरदार पटेल स्टेडियमवर मुंबईला सर्व स्तरांवर कामगिरी उंचवावी लागेल.

गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अपयशी सलामीनंतर घरच्या मैदानावर मुंबईची कामगिरी बहरेल, असे वाटले.

मात्र किंग्ज इलेवन पंजाबविरुद्ध  ‘होम ग्राऊंड’वर त्यांनी चाहत्यांना निराश केले. ढेपाळलेली फलंदाजी मुंबईच्या सलग पराभवांचे प्रमुख कारण आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि कोरी अँडरसनला सातत्य राखता आले नाही. आरोन फिंच, आदित्य तरे आणि अंबाती रायडू चुकांमधून बोध घ्यायला तयार नाहीत.

वानखेडे स्टेडियमवर रविवारी शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला. मात्र त्याचे श्रेय अष्टपैलू हरभजन सिंगला जाते. तळातील एखादा फलंदाज खेळून सातत्याने जिंकता येत नाही, हे मुंबईला कधी कळणार? विजयासाठी आघाडी आणि मधली फळी बहरणे, आवश्यक आहे.

राजस्थानची गोलंदाजी नियंत्रित असल्याने मुंबईच्या फलंदाजांची मंगळवारी परीक्षा असेल. मुंबईच्या गोलंदाजीतही आलबेल नाही. वेगवान लसित मलिंगाला आता प्रतिस्पर्धी फलंदाज घाबरत नाहीत.

देशांतर्गत स्पर्धेत प्रभावी ठरलेल्या मध्यमगती आर. विनय कुमारला अचूक मारा करता आलेला नाही. ऑफस्पिनर हरभजन सिंगही निष्प्रभ ठरतो. मुंबईकडे दुस-या फळीतही चांगले गोलंदाज नसल्याने अंतिम षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाज वरचढ ठरताहेत.

राजस्थान रॉयल्सने सुरुवातीच्या दोन्ही लढती जिंकत आश्वासक सुरुवात केली. नियोजित कर्णधार शेन वॉटसनच्या अनुपस्थितीतही सांघिक कामगिरीत सातत्य राहिले. अष्टपैलू जेम्स फॉकनर आणि दीपक हुडाने विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र रॉयल्सलाही फलंदाजीत सुधारणा आवश्यक आहे.

सलामीवीर अजिंक्य रहाणेने (२ लढतींमध्ये ४७ धावा) थोडी चांगली फलंदाजी केली तरी हंगामी कर्णधार स्टीव्हन स्मिथ (२ लढतींमध्ये ४३ धावा) तितका बहरात नाही. करुण नायर (२ सामन्यांत २८ धावा), संजू सॅमसन (२ लढतींमध्ये १६ धावा) आणि स्टुअर्ट बिन्नी (२ लढतींमध्ये १४ धावा) फॉर्मच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबईचा स्वैर मारा त्यांना फॉर्म मिळवून देऊ शकतो. कर्णधार वॉटसन खेळल्यास राजस्थानची फलंदाजी मजबूत होईल. राजस्थानचे गोलंदाज मात्र फॉर्मात आहेत. वेगवान जेम्स फॉकनरसह (३ विकेट) टिम साऊदी, ख्रिस मॉरिसने (प्रत्येकी २ विकेट) अचूक मारा केलाय. त्यांना प्रदीप हुडा, प्रवीण तांबे आणि धवल कुलकर्णीची चांगली साथ मिळतेय.

यंदाच्या मोसमातील सुरुवातीची कामगिरी पाहता मुंबईविरुद्ध राजस्थानचे पारडे जड वाटते. मात्र फलंदाजी बहरली तर मुंबईला गुणांचे खाते उघडण्याची संधी आहे.

वेळ : रा. ८ वा. थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स.

झहीर, शामी दुखापतग्रस्त

नवी दिल्ली- दुखापतींनी डोके वर खाल्ल्याने अनुभवी मध्यमगती गोलंदाज झहीर खान आणि त्याचा सहकारी मोहम्मद शामी पुढील काही लढतींमध्ये दोघेही खेळू शकणार नसल्याचे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ व्यवस्थापनातर्फे सोमवारी सांगण्यात आले.

झहीरला स्नायू दुखापतीचा तसेच शामीला गुडघा दुखापतीचा त्रास जाणवत आहे. पाचव्या लढतींपूर्वी झहीर तंदुरुस्त होईल, असा विश्वास दिल्लीचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केलाय. मात्र शामीच्या पुनरागमनाचा कालावधी त्यांनी स्पष्ट केलेला नाही.

दिल्ली डेअरडेव्हिल्सची तिसरी लढत बुधवारी (१५ एप्रिल) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर किंग्ज इलेवन पंजाबशी पडेल. पहिल्या दोन लढतींमध्ये दिल्लीला पराभव पाहावे लागले आहेत.

ढेपाळलेली मुंबई 

दोन लढतीत केवळ तीन अर्धशतके.

  • आदित्य तरे – २ लढतींमध्ये १४ धावा.
  • आरोन फिंच आणि अंबाती रायडू – २ लढतींमध्ये प्रत्येकी १३ धावा.
  •  कीरॉन पोलार्ड – २ लढतींमध्ये २० धावा.
  •  रोहित शर्मा – २ लढतींमध्ये ९८ (सर्वाधिक नाबाद ९८).
  •  कोरी अँडरसन – २ लढतींमध्ये ६० धावा (सर्वाधिक नाबाद ५५).
  •  लसित मलिंगा – २ लढतींमध्ये २ विकेट.
  •  आर. विनय कुमार आणि प्रग्यान ओझा – दोन्ही लढतींमध्ये विकेट नाही.
  •  हरभजन सिंग – २ सामन्यांत ३ विकेट.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version